जेथे आशियाला युरोप मिळते. ( इस्तंबूल भाग-३)

आज सकाळी लवकर उठायचे ठरवूनच बाहेर पडलो. रात्री परत येताना जवळच्या मार्केटमधून सोबत ब्रेड बटर केळी घेऊनच आलो होतो. त्यामुळे पटापट रुमवरच नाश्ता केला आणि निघालो. आज घाई करायची होती कारण आजचे पहिलेच ठिकाण होते हजारो वर्षापासून उभे असलेले इस्तंबूलमधले गुलाबी ऐश्वर्य ..हागिया सोफिया. हे म्युझियम कम चर्च कम मशीद बघायला कमीत कमी तीन तास लागतात. शिवाय त्याच्या समोरच प्रसिद्ध ब्लु माॅस्क आणि तिच्यामागे इस्तंबूलचे रोमनकालिन अवशेष हिप्पोड्रोम आहेत.
नेहमीप्रमाणे तक्सिम काबातास फ्युनिक्युलर आणि काबातासहून T1 ट्राम घेऊन सुलतान अहमेत स्टेशनवर उतरलो. उतरलो की समोरच हागिया सोफिया आणि ब्लु माॅस्क दिसतात. त्यांच्याकडे तोंड केले की डाव्या हाताला चालत हागिया सोफिया लागते. त्याच्या प्रवेशद्वारावर प्रचंड मोठी रांग. पण हमारे पास म्युझियम पास था ना! मग रांगेत पुढे जाऊन तो दाखवताच तिळा तिळा दार उघड केल्यासारखे तिथल्या रखवालदाराने आत घेतले. आत परत वैयक्तिक तपासणी अाणि बॅगेचे स्कॅन करावे लागते. ते करुन मग पास दाखवून आपण हागिया सोफियाच्या मुख्य प्रवेशद्वारी येतो.

इसवी सनाच्या चौथ्या शतकापासून उभी असणारी ही देखणी इमारत . बिझेन्तिन आणि आॅटोमन साम्राज्याच्या चढ उताराची साक्षी. तिच्या सौंदर्य आणि भव्यतेने तिला निरनिराळी धर्मांतरे करत वाचवले. शेवटी विसाव्या शतकात आतातुर्कने तिला निधर्मी जाहीर करुन तिचे म्युझियम केले. त्यामुळे सगळे जग आज आतून बाहेरून हे भव्यदिव्य बघु शकते आहे.

.

हागिया सोफियाला तुर्की भाषेत अाय्या सोफिया ayasofya म्हणतात. Hagia Sofia हा ग्रीक शब्द. इमारत इतकी विशाल आहे की तिचा पूर्ण भाग लांब गेल्याशिवाय दिसत नाही. मधला भव्य घुमट खालचे बाजूचे अर्ध घुमट,मिनार मध्ये चर्चमध्ये असतात तशा ग्लास विंडो असे वेगळेच ख्रिस्ती मुस्लिम मिश्रण. दरवाजात गाइड उभेच असतात. इथेही आॅडिओ गाईडची सोय आहे परंतु तोपकापीच्या अनुभवावरून गुगल गाईड आणि इंग्रजीतल्या पाट्या यांचं मार्गदर्शन घ्यायचं ठरवुनच आत शिरलो. तो अगदी उत्तम निर्णय ठरला.

मुख्य प्रवेशद्वाराबाहेर. जुन्या चर्चचे अवशेष जतन केलेले आहेत. इ स ३६० मध्ये सम्राट काॅन्टन्टिनने हे चर्च बांधायला घेतले. पण ते युद्धात जळुन गेलं. मग थिओडोससने परत बांधलं. ते यादवी युध्दात नष्ट झाले. या दोन्ही चर्चेसची छतं त्यावेळी लाकडी होती. सम्राट जस्टिनिअनने बांधलेले सध्याचे चर्च सहाव्या शतकातले आपण बघतोय. या अाय्या सोफिया नावाची पण एक कथाच आहे. जस्टिनिअन आधी या चर्चला फक्त megale ekklesia म्हणजे मोठे चर्च नाव होते. जस्टिनिअनने त्याला झालेल्या दृष्टान्तामुळे नवे चर्च त्याच जागी बांधायला घेतले. त्याला देवाने आय्या सोफिया म्हणजे दैवी शहाणपण असं नाव ठेवायला सांगितले (म्हणे! ) त्या काळात ख्रिश्चन धर्म प्रसारासाठी असे चमत्कार, दृष्टान्त व्हावेच लागत राजाला! ! अजूनही फारसे वेगळे नाहीच Wink

मग सम्राटाने त्याच्या आर्किटेक्टला आज्ञा केली की बायबलमध्ये वर्णिलेल्या साॅलोमनच्या देवळापेक्षा भव्य असे चर्च बांध. आले सम्राटाच्या मना मग काय त्याच्या ग्रीक रोमन सर्वदूरच्या साम्राज्यातून निरनिराळ्या रंगाचे संगमरवर ,रोमन खांब असे साहित्य जमा होऊन पाच वर्षात हे चर्च उभारले गेले. त्या काळात त्याचा घुमट ,आतली सोनेरी मोझाइक्स हे जगातले एक आश्चर्यच होते. इस ५६० मध्ये सम्राटाने या चर्चमध्ये प्रवेश केला आणि त्याच्या भव्यतेने खुश होऊन गर्जला "देवा ,माझी हे चर्च बांधण्यासाठी निवड केलीस, तुझे आभार. आज मी साॅलोमनलाही हरवून टाकलं!"

नंतर अर्थातच सर्व सम्राटांचे राज्याभिषेक या ठिकाणी होऊ लागले. जवळजवळ हजार वर्ष हे जगातलं सर्वात मोठं चर्च होतं. यावरून मुस्लीम धर्मातल्या मशिदी बांधल्या गेल्या. मधल्या काळात पडझड होत डागडुजी होत ते पंधराव्या शतकात आॅटोमनांच्या ताब्यात आले. बिझेन्तिन साम्राज्याचा धुव्वा उडवून फत्ते महंमदाने इस्तंबूल जिंकून घेतले. त्याच दिवशी संध्याकाळी या चर्चमध्ये त्याने नमाज पढला. चर्चच्या वास्तूचा एवढा प्रभाव त्याच्यावर पडला की ते नष्ट न करता त्याची मशीद करण्याचे आदेश दिले. मग मशीद संकूलासाठी आवश्यक मिहराब,मिनराब,मुअज्जिन बांग देतो तो भाग , धर्मशाळा,हमाम, मदरसा अशी एकेक भर पडत गेली. पण आधीची ख्रिस्चन काळातली मोझाइक प्लास्टरखाली झाकली गेली. ..ती नंतर केमाल पाशाच्या काळात घासून उघडली गेली. तसेच फोसाटी बंधूंनी याचे नूतनीकरण करताना काळजीपूर्वक जतन केली. ही अप्रतिम मोझाइक्स बघणे म्हणजे त्या काळात जाऊन पोहोचणे. कसे होते त्या काळात लोक,काय नेसत होते, काय भाषा होती,इतकेच नाहीतर रेनेसान्सच्या सुरूवातीला येशुचे दैवी चित्रण सोडून तो माणसासारखा काढण्याची प्रेरणासुध्दा या मोझाइक्सने त्या काळात दिली. हे सगळे बघण्यासाठी इतिहासाचा हा भलामोठा कॅनव्हास समोर ठेवुन म्युझियमच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आलो. अगदी समोरच इथलं पहिलं देखणं आणि अतिशय सुस्थितीत असणारे मोझाइक आहे. या चित्रातला येशु हा जगन्नियंता दाखवला आहे. त्याच्या बाजूला देवदूत आणि त्या काळातला सम्राट लिआॅन आहे. त्याच्या हातातल्या बायबलमधले शब्ददेखील स्पष्ट दिसतात.
.

आत पाऊल टाकताच आपण त्या भव्य दर्शनाने स्तिमित होऊन जातो. भलामोठा मधला घुमट. त्याखाली रंगीत काचांच्या खिडक्या. बाजूला सोनेरी मोझाइक. घुमटाच्या बाजूला त्याला तोलणारे अर्ध घुमट. छत्री उघडल्यावर दिसते तसे मधल्या काड्यांमध्ये खिडक्या आहेत. उंचावर लावलेल्या ढालीसारख्या फलकांवर कॅलीग्राफीत अल्ला महंमद हुसेन हसन इ ची नावे. उंचावरून खाली सोडलेली हात लागेल असे वाटणारी अतिप्रचंड झुंबरं. काय बघु काय नको!
मध्यभागी पूर्वी चर्चचा क्राॅस असे. तिथे आता मशिदीचा मिहराब आहे परंतू तिथे वर मदर मेरी आणि बालयेशुचे सुरेख मोझाइक टिकून आहे. बाजूला पाय-या आहेत ती मुल्लांच्या भाषणाची जागा. दोन्ही बाजूला ब्राँझचे प्रचंड कँडल स्टँड आहेत. समोर एका बाजूला मुअज्जीनची जागा आहे. इथेच एक संगमरवरी सुंदर खोली खास सुलतानाच्या प्रार्थनेसाठी. मागे सुरेख सोनेरी जाळीकाम असणारे ग्रंथालय आहे. डावीकडे पुढे निळ्या इझ्निक टाइल्स असणारा विभाग आहे. इथे सुलतानाला राज्याभिषेक होत असे. कोपर्यात दोन प्रचंड मोठे संगमरवरी रांजण आहेत. यांचा उपयोग रमजानच्या दिवसात सरबत वाटायला करत. सर्व खांबाच्या टोकाशी असणाऱ्या कोरीव कामात त्या काळच्या राजांचे शिक्के आहेत. पलीकडच्या बाजूला एक खांब आहे. त्यात जो बघावे तो बोट घालत होता. त्यावर पितळ्याचा पत्रा लावलेला आहे. त्याला मध्ये भोक आहे. मनात इच्छा धरुन यात बोट घातले की ती पूर्ण होते म्हणून हा विशिंग काॅलम! तिथे अर्थातच इच्छाधारी लोकांनी गर्दी केलीच होती. माझी इस्तंबूल बघायची इच्छा बोट न घालताच पुरी झाल्याने मी खांबाला लांबूनच सलाम केला :)

.

.

बाहेर येताच बाजूच्या जिन्याने वर जाता येते. इथे पाय-या नाहीत तर सिमेंटी चढ आहे. त्यावर दगडगोटे घालुन खडबडीत केला आहे. आपण तो वर चढून येतो सम्राज्ञीच्या कक्षात. हिरव्या संगरमरवराने ही जागा उठून दिसते. इथून राणी सरकार धार्मिक कार्यक्रम बघत असत. तिचे बसण्याचे संगरमवरी आसन समोरच आहे. इथून खाली बघताना विहिरीत डोकावून बघितल्यासारखे वाटते. आजुबाजुला असणारी मोझाइक वरुन स्पष्ट दिसतात. माझ्याकडे इथल्या मोझाइकमध्ये काय बघायचे याच्या नोट्स आणि गुगलबाबा होता. त्याचे बोट पकडून इथून पुढचे पहायचे कारण ज्या मोझाइक्ससाठी अय्या सोफिया पहायचे ती इथेच आहेत.

सर्वप्रथम लागते ते येशील,मेरी आणि जाॅन द बॅप्टिस्टचे मोझाइक. त्यांच्या चेहर्यावरचे गंभीर भाव ,त्यांचे कपडे सर्वच त्या मोझाइकमधून झळकते आहे. रेनेसान्सला प्रेरणादायी ठरलेले हेच ते मोझाइक. ख्रिस्ताचे इतके मानवी चित्रण त्याआधी केले जात नसावे.

.

याच्या मागे इंफर्नो फेम दांदोलो दोजची कबर आहे. इंफर्नो वाचलेल्यांना कळेलच तिचा उल्लेख मुद्दाम का केलाय!

उजवीकडे कोपर्यात दोन अतिशय सुंदर मोझाइक आहेत. पहिल्या चित्रात येशू मेरीबरोबर तत्कालीन सम्राट आणि त्याची राणी आयरिनी आहे. ते देवधर्म करताना दाखवले आहेत. राणीच्या चेहर्यावरच्या सुरकुत्या, तिचा गुलाबी गोरा रंग अगदी हुबेहूब त्या बारीक सोनेरी तुकड्यामध्ये साकारले आहे. कोपर्यात या राजाचा अकाली वारलेला मुलगा दाखवला आहे. बाजूला उभे राहून हे चित्र दिसते. तो अगदी आजारलेला दिसतोच. तो मृत असल्याने त्याला देवाजवळ जागा मिळावी म्हणून त्याचे चित्र इथे बनवले गेले आहे.
.

पुढचे मोझाइक आहे सम्राट मोनोमाकोस आणि त्याची राणी झोइ हिचे. तेदेखील देवाला मोहरांची थैली अर्पण करत अाहेत. या चित्रातली मजा म्हणजे झोई नवरे मर्जीनुसार बदलत असे त्याप्रमाणे चित्रातले नवर्याचे डोके बदले धड कायम राही! हा तिसरा नवरा चित्रात दिसतो कारण त्याला मारण्याआधी झोईच एकदाची स्वर्गात पोहोचली! !

इकडे कठड्यावर एक गंमत बघायला मिळते. हजार वर्षापूर्वीची ग्राफिटी! व्हायकिंग आक्रमणाच्या काळात सुरक्षारक्षक असणाऱ्या कोणीतरी तिथे आपले नाव संगमरवरात कोरून ठेवलंय ज्याचा अर्थ Halvadan was here !ते आता जपलं जातंय. अजय म्हणायला लागला त्यालाही प्रेरणा मिळाली मग कोरायला. हजार वर्षांनी ते लोक कौतुकाने बघतील तरी! आमचे कोणाला कौतुकच नाही ,त्याने हजार वर्षापूर्वी केलेले चालतेय :-/

.

इकडून समोरचे दर कोपर्यावर केलेले देवदुताचे मोझाइक स्पष्ट दिसते. मधल्या घुमटाभोवती ही पंखधारी देवदूतांची मोझाइक आहेत. आता त्यातल्या एकाचा चेहरा स्पष्ट करण्यात पुरातत्त्व खात्याला यश आले आहे.

.

पलीकडच्या बाजूस इथले संग्रहालय आहे. उतरताना समोर एक भलेमोठे मोझाइक लागते. त्याच्यासमोर आरसा ठेवलेला आहे. यात सम्राट जस्टिनिअन आणि काॅन्स्टंटिन हे चर्च येशूला अर्पण करताना दाखवले आहेत.
.

इथल्या भिंती प्रचंड जाड असल्याने जिन्याच्या बाजूचा उपयोग थडगे म्हणूनही केलेला दिसतो. देवाच्या सान्निध्यात मृत्यूनंतर राहण्यासाठी इथे अात मृतदेह पुरले जात. त्यातली दोन ठिकाणं उघडून ठेवलेली आहेत.

असे सगळे बघत बघत आपण खालच्या ओव-यामध्ये येतो. तरी काहीनाकाही दिसत राहतेच. बाप्तिस्मा देण्याची संगमरवरी पात्रं, सुलतानांच्या कबरींचा मिमार सिनानने बांधलेला कक्ष मागे आहे तरी बघावाच. आॅटोमन वास्तुकलेचा कळसाध्याय गाठलेल्या काळातल्या या देखण्या वास्तू. आतले इझ्निक टाईल्सचे काम,कॅलीग्राफीतल्या टाइल्स, सोनेरी घुमट अतिशय बघण्यासारखं आहे.

याच ओवरीत आतातूर्क पाशाने या मशिदीला निधर्मी म्युझियम केल्याचा जाहीरनामा, सुलतानाचा मोझाइकमधला शिक्का हे मांडून ठेवलेले आहे. इतरही अनेक वस्तू दिसत राहतात. इथे एक अय्या सोफियावरची फिल्म बघायला मिळते. ती बघून मग फिरल्यास आपण काय बघतोय उमजायला मदत होते.

सगळे बघता बघता तीन तास कधी उडून गेले कळलेसुध्दा नाही. आता पोटात कावळ्यांना पिल्लं झाली होती. जवळच्या हान रेस्टॉरंटकडे परत पावलं वळलीच. आज पालक गोझ्लेमे, आॅटोमन स्टाईल बेक्ड पोटॅटो आणि आयरन मागवलं. बेक्ड पोटॅटो होते चविष्ट पण फारच तेलात ते क्रिस्पी होत ठेवले होते. पोट तुडुंब भरल्यावर निवांत चालत समोरच्या ब्लु माॅस्कमध्ये गेलो.

.
ब्लु माॅस्क ही वापरातील मशीद आहे. त्यामुळे आपले डोके रूमालाने झाकून जावे लागते. ही मशीद पहिल्या अहमेत सुलतानाने बांधली. तिला लहान मोठया घुमटांनी डौलदार आकार मिळालाय. मक्केपेक्षा एक कमी असे सहा टोकदार मिनार तिची शोभा वाढवतात. गुलाबी केशरी अय्या सोफिया आणि ही मशीद समोरासमोर आहेत. दोन देखण्या वास्तू एकमेकींकडे बघत शतकानुशतकं उभ्या आहेत. मधल्या बागेत रोक्साना सुलतानाने बांधलेले सुंदर कारंजे आहे.

ब्लु माॅस्कमध्ये प्रवेश करताच दिसते ते मधले प्रचंड झुंबर. आणि सर्व बाजूंनी विविध नक्षीच्या निळ्या इझ्निक टाईल्स. त्या निळाईचा अजब करिश्मा त्या वास्तूमध्ये आहे. डोळ्यांना सुखद. शांतवणारा. मशिदीबाहेरच अरास्ता बाजारकडे जाणारा रस्ता आहे. असा बाजार, हमाम, किचन, कारंजे,मदरसा मिळून मशिदीचे परिपूर्ण संकूल बनते. त्यामुळे हा बाजारही पूर्वापारचाच. तिथे अनेक दुकानं आहेत. इथे मुख्यतः पेंटिंग्ज विकत घ्यायची असतील तर जरुर चक्कर मारावी.

.
.
.

ब्लु माॅस्कचा मागचा दरवाजा उघडतो हिप्पोड्रोममध्ये. हे इस्तंबूलचे ग्रीक अवशेष . खरेतर हा पूर्ण भागच त्याकाळी हिप्पोड्रोम म्हणजे रथांच्या शर्यतीचे मैदान होते. बिझेन्तिन साम्राज्य ग्रीकांचे. त्यामुळे ब्लु माॅस्कच्या जागी त्यांचा राजवाडा होता. आणि मनोरंजनासाठी हिपोड्रोम. इथेच व्हेनिसच्या सेंट मार्क्स चर्चवर लावलेला प्रसिद्ध क्वाड्रिगा म्हणजे चार घोड्यांचे ब्राॅन्झ शिल्प होते. रोमनांनी टाकलेल्या धाडीत ते इटलीला नेले गेले.

सध्या हिपोड्रोममध्ये ओबेलिस्क म्हणजे दगडाचे स्तंभ थोड्या अंतरावर दिसतात. त्यातली एक इजिप्शियन ओबेलिस्क आहे. ही सम्राट थिओडोसिअसने इजिप्तहून पळवली! तिसऱ्या तुतमोसिस फेरोचा विजय साजरा करण्यासाठी ही ओबेलिस्क कैरोजवळ उभी केली होती. ती पळवून आणुन परत तिच्याखाली आपली विजयगाथा रचून ते शिल्प सम्राटाने इथे उभारले.
.
या ओबेलिस्कपुढे एक पिळापिळाचा लोखंडी खांब आहे. तो तोडलेला स्पष्ट दिसतो. त्याच्यावर पूर्वी सोनेरी नाग होते. हा खांब ग्रीसमधील देल्फीच्या अपोलोच्या देवळातला. सम्राट काॅन्स्टंटिनने इस्तंबूलचे न्यू रोमा म्हणजे नवीन रोम करण्याच्या नादात काहीही उचलून इथे आणले त्यात हा खांब होता. मूळचा सुंदर आता भग्न.

याच्यापुढे अजून एक ओबडधोबड दिसणारी ओबेलिस्क आहे. ती सम्राट काॅन्स्टंटाइन सहाव्याने घडवलेली. तिच्यावरचे मौल्यवान आवरण क्रुसेडर्सने पळवल्यावर आतला ओबडधोबड भाग उघडा आहे.

.

याच्या टोकाला जर्मन कारंजे आहे. ते आॅटोमन शैलीतले कारंजे जर्मनीच्या कैसर विल्यमकडून भेट मिळालेले आहे.

हे सगळे बघता बघता संध्याकाळ कधी झाली कळालेच नाही. तरी बघायची हौस न फिटल्यासारखे आम्ही ट्राम पकडून बेयाझितला उतरलो. इथेच बाहेर प्रसिद्ध ग्रँड बाजार आहे. सात वाजल्याने तो बंद झालेला मिळाला. मग परत आलो. आज हाॅटेलात व्हिलेज आॅमलेट म्हणजे आॅमलेट ,पाव आणि भरपूर सॅलड सोबत येते. पिलाव म्हणजे भात आणि दही मागवून छान जेवलो.

उद्याचा दिवस आजपेक्षाही धावपळीचा असणार होता. रोज येता जाता दिसणाऱ्या बाॅस्फरस खाडीत क्रुज उद्या घ्यायची होती. गलाटा टाॅवर खुणावत होताच. तेच सगळे डोक्यात घोळवत दमून कधी झोपलो कळलेच नाही.

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle