वसंत ॠतूत सर्वत्र रंगांची मुक्त उधळण दिसून येते. विविध रंगांची फुले पाहून मन प्रसन्न होते. अशीच रंगांची उधळण किचनमध्ये करता येईल का? असा विचार मनात आला. पण निसर्गातील हा रंगांचा खेळ जसा आपसुक जुळून येतो, तसं काहीसं अपेक्षित होतं. मग ठरवलं नैसर्गिकरित्या म्हणजे कोणताही कॄत्रिम रंग न वापरता काही रंगीत पा. कृ. करावी.
मायबोलीवर पारंपारीक रोडग्यांची पा. कॄ. मीच पोस्ट केली होती. इथे लिंक देते.
हे पीठही माझ्याकडे दळून आणलेले असते नेहमी. याच पाककृतीत मी अनेक, भाज्या वगैरे विविध काँबिनेशन्स वापरुन पाहिली आहेत.पण आज 'रंग' हेच उद्दिष्ट डोळ्यांसमोर होतं आणि त्यानुसार वेरिएशन करुन हे रंगीत रोडगे बनवले.
१. पांढरे रोडगे - वरील पीठात मीठ, तेल व पाणी घालून हे केले. पण दळतानाच त्यात जीरे-धणे भाजून घातले असल्यामुळे चवीला पुरी/चपातीसारखे ब्लँड न लागता छान लागले.
२. पिवळे रोडगे - केशर तव्यावर थोडा गरम करुन दुधात भिजत घातला तासभर आणि या केशरी दुधात वरील पीठ भिजवले. दूध व केशर यांमुळे थोडी गोडसर चव आली याला.
३. लाल रोडगे- मूळ पा. कृ. नुसार सर्व घातले. फक्त तिखटाचा रंग फिका होऊ नये म्हणून हळद घातली नाही , जीरे-धणे पावडर, गरम मसाला किंचितसा घातला.
४. गुलाबी रोडगे- बीट रूट कुकरला ३ शिट्या लावून वाफवून घेतले. साले काढून त्याची मिक्सरमध्ये पेस्ट केली. मीठ, तेल घातले. बीटाचा उग्रपणा कमी होण्यासाठी जीरे- धणे पावडर थोडी जास्त घातली व पीठ मळले.
५. हिरवे रोडगे - पालकाची पाने वाफवून घेतली. त्यात कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची, मीठ, तेल घालून मिक्सरमध्ये पेस्ट केली व त्यात पीठ मळले.
त्याचप्रंमाणे पंचरंगी भात केला.
यापैकी गुलाबी व हिरव्या रंगासाठी वर सांगितलेली बीट रूट व पालकची पेस्ट वापरली.
पिवळा रंग - फोडणीवर जिरे, हिंग,हळद, घालून भात परतला व मीठ घातले.
लाल रंग - फक्त लाल तिखट व मीठ घालून भात परतला.
आता या वड्यांबरोबर खायला चटण्याही रंगीत नकोत का?
१. हिरवी चटणी- नेहमीसारखी मिरची, कोथिंबीर, लसूण,चिंच, खोबरे घालून केलेली
२. पांढरी चटणी- केवळ खोबरे व १ लसूण पाकळी घातली
३. लालसर चटणी- खोबरे, सुकलेल्या लाल मिरच्या, चिंच, लसूण घालून केली
४. तपकिरी - ही खजूर, चिंच व गूळ घालून केली.
५. लालभडक - ही आपली बटाट्यावड्याची मैत्रीण - लसणीची चटणी
मैत्रिणींनो, या खायला आणि सांगा कसे आहेत हे रंगीत पदार्थ.