पाऊस!!

पहाटे तीन साडेतीनला जाग यावी. जुलैचा महिना असावा. बाहेर धुवांधार पाऊस बरसत असावा. रात्रभर जराही उसंत न घेता. एकही तारा दिसू नये असा गिच्च काळोख असावा. गरमागरम टंपाळभर चहा करून घ्यावा. तो घेतल्यावर जरातरी थंडी कमी जाणवेल. मग घराचा दरवाजा उघडावा आणि निवांत बाहेर पडावं. नो छत्री, नो रेनकोट. सोबत चहाचा थर्मास आणि इतर जीवनावश्यक गोष्टी एका छॉट्या सॅकमध्ये.
पहाटे चारपाच वाजताचा पाऊस ही काय जीवघेणी चीज आहे ते अंगावर घेतल्याशिवाय कळत नाही. अंधारामध्ये पायाखालची वाट तुडवत मनमुक्त भटकायला सुरूवात करावी. अगदी दोन तीन किमीवर कुठेतरी समुद्रकिनारा असणार. तिथून समुद्र पावसामध्ये खेळत असणार. त्याच्या खेळण्याचा आवाज ऐकावा. एरवीचा धीरगंभीर समुद्र आता इतका अवखळ झालेला ऐकायला बघून मजा येतेच.
आपण चालत रहावं. डोक्यात आठवणी आपसूक् येतात. येऊ द्याव्यात. कधी हसू येतं, कधी डोळ्यांतून पाणी. चालतंय. इथं आपल्याला बघणारं कुणी नाही. एवढ्या सरासर झपाझप बरसणार्‍या धारांत आपल्या डोळ्यांतून चुकार मुकार आलेल्या पाण्याचं आपल्यालाच कौतुक राहत नाही. चालत असतानाच आठवणींच्या वनामध्ये "लिहायला" म्हणून काहीतरी सुचत जातं. ते सुचू द्यावं. चित्रविचित्र आठवणी दाटायला लागतात. त्यांना सोबत घ्यावी आणि आपली मैफिल चालू करावी. मध्येच चुकून रिमझिम के तराने लेके आयी बरसात मधला देव आठवतो, ये दुनिया उसीकी मधला व्याकुळ शम्मी आठवतो.... मग आपण ते गाणं मोठमोठानं गावं... ऐकायला कुणी नसतं. कुणी असलं तरी पावसाच्या तडाडतोममध्ये आपण नक्की दोन सुरांत गातोय की तीन सुरांत गातोय तेच कळणार नाही. फिकर नॉट.
इतका वेळ अंगावर पडत असलेल्या पावसाच्या धारा हळूहळू हाडापर्यंत पोचतात. आधी वाटणारे नाजुक शिरशिरी आता हाहाहूहू वाजणारी थंडी होते. दात कडाकडा वाजतात. पावसाचा जोर किंचित कमी होतो आणि झुंजूमु़ंजू होतं. त्यामुळे पूर्व दिशा कुठली हे कळायला मदत होते, बाकी तो पावसाचा भरलेला करडा काळोख तसाच निनादत राहतो.
गच्च चिंब ओलं होऊन एखाद्या दगडाकडे बघावं. कातळाचा तो दगड किती शतकं इथं ऊन्हापावसात इथंच थांबलाय, ते त्याला विचारावं. तो दगड आधी सुखावतो. मग किंचित हसतो आणि एका क्षणात त्याची सगळी कहाणी सांगून मोकळा होतो. आपण ऐकावं. एरवी पीटपिट बोलत असतो, आज ती टिपटिप ऐकावी. ऐकतानाच तिथंच चिखलात निवांत बसावं. पाऊस थांबलेलाच असतो.
सॅकमधून एक सिगरेट काढावी. आपल्या थरथरत्या हातांनी निवांत पेटवावी. एक दम घ्यावा. तो गरमगरम धूर अगदी मनापर्यंत पोचून ऊब देताना अनुभवावा. तोच धूर ओठांमधून बाहेर सोडताना आपण आतून किती रिते होतोय ते अनुभवावं. प्रत्येक झुरक्यासरशी मनातलं कितीतरी बाहेर निघून जातंय. आपण रितेच होत आहोत. कशासाठी वागवलं होतं हे सगळं ओझं? कशासाठी अट्टहास आहे हा सर्व? या पावसापेक्षा, या भरलेल्या आभाळापेक्षा, उधळलेल्या समुद्रापेक्षा दुसरी कुठलीही गोष्ट महत्त्वाची असूच कशी काय शकते हे स्वतःलाच विचारावं. सिगरेट संपते. आयुष्यातली प्रत्येक गोष्ट संपते तशीच. पण जाताना तिच्यासोबत बरंच काही घेऊन गेलेली असते. चहाचा थर्मास घ्यावा, आणि एक एक घोट करत प्यावा. रिकाम्या झालेल्या मनामध्ये आता आठवायला काहीही नसतं, रडायला काहीही नसतं आणि हसायला काहीही शिल्लक नसतं. चिडायला तर त्याहून काहीही नसतं.
आपण या पावसामध्ये धुवून पुसून लख्ख झाले आहोत अशी एक टोटली वायझेड कल्पना डोक्यात येते. रात्रभर बरसलेल्या पावसानं माळरान अगदी दमून गेलेलं असतं. त्या माळावरून आपण परत निघावं. बाहेर पडताना नक्की कुठं जायचं ते माहित नसतं, परत जाताना ते नक्की ठिकाण माहित असतं. त्या ठिकाणाकडे परत निघावं. कितीही वाट फुटेल तिथं पळत गेलं. कितीही पावसात भिजलं तरी पावलं परत कुठं वळणार ते माहित असतंच. समुद्र, आकाश, माळरान आयुष्यात कितीही महत्त्वाचे वाटले तरी त्याच्या स्पर्शाची जागा कधीच काहीच कुणीच घेऊ शकणार नाही हे जाणवल्याची ओढीनं झपाझप पावलं उचलत परत यावं. आपल्याच घरट्याकडं.

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle