सध्या मला एक मोठाच प्रश्न सतावीत आहे मला. सर्वच बाबतीत असे नाही पण बऱ्याच बाबतीत मला कोणतीच बाजू ठामपणे घेता येत नाही. सगळ्यांचे सगळे बरोबरच वाटते आणि त्याचबरोबर चुकीचेही वाटते. आता सैफ-करीना ने आपल्या मुलाचे नाव तैमूर ठेवले त्यावरून एवढा गदारोळ माजला. सुरुवातीला मला पण थोडे विचित्र वाटले पण मग मी विचार केला की माझ्या मुलाचे नाव ठेवताना ना मी आई- वडिलांना विचारले ना सासूसासऱ्यांना मग सैफ-करीना ने काय म्हणून जनतेचा विचार घ्यावा (किंवा करावा)??? हेही पटले. पण तरीही तैमूर नाव ठेवायला नकोच होते हे ही पटले. आता पहिल्या विचाराचे पारडे किंचित जड होते हे मी नाकारणार नाही पण तरीही दोन्ही बाजू आपापल्या परीने बरोबरच वाटल्या.
माझा एक मित्र अविकसित देशांमध्ये खेडोपाडी फुकट इंटरनेट कसे देता येईल ह्यावर संशोधन करतो. त्याच्या फेसबुक पोस्ट्स पहिल्या की भारावल्यासारखे वाटते. त्यामुळे खेडोपाडी इंटरनेट सुविधा सहजपणे आणि शक्यतोवर फुकट उपलब्ध व्हावी हे मला पटते. पण त्याचबरोबर नेट न्यूट्रॅलिटी आवश्यक आहे असेही वाटते. आता थोड्याफ़ार संशोधनानंतर आणि प्रयत्न केल्यानंतर ह्या दोन्ही गोष्टी शक्य आहेत पण प्रत्येक प्रश्न असा सुटेलच असे नाही ना!!!
बंगलोरच्या विनयभंग प्रकरणानंतर स्त्रियांना दोष देणारे लोक पहिले आणि प्रचंड संताप आला. स्त्रियांवर विविध प्रकारे बंदी घालणे हे चूकच. पण थोडा विचार केला आणि मला जाणवले की मी स्वतःसुद्धा मला स्वतःला जपूनच असते. साधारण काळ-वेळ, कुठे जातोय, बरोबर कोण आहे ह्याचे भान ठेवूनच कपडे घालते. विनयभंग करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे हे खरेच, स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर बंदी येऊ नये हेही खरे पण जोवर असे प्रसंग सतत घडत आहेत तोवर स्त्रियांनी स्वतःला जपणे महत्वाचे हेही खरेच.
आमिर खानचा दंगल खूप आवडला. त्यामध्ये गीताच्या कोचचे पात्र जरा खटकले. कोचची उगीचच बदनामी झाल्यासारखे वाटले. पण त्याचबरोबर दर्शकांनी चित्रपट पहाताना थोडा विचार करावा असेही वाटले. सगळेच प्रसंग खरे आणि तंतोतंत असतील तर तो सिनेमा न होता डॉक्युमेंटरी होईल. त्यामुळे मनोरंजन करणारे काही प्रसंग चित्रपटात टाकले जातातच. असे असले तरी गीताच्या खऱ्या आयुष्यातील कोचबद्दल थोडेसे वाईटसुद्धा वाटले.
ब्रिटनमध्ये ब्रेक्सिट झाल्यावर विविध माध्यमांमध्ये भरपूर चर्चा घडल्या सर्व चर्चा मी वाचत होतेच. तेव्हा कधी ब्रेक्सिटच्या बाजूने बोलणाऱ्यांचे पटायचे कधी विरुद्ध बाजूने बोलणाऱ्यांचे पटायचे. ब्रिटनने युरोपियन युनियनमध्ये रहाणे फ्री ट्रेड वगैरेच्या दृष्टीने महत्वाचे आहे हे जरी खरे असले तरी युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्यासाठी इतर युरोपियन देशांमध्येसुद्धा काही राजकीय पक्ष प्रयत्नशील आहेतच की. अर्थात ब्रेक्सिटचा निर्णय चूक की बरोबर हे येणारा काळ ठरवेलच पण तोवर ह्या दोन्ही बाजू आपपल्या परीने मला बरोबर वाटत रहातीलच.
असेच माझ्या मनामध्ये विविध विषयांवरचे द्वंद्व सतत चालूच असते कधी एक बाजू पटते मग दुसऱ्या बाजूचा विचार केला की ती बाजूसुद्धा पटते. एकाद्या बाजूचे पारडे जाड झाले की मग मी ठरवते की हा विचार आपल्याला पटतो आहे. मग फारच हिय्या करून कधी सोशल मीडिया पोस्टस मधून किंवा इतरांच्या लेखांवर दिलेल्या प्रतिक्रियांमधून मी व्यक्त होते. पण विरोधात असलेल्या व्यक्तीला माझी मते मलाच पटवून देता येत नाही कारण कुठेतरी दुसरी बाजूसुद्धा पटतच असते. कधी कधी वाटते आपला अभ्यास कमी पडतो म्हणून आपल्याला ठामपणे काही पटत नाही. पण एखाद्या विषयावर जितके वाचन मी करते, जितक्या चर्चा मी ऐकते आणि करते तितक्या जास्त प्रमाणात दोन्ही बाजू पटायला लागतात.
हल्ली सोशल मीडियाच्या प्रसारामुळे लोक खूप छान व्यक्त व्हायला लागलेली आहेत आपली मते खुलेपणाने ठामपणे मांडत आहेत. हा बदल खूपच स्वागतार्ह असला तरी सरसकटीकरण आणि आणि शिक्के मारणेसुद्धा वाढत चालले आहे त्याबद्दल फार वाईट वाटते. मोंदीविरोधात बोलले की काँग्रेसी आणि मोंदीचे कौतुक केले की भाजप्ये. पण भारतीय हा शिक्का अस्तित्वातच नाही. स्त्रियांच्या बाजूने बोलले की स्त्रीवादी. थोडी पुरुषांची बाजू घेतली पुरुषप्रधान संस्कृतीची द्योतक. पण माणूस हा शिक्का कुठे आहे?? ट्रम्प महाशयांचे एखादे भाष्य थोडे जरी पटायचा अवकाश; मग शिक्क्यांना अंतच नाही. अशा वेळेस माझ्यासारख्या कुंपणावर घुटमळणाऱ्या व्यक्तीला व्यक्त होणे फारच कठीण जाते.
अशा वेळी एकच प्रश्न पडतो: कोणतीच बाजू ठामपणे घेता न येणे ही माझ्यात असलेली उणीव आहे की नाण्याला दोन बाजू असतात त्या पाहता येणे हे माझे कौशल्य आहे???