दोडका भात

सईच्या श्रावण धाग्याने उल्हसित होऊन एरवी ढुंकूनही बघत नाही अशी कुठलीतरी भाजी आणावी असं ठरवलं. नेमका समोर दोडका दिसला, मग आणला उचलून!

मग व्हॉट्सऍपिय चर्चा आणि नेटाने शोधाशोध करून त्याचा दोडका भात करावा असे ठरले.
पोळ्या करायला येणाऱ्या काकूंना बॅकअप म्हणून पालक पराठे करायला सांगितले. यावर आपल्या मी अनु ने 'जपत किनारा शीड सोडणे नामंजूर' असे हाणून घेतले. तर सांगायची गोष्ट अशी की दोडका भात झाला, आणि चविष्टही झाला. चक्क!! :P

साहित्य:
अर्धा किंवा एक कोवळा सोललेला दोडका
दीड ते दोन कप बासमती तांदूळ (अर्धा तास भिजवून ठेवा)
अर्धा कप खवलेला नारळ
एक चमचा जीरे
दोन चमचे तेल
थोडी कोथिंबीर

भरायच्या मसाल्यासाठी:
दोन इंच दालचिनीचा तुकडा
दोन तीन लवंगा
एक चमचा तीळ
थोडं जिरं आणि शहाजीरं
थोडे धने
हे सगळं भाजून पूड करून ठेवा.

थोडी हळद, तिखट पूड, थोडा मालवणी मसाला, थोडा गूळ, मीठ.

कृती:
१. नारळाचा चव कढईत भाजून तो चव आणि थोडी चिरलेली कोथिंबीर मिक्सरला लावा. (मी त्यात अर्धा कांदाही चिरून घातला). या वाटणात आधी तयार करून ठेवलेला ताजा मसाला, हळद, तिखट, माम, गूळ, मीठ हे सगळं घालून हाताने कालवून घ्या.

२. सोललेल्या दोडक्याचे साधारण दोन इंची काप करा. त्यातल्या बिया काढा. या प्रत्येक कापात कालवलेला मसाला भरा. उरलेला मसाला बाजूला ठेवा.

IMG_20170720_204654.jpg

३. कढईत दोन चमचे तेल गरम करा, त्यात जिरं आणि कढीपत्ता तडतडला की उरलेला मसाला घालून परता. लगेच भरून ठेवलेले दोडक्याचे काप घाला. थोडं परतून ते बुडतील इतकं पाणी घाला. त्यात तांदूळ घालून नीट ढवळा. झाकण ठेवून शिजवा.

४. पाच मिनिटांनी उघडून त्यात मीठ आणि कोथिंबीर घालून ढवळा, पाणी आटलेलं असेल तर अजून कपभर पाणी घाला. झाकण लावून मंद गॅसवर शिजूद्या.

५. पूर्ण पाणी आटल्यावर गॅस बंद करा. वाढताना वर कोथिंबीर आणि नारळ घालून वाढा. बरोबर दही किंवा रायता वगैरे आवडेल ते घ्या.

IMG_20170720_213205.jpg

अश्या रीतीने फायनली दोडका झाला लाडका! Lol

Taxonomy upgrade extras: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle