अपार्टमेंटमधून बाहेर पडलो ते तक्सिम स्क्वेअरमध्येच आलो इतका जवळ हा शहराचा महत्त्वाचा भाग होता. तक्सिम स्क्वेअरमध्येच तुर्कस्थानच्या लाडक्या राष्ट्रपित्याच्या आतातुर्क केमाल पाशाचे स्मारक बांधलेले आहे. एका बाजूने राष्ट्रकर्तव्यदक्ष आतातूर्क आणि त्याचे साथीदार तर दुसर्या बाजूला लष्करी वेषात आपले संरक्षण कर्तव्य पार पाडणारा आतातुर्क आणि लष्करातले त्याचे सोबती असे तुर्की जनतेच्या या लाडक्या नेत्याचे शिल्पस्मारक आहे. इथूनच इस्तिकलाल कादेसी या पूर्णपणे पादचारी हॅपनिंग रस्त्यावर जायचा मार्ग सुरु होतो.
याच स्क्वेअरमध्ये आम्ही ब्रेकफास्टसाठी हाॅटेल शोधायला घेतलं. समोरच तक्सिम सुट्स२ म्हणून लिहिलेले रेस्टाॅरंट दिसले. बरेच स्थानिक लोक जाताना दिसत होते. आधी दारातच घुटमळून आतून कसे आहे पाहून आत शिरलो. व्हेज मेन्यूची चौकशी करता तिथल्या वेटरने बरेच आॅप्शन मेन्यूकार्डवर दाखवायला सुरुवात केली. सुदैवाने प्रत्येक पदार्थात काय आहे हे सचित्र इंग्लिशमध्ये लिहिलेले होते. बघता बघता दिसला सब्जेली पिडे आणि आम्ही खूश झालो ! पिडे म्हणजे तुर्की पिझाच एक प्रकारचा. वर भाज्या ,चिजचे टाॅपिंग. अतिशय सुरेख भाजलेला सब्जेली पिडे माझ्यासारख्या पिझ्झा अजिबात न आवडणारीची पण घासाघासाला दाद घेऊन गेला सोबत तुर्की चाय होताच. तुर्की लोक आपल्या वरताण चहा पितात. पण बिनदूधाचा. आम्ही तोच दूध घालून मागवला होता.
सब्जेली पिडे खाऊन पोट तुडुंब भरल्यावर आजचे पहिले प्रेक्षणीय ठिकाण तोपकापी पॅलेससाठी कूच केले.
आम्ही राहत होतो त्या तक्सिमपासून ट्राम जात नाही. त्यासाठी फ्युनिक्युलरने एक स्टेशन खाली काबातासला यावे लागते. तक्सिम स्क्वेअरमध्येच हे फ्युनिक्युलर स्टेशन आहे. प्रवेशद्वारातच इस्तंबूलकार्टचे किअाॅस्क आहेत. आजुबाजुच्या छोट्या जनरल स्टोअरमध्ये हे कार्ड मिळते. त्यातले सात लिरा त्याची किंमत असते. वर आपण ५,१०,१५,२०असे टाॅप अप किआॅस्कवर करु शकतो. या मशिनवर कार्ड ठेवायचे आणि बाजूच्या स्लाॅटमध्ये लिराची नोट टाकायची. लगेच आपल्याला कार्ड रिफिल झाल्याचा मेसेज येतो. ते कार्ड ट्राम,मेट्रो ,फ्युनिक्युलर सर्वत्र चालते. प्रवेशद्वारापाशी हे कार्ड ठेवायचे. त्यातले पैसे कट होऊन आपण आत शिरतो. पहिला प्रवास २.५ लिरा नंतर दोन तासाच्या आत कार्ड वापरल्यास कमी दर लागत जातो.
फ्युनिक्युलर ट्रेन उभीच असते. तिचा एकच स्टेशनचा प्रवास पण गाडी वातानुकूलित, अतिशय स्वच्छ, कुठेही घाण कचरा नाही. ट्रामची स्टेशन पण अगदी लख्ख होती. काबातासहून T1 ही Bagcilar कडे जाणारी ट्राम घ्यायची. काबातास या लाइनचे शेवटचे स्टेशन आहे. सर्व प्रमुख आकर्षणं आहेत सुल्तानअहमेत विभागात. ट्राममध्ये पुढच्या स्टेशनची घोषणा होतच असते. सुल्तानअहमेतला उतरताच डावीकडे केशरी हागिया सोफिया आणि उजवीकडे ब्लुमाॅस्क दर्शन देतात. तोपकापी पॅलेस हागिया सोफियाशेजारीच आहे. त्यामुळे त्या दिशेने चालायला लागायचे. तोपकापी हा इस्तंबूल दर्शनातला बडा ख्याल आहे. त्यामुळे तो भरपूर वेळ देऊन बघावा लागतो! म्हणून पटपट पावलं उचलत हागिया सोफियाकडे बघत बघत त्यावरून सरळ जात टोकाला रस्ता वळतो तो जातो तोपकापीला.
समोरच भव्य दरवाजा आपण राजवाडयात आलोय याची आठवण करुन देतो. हे राजवाड्याचे मुख्य तोपकापी द्वार. इथे पूर्वी संरक्षणासाठी तोफा ठेवलेल्या असायच्या. त्या तोफांचे दार म्हणजे तोपकापी.
दरवाज्यात आपली कडेकोट तपासणी करुन आत सोडले जाते. आत जाणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा मोठे वृक्ष आणि कडेने छानशी बाग आहे. डावीकडे रस्ता आर्किआॅलाॅजी म्युझियमला जातो. सरळ जात राहिल्यावर अचानक गर्दी दिसल्यावर थांबलो तर ते तिकिट घर होते. ती लाईन बघता दोन तास तिथेच मोडले असते पण मग आपण अभ्यास करुन गेलोय त्याचा काय उपयोग! जय ट्रिप अॅडव्हायजर म्हणत शांतताप्रेमी अजयला लाइनीत उभे करुन मी डायरेक्ट काऊंटरवर गेले. तिथे म्युझियम पास मागितला. या पासमुळे तिकिटाच्या रांगेत उभे न राहता राजवाडा, बरीच महत्त्वाची म्युझियम आणि हागिया सोफिया बघता येते. ८५ लिराला एक पास असतो. पण यातले ४०लिरा तोपकापी, ४० हागिया सोफियाचेच तिकिट असते जे आपण बघणार असतोच.वर इतर म्युझियम वेगळे तिकिट न काढता बघता येतात हा फायदा असतो.
म्युझियम पास मागितल्याने मला रांगेत उभे रहायला न लागता लगेच मिळाला. कुठेही काय रांगेत घुसतेस म्हणणाऱ्या अजयला विजयी मुद्रेने रांगेबाहेर काढून दुस-या दरवाजापाशी पोहोचलो. इथे स्कॅनरमध्ये आपल्या बॅगेची तपासणी होते. मगच आत शिरता येते. आत शिरताच उजवीकडे आॅडिओ गाईडचे दुकान आहे. इथे २५ लिरा देऊन आॅडिओ गाईड मिळतो. यात दिलेला नंबर दाबताच त्या ठिकाणची माहिती आपल्याला ऐकु येते. हे घेण्याची काहीही गरज नाही मात्र. आत सर्वत्र उत्तम इंग्रजीत पाट्या आहेत. तसंच आपला मोबाइलही चालता असेल तर आपण काय बघतोय ती माहिती अजून सविस्तर गुगल सांगतंच!
आपल्या कन्याकुमारीसारखा इस्तंबूलचा एक भाग थेट समुद्रात शिरला आहे. दोन्ही बाजूने समुद्र असल्याने शत्रुपासून सुरक्षित अशा या जागी फत्ते महंमदाने आॅटोमन साम्राज्याची पायाभरणी या इथे राजवाडा बांधून केली. ही जागा त्याला चांगलीच लाभली कारण पुढची चारशे वर्ष त्याचा वंश इथे राज्य करत हा राजवाडा वाढवत गेला. या सम्राटांनी कुबेरासारखी दौलत याच ठिकाणी गोळा केली. वैभव म्हणजे काय याची कल्पना या राजवाड्यातल्या त्यांच्या वापरातल्या वस्तूंचे म्युझियम बघून कळते.
राजवाड्याचे चार विभाग आहेत. बाहेरचा संरक्षक विभाग, इथे राजवाड्याचे बाहेरचे पहारे.जसे आत जाऊ तसे खाजगी विभाग येत जातात. आत शिरताच डाव्या हाताचा रस्ता जातो हारिम विभागाकडे. हा बालेकिल्ला.इथे स्वतः सुलतान राहून राज्यकारभार चालवत असे. पण सुलतान हाच इथे राहणारा एकमेव कर्ता पुरूष असे. बाकी या विभागाचे संरक्षण हिजडे करत असत. त्यासाठी आफ्रिकेतून गुलाम मागवले जात. त्यांचे खच्चीकरण करुन मग त्यांना या महत्त्वाच्या जागी कामासाठी वापरले जात असे. कारण आत सुलतान सोडता सुलतानाच्या अनेक रखेल्यांचे स्त्री राज्य असे. पुरुष शक्तीने हवा असे परंतु पुरुष म्हणून नाही! हारिममधल्या स्त्रीवर्गावर लक्ष ठेवणे,सुलतानाची मर्जी सांभाळणे, बावळट सुलतानाचा अगदी राज्यकारभार हातात घेणे इथपर्यंत यांची पोच असे.बऱ्याचदा एक सुलतान बदलून दुसरा येताना आपले मर्जीतले खोजे आणत असे.मग आधीचे कापले जात. त्यामुळे स्वतःच्या जीवाच्या भितीने हे आपापल्या सुलतानाची काळजी घेत असत. या हबशी खोजांच्या रहिवासाचे ठिकाण हारिमच्या सुरूवातीस एका बाजूला आहे. तिथेच एक सुंदर हमामदेखील आहे. तेव्हा नुकतेच आलेले तंबाखूचे हुक्के सुलतानाला करुन देण्याची एक रुमदेखील तिथे आहे.
बाजूलाच दुसरा दरवाजा आहे. इथे आत सुलतान आणि त्याच्या असंख्य रखेल्यांच्या राहण्याच्या खोल्या आहेत. या भागात राज्य असे ते वालिदे सुलतान म्हणजे सुलतानाच्या आईचे. सुलतानाच्या राज्यकारभारावर आणि खाजगीत वालिदे सुलतानची करडी नजर असे. वालिदे सुलतान असणे म्हणजे पाॅवर! म्हणूनच आपला मुलगा सुलतान व्हावा म्हणून या बाया कट कारस्थानं खून विषप्रयोग सर्व काही करायला तयार असत. अशा या वालिदे सुलतानच्या राहण्याचे कक्ष अगदी सुरेख आहेत. दरवाजे हस्तिदंती, अतिशय सुंदर इझनिक टाईल्सच्या भिंती ,संगमरवरी कारंजी, खाजगी प्रार्थनेच्या जागा, सोन्याचे प्रचंड मोठे नक्षीदार आरसे ,भलीमोठी देखणी झुंबरं. आलिशान !
संपूर्ण हारिममधल्या वाटा गुळगुळीत गोट्यांसारख्या दगडांनी बनवल्या आहेत. सुलतान घोड्यावरुन जाताना घसरु नये म्हणून असे खडबडीत रस्ते.
खुद्द सुलतानाचा खाजगी दिवाणखान्यात मध्यभागी त्याचे सिंहासन. बाजूला त्याला रिझवण्यासाठी नृत्यगायन करणाऱ्या सख्या बसायची जागा. प्रचंड मोठी बिलोरी झुंबरं. इझनिक टाईल्सने नटलेल्या भिंती आणि मिमार सिनानचे अप्रतिम आॅटोमन आर्किटेक्चरचे छत.
इथून पुढे सुलतान मुरादच्या खोल्या अतिशय देखण्या टाईल्सने शोभिवंत केलेल्या आहेत. इथले संगमरवरी कारंजे आणि छताचा घुमट फारच सुंदर.
अशा खोल्यांमागून खोल्या लागत असताना पाय आणि डोकं दोन्ही भणभणून जायला लागतात पण काहीनाकाही दिसतंच राहतं. एक मोठी खोली आहे राजकुमारांची सुंता करण्याची! तिच्या बाहेरचे टाईल्सचे काम अप्रतिम सुंदर आहे.
चालत चालत आपण सोनेरी मेघडंबरी असणाऱ्या गच्चीत येतो. इथून समोर पसरलेल्या बाॅस्फरसचे विहंगम दृश्य दिसते. या कमानीत सुलतान रमजानचा उपास सोडायला येत असे. एका बाजूला समुद्र तर मागच्या बाजूला गुलाबाच्या सुंदर बागा अशा ठिकाणी ही गच्ची आहे. याच्या आजुबाजुलादेखील अनेक महाल अनेक कक्ष दिसत राहतात.
इथून पुढे गेलो की महंमद पैगंबराच्या वापरातल्या आणि त्याचे दात केस इ इस्लाम धर्मासाठी अत्यंत पवित्र असणाऱ्या वस्तूंचा कक्ष आहे. निरनिराळ्या डब्यांत ठेवलेले पैगंबराच्या दाढीचे केस लोक वाकून वाकून बघत होते. म्हणून आम्हीपण बघितले ! मक्केच्या काबाचे कडी कोयंडे, महंमदाच्या तलवारी,सिंहासन खानाच्या पवित्र दगडावरचे सोन्याचे कवच अशा बर्याच गोष्टी इथे आहेत. मला उगाच महंमदाचा दात बघायची उत्सुकता होती ! जातंच लक्ष दाताकडे. हाडाची डेंटिस्ट आहे मी
तो या भांडारात नेमका कधी बघितला लक्षातच आले नाही.
तोपकापी प्रसिद्ध आहे ते इथल्या खजिन्यासाठी. इथला तोपकापी खंजीर आणि स्पूनमेकर हिरा जगप्रसिद्ध आहे. तो विभाग मात्र रिस्टोरेशनसाठी बंद होता. तेवढे दोन आयटम ठेवायचे ना बघायला इतर कुठेतरी. मी काय मागणार होते का :-/ ते आता पुढच्या ट्रिपमध्येच दिसणार.
हारेममधून बाहेर येताच बाजूला राजवाड्यातील सुलतानाच्या वस्तूंचे म्युझियम आहे. त्यांचे कपडे बघताना सुलतानांच्या प्रचंड आकारमानाचा प्रत्यय येतो! तिथेच सुलतानांच्या वापरातील पागोटी ठेवलेली आहेत. कांद्याच्या आकाराची ती भलीमोठी पागोटी इतकी विचित्र दिसतात. इतका सुंदर कपडेपट वापरणाऱ्या सुलतानांना ही असली बेंगरुळ पागोटी कशी काय आवडत कळेना. त्यांच्या थडग्यांवरदेखील ही पागोटी ठेवलेली किंवा कोरलेली असतात. पागोटेवाले थडगे म्हणजे राजवंशातल्या पुरूषाचे असे ओळखता येते. या दालनापुढेच मोठे शस्त्रागार आहे. इथे अनेक प्रकारच्या तलवारी, खंजीर ,दांडपट्टे ठेवलेले आहेत. सुलतानाची शस्त्रे मोठाले पाचू, हिरे,माणकांनी मढवलेली आहेत. मला कुठलेच शस्त्रागार बघायला आवडत नाही. सुलतानाची शस्त्रं फारतर शिकारीला वापरली जात असावीत. सुलतानांचे बलाढ्य आकारमान बघता ते घरची लढाई आवरतानाच थकत असावेत यात संशय नाही! त्या हिरेमोत्यांनी सजलेल्या बंदूकीतून शिपायांनी समोर आणलेल्या सावजावर बार ओढणे एवढा वापर.अपवाद फक्त काही सुलतान. याच दालनात शिकारींची चित्र लावलेली आहेत. एका दालनात पूर्ण आॅटोमन वंशावळीची पोर्ट्रेट आहेत.
यापुढे लागते राजवाड्याचे स्वयंपाकघर. एकावेळी दहा हजार माणसे राजवाड्यात जेवत असत. त्यासाठी वापरातली प्रचंड मोठी भांडी ,कढया इथे अतिशय व्यवस्थित जतन केले आहे.
त्याकाळातली चित्र देखील लावलेली आहेत. एका कक्षात सुलतानाच्या वापरातील क्रोकरी आहे. अप्रतिम देखणा असा हा सिरॅमिक संग्रह बघावाच असा आहे. सोनेरी कडांच्या अती नाजूक बश्या, त्यावरची सुंदर चित्र,अत्युच्च दर्जाचे पोर्सलिन त्या त्या शतकाप्रमाणे लावलेले आहे. अखंड जेडच्या बशा सुलतान वापरत.विषारी अन्नाने रंग बदलणाऱ्या या बशा मुद्दाम वापरात असत. तसेही आधी सुलतानाचे अन्न त्याच्या खाशा स्वयंपाकघरात बनत असे. ते सुलतानासमोर त्याचा खासा खोजा खाणार मगच सुलतान ते खात असे. म्हणजे कुबेराला लाजवणारे वैभव असणारा सुलतान कधीच जिवाच्या भिती सोडत नसणार!
बाजूच्या कक्षात सुलतानाच्या वापरातले सोन्याचे जग, तस्तं ठेवलेली आहेत. अतिशय अप्रतिम अशी सोन्याची चांदीची कारागिरी असणारी भांडी या दालनात बघता येतात.
असे सर्व बघत बघत आपण परत बाहेरच्या प्रांगणात येतो. इथे एक नैसर्गिक गंमत बघण्यासारखी अाहे. तीनचारशे वर्ष जुन्या वृक्षांची खोडं बुरशीने पोखरली आहेत. त्या पोकळीतून नवे मोठे वृक्ष उगवले आहेत. अशी बरीच झाडं जाता येता दिसत राहतात.
राजवाडा बघायला लागून चार तास कधीच होऊन गेले होते. पोटात कावळे जोरजोरात ओरडत होते. सॅकमधून नोट्स बाहेर काढल्या आणि लक्षात आले आपण आॅटोमन स्वयंपाकाची खासियत असणाऱ्या हान रेस्टॉरंटच्या अगदी जवळ आहोत. गुगल मॅपला शरण गेलो. आर्किआॅलाॅजी म्युझियमच्या उतारावरून बाहेर पडताच डाव्या हातालाच हे प्रसिद्ध रेस्टॉरंट आहे. इथे लोड तक्के चौरंग लावून आरामशीर जेवता येण्याची व्यवस्था आहे. इथे यायचे ते गोझ्लेमे खाण्यासाठी. गोझ्लेमे आपल्या आलु पराठ्यासारखे सारण भरुन करतात. ते करणाऱ्या स्त्रिया दारातच बनवत असतात. चिज, पालक, बटाटा असे शाकाहारी सारण भरलेले गोझ्लेमे गरम गरम अगदी चविष्ट लागतात. त्यासोबत अायरन म्हणजे ताक अवश्य आहे. साधारण एवढ्या जेवणाचा तीस लिरा खर्च येतो. याच रेस्टॉरंटमध्ये व्हेज केबाब म्हणजे निखाऱ्यावरचे कबाब पण मिळतात. आमचे पोट फारच भरल्याने हे मात्र खायचे राहिले
क्षुधाशांती तर झाली पण अजून हातात संध्याकाळ होती. हान मधून रमतगमत सुलतानअहमेतच्या दिशेने जाताना उजवीकडे येराबतान सरायीचा बोर्ड दिसला. येराबतान सरायी म्हणजेच बॅसिलिका सिस्टर्न. हा जमिनीखाली बांधलेला पाण्याचा प्रचंड मोठा तलाव आहे. सम्राट जस्टिनिअने पंधराशे वर्षापूर्वी इस्तंबूलमध्ये गोड्या पाण्याचा साठा असावा म्हणून हा पाण्याखालचा राजवाडाच बांधून घेतला. प्रवेशद्वारापाशी तिकिट काढावे लागते. म्युझियम पासमध्ये येराबतान सराईचे तिकिट समाविष्ट नाही. जिन्याने खाली जाताच आपण काहीतरी अद्भुत विश्वात प्रवेश केलाय याची त्या धुसर अंधाऱ्या जागेत जाणीव व्हायला लागते. त्यात तुम्ही इंफर्नो वाचले असेल तर त्या शेकडो खांबामध्ये आपण मेड्युसा राक्षसीणीला शोधायला लागतो! (इंफर्नो ही डॅन ब्राऊन लिखित कादंबरी. हिचा क्लायमॅक्स याच येराबतान सराईत घडतो. मी डॅन ब्राऊनची पंखी असल्याने इंफर्नो कादंबरी घडते ते फ्लोरेन्स,व्हेनिस आणि आता इस्तंबूल बघून इंफर्नो जर्नी पूर्ण केल्याचा मला अतिशय आनंद झालेला !)
आतमध्ये अनेक रोमन स्टाईलचे दणदणीत खांब आहेत. त्यांच्या बाजूने विटांचे कमानीचे बांधकाम. मधल्या भागात जाण्यायेण्यासाठी पायवाट.सर्व खांबामधून लाइट लावलेले आहेत. त्यांचा आतल्या पाण्यावर प्रकाश पडून ही जागा अजूनच गुढ वाटायला लावतात. अगदी टोकाला एक रडका खांब आहे! तो कायम ओला असतो म्हणून रडका खांब :)
अगदी टोकाला इथले प्रमुख आकर्षण असणारे खांब आहेत. त्यांच्या तळाशी सर्पकेशी मेड्युसा राक्षसीणीचे तोंड अखंड दगडात उलटे कोरलेले आहे. ग्रीक लोककथात ही मेड्युसा ज्याच्याकडे बघेल त्याचा दगड होत असे. इथल्या पाण्यात कोणी विषप्रयोग करायला आले तर या मेड्युसेला घाबरावे म्हणून हिला इकडे बसवलीये. तर एका खांबावरील मेड्युसेचे तोंड पलिकडे आहे. कारण समोर हागिया सोफियासारखी देखणी वास्तू. तिच्यावर तिची नजर पडू नये म्हणून तिचं तोंड उलटं आणि फिरवलेलं आहे !
येराबतानच्या गुढवलयातून पटकन बाहेर पडावेसे वाटतच नाही. संध्याकाळ होत आलेली. पायांनी आता चालून असहकार पुकारला होता. तरीपण बघायची खुमखुमी अपार्टमेंटवर परतू देईना. मग ट्राम स्टेशनवरून उलट दिशेची परतणारी T 1 पकडली आणि Eminonu स्थानकावर उतरलो. समोर प्रचंड मोठी yeni cami म्हणजेच नवी मशीद दिसते. इथे cचा उच्चार ज .ही येनी जामी. जामी म्हणजेच मशीद. नाव नवी असले तरी ही देखील तीनशे वर्ष जुनी आहे ! तिच्या पुढेच वसला आहे इजिप्शियन बाजार. ही आपल्या क्राॅफर्ड मार्केटसारखी मंडई अाहे. आतून छप्परबंद. बाजूने हारीने मसाले,सुकामेवा, अत्तराची दुकानं. इथल्या तुर्की पाॅटरीच्या दुकानतल्या सुंदर वस्तूंनी माझा खरेदी न करण्याचा इरादा पार मोडून तोडून टाकला! तिथली एक गोंडस सिरॅमिक मांजर माझ्या सॅकमध्ये जाऊन बसलीच :)
इथलाच रस्ता पुढे इझनिक टाईल्सच्या कामासाठी प्रख्यात असणाऱ्या रुस्तम पाशा मशिदीकडे जातो. अगदी जवळ अाहे वाचलेले. मग बघूनच जाऊ म्हणून त्या अफाट बाजाराला आणि गर्दीला ओलांडत जातोय जातोय तरी येईना.कोणी धड सांगेनाही. तेवढयात एका ठिकाणी इस्तंबूलची आठवण म्हणून टी शर्ट पण घेऊन झाले. आता अगदी थकलो होतो. शेवटी परत एकदा चौकशी केल्यावर तिथल्या पोराने सहज वर बोट दाखवले तर आम्ही मशिदीच्या दारातच उभे राहून शोधत होतो असा साक्षात्कार झाला. एवढे करुन मशीद दोन वर्ष नूतनीकरणासाठी बंद आहे अशी सूचना वाचून हिरमुसून निघालो. तर अगदी समोर एमिनोनु स्थानक. आम्हाला त्या बाजारात काय चकवा लागला नकळे!
दुखरे पाय कुरवाळत स्थानकासमोर नव्या मशिदीबाहेर बसायला बाक ठेवलेत तिथे उकडलेले कणीस खात निवांत बसलो जरावेळ. आणि इथल्या धुम्रपानाच्या व्यसनाची कल्पना आली. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक बाईबुवाच्या हातात सिगारेट. इतका सुंदर परिसर पण सिगारेटच्या वासाने मला गुदमरून आले. घसा दुखायला लागला. मग तिकडून पळ काढला. परतीच्या T1 ट्रामने काबातास,फ्युनिक्युलरने तक्सिमला आलो . सकाळच्या हाॅटेलात पिलाव म्हणजे भात आणि दही मागवून दहीभात खाऊन अपार्टमेंटवर परतलो. उद्या इथली सगळ्यात प्रसिद्ध हागिया सोफिया, ब्लु माॅस्क आणि ग्रँड बाजार बघणार होतो. त्याबद्दल वाचतानाच थकलेले डोळे कधी मिटले कळलेच नाही.
पुढच्या भागात ते वाचुच ...