एखाद्याच्या व्यक्तीमत्त्वातच असं काहीतरी असतं की त्याची समोरच्यावर लगेच छाप पडते. कोणाची उंची छान असते, काही लोक दिसायलाच खूप छान असतात, कोणाचं हास्य अगदी मनमोहक असतं तर काहीजणांचा आवाजच चक्क मृदू असतो म्हणे! मृदू, म्हणजे नुसता गोड आवाज नाही… गोडही आणि शिवाय हळूवार आणि तलम असाही! म्हणजे अगदी विविधभारतीवरच्या निवेदकांचा असतो तसा (कोणतेही एफेम चॅनेल नाही हां, विविधभारतीच. बाकी एफएम चॅनलवरचे ते आरजे आणि मृदू आवाज यांचा काहीच संबंध नाही. तर ते असो.) असं म्हणतात, की असा गोड आवाज ऐकून समोरची व्यक्ती खुश होऊन जाते म्हणे, तिला आपण खूप स्पेशल आहोत वगैरे असंही वाटायला लागतं म्हणे.. आणि ती व्यक्ती असा गोड आवाज ऐकून काहीही करायला तयार होऊ शकते म्हणे- म्हणजे नजरेचा कटाक्ष असतो ना, तसा मृदू आवाजाचाही ईफेक्ट असतो म्हणे!
हो, म्हणेच. कारण मृदू आवाज आणि माझा काहीच संबंध नाहीये ना! माझा आवाज चांगला खणखणीत आहे, त्यामुळे माझ्या आवाजामुळे फार तर, “कोण बोलतंय ते तिकडे इतक्या जोरात? ओ शुक शुक… जरा आवाज कमी करा…” इतकाच ईफेक्ट होतो!
पण असा मृदू आवाज असणारे लोक असतात… अगदी आपल्या आसपास. निसर्गाचा एखादा चमत्कार पाहून आपण जसे थक्क होतो तसेच हे मृदू आवाजवाले लोक दिसले की मला होतं!
मी जेव्हा नोकरी करत होते, तेव्हाची गोष्ट. तिथल्या ऑफिसमध्ये एक विवक्षित जागा होती.. तिथे आपल्या क्यूबिकलमध्ये बसून न बोलता येणार्या गोष्टी फोनवरून बोलता यायच्या. म्हणजे, तुम्ही ओळखलं असेलच- ती खास कुचकुच करण्याची जागा होती. तिथे ऑफिसातल्या काही कन्यका त्यांच्या ठरलेल्या वेळेला यायच्या आणि मोबाईल कानाला चिकटवून कुजबूज करायच्या. आता म्हणाल, तर ही जागा तशी सार्वजनिक वहिवाटीची होती, आणि तिथेच तो कोपरा होता.. सो, मुली कुजबूज करत असताना, कोणेहे ’सहज म्हणून’ त्यांच्या शेजारून त्यांना संशय न येता चक्कर मारू शकायचं. पण ह्या कन्या एकतर बोलण्यात इतक्या दंग असत, की शेजारून कोणी गेलं तरी त्यांना गंधवार्ताही नसे (- त्यांचं तोंड ऑलमोस्ट त्या फोनच्या आत असायचं!) त्यामुळे त्या उभा राहिल्या की कुतुहल म्हणून अनेकदा मी त्यांच्याशेजारून ये-जा करायचे. पण या मुली हळू बोलण्यात अशा तरबेज! इतक्यांदा त्यांच्या शेजारून जाऊनही एक शब्द मला ऐकू आला असेल तर शपथ! जाम हेवा वाटायचा मला! आता तुम्ही म्हणाल, की बाई तू कशाला त्यांचं बोलणं ऐकायला जात होतीस? तर अहो, मला त्या कोणाशी आणि काय बोलतात याच्याशी काही घेणंदेणं नव्हतं. मला फक्त त्या ’कशा’ बोलतात हे जाणून घेण्यात इन्टरेस्ट होता.
तरी ह्या मुली बाहेर तरी यायच्या क्यूबिकलच्या.. असेही काही सहकारी होते जे माझ्या शेजारी बसायचे, तरीही ते फोनवर काय बोलत हे मला कळायचं नाही! त्यांचा फोन नेहेमी सायलेन्टवर असल्यामुळे, त्यांना फोन आला कधी, त्यांचं बोलणं झालं कधी, फोन ठेवला कधी- पत्ता म्हणून लागायचा नाही!
आणि या उलट माझी गत! आमच्या ऑफिसमध्ये मी अगदी कोपर्यात बसत होते. एकदा एक मैत्रिण भेटायला येणर होती. तिला मी सांगितलं होतं, की बिल्डिंगपाशी खाली आलीस की फोन कर. मग मी तुला सांगेन कुठे, कसं यायचं ते. पण नेमकं काय झालं, की ती आली तेव्हाच मला माझ्या साहेबांचा फोन आला आणि मी त्यांच्याशी बोलत होते. त्यामुळे हिनं खालून फोन केला तेव्हा माझा फोन लागला एन्गेज. तर ही बया ’आपण अपापलंच शोधू’ असं म्हणत जिना चढली आणि थेट माझ्या समोरच दत्त म्हणून येऊन उभी! मला काही कळलंच नाही. मी एक सेकंद बावचळलेच!
"काय गं, अशी कशी अचानक उगवलीस? कशी काय सापडले मी तुला?"
त्यावर ही माझी मैत्रिण कुचकटपणे हसत म्हणाली,"अगं सोपं होतं, तू फोनवर बोलत होतीस ना, तुझ्या आवाजाचा माग काढत आले!"
अक्षरश: तीळपापाड झाला माझा! पण बसले हात चोळत! काय करणार? खरं होतं ना ते! तरी मी बॉसशी बोलत होते, त्यामुळे तेव्हाची आवाजाची पट्टी अदबशीर, पोलाईट लेव्हलची होती! आईशी, बहिणीशी, किंवा अजून एखाद्या मैत्रिणीशी बोलत असते, तर काय झालं असतं, कल्पना करा!
हे माझं होतंच हं पण.. आपल्याला फोन आलाय, किंवा आपण कोणालातरी फोन केलाय ह्याची उगाचच एक्साईटमेन्ट इतकी असते, की काय बोलू आणि काय नको असं होतं आणि अलगद आवाजाची पट्टी चढते! खिदळत असताना, एखाद्या बातमीची देवाण-घेवाण करत असताना आवाज लहान कसा काय ठेवायचा असतो बुवा? छे! इम्पॉसिबल आहे!
पण त्यावरून मला कित्ती टोमणे ऐकून घ्यावे लागतात माहित्ये? हे नमुने ऐका-
“तुला फोनची तरी काय गरज आहे मध्ये? साधारण पाच किलोमीटरच्या परिसरात तुझा आवाज थेट पोचत असेल ना?”
“तू ना, सुगम संगीत वगैरे शिकू नकोस, थेट ओपेरा सिंगींग सुरू कर.. त्यात तुझ्यासारख्या मोठ्या आणि मोकळ्या आवाजाच्या बायका मस्त गातात अगं, तीही एक कलाच आहे..”
“आवाज दो कहां हो?” हे गाणं तुझ्यासाठी कोणी म्हणलंच नसेल ना? तू आणि तुझा आवाज जिथे असाल तिथे सापडालच आपोआप, नाही का?”
असे अनेक…
माझ्या लाडक्या मुलाच्या अभ्यासाची गत तर काय सांगावी? इतका मोठा झाला तरी त्याची अभ्यासाची टंगळमंगळ चालूच असते. एरवी शक्य तितकं मी दुर्लक्ष करते, पण परिक्षांच्या दिवसात मात्र माझा संयम संपतो. परिक्षा पंधरा दिवसांवर आली तरी चिरंजीव निवांतच असतात. मग मात्र मला राहवत नाही. माझी रसवंती सुरू होते..म्हणजे शास्त्रीय गायकांप्रमाणे मी होते सुरू ती अगदी मंद्र सप्तकात विलंबित लयीमध्ये. पण हळूहळू आवाजाची भट्टी अशी काही जमते की काय सांगू.."अरे नुसता बसला काय आहेस? अभ्यासाचं पुस्तक हातात तरी धर. असं शांत बसून कसं चालेल अरे? आयुष्यात काही करायचं असेल, तर अभ्यास करायला नको का? (इथे आवाज एक पट्टी वर) तुला ना फक्त टीव्ही पहायला हवा, खेळायला हवं.. (दोन पट्ट्या) ते काही नाही, आजपासून सगळं बंद. फक्त अभ्यास एके अभ्यास. आणि उगाच कटकट करू नकोस.. मी काहीएक ऐकणार नाहीये सांगून ठेवत्ये.. मित्र-बित्र सगळे बंद.. कळतंय की नाही काही? (परमोच्च बिंदू)"
असं बरंच ऐकून झाल्यावर तो शांतपणे म्हणतो, "आई हो, मी करेन अभ्यास, पण हळू जरा. तुला खोकला होईल. पाणी देऊ का तुला?” म्हणजे त्यालाही त्याच्या अभ्यासाची चिंता नाही, तर माझ्या मोठ्या आवाजाची!
मग एक दिवस मी ठरवलं, अगदी गोड, हळू बोलायचं (किमान फोनवर तरी). जमलंच पाहिजे, नाही म्हणजे काय? असं हळू बोलायचं की ह्या कानाचं त्या कानाला ऐकू येता कामा नये! गोड, लाडिक, मऊ आवाजात बोलायचं. (तसं तर, कमी बोलायचं असंही मी अनेक वेळा ठरवलंय. पण ऐन वेळी मी ते विसरते, त्यामुळे बोलायचं, पण गोड आवाजात असा रिव्हाईज्ड संकल्प मी सोडला.) मी असं ठरवलं आणि मिस्टरांचा फोन आला! म्हटलं, आता ह्यांना चकितच करू. एरवी येताजाता मला टोमणे मारत असतात माझ्या आवाजावरून! आता बघाच! तर, अगदी गोड आवाजात बोलायला लागले. दोन वाक्य होतात न होतात, तोवर ह्यांनी विचारलं, "तुझा आवाज असा खोल का गेलाय? बरं नाही वाटत आहे का?" डोंबल! खोल? म्हणजे बघा, मी गोड आवाजात बोलत्ये, तो त्यांना आजारी आवाज वाटला! हाय रे कर्मा! तरी, मी तसंच बोलणं रेटलं.
"अं? काय बोलत्येस? मला काही ऐकायला येत नाहीये.." माझ्या हळू आवाजामुळे त्यांचा आवाज तिकडे चढला!
इतकं ऐकूनही मी अगदी धीराने घेत होते. तसंच, त्याच पिचमध्ये बोलणं पुढे ढकललं. मग मात्र ते वैतागले.."अगं काय चाल्लंय हे? नीट बोल की हडसून खडसून नेहेमीसारखी.. हे काय कानाला गुदगुल्या केल्यासारखं चाल्लंय मगापासून?"
अखेर मी माझं गुपित फोडलं. "मी किनई मृदू आवाजात बोलण्याची सवय करत्ये.."
“काय???” असं ओरडतच हे तिकडून खदाखदा हसायला लागले! “कोणी भरवलं हे नवं खूळ डोक्यात? अगं आपल्याला झेपतील अशी कामं करावीत. हे म्हणजे अमिताभ बच्चनने ’आता मी एकही जाहिरात करणार नाही’ असं म्हणण्यासारखं आहे. जमणार आहे का त्याला? आणि तुलाही? काही नको.. तुझा आहे तो खणखणीत आवाजच बराय.. हे असलं काही शोभत नाही तुला.. तुझ्या दणदणीत आवाजाची इतकी सवय झालीये, की फोनवरून माझ्या शेजारी बसणार्या मनोजलाही सगऽळंऽ कळतं आपण काय बोलतो ते.. तू अशी पुटपुटत बोलायला लागलीस, तर मला त्याला वेगळं सांगत बसायला लागेल..ते तसं नको.. नेहेमीच्या वरच्या पट्टीत येऊदे.."
म्हणजे बघा, हे असं असतं.. मोठ्याने बोलले, तर हळू बोल. हळू बोलले, तर जोरात बोल. त्या कुचकुच करणार्या मुलींना धीर करून विचारायचं राहिलंच… की कसं काय जमवता हे? तुम्ही जे बोलता ते तिकडे नीट पोचतं का? तिकडून ’आं? आं?’ करत नाही का कोणी? केलं तरी तुम्ही मृदू आवाजातच बोलत राहू शकता का? तुम्ही हळू आवाजात जे सांगता त्याप्रमाणे होतं का? तुमच्या मनासारखं झालं नाही तरी तुम्ही मृदूच बोलता का? तेव्हा तरी आवाज चढतो का? तुमचे आवाज कधीही चढू नयेत, नेहेमी मऊ, मृदू रहावेत म्हणून कोणतं औषध, जडी-बूटी आहे का? तर मलाही एकदा सांगाच. मलाही शिकवा ही मृदू आवाजात समोरच्यावर छाप पाडायची कला! शिकवाल ना? प्लीज!