त्यानंतरचे दिवस - १

बेल वाजली. उशिरा झोपल्यानंतरच्या सकाळच्या वेळी असणार्‍या पूर्ण झोपेत असणार्‍या मला कूसही बदलायची नव्हती. बेल पुन्हा वाजली. मा व शी. ज्या दिवशी ऑफिस लौकर तेव्हा या उशिरा येतात आणि जेंव्हा आज नाही आल्या तर बरं असं वाटतं तेंव्हा वेळेआधी हजर.
उठून स्लिपर्स घालेपर्यंत अजून एकदा बेल. तरी बरं यांना संगितलंय की दोनदा बेल वाजवून थांबत जा. मी बाथरूममधे असू शकते. एक किंवा दोन नंबरला. पण नै. दर वेळी आतून फोन करावा लागतो. बसा ५ मिनिटं आलेच. आणि घरात असले की सदासर्वकाळ ही मावशीना अटेंड करायची जबाबदारी माझीच. कारण शिबानी सकाळी जिमला गेलेली असते.
आ ले आ ले असं ओरडत मी दाराकडं निघाले. जाताजाता नेट ऑन केलं. सावन सुरू केलं. टॉप हिटस लावले. तोवर दाराजवळ पोचून दार उघडून परत आत बेडरूममधे येऊन धाडकन बेडवर आडवी झाले. हे करत असताना मावशी केर बाहेर ठेवा आणि दोन ऑम्लेट्स बनवा आणि ती झाली की ब्रेड टोस्ट करा. हे सांगितलं. आणि मग जरा डोळे उघडून ते व्हॉटसअ‍ॅपला लावले . कालच्या दिवसाला घाबरून बंद केलेलं. मेसेज पाहिला हेच नको. कटकटच नको. तेच बोर मेसेजेस आणि ते पाठवणारे तेच बोर लोक. ओके ओके, लोक तेच नसतील, पण व्हॉटसॅपवर मक्काय आज काय स्पेशल प्लॅन्स? वगैरे त्याच चौकशा. काय उत्तरं देणार? हे लोक असा माग का काढतात? नुस्तं गॉसिप. त्यातनं ज्याना इंटरेस्ट आहे खरंच ते यावर, " तुझ्या घरासमोर काय रांगा असतील ना? म्हणून मग हिम्मतच होत नाही. " म्हणे. हॉ? "हिम्मत होत नाही तर विषय कट डुड. बावळट्ट माणसाचं काही होऊ शकत नाही या मैदानात. " असं तर नाही म्हणता येत तोंडावर. खरं तर काहीच नै म्हणता येत. या असल्या अंदाज घेणार्‍या लोकांचा जाम वैताग अस्तो. आइ बघते तस्ल्या हाय सॅच्युरेशन रंगाच्या सिनेमा मधे अस्तात तस्ले हे बावळट हिरो. ते अंगावरच शिवलेले ड्रेस घालून सायकली चालवणार्‍या, आणि तरी या मेहनतीला कधीच इण्चेस लॉस मधे कन्वर्ट न करू शकणार्‍या हिरोइन्सच फक्त या असल्या वाक्याना प्रपोज समजून उत्तरं देत असतील. इट्स अ बिग टर्नऑफ. ईईईई..
पण मेसेजेस वाचायच्या आधीच मावशी रूममधे आल्या आणि म्हणल्या , " रसिका, तुजी याक्टिवा तू आज बिल्डिंग समोर लावलीय ना. "
हो म्हटलं. जागाच नव्हती आत.
" काळपट याक्टिवा आणि मागं लाल सिंह वाली तुजीचे ना गाडी. "
"मावशी हो. माझीच आहे. तुम्हाला माहीतीय ना माझी गाडी. किती वेळा बसलायेत. आणि सिंह काय? ड्रॅगन आहे तो. काय झालं ?"
" मंग चल जरा खाली जाऊ."
शिट. काय झालं? एव्हाना मी उठून चपला पायात सरकावल्या होत्या.
" काय झालं सांगा की मावशी."
" एक पोरगं फुलं लावालंय तुज्या गाडीवर . "
वॉट! आर यु सिरियस!!
"मावशी त्याला विचरायचं ना ."
" कसं इचारणार? तुला माहीत असेल असं वाटलं मला. "
मी मावशींबरोबर खाली गेले. आणि वाटलं होतं तसंच झालेलं. कुणीच नव्हतं तिथं तोपर्यंत. पण अ‍ॅक्टिवाला मस्त फुलं लावलेली सगळीकडं. लाल, पिवळी, गुलाबी. धन्य आहे जो कोण असेल त्याची. ही अशी लग्न झालेली बाईक घेऊन मी ऑफिसला जाणारे का? च्यायला वैताग.
मावशी हसत उभ्या होत्या.
" मावशी चला ही फुलं काढायला मदत करा " मी चिडले.
" हां. तू जा वर. मी आन अशोक मिळून काढतो. अशोक म्हणजे गापुजी. ( गाडी पुसणारा जीव. हे माझं आणि चिन्याचं वर्जन.)
" लौकर निघतील का पण ? मला नऊला ऑफिस आहे. "
" हां धा पंदरा मिंटात हुतंय. जा. चा ठेव. " मावशी.
मग मी लिफ्टपाशी नखं खात , विचार करत उभी होते की कोण असेल हा आचरट! मग म्हटलं याने कुठं तरी निरोप ठेवलाच असेल. बाईक वर तर काही नोट, टॅग काही नव्हतं.
कदाचित काल मेसेज केला असेल. म्हणून व्हॉटसॅप उघडलं. तिथं काही सुगावा लागेना. तोपर्यंत फ्लॅटजवळ पोचले होते. दार उघडायला गेले तर तिथं एक नोट लावलेली.
" पता था फूल निकाल दोगी| लेकीन याद तो रहेगा| है ना? इन फुलोंका काम बस उतनाही था|
और सोचोगी इस पागलने ये आज क्यु किया? वॅलेंटाईन तो कल था| तो फिर वही जवाब है| बडा दिन मिस किया | पर याद तो यही दिन रहेगा | है ना? चाहे तुम्हारा जवाब हां हो या ना, तुम भुलोगी तो नही ये बात| मुझे डर है, डर क्या यकीन है, तुम ना ही कहोगी| कहां तुम और कहां मै| इसलिये पहले बेसिक स्टेप्स किये| स्पेशल एंट्री और फिर काँटेक्स्ट सेट| दरसल नाम यहीं लिख देता पर सवाल जवाब तो सामनेही होना अच्छा है|" बस्स एवढंच. मी नोट उलटीसुलटी केली. काहीच नाही.
" लेटर पलटना छोडो, खुद पलटो " शिट! केवढी दचकले मी. आणि क्षणार्धात वळले. मान व्यवस्थित वर करून बघावं लागावं इतकी हाईट , फेयरली डार्क स्किन, चिझल्ड बॉडी , शार्प जॉलाईन आणि लांब केसांची पोनीटेल. मी ओळखत होते याला.

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle