इकडे थंडी पडायला सुरूवात झाली आहे. थंडीच्या दिवसांत आमच्याकडे हमखास केला जाणार पदार्थ म्हणजे गव्हाची खीर. आईकडे शेतातून आलेले खपली गहू सडून त्याची खीर असते. पण इकडे गहू मिळाले तरी तेवढे सोपस्कार करायला वेळ नसतो म्हणून झटपट होणारी दलियाची खीर. पद्धत मात्र पारंपारिकच. ही माझी पद्धत आहे. इथेच तुमच्या वेगळ्या पद्धती पण लिहा.
साहित्य
१ वाटी दलिया
१/४ वाटी बारीक कणीचा तांदूळ
१ वाटी बारीक चिरलेला गूळ (कनक गुळाची पावडर पण चालेल. फक्त खीरीला काळपट ब्राऊन रंग येतो.मला खपली गव्हाची असवय असल्याने तो रंग आवडतोच.)
२ चमचे अथवा आवडीप्रमाणे साखर( गूळाला गोडवा कमी असेल तर थोडी साखर वापरून परफेक्ट गोड होते.)
१.५ टेबलस्पून डेसिकेटेड कोकोनट
१ टीस्पून खसखस
कृती
१) पहिल्यांदा दलिया स्वच्छ धुवून, थोड्या पाण्यात ३० मिनिट भिजत घालावा. असे केल्याने पटकन शिजतो.
२) तांदूळ कण्या पण धुवून घ्याव्यात.
३) कुकरच्या वेगवेगळ्या भांड्यात दलिया आणि कण्या घालून दुप्पट पाणी घालून शिजवाव्यात. नेहेमीच्या वरण भाताच्या पेक्षा जास्त वेळ लागतो. बारीक गॅसवर कुकर १० मिनिटे ठेवला तर छान शिजते सगळे.
४) कूकर होईपर्यंत खोबरे आणि खसखस वेगवेगळी मंद गॅसवर भाजून बारीक पूड करून ठेवावी.
५) कूकर झाला की एका मोठ्या जाड बुडाच्या भांड्यात आधी कण्या घेऊन हाटून/घोटून घ्याव्यात. त्यात शिजलेला दलिया पण घालून सगळेच मिश्रण नीट हाटून घ्यावे. घट्ट वाटले तर लागेल तसे उकळते पाणी घालावे. गार पाणी घातले तर गुठळ्या होतात लगेच.
६) उकळते पाणी घालून हवी तशी कन्सिस्टन्सी झाली की पातेले गॅसवर ठेवून त्यात बारीक चिरलेला गूळ आणि खोबरे-खसखस घालून गूळ निट विरघळे पर्यंत शिजवावे.चव बघून गरज असल्यास जास्त गूळ किंवा थोडी साखर घालावी.
७) ही बेसिक खीर. गार झाली की घट्ट झाकणाच्या डब्यात घालून ठेवली तर फ्रीजमधे अगदी २ आठवडे पण छान रहाते. फ्रीजर मधे पण नीट राहू शकेल.
अधिक टीपा
१) खायला घेताना गरम करून, साजूक तूप आणि थोडे दूध घालून खायची.
२) हे खीर गरमच चांगली लागते. गोडीला थोडी जास्त गोड केली तर चांगली लागते.
३) काही जण नारळाचे दूध घालून पण खातात.
४) थंडीमधे सकाळी ब्रेकफास्टला खायला पण छान वाटते. साखर जरा जास्त आहे खरी.
५) फ्रीज करायची असेल तर दूध न घालताच फ्रीज करायची.
फोटो संध्याकाळी टाकेन.