भटंकतीची काही ठिकाणं माझ्या मनात कधीची घर करुन बसली आहेत. त्यात अगदी वरच्या क्रमांकावर इस्तंबूल शहर आहे. हजारो वर्षांचा निरनिराळ्या राजवटींचा इतिहास, अप्रतिम स्थापत्यशैली असणाऱ्या इमारती आणि तिथली अती रूचकर खादयसंस्कृती असे सर्वच जिथे अनुभवता येते आणि जी भूमी आशिया व युरोपचा संगम साधते तिथे जायची उत्सुकता कायम वाटत होती.
या सुट्टीत नवर्याघरी बाहरिनला गेले असता त्याला अचानक लाॅटरी लागल्यासारखे चार आॅफ जोडून मिळाले. मग ते बाहरिनच्या माॅलमध्ये घालवण्यापेक्षा इस्तंबूलला जाऊन आलो तर असा विचार डोक्यात चमकून गेला! पण तो होता सोमवार. गुरूवारपासून सर्वत्र आशुरा म्हणजे मोहरमची सुट्टी होती. ते थेट मंगळवारी एम्बसी उघडणार होत्या आणि आम्हाला नेमका मंगळवार ते शुक्रवार एवढाच वेळ होता. मग एम्बसीत जाऊन चौकशी तर करु म्हणून तुर्की एंबसीत जाऊन थडकलो. तिथल्या माणसाने व्हिसासाठी कागदपत्र कोणती लागतील याची यादीच हातात ठेवली. मग त्या अर्ध्या दिवसात फोटो काढणे,बँक स्टेटमेंट,याच्या कंपनीचे पत्र मिळवणे, एजंटकडून विमान तिकिट आणि हाॅटेलचे टेंपररी बुकिंग करुन घेणे हे सर्व करता करता भूकेने चिडचिड होऊन भांडण करणे असे यथासांग करुन आम्ही संध्याकाळ पर्यंत जमवाजमव करुन तयार झालो. दुसर्या दिवशी जाण्याची आॅनलाइन अपाॅइंटमेंट पण मिळाली. मग मंगळवारी दिल्या वेळात एम्बसीत जाऊन धडकलो. तिथे अजिबात गर्दी नव्हती. पण तिथल्या कर्मचारी बाईंनी आमची प्रवासाची तारीख मंगळवार बघून नाक मुरडले. व्हिसा देण्यासाठी चार वर्किंग डे लागतील. शुक्रवार ते सोमवार सुट्टी आहे. ते ऐकून मी बराच केविलवाणा ( म्हणजे मला जमेल तेवढा. केविलवाणं वगैरे न दिसणे आमचा जेनेटिक प्राॅब्लेम आहे :-/) करुन दाखवला. मग तिने दया आल्यासारखे दाखवले! पैसे भरा आणि गुरूवारी पासपोर्ट घेऊन जा म्हणाली. मग गुरुवारपर्यंत सस्पेन्स! मिळतो का नै व्हिसा. गुरूवारी दुपारी आमचे मालक दिल्या वेळात एम्बसीत हजर. तिथे एक महिन्याचा सिंगल एंट्री व्हिसाचा शिक्का मारून पासपोर्ट तयार होता! मग घरी आल्या आल्या विमानाची तिकिटं बुक केली. बुकिंग.काॅम वरुन तक्सिम स्क्वेअरमधले अपार्टमेंट बुक केले. हे अगदी स्वस्तात मिळाले. ६०००रुपये चार दिवसाचे. हा अर्थातच घी देखा.बडगा दिसायचा होताच!
उरलेले चार दिवस मग कसून अभ्यासात घालवले. तेव्हा या इस्तंबूलमध्ये बघायला केवढे आहे हे कळून हे बघु का ते बघु. कधी बघू किती बघू चार दिवसांत असे होऊन गेले.
ट्रिप अॅडव्हायजरला शरण गेले. त्यावरून निरनिराळ्या सूचना मिळाल्या. त्याप्रमाणे जायचे यायचे ट्राम, फ्युनिकलर,मेट्रोचे मार्ग निश्चित केले. तिथले लोकल प्रवास कार्ड Istanbulkart हे अतिशय सोयीचे आहे. ते सर्वत्र चालते. ते कुठे कसे टाॅप अप करायचे इ व्हिडिओ बघून ठेवले. इस्तंबूलला बघण्याची अनेक आकर्षणे अाणि असंख्य म्युझियम आहेत. तिथे तिकिटाच्या रांगा टाळण्यासाठी म्युझियम पास मिळतात ही माहिती मिळाली.
मग आमच्या प्रत्येक दिवसाच्या प्रवासाची रूपरेखा करायला घेतली. आम्ही दोघे शाकाहारी असल्याने परदेशात आपल्याला कसे आणि काय शाकाहारी मिळणार आपण कुठे शोधत जाणार या चिंतेने आम्ही कायम प्रवासी कंपनीसोबत परदेश यात्रा करत असू. स्वतःच अॅरेंज करुन परदेशात जायची ही पहिलीच वेळ. तिथे जेवणाचे कसे करायचे ही शंका मनात डोकावत होती. नेटवरून इस्तंबूलमधल्या भारतीय हाॅटेलांचे रिव्हयू अगदीच वाईट होते. त्यामुळे ती शोधत फिरण्यात काहीच अर्थ नव्हता. अपार्टमेंट घेतल्याने त्यात किचन होते. वेळ आलीच तर करु खिचडी ,उपमा असा विचार करायला लागले होते. आणि नेटवर माहिती चाळता चाळता अश्विन बहुलकरच्या ब्लाॅगची लिंक मिळाली. त्याने तुर्की व्हेज जेवणावर त्याच्या ब्लाॅगवर सचित्र सुरेख माहिती दिली होती. त्यात तिथल्या पदार्थांची नावे,तशा प्रकारचा कोणता भारतीय पदार्थ आहे,ते कुठे चांगले मिळतील अगदी व्यवस्थित लिहिले आहे. त्यावरून नोट्स करुन घेतल्या. त्याचा आम्हाला अतिशय फायदा झाला. थँक्स अश्विन.
सोमवारी रात्री दीड वाजता आमचे विमान बाहरिनहून उडाले. ते सकाळी साडेपाचला इस्तंबूलला पोहोचले. एअरपोर्टवरुन बाहेर येताच आधी turkcell ची सिम कार्ड १२५ लिराला एक अशी विकत घेतली. यात ५ जिबी डेटा मिळतो. दोघांना घेतल्याने कुठेही गर्दीत हरवलो तर फोन करायची सोय झाली !
तसंच सर्वत्र रेंज असल्याने फोनच आमचा फ्रेंड फिलाॅसाॅफर गाईड बनून फिरायला तय्यार झाला. बाहेर बघतो तो पाऊस पडत होता. आपल्या चारच दिवसांच्या प्रवासावर पाणी पडतं का काय चिंता करत आम्ही हवाबस शोधायला निघालो. वाटेत टॅक्सीवाले पुढे पडणाऱ्या पावसाची चित्रं वर्णन करायला लागले. शेवटी भूरभूर भिजत पुढे जाण्याला कंटाळून आम्ही टॅक्सी करायची ठरवली. एअरपोर्ट ते शहरमध्य साधारण ६० लिरा होतात हे वाचून ठेवले होते. तेवढेच घेणार्या टॅक्सीत बसलो. सुरूवातीला अगदी निरस शहर सामोरे येत होते. सोबत पाऊस. जरा बिचकायलाच झाले. नवर्याला एवढा घोड्यावर बसवून आणलाय खरा. सगळे बघायला तर मिळेल ना अशी चिंता करत,डोळ्यांत दाटलेली झोप आणि पोटात भूक असे तक्सीम स्क्वेअरला अर्ध्या तासात पोहोचलो. तिथे आमचा अपार्टमेंट मालक घ्यायला आला होता. तो बॅग घेऊन पुढे निघाला. आणि बघते तो अगदी तीव्र उतारावर त्याची इमारत. कसेबसे पोहोचलो तर त्याने फ्लॅट दुसर्या मजल्यावर असल्याची खुषखबर दिली. मग ती कमी म्हणून लिफ्ट नाही आणि वर जाणारा जिना अगदी तिरपा आणि चिंचोळा आहे असे चेरी आॅन द टाॅप आमच्या लक्षात आले. यातले काहीही या फ्लॅटच्या रिव्हयूत लिहिलेले नव्हते. आता पोहोचलोय तर बघु नंतर म्हणत आधी बेड गाठून पाठ टेकवली. बाकी फ्लॅट बरा होता हे बघून जरा रिलॅक्स झालो.
थोड्याच वेळात फ्रेश होऊन आजचे पहिले ठिकाण जे सगळ्यात दमवणारे आणि वेळखाऊ होते त्या तोपकापी पॅलेसला जाण्यासाठी सज्ज झालो. ती कहाणी पुढच्या भागात.