गर्दीमधल्या चेहर्यांची एक गंमत असते. हे चेहरे स्वत:शी फार प्रामाणिक असतात. “चार लोकांमध्ये” असूनदेखील कसलाही अभिनय करत नसतात. सच्चे असतात. मला म्हणूनच गर्दीमधल्या अशा चेहर्यांकडे बघत फिरायला फार आवडतं. प्रवासामध्ये किंवा इतरत्र कुठेही लोकांचे चेहरे निरखायचा, त्या चेहर्यामागे नक्की कसला विचार चालू असेल ते बघायचा मला एक आगळाच छंद आहे. ही व्यक्ती मला जशी दिसली तशीच प्रत्यक्षातही असेल असं नाही, किंबहुना, या व्यक्तींकडे बघताना माझा जो काही चष्मा होता त्यातूनच मी पाहिलं असणार.
कित्येकवेळा व्यक्ती काहीच बोलत नाही. काहीच साद-प्रतिसाद देत नाही. काहीच संवाद करत नाही. बोलतात ते फक्त डोळे. या डोळ्यांच्या तर्हा किती वर्णाव्या? जगामध्ये एकासारखे दुसर्याचे डोळे नसतात म्हणे. कसे असणार? जगामध्ये एकासारखं दुसरं मन तरी कुठे असतं? हे डोळे म्हणजे मनाचा आरसा बिरसा नव्हेत. हे डोळे म्हणजे मनाच्या खिडक्याबिडक्या पण नव्हेत, हे डोळे म्हणजे मनाचा बाहेरच्या जगाशी संवाद साधण्याचा मार्ग. तुमच्या मनात काय आहे ते चेहर्यावर दिसत नाही. शब्दांत येत नाही. नजरेमध्ये मात्र मन आपसूक येऊन थांबलेलं असतं. कधी संतापाच्या ठिणग्या बनून, कधी अपमानाचे कढ बनून तर कधी आनंदाच्या लकेरी बनून. तर कधी सुखदु:खाचे झरे बनून.
असे हे डोळे आणि या नजरा. मला कायमच इथंतिथं कुठेतरी भेटलेल्या. प्रत्येक नजरेमागे एक व्यक्ती. प्रत्येक व्यक्तीमागे एक कथा. प्रत्येक कथेमागे एक आयुष्य. एका नजरेमध्ये एक आयुष्य, एका आयुष्यामध्ये मात्र अशा कितीक नजरा. किती भावविभोर डोळे.
हा कोलाज म्हणजे व्यक्तीचित्रण खचितच नाही, कारण यामधले बहुतांश व्यक्ती मला माहित नाहीत. ही आहेत क्षणचित्रं. त्या त्या क्षणापुरती पाहिलेली, आणि मनामध्ये कायमची कोरून गेलेली. प्रत्येक प्रसंग आज जसाच्या तसा आठवत नाही, पण या प्रत्येक प्रसंगामधले डोळे मात्र लखलखीत आठवतात. त्या डोळ्यांनी साधलेला संवाद आठवतो..
अशाच अधेमध्ये भेटलेल्या काही डोळ्यांच्या नजरांची ही दास्तान.
डोळ्यांत प्राण येतात कुणाचीतरी वाट बघताना. हे नुसतं वेड लावणारं असतं. गणपतीच्या दिवसांत मुंबईवरून सासरी खेडला एस्टीने येत होतो. पावसाचे दिवस. तिन्हीसांजेची अंधारलेली वेळ. प्रवासाने शिणलेले चाकरमानी गाव आलं की उत्साहानं उतरत होते. अशाच कुठल्या तरी एका स्टॉपला गाडी थांबली. बाहेर एक म्हातारा उभा होता. एंशीच्या आसपास वय, अर्धवट पडलेलं टक्कल, हिरवट मिचमिचे डोळे. अंगावर एक फाटका बनियन आणि धोतर. हातात काठी आणि बॅटरी. गाडी थांबल्या थांबल्या त्याची नजर दाराकडे वळली. उतरणारे उतरले. पण त्यात त्याच्या ओळखीचं कुणी नसावं. नजरेमधली ती प्रतीक्षा तशीच. किती वेळ उभा होता आणि अजून किती वेळ थांबला असता कुणास ठाऊक. पाऊस कोसळतच होता. आणि तरीपण म्हातारा हातातली बॅटरी घेऊन उभाच होता.स. काळजातील माया त्याच्या डोळ्यांमध्ये पसरली होती. कुणाचा तरी बाप असावा... बापाची नजर असलीच. मायेची, आतड्याच्या गाठीची.
पण ज्याक्षणी ही प्रतीक्षा संपते त्यावेळचे डोळे कधी पाहिले आहेत का? नजरेमध्ये अक्षरश: फुलं उधळतात. चांदण्या नाचतात. रेल्वे स्टेशनवर किंवा एअरपोर्टवर फिरताना असे डोळे कायम भेटतच आले आहेत. पण मनामध्ये कायम लक्षात राहिलेला क्षण वेगळाच होता. मुंबईमध्ये २६ जुलैचा पाऊस पडला होता, तेव्हा एका मुलीने तिच्या कलीगला आमच्या हॉस्टलमध्ये आणलं होतं. कलीगकडे मोबाईल नव्हता, तिचा नवरा तिला शोधत असणार, पण त्याच्याशी संपर्क करायचं कुठलंही साधन नव्हतं. जो नंबर आठवत होता, तो लागत नव्हता. जवळजवळ दोन दिवसांनी त्याच्या ऑफिसचा नंबर शोधला, आणि त्याला सांगितलं की ती इथं आहे. तासाभराने तो आल्यानंतर हॉस्टेलच्या गेटमध्ये दोन मिनिटं उभाच राहिला. समोर आपलीच बायको उभी आहे, आणि ती जिवंत आहे यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. त्या क्षणापुरतं त्याचं विश्व स्तब्ध झालं असावं. तिनं त्याला हाक मारल्यावर तो भानावर आला, आणि पुढे येऊन त्या सात महिन्याच्या पोटुशीला अक्षरश: उचलून घेतलं. गेले दोन दिवस तिला कुठे कुठे शोधत होता, अगदी हॉस्पिटल, शवागार इथेसुद्धा. सगळी आशाच संपली होती. पण दोन दिवसांनी का होईना, ती सुखरूप दिसली याचं सगळं सुख त्याच्या नजरेमध्ये येऊन थबकलं होतं.
हा अगदी गेल्या महिन्यांत घडलेला प्रसंग. चेन्नईमधली दुपारी बाराची वेळ. ऊन तापलेल्या तव्यासारखं भाजत होतं. एवढ्या उन्हाला दारावर कलिंगड विकणारा आला. त्याला विचारलं, “केवढ्याचे दिले?” त्यानं तमिळमधून सांगितलेले आकडे माझ्या लक्षात यायला वेळ लागत होता. घासाघीस जमत नव्हती. इतकावेळ हातगाडीवर बसलेली त्याची दहा-बारा वर्षाची लेक पुढे आली, आणि चुरूचुरू इंग्रजीमधून मला रेट सांगायला लागली. त्या मुलीची मला जितकी मजा वाटली त्याहून जास्त त्या बापाला अभिमान वाटला. “स्कूल पोयटा. फ़ोर्थ स्टॅण्डर्ड” हाताची चार बोटं दाखवत तो म्हणाला. मग मी तिला नाव शाळा वगैरे विचारलं. ही मुलगी लेकीच्याच शाळेत शिकत होती. वडलांकडे पाहता घरची परिस्थिती काय असणार ते समजत होतं. तरी बाबानं हट्टानं तिला मोठ्या शाळेत घातलं होतं. आता शाळेला सुट्टी असल्यानं ही बाबाबरोबर फळं विकायला फिरत होती. “इट इज फन ऍण्ड आय लर्न मॅथ्स!” असं ती चिमुकली म्हणाली, सर्र्कन अंगावर काटा आला. जगाच्या शाळेमध्ये मिळणारं फार महत्त्वाचं शिक्षण त्या पोरीला महत्त्वाचं वाटत होतं. त्याच निमित्तानं बाबालाही थोडाफार हातभार लागत होता. ती लेक माझ्याशी ईंग्रजीमध्ये बोलत असताना बाबाचे डोळे मात्र अभिमानानं फुलून आले होते. कलिंगडं तर घेतलीच शिवाय त्या बाळीला थोडी चॉकलेट्स आणि असंच एक नवं गोष्टींचं पुस्तक होतं ते दिलं. बाळी हरखलीच. पण बाबाच्या नजरेमधल्या कणाकणामध्ये एकुलत्या लेकीचं कौतुक आणि माया डोकावत होती.
