साहित्यः-
२ वाट्या कणीक (जाडसर असेल तर उत्तम),
१ वाटी तूप,
१ वाटी अगदी बारीक चिरलेला/ किसलेला गुळ
वेलची /जायफळ पूड
थोडसं दुध
(optional) वरील प्रमाणाला प्रत्येकी १ टे.स्पु.
तळलेला डिंक पूड करून,
सुकं खोबर भाजून पूड करून,
ड्रायफ्रुट पावडर
खसखस भाजुन पुड करुन
कृती:-
एकदम सोप्पी कृती आहे. सगळी तयारी करुन हाताशी ठेवा.
जाड कढईत तुपात अगदी मंद आचेवर कणीक भाजायला घ्या. सतत कालथ्याने हलवुन भाजत रहायला हवी, खमंग वास आला रंग बदलला की मग दुधाचा हबका (जसा लाडू करताना बेसन भाजल्यावर) मारा. याने कणीक रवाळ होईल.
गॅस बंद करा. आता कणीक गरम असताना त्यात बाकिचे जिन्नस घाला. चांगलं मिक्स करुन वड्या थापा (ही स्टेप फु प्रो वापरुन सोप्पी होते).
अधिक टीपा:-
१)गुळ पावडर वापरण्यापेक्षा ढेप किसून/बारीक चिरून घालायचा रंग आणि चव मस्त येते, वडया चांगल्या पडतात.
२)यात नाचणी पीठ, बेसन अशी मिक्स पीठं पण वापरता येतील. मिक्स पीठ पाव भाग घ्या (फोटोतल्या वड्यांमध्ये नाचणी पीठ मिक्स आहे) (काजु फोटो काढण्यापुरते वरुन लावले आहेत, वरुन ड्रायफ्रुट लावयचे तर पातळ काप करुन थापावे लागतील)
३)ऑपशनल गोष्टी वापरल्या तर गुळाचं प्रमाण थोडं वाढवावं लागेल. सव्वा वाटी घ्यावा.
४)सुकं खोबरं किवा तळलेला डिंक हाताने चुरुन घेतला तरी छान लागतो पण तसा मी लाडु करताना वापरते वड्या करणार असेल तर पावडर करते. लाडु करताना यांच प्रमाण जरा जास्त घेते.
५)लाडु करताना वेलची-जायफळ पा. न घालता मेथी पा./सुंठ पा. घालुन छान लागतात थंडीच्या दिवसांत आमच्याकडे होतातचं. (फोटोतले लाडु मेथी पावडर घालुन केलेले आहेत, अख्खे मेथीदाणे लालसर भाजुन पा. केली)