एका फिल्मशी संबंधित प्रदर्शनाचं काम बघत होते. बर्य़ाच स्टॉलमध्ये सध्याच्या फॅशनप्रमाणे काही मॉडेल्स होस्टेस म्हणून ठेवलेल्या. सकाळचे सात वाजले असावेत. प्रदर्शनाच्या आधीची तयारी चालू होती. फिल्मी सेलीब्रीटी येणार म्हणून सगळं काम अगदी जोषात चालू. अचानक जवळच्या स्टॉलमध्ये आरडाओरडा ऐकला म्हणून गेले तर एक स्टॉलवाला होस्टेसवर अगदी अर्वाच्य शिव्या घालून ओरडत होता. जास्त काहीही झालेलं नव्हतं, त्या मुलीला कंपनीच्या प्रॉडक्टचं नाव नीट उच्चारता येत नव्हतं म्हणून हे बडबडणं. ’फ’ ’भ’ ची बाराखडी वापरून. त्या होस्टेस मुलींचा मॅनेजर ताबडतोब तिथं आला. नक्की काय घडलंय ते त्यानं विचारायच्या आधीच या ओरडणार्या माणसाने खिशातून पाचशेच्या दोन नोटा काढल्या. त्या मॅनेजरच्या अंगावर फेकल्या. मॉडेल्सना घेऊन जायला सांगितलं. मॅनेजरने हात जोडले. दोन्ही नोटा उचलल्या आणि मुलींना चला म्हणून इशारा केला. बोलला काहीच नाही. त्याक्षणी त्याच्या डोळ्यांमध्ये सगळा अपमान चितारलेला होता. अजून प्रदर्शनाला सुरूवात पण झाली नव्हती, आणि त्याच्या हातातून हे काम गेलं होतं. पैशाचं जे काही नुकसान झालं असेलच, पण एवढ्या चारचौघांसमोर ऐकून घ्यावं लागणं यासारखा अपमान नसावा.
दरवर्षी रमझान आला की, मला हा प्रसंग हमखास आठवतो. दुपारची वेळ होती, मी अंगणात अभ्यास करत बसले होते. गल्लीमधल्या रस्त्यावर काही मुलं खेळत होती. खेळता खेळता त्यातली एक साताठ वर्षाची मुलगी पडली. जोरातच. हाताचा कोपरा खरचटला होता, गुडघ्याला जखम झालेली. सगळेजण धावत बघायला गेलो, चांगलंच रक्त वाहत होतं, मुलगी रडायला आली. साहजिकच होतं. डॉक्टरकडे जाण्यासाठी गाडी काढत होते, तेव्हा गल्लीतल्या एक काकी तिला म्हणाल्या, “आज तुजो रोझा है ना? मंग रडू नकोस.” त्या क्षणी त्या मुलीने डोळे पुसले आणि रडू बंद. डोळे पाण्यानं भरले होते, पण ते पाणी गालावर आलं नाही. मनाचा एवढा निग्रह अगदी भल्याभल्यांनादेखील जमत नाही. तिला जमला होता. आजही मला कुठे वाचताना वगैरे पाणीदार डोळे असा उल्लेख आला की नजरेसमोर येतात ते याच जखमी कन्यकेचे डोळे.
हॉस्पिटल हे असं ठिकाण असतं, जिथं बरंच काही एकाचवेळेला चालू असतं. कधी जन्माचा जल्लोष, कधी मृत्यूचा आक्रोश, कधी काळजीचं मळभ तर कधी सुटकेचा नि:श्वास. पण एकदा दिसला अशाच एका कोंदट, गर्दीने तुडुंब भरलेल्या हॉस्पिटलमध्ये एक प्रचंड खुश बाबा. अवघ्या वर्षाची असणार ती मुलगी. वडाराची. काळा रंग, डोक्याला बांधलेली खणाची कुंची, अंगामधला जुनाच पण स्वच्छ फ्रॉक घातलेलं ते बाळ आणि तिच्यापेक्षा एक कण जास्त काळा असलेला, उन्हाने रापलेल्या चेहर्याचा बाबा. आजूबाजूंच्याची काहीही फिकीर न करता बाबा तिला वेडेवाकडे चेहरे करून दाखवत होता. आणि ती खिदळत होती. ती खिदळली की तो हसत होता. पोरगी एवढी चंट होती, बोलता येत नसलं तरी बाबाबरोबर खेळतानाचा आनंद तिच्या काजळ माखलेल्या डोळ्यांतून वाहत होता. त्याच्या डोळ्यांमधे तो चिमुकला जीव नुसता नाचत होता. बास, एवढंच विश्व. एवढीच दुनिया. अजून कुणाचीच तिथे त्या क्षणी गरज नव्हती.
अशाच एका हॉस्पिटलमध्ये भेटले ते वेगळेच करूण डोळे. रात्री तीन वाजता अख्खी बिल्डिंग कोसळली. ती फारतर सतरा-अठरा वर्षाची असेल. जास्त लागलं नव्हतं. पण घरामधला प्रत्येक माणूस जागीच ठार झालेला. तिच्याखेरीज. जेजे हॉस्पिटलच्या एका बेडवर ती बसून होती. तिला घरामधल्या इतर लोकांबद्दल अद्याप काहीच सांगितलेलं नव्हतं. पण तेव्हा पत्रकाराच्या भूमिकेत असलेल्यांना कुणाच्याही संवेदनांची, जखमांची पर्वा करायची गरज नव्हती. माझ्यासोबत असलेल्या एका टीव्ही जर्नालिस्टने लगेच कॅमेरा वगैरे चालू करून तिचा “बाईट” घेतला. शुद्ध मराठी भाषेतला चावाच खरंतर. “आपके फॅमिलीके सब लोग इस हादसेमे मारे गये, आप इसके बारे मे क्या कहना चाहेंगे?” तिनं अचानक मान वर करून पाह्यलं. क्षणभरच. तेवढ्या त्या क्षणामध्ये तिच्या डोळ्यांमध्ये एक आयुष्य सरकून गेलं. झोपेत असताना स्वप्न पडण्याऐवजी पडलं होतं. आजूबाजूला ज्यांच्या अंगावर विश्वासानं हात टाकून झोपली, ते आज्जीआजोबा, आईवडील, भाऊबहिण कुणीच शिल्लक राहिलं नाही? असं शक्यच कसं होतं? हे असं केवळ सिनेमानाटकांत घडतं.. प्रत्यक्ष आयुष्यात थोडीच!!!! “आय थिंक इट्स अ ड्रीम” ती अगदी सावकाश म्हणाली. काश, हे खरंच एक स्वप्न असतं, मी मनात म्हटलं. नंतर तिचा या वास्तवाशी सामना झालाच असणार. ती पुन्हा उभारली असणर. ती नंतर जगली असणार. पण त्याक्षणी मात्र मला तिच्या डोळ्यांमध्ये दिसलं ते मृत्यूचं भयाण वास्तव. आजही त्या शांत पिंगट डोळ्यांचे डोह आठवलं की माझी रात्रीची झोप उडते.
मागच्यावर्षी लेकीच्या वाढदिवसासाठी तिला घेऊन असंच फिरायला गेलो होतो. इथं चेन्नईजवळ एक क्रोकोडाईल पार्क आहे. इतर सरपटणारे प्राणीदेखील आहेत. पण प्रमुख आकर्षण मगरी. लेक अगदी खुश होऊन सगळीकडे फिरत होती. इथल्या मगरी पिंजर्यात वगैरे न ठेवता बर्यापैकी मोकळ्या तलावसदृश ठिकाणी ठेवल्या आहेत. त्या मगरींना मांस द्यायचं काम एक मुलगी करत होती. सहज फोटो काढताना तिला अजून माहिती विचारली. ती मगरींच्या दिनक्रमाची माहिती देत असताना आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यातला एक म्हणाला, “या मगरी इतक्या कुरूप का असतात?” त्या मुलीला अस्सा काही राग आला, जणू त्यानं तिलाच कुरूप म्हटलं होतं. “तुमच्या आणि माझ्या पूर्वजांचादेखील जन्म व्हायच्या आधीपासून हे लोक पृथ्वीचे रहिवासी आहेत. आणि तुम्ही आणि मी आपल्याच कर्मानं अख्खी मानवजात नष्ट करून गेलो, तरी हे लोक राहणार आहेतच. रीस्पेक्ट देम!” ती जवळजवळ कडाडली. मगरीसारख्या प्राण्यावरून एखाद्याला इतका राग येऊ शकतो ते बघून गंमत वाटली, आणि मग वाटलं, प्रेम काय फक्त माणसावरच करावं, कुत्र्यामांजरासारख्या ठराविक प्राण्यांवरच करावं. प्रेमाला कसलं आलंय बंधन? ते कुणावरही करता येऊ शकतंच की. मगर असली म्हणून तिचंही कोडकौतुक करणारं असतंच.
मला असे होपलेसली कशाच्याही प्रेमांत पडलेले लोक फार आवडतात. मीपण त्यातलीच एक आहे. एखाद्याच्या प्रेमात पडण्याच्या कल्पनेच्याच मी प्रेमात असल्यासारखी. प्रेम जर मनुष्यरूप घेऊन आलं तर त्याची नजर कशी असेल माहिताय? शम्मीसारखी. हिंदीच काय, पण मी पाहिलेल्या कुठल्याच सिनेमामधला हीरो नायिकेकडं शम्मीसारखं बघू शकत नाही. शम्मी कधीही नुसता बघत नाही, तो नजरेनेच प्रेम करतो. त्याचा एकही सिनेमा आजवर मोठ्या पडद्यावर पाहिलेला नाही. टेलीव्हीजनच्या इवल्याशा पडद्यावर हा माणूस इतकं गारूड करत असेल तर मोठ्या पडद्याची कथा काय वर्णावी? म्हणून त्याचा एकतरी सिनेमा थीएटरमध्ये पहायची खूप दिवसांपासून इच्छा होती. ती केवळ त्याच्या या निळ्या डोळ्यांच्या नजरेसाठी. आजवर ती इच्छा काय पूर्ण झाली नाही. एकदा पृथ्वी कॅफेला एका मित्राला भेटायला गेले होते. संध्याकाळचे सहा वाजले असतील. मित्र अजून आलेला नव्हता, म्हणून पुस्तक वाचत बसले होते. सहज नजर वर गेली आणि समोर... शम्मी!! व्हीलचेअरमध्ये बसलेला. त्याच्या बाजूला शशी कपूर उभा होता. दोघं भाऊ आपापसांत काहीतरी बोलत होते. त्यावेळेला भारावून जाणं, बोलायला शब्दही न फुटणं, अंगात कापरं भरणं वगैरे नुसते वाक्प्रचार राहिले नाहीत! थोड्यावेळानं उठले आणि दोघांच्याही पायाला हात लावून नमस्कार केला. शम्मीने एकदा माझ्याकडं पाहिलं आणि तो हसून काहीतरी म्हणाला. मी काय उत्तर दिलं ते आठवत नाही, पण त्या निळ्या डोळ्यांकडे एकदा प्रत्यक्ष पाहिल्यावर वाटलं, चला, आता मेलं तरी हरकत नाही. स्वर्गात नक्की जाणार. न होंगी ऐसी दोबारा आंखे!
आता इतरांच्या डोळ्यांबद्दल एवढं लिहिलं... कधीतरी कुणीतरी माझेही डोळे बघून असंच काही म्हटलं असेल नाही? तेव्हा दहिसरला नुकतीच रहायला आले होते. ऑफिस चर्चगेटला. विरारवरून येणार्या ट्रेनमध्ये चढणं शक्यच नव्हतं. म्हणून मग बोरीवलीवरून ट्रेन घ्यायची. त्यादिवशी सकाळी उशीर झालाच होता, आदल्या रात्री घरी यायला बारा वाजले होते. जायचं अजिबात मनात नव्हतं, तरी ऑफिस चुकवणं शक्य नव्हतं. धावतपळत लेडीजमध्ये शिरले तेव्हा ट्रेन पूर्ण भरली होती. किमान फोर्थ सीटतरी मिळावी म्हणून “किधर उतरेंगे” विचारायला सुरूवात केली, प्रत्येकीकडून “लास्ट” ऐकल्यावर प्रचंड राग यायला लागला. सगळ्यांनाच काय म्हणून चर्चगेटला जायचं होतं, अधेमध्ये कुठे उतरता येत नाही का? एक तर उशीर झालेला, म्हणून नाश्ता केला नव्हता. त्यात परत वाईट दिवस... उभं राहण्याचं त्राण नव्हतं. आणि सीट मिळत नव्हती. वैतागून डब्याच्या दुसर्य़ा बाजूला गेले. मी निघाल्यावर तिथं बसलेल्यांपैकी एकजण म्हणाली, “काय डोळे मोठे करून रागानं बघत होती. आता ही उशीरा आली तर आमची काय चूक?” ते वाक्य कानावर आलं आणि मला एकदम हसू आलं.. लोकांचे डोळे बघताबघता कधीतरी आपल्याच डोळ्यांनी मनातली गोष्ट उघड केलीच की.
तस असे हे डोळे, आणि डोळ्यांमागचे चेहरे, काही कथा, काही क्षण, काही प्रसंग. आपलेच डोळे जरा उघडे ठेवून इकडे तिकडे वावरलं तर हमखास भेटणार... आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कशानाकशा स्वरूपांत आठवण्यासाठी. एखाद्याशी संवाद साधण्यासाठी शब्दांचीच गरज असते असं नाही. कितीकवेळा केवळ नजरदेखील पुरेशी ठरते.
आंखोमें क्या इस दिल से पूछो जरा
देखूं मैं क्या माजरा चेहरे के पिछे
खामोशी के रंगीन साये रूखसार पे किसीके.