मी शाळेत असताना कधीतरी (नक्की साल लक्षात नाही) एकदा मी संध्याकाळी घरी आले तेव्हा आई बाबा बाहेर गेले होते. दिंदीला (माझ्या मोठ्या बहिणीला) विचारलं तर ती म्हणाली,’ सोहोनी काकूंकडे गेलेत.”
ते ऐकताक्षणी मी आनंदानी उडालेच. त्याला कारण ही तसंच होतं. काही दिवसांपूर्वी सोहोनी काकूंनी (आमच्या आईची मैत्रीण) आईला फोन केला होता .. त्यांच्या ‘डॉली’ नावाच्या पॉमेरिअन कुत्रीला पिल्लं झाली होती . ‘त्यातलं एखादं पिल्लू तुम्हाला हवं आहे का?’ या त्यांच्या प्रश्नाला आम्ही खूप जोरात ‘ होsssss ‘ असं उत्तर दिलं होतं. आणि त्या दिवशी त्यातल्याच एक पिल्लाला घरी घेऊन यायला आई बाबा काकूंकडे गेले होते.
आम्ही सगळ्यांनी पटापट येणाऱ्या पाहुण्याच्या स्वागताची तयारी सुरू केली. सगळ्यात गहन प्रश्न होता… त्या पिल्लाला बांधून ठेवायचं का नाही? यावर खूप चर्चा झाली आणि शेवटी ‘आई म्हणेल तसं करूया’ असं ठरलं.
पण बाकी तयारी काही कमी नव्हती! त्याच्यासाठी बसायला आणि झोपायला म्हणून माझ्या आजीच्या एका मऊ नऊवारी लुगड्याची गादी तयार केली. आणि त्याच साडीतून राहिलेल्या कापडाचं matching पांघरूण ….कोणीतरी म्हणालं,” अरे, त्याच्यासाठी दूध तयार ठेवूया.. भूक लागली असेल तर?”
विचार तर योग्यच होता.. पण ते छोटंसं पिल्लू दूध पिणार कशातून? सगळं स्वैपाकघर पालथं घातलं पण योग्य ते भांडं काही सापडलं नाही. मग अस्मादिक मदतीला धावून आले.. मला शाळेत स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवल्याबद्दल एक लाल रंगाची प्लास्टिकची खोलगट अशी डिश मिळाली होती..इतके दिवस मी ती अगदी जपून ठेवली होती माझ्या कप्प्यात… as my prized possession. मी ती डिश घेऊन आले आणि त्या गादी शेजारी ठेवली.. अर्थात त्यानंतर मला माझ्या भावंडांनी खूप काही ऐकवलं म्हणा… “ का गं, आम्ही मागितली तर नाही दिलीस आणि आता मात्र स्वतःहून दिलीस!” वगैरे वगैरे..
थोडयाच वेळात आई बाबा आले आम्ही सगळ्यांनी त्यांच्या भोवती गराडा घातला.
सुरुवातीला तर मला दिसलाच नाही तो… पण मग आई नी जेव्हा हळूच त्याला जमिनीवर ठेवलं तेव्हा बघितलं मी…. जणू काही मऊ मुलायम कापूसच, पांढरा शुभ्र ! प्रथमदर्शनीच मी त्याच्या प्रेमात पडले. आम्हां भावंडांच्या आनंदाच्या किंकाळ्या ऐकून तो छोटासा जीव घाबरून परत आईच्या कुशीत शिरला.
ते बघून बाबा त्यांच्या नेहेमीच्या स्टाईल मधे म्हणाले,” बाजूला व्हा बरं तुम्ही सगळे… थोड्या वेळात आपणहुन येईल तो तुमच्याकडे.” जे लोक आमच्या बाबांना ओळखतात त्यांना कळलंच असेल… बाबांनी ‘बाजूला व्हा’ म्हटल्यावर आमची कोणाची काय बिशाद ! आम्ही सगळे चुपचाप जाऊन सोफ्यावर बसलो. पण बाबांच्या बोलण्यातून एक कळलं..ते पिल्लू ‘तो’ होतं, ‘ती’ नव्हतं.
पण त्यामुळे आम्हांला काहीच फरक पडणार नव्हता म्हणा!
आमच्या सारखंच ‘त्या’नी पण बाबांचं म्हणणं ऐकलं वाटतं, कारण थोड्यावेळानी हळूच तो आईच्या कुशीतून बाहेर आला आणि त्याची ती छोटीशी शेपूट हलवत आमच्याकडे बघत हळूच भुंकला.. जणू काही स्वतःची ओळख करून देत होता !
आमचा गलका ऐकून शेजारून आमचे काका काकू आणि चुलत भावंडं पण आली… मग सुरू झालं एक गहन चर्चासत्र… ‘या पिल्लाचं नाव काय ठेवायचं?’ प्रत्येक जण काही ना काही नावं सुचवत होता. नावात जरी एकमत होत नव्हतं तरी एका गोष्टीत सगळ्यांचं एकमत होतं.. आणि ते म्हणजे -’ नाव एकदम वेगळं असलं पाहिजे.. टिपिकल कुत्र्यांची नावं असतात तसं नको!’ मग खूप विचारांती ‘लौकिक’ हे नाव ठरलं. पण माझ्या काकांना ‘कौस्तुभ’ हे नाव ठेवायचं होतं. प्रॉब्लेम हा होता की दोन्ही नावं सगळ्यांनाच आवडली होती. पण ठरवणार कोण? शेवटी आम्ही उत्सवमूर्तीला च हा मान देण्याचं ठरवलं.. म्हणजे त्या पिल्लाचं नाव काय असावं हे त्यानी स्वतः च ठरवायचं! त्यासाठी मग आम्ही दोन चिट्ठ्या तयार केल्या.. एकीवर लिहिलं ‘कौस्तुभ’ आणि दुसरीवर ‘लौकिक’.. त्या दोन्ही चिठ्ठ्या त्या पिल्लासमोर ठेवायचं ठरलं, तो ज्या चिठ्ठी ला नाक लावेल ते त्याचं नाव! ठरल्याप्रमाणे दोन्ही चिठ्ठ्या त्याच्यासमोर ठेवण्यात आल्या. तेवढ्यात माझा छोटा चुलत भाऊ म्हणाला,’ अरे, चिठ्या नीट फोल्ड तर करा.. लिहिलेलं सगळं दिसतंय त्याला!’ त्याचं हे निरागस बोलणं ऐकून सगळे जण खूप हसले..पण ‘त्या पिल्लाला वाचता येत नाही’ हे त्याला काही केल्या पटेना.
चिठ्या ठेवल्याक्षणी त्यानी त्यातल्या एकीला नाक लावलं (बहुतेक तो त्याच्या natural instinct नी वास घेत होता, पण आम्ही असं गृहीत धरलं की त्यानी ते नाव सिलेक्ट केलं). आणि अशा रितीनी आमच्या ‘लौकिक’ चा नामकरण सोहळा संपन्न झाला. पण आमच्या काकांसाठी मात्र तो शेवटपर्यंत ‘कौस्तुभ’ च होता. आणि आश्चर्य म्हणजे फक्त काकांनी ‘कौस्तुभ’ म्हटलं तरच तो लक्ष द्यायचा, जणूकाही त्याला त्या खास नावानी हाक मारायचा अधिकार त्यानी फक्त काकांनाच दिला होता , इतरांसाठी तो ‘लौकिक’ होता. माझे मित्र मैत्रिणी त्याला प्रेमानी ‘अलौकिक’ म्हणायचे.
त्या दिवसाचा उरलेला सगळा वेळ ‘लौकिक’ बरोबर खेळण्यात आणि त्याची सरबराई करण्यातच गेला. विनिताताईनी ( माझ्या दुसऱ्या मोठ्या बहिणीनी) तिच्या अनमोल खजिन्यातून एक लाल रंगाची satinची रिबन आणली आणि लौकिक च्या गळ्याभोवती बांधली. त्यामुळे तर तो अगदी एखाद्या छोट्या 'gift wrapped soft toy’ सारखा दिसायला लागला.
आईनी त्याच्या लाल डिश मधे थोडं दूध घालून त्याच्या समोर ठेवलं आणि बघता बघता त्यानी ते सगळं दूध फस्त केलं. दूध पिताना (rather चाटताना) त्याची ती आतबाहेर होणारी इवलीशी गुलाबी जीभ बघून मी अगदी मंत्रमुग्ध झाले होते. त्याला तसं बघताना अचानक माझ्या मनात आलं..” जेमतेम दोन महिन्यांचा आहे हा! काही वेळा पूर्वी पर्यंत त्याच्या आईबरोबर होता. त्याच्या.ओळखीच्या जागेत! आणि आता एकदम इतक्या सगळ्या अनोळखी लोकांमधे आईपासून लांब आलाय…. काय चालू असेल त्याच्या मनात? आईची आठवण येत असेल का? या डिशमधल्या दुधाला त्याच्या आईच्या दुधाची चव असेल का?” नकळत माझ्या मनात त्या छोट्याश्या अबोल जीवासाठी खूप प्रेम भरून आलं, त्याच्यासाठी एक ‘protective’ भावना जागी झाली. मी मनातल्या मनात त्याला प्रॉमिस केलं की मी त्याची खूप काळजी घेईन. त्याला खूप प्रेम देईन.
पण त्याच्या जन्मदात्री ची उणीव आमच्या आईनी भरून काढली. आम्हां चौघा भावंडांबरोबरच ती लौकीकची पण आई झाली. आणि तोही अगदी मातृभक्त होता बरं का! सारखा आईच्या मागे मागे असायचा. दुपारी आई जेव्हा झोपायची तेव्हा लौकिक त्या खोलीच्या दाराशी बसून राहायचा. आणि जोपर्यंत आई उठून बाहेर येत नाही तोपर्यंत आम्हाला कोणालाही त्या खोलीत पाऊल ही नाही ठेवू द्यायचा. जर कोणी हिम्मत करून आत जायचा प्रयत्न केलाच तर चिडून दात दाखवत गुरगुरायचा… कदाचित भुंकण्याच्या आवाजानी आई उठेल असं वाटत असावं त्याला! पण त्याचं ते गुरगुरणंच पुरेसं असायचं.
रोज सकाळी जेचा आम्ही चहा प्यायला डायनींग टेबल पाशी बसायचो तेव्हा तोही त्याची डिश घेऊन हजर असायचा. हो,...आमच्याबरोबर तो सुद्धा रोज सकाळी चहा प्यायचा!
लौकिक घरी येऊन जेमतेम २-३ दिवस झाले असतील,आम्हांला हळूहळू त्याच्या असण्याची सवय होत होती. पण त्यानी मात्र बहुतेक पहिल्या दिवसापासूनच आमच्या घराला आणि आम्हां सगळ्यांना आपलं मानलं होतं..एका सकाळी जेव्हा आईनी रोजच्या प्रमाणे दूधवाल्यासाठी दार उघडलं तर लौकिक दारापाशी बसलेला होता. चेहरा मलूल आणि डोळ्यांत पाणी होतं त्याच्या… बिचारा … रात्रभर बाहेरच राहिला होता. आणि आमच्या कोणाच्या लक्षातच नव्हतं आलं. आई ला बघताच तिच्या पायांशी घुटमळत तक्रारीच्या सुरांत भुंकत होता.. जणू काही विचारत होता,” मला रात्रभर बाहेर का ठेवलंस ?”
त्याला तसं बघून आम्हांला इतकी अपराधाची भावना आली… खूप वेळा सॉरी म्हणालो त्याला! त्या दिवसानंतर मात्र रोज रात्री झोपायच्या आधी लौकिक ची खबरबात घ्यायला नाही विसरलो कधी.
सुरुवातीच्या काही दिवसांत त्याला फिरायला बाहेर घेऊन जाण्यासाठी आम्हा भावंडांत भांडणं व्हायची.. प्रत्येकालाच जायचं असायचं .. शेवटी आई ज्याला सांगेल त्यांनी जायचं असं ठरलं, कारण आई partiality करणार नाही याची खात्री होती.
थोड्याच दिवसांत लौकिक आमच्या घरातला एक अविभाज्य घटक झाला. कुठेही बाहेर जाताना इतरांप्रमाणेच आम्ही त्याला ही सांगून जायचो. संध्याकाळी घरी आल्यावर पहिली पाच मिनिटं त्याच्यासाठी ठेवावी लागायची.. त्याला झालेला आनंद, त्याचं अंगावर उड्या मारणं, लाडिक आवाजात भुंकणं … किती छान वाटायचं ते सगळं! आपलं अस्तित्व कोणालातरी इतका आनंद देऊन जातं या नुसत्या कल्पनेनीच समाधान वाटायचं.
मी कॉलेज मधे असताना NCC तर्फे गिर्यारोहणाच्या कॅम्पसाठी ग्वालियर ला गेले होते. तिथून परत येताना घरातल्या प्रत्येकासाठी मी काही ना काही भेटवस्तू घेऊन आले होते. पण लौकिक साठी मात्र मला काहीच पसंत नव्हतं पडलं. पुण्यात परत आल्यावर स्टेशन वरून रिक्षानी घरी जाताना मनात सारखा लौकिकचाच विचार येत होता. त्याच्यासाठी काहीच न आणल्याची खंत वाटत होती. तसं पाहिलं तर त्याची माझ्या कडून काहीच अपेक्षा नव्हती हे मलाही माहीत होतं. पण मलाच असं रिकाम्या हाती जाणं पटत नव्हतं. मनात हे सगळे विचार चालू असताना सहज माझं लक्ष बाहेर रस्त्यावर गेलं आणि मला माझं उत्तर सापडलं. मी रिक्षावाल्या काकांना एके ठिकाणी रिक्षा थांबवायला सांगितली आणि उतरून सरळ समोरच्या ‘ललित महल’ हॉटेल मधे गेले. तिथून दोन प्लेट इडली पॅक करून घेतली. लौकिकला इडली खूप म्हणजे खूपच आवडायची. आता मला कधी एकदा घरी पोचते असं झालं होतं. माझं हे गिफ्ट त्याला नक्की आवडेल याबद्दल शंका नव्हती. घरी पोचल्यावर मी दारावरची बेल वाजवायच्या आधीच आतून लौकिकनी भुंकायला सुरुवात केली होती. त्याच्या आवाजातला आनंद आणि अधीरता मला जाणवत होती. आणि मी जेव्हा घरात शिरले तेव्हा त्याची प्रचितीही आली. मला इतक्या दिवसानंतर आलेली बघून त्याला खूपच आनंद झाला होता. सुरुवातीची काही मिनिटं तो फक्त माझ्या अंगावर उड्या मारत होता. मी त्याला जवळ घेऊन त्याचे लाड केल्यावर तो थोडा शांत झाला. मग मी त्याच्यासाठी आणलेल्या इडलीचं पॅकेट त्याच्यापुढे ठेवलं. वासावरूनच त्यानी ओळखलं असणार आत काय आहे ते. मला वाटलं होतं की तो लगेच त्या इडल्या फस्त करेल, पण त्यानी चक्क चक्क वास घेऊन ते पॅकेट बाजूला सारलं आणि माझ्या मांडीवर येऊन बसला. त्याचं ते निर्व्याज , निरपेक्ष प्रेम बघून त्या क्षणी मला जग जिंकल्याचा आनंद झाला.
पण हे सगळं जरी खरं असलं तरी लौकिक च्या नात्यांच्या समीकरणात आमच्या आईचं स्थान सगळ्यात वरती होतं. आणि त्याला कारणही तसंच होतं. आई अगदी खरंच एखाद्या लहान बाळाची घ्यावी तशी लौकिक ची काळजी घ्यायची. त्याला जर कधी बरं वाटत नसेल तर त्याची सगळी सेवा शुश्रूषा करायची ती.. मला लक्षात आहे, एकदा त्याला ताप आला होता तेव्हा् आई त्याला मांडीवर घेऊन बसली होती… त्याला झोप लागली असं वाटून तिनी सुरुवातीला त्याला मांडी वरून खाली त्याच्या गादीवर ठेवलं तर तो लगेच कण्हायला लागला. म्हणून मग रात्रभर ती त्याला मांडीवर घेऊन बसून राहिली होती. त्यांच्या या अशा नात्यामुळेच की काय पण आमच्या कॉलनी मधे सगळे आमच्या आईला ‘लौकीकची आई’ अशीच हाक मारायचे!
संध्याकाळी आई आणि काकू घराबाहेर कडुनिंबाच्या पारावर गप्पा मारत बसायच्या; तेव्हा हे महाशय देखील अंगणात बागडत असायचे. कॉलनीच्या ग्राउंड वर सगळी मुलं वेगवेगळे खेळ खेळत असायची.. आमच्या बंगल्याच्या गेटच्या आतून लौकिक त्यांची पळापळ, आरडाओरडा बघत बसायचा.. पण जर का चुकून एखादा कावळा आमच्या अंगणाच्या वरून उडत जाताना त्याला दिसला तर जमिनी वरूनच त्याचा पाठलाग करायचा आणि तोही अगदी तारसप्तकात भुंकत भुंकत ! जणू काही आमचं घर आणि अंगण कावळ्यांसाठी out of bounds होतं !!
कावळ्यांशी जसा त्याचा ३६ चा आकडा होता तसंच उंदरांशीही अगदी हाडाच वैर होतं त्याचं.
आमच्या घरी लॉफ्ट वर बऱ्याच वेळा उंदीर यायचे. बहुधा लॉफ्ट च्या भिंतीला लागून असलेल्या खिडकीतून येत असावे. त्या उंदरांना नेस्तनाबूत करायच्या मोहिमेत लौकिक चा सिंहाचा वाटा असायचा. लॉफ्ट वरून उंदराची खुडबुड ऐकू यायला लागली की एखाद्या दिवशी आई, आमची मोलकरीण हिराबाई आणि लौकिक एकजूट होऊन गनिमी काव्यानी त्या उंदराचा नायनाट करायचे.
त्यांची strategic planning इतकी जबरदस्त असायची की विजय त्यांचाच होणार हे ठरलेलं असायचं.
सगळ्यात आधी हिराबाई स्टूल वरून लॉफ्ट वर चढायची. तिला असं पाहताक्षणीच लौकिक ला कळायचं की आता उंदीर मारायची मोहीम सुरू झाली आहे. तो आपणहून कोणीही न सांगता लॉफ्ट च्या खालच्या पॅसेज मधे एकदम तयारीत थांबायचा.. मग हिराबाई काठीनी लॉफ्टवरचं सामान हलवायची, त्यामुळे घाबरून बाहेर पळणारा उंदीर साहजिकच लॉफ्ट वरून खाली उडी मारून पळायचा प्रयत्न करायचा… and this is where laukik would take charge of the situation.. तो इतका चपळ होता की धावणाऱ्या उंदरालाही बरोब्बर पकडायचा , आणि उंदराला मारायची त्याची स्टाईल पण एकदम जगावेगळी होती. तो उंदराला तोंडात पकडायचा आणि स्वतःच्या मानेला एक हलकासा झटका द्यायचा ...बस्स् … पुढच्या क्षणी उंदीर मरून जमिनीवर पडलेला असायचा ! आणि आश्चर्य म्हणजे रक्ताचा एक थेंबही नाही दिसायचा कुठे.. मग तो मेलेला उंदीर आई बागेत एखाद्या झाडाखाली दफन करायची ! अशा रीतीने त्या मोहिमेची सांगता व्हायची.
पण अशा वेळी हिराबाई च्या टीम मधे असणारा लौकिक इतर वेळी मात्र का कोण जाणे पण तिच्यावर खार खाऊन असायचा! रोज सकाळी ती आल्यावर तिच्यावर भुंकायचा… जणू काही पहिल्यांदाच बघतोय तिला. तिनी घर झाडायला सुरुवात केली की लौकिक तिच्या मागे मागे जायचा.. जणू काही तिच्यावर पाळत ठेवून असायचा.
त्याच्या काही सवयी खूप interesting होत्या. जेव्हा त्याला तहान लागायची तेव्हा तो बाथरूम मधे जाऊन उभा राहायचा आणि भुंकून आमच्यापैकी कोणाला तरी बोलवायचा. मग आम्ही बाथरूम मधला नळ उघडायचो आणि त्यातून पडणाऱ्या पाण्याच्या धारेत मधे तोंड घालून लौकिक पाणी प्यायचा. या सगळ्या द्राविडी प्राणायामात बऱ्याच वेळा त्याच्या नाकात पाणी जायचं, मग बाहेर येऊन शिंकत बसायचा !
आमच्या काकांकडे एक मांजर होती- सोनम नावाची. तिचं आणि लौकीकचं खूप सख्य होतं. बऱ्याच वेळा सोनम लौकिकच्या डिश मधलं दूध पिऊन जायची आणि त्यालाही त्यात काही आक्षेपार्ह नाही वाटायचं.
मी जेव्हा माझ्या सरोद चा रियाज करायची तेव्हा त्याला काय वाटायचं काय माहीत! पण सरोद चा आवाज ऐकल्याक्षणी तो जिथे असेल तिथून पळत माझ्याजवळ येऊन उभा राहायचा. आणि वादनाची गती जेव्हा वाढायची तेव्हा त्याच्या खाण्याच्या डिशमधे जो काही खाऊ असेल तो अगदी चाटून पुसून स्वच्छ करायचा.. माझं सरोद वादन आणि त्याचं उदरभरण यांचं काय नातं होतं ते शेवटपर्यंत माझ्या लक्षात नाही आलं. पण माझ्या लहान भावाकडे -पराग कडे मात्र याचं एक स्पष्टीकरण होतं… त्याच्या मते- माझं सरोद वादन लौकीकला इतकं असह्य व्हायचं की तो म्हणायचा..’अगं बाई, मी सगळं ताट स्वच्छ करायला तयार आहे पण तुझं वादन थांबव!’
खैर, त्याच्या या वक्तव्याला मी ‘बाल मनातले पोरकट विचार’ असं समजून मोडीत काढायची!
लौकिक च्या खाण्यापिण्याच्या आवडी पण अगदीच माणसाळलेल्या होत्या.. इडली तर त्याची all time favourite होती. फणसाचे गरे तर इतक्या सफाईनी खायचा… गरा पोटात आणि आठळी बाहेर… केळी पण आवडायची त्याला. त्यामुळे त्याला जर कधी औषधाच्या गोळ्या द्यायच्या असल्या तरी आम्ही त्या केळ्यात लपवून द्यायचो. अजून एक त्याच्या अगदी आवडीचं फळ म्हणजे आंबा… आंब्याची कोय तर तो अशी स्वच्छ करायचा की वाटायचं - ‘आपण ही शिकावं याच्याकडून आंबा कसा खायचा ते !’
आई कोबी चिरायला बसली की पुढच्या काही मिनिटांत लौकिक तिच्या शेजारी हजर असायचा…. त्याचं सगळं लक्ष त्या कोबी च्या गड्ड्यातल्या मधल्या दांड्यावर असायचं. पण त्याला त्याच्या limits माहीत होत्या, त्यामुळे जोपर्यंत आई स्वतः त्याला तो मधला दांडा नाही द्यायची तोपर्यंत तो तसाच उभा राहायचा.. आईच्या आदेशाची वाट बघत! आईनी फक्त ,” घे लौकिक” म्हणायचा अवकाश.. पुढच्या क्षणी त्याच्या भक्ष्या सकट तो गायब झालेला असायचा. मग पु.लं च्या म्हैस मधल्या सारखं आम्ही म्हणायचो,” अर्ध्या तासाची निश्चिन्ति झाली, बगू नाना!”
घरातल्या प्रत्येक माणसाबरोबर लौकिकचं नातं आणि त्याचं वागणं वेगळं होतं. आमच्या बाबांशी आठवडाभर अगदी प्रेमानी खेळणारा लौकिक रविवारी मात्र त्यांच्यापासून चार हात दूर असायचा. कारण दार रविवारी बाबा त्याला अंघोळ घालायचे.मला नेहेमी एक प्रश्न पडायचा की ‘आज रविवार आहे हे लौकिक ला कसं कळतं ?’ पण रविवारी सकाळपासूनच तो आईच्या मागेमागे असायचा. आणि जेव्हा आई बाबांना त्यांच्या दुसऱ्या चहासाठी हाक मारायची तेव्हा हळूच कोणाच्याही नकळत बेडरूम मधे कॉटखाली अगदी आत, भिंतीपाशी जाऊन बसायचा. त्याला बाबांचं रुटीन पाठ झालं होतं. दुसऱ्या चहा नंतर बाबा त्याला अंघोळीसाठी हाक मारायचे आणि तो मात्र ऐकू न आल्यासारखं दाखवायचा. शेवटी अक्षरशः त्याला उचलून घेऊन जावं लागायचं बाथरूम मधे!
मस्त शॅम्पू केलेले त्याचे ते मऊ मऊ केस विंचरायला मला खूप आवडायचं. एक वेगळीच चमक यायची त्याच्या केसांना! लहानपणी अगदी पांढरे शुभ्र असलेले त्याचे केस नंतर नंतर golden झाले होते. त्यामुळे तर तो अजूनच रुबाबदार दिसायचा! आम्ही अधून मधून त्याच्या कपाळावर मेंदीचा टिळा लावायचो…. खूप खुलून दिसायचा … अगदी त्याच्या सोनेरी केसांना matching!
त्याच्या सोनेरी fur सारखीच त्याची शेपटी पण अगदी युनिक होती. इतर पॉमेरिअन्स सारखी झुबकेदार नव्हती तर जागच्याजागी गुंडाळून ठेवल्यासारखी होती…. जणू काही स्वतः भोवतीच वेटोळे घातल्यासारखी!
मला सगळ्यात अप्रूप या गोष्टीचं वाटायचं की त्याला घरच्या मेंबर्स ची seniority पण बरोब्बर कळायची.
म्हणजे जेव्हा आई घरात नसायची तेव्हा जर त्याला काही खायला हवं असेल किंवा बाहेर जायचं असेल तेव्हा तो सरळ माझ्या सगळ्यात मोठ्या बहिणीकडे- दीदी कडे जायचा. जर तीसुद्धा नसेल तर मग दुसऱ्या बहिणीकडे -विनिताताई कडे जायचा. मी आणि आमचा लहान भाऊ त्याच्या रडार वर कधी नसायचोच!
१९८९ साली जानेवारी मधे दीदी चं लग्न झालं. दुर्दैवानी त्याच वर्षी ऑगस्ट मधे आमची आईही अचानक आम्हांला सोडून गेली…..कायमची!
आम्हां सगळ्यांबरोबरच लौकिक साठी सुदधा तो एक जबरदस्त मानसिक धक्का होता.
त्यानंतर तो अगदी गप्प गप्प असायचा. तासन् तास घराच्या दाराकडे किंवा खिडकीतून बाहेर एकटक बघत राहायचा. त्यावेळी त्याच्या मनात काय विचार चालू असायचे कोणास ठाऊक, पण त्याचा तो उदास चेहेरा आणि रिकामी नजर बघून मला वाटायचं की तो कदाचित आईची वाट बघत असावा.
त्याला तसं पाहिलं की मला खूपच गहिवरून यायचं. मी पटकन जाऊन त्याला कुशीत घेऊन बसून राहायची.
आमच्या मनातलं दुःख आम्ही सगळे एकमेकांशी बोलून हलकं करायचो. कधी कधी आईच्या आठवणी काढत, तिच्याबद्दल बोलून एकमेकांना सांत्वना द्यायचो. पण लौकिकचं काय? त्याच्या मनातले विचार, त्याला आईची येणारी आठवण हे सगळं व्यक्त करायला त्याच्याकडे कुठला पर्याय होता?
त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात आधीच ठरल्याप्रमाणे विनिताताईचंही लग्न झालं. त्यानंतर मात्र लौकिक कायम माझ्या मागे मागे असायचा. मी जर दिसले नाही तर घरभर मला शोधत फिरायचा. कदाचित मीही त्याला सोडून जाईन की काय अशी भीती वाटत असेल त्याला. खूपच हळवा झाला होता मनानी!
एकदा असंच झालं… मला किराणा सामान आणण्यासाठी आमच्या घराजवळच्या वाण्याच्या दुकानात जायचं होतं. जवळ म्हणजे अगदीच जवळ होतं दुकान. अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर. लौकिक त्याच्या गादीवर शांत झोपला होता म्हणून मी त्याला न सांगता गेले. मी दुकानात सामान घेत होते तेवढ्यात ते दुकानातले काका म्हणाले,” ताई, तो तुमचाच कुत्रा आहे ना रस्त्यावर?” मी झटकन् मागे वळून पाहिलं तर खरंच, तो लौकिक च होता. फूटपाथवर उभा राहून भिरभिरत्या नजरेनी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना बघत होता. मलाच शोधत होता बहुतेक … मी अक्षरशः पळत त्याच्याजवळ गेले आणि त्याला उचलून घेतला. मला बघितल्यावर त्याच्या डोळ्यांत दिसलेला आनंद अजूनही आठवतो मला!
त्याला आईची उणीव भासू नये म्हणून माझ्या परीनी मी पूर्ण प्रयत्न करत होते. पण त्याच्या डोळ्यांतली ती गेलेली चमक काही पुन्हा परत नाही आली.
१९९० च्या मे महिन्यात मी आणि माझी मामेबहिण माधवी कराडला विनिताताई कडे जाणार होतो ४-५ दिवस राहायला. जायच्या दिवशी सकाळी निघताना मी लौकिक ला सांगितलं ,” मी येईनच लवकर परत. पण तू नीट राहा, वेळच्यावेळी जेव. मी परत आले की आपण खूप खेळू! Ok !! “ त्यावर त्यानीही माझा हात चाटून मला ‘ok’ म्हटलं होतं.
मी ठरल्याप्रमाणे ४ दिवसांनी पुण्याला परत आले. आधी आम्ही दोघी नारायण पेठेत माझ्या मामाच्या घरी जाणार होतो. तिथे माधवीला सोडून मग मी आमच्या घरी जाणार होते. पण आम्ही रिक्षातून उतरत असतानाच माझी आजी तिथे आली आणि मला म्हणाली,” तू आत्ता इथे नको थांबू, सरळ घरी जा.” तिच्या चेहेऱ्यावरचे ते सिरीयस भाव बघून मला चांगलंच टेन्शन आलं. मी तिला जरा घाबरतच विचारलं, “ काय झालंय ?” त्यावर ती म्हणाली,” लौकिक गेला.” मला वाटलं, मी दिसले नाही म्हणून परत मागच्या वेळेसारखाच घरातून पळून वगैरे गेला की काय? “आता याला कुठे शोधायचं?” या माझ्या प्रश्नावर आजी म्हणाली,” तसा नाही गं बाळा… तो आता आपल्याला सोडून गेलाय .. कायमचा …” तिच्या या वाक्याचा अर्थ कळायला मला काही क्षण लागले. पण जेव्हा समजलं तेव्हा मी चांगलीच हादरले.. मी डोळ्यातलं पाणी कसंबसं थांबवत तिला विचारलं,” हे कसं आणि कधी झालं ?” त्यावर ती म्हणाली,” दोन दिवसांपूर्वी.”
दोन दिवस झाले होते या घटनेला, पण मग मला का नाही सांगितलं कोणी? मी तशीच परत रिक्षात बसले आणि घरी जायला निघाले. पण घरी पोचेपर्यंत मनात वेगवेगळे विचार येत होते… असा कसा गेला लौकिक .. इतक्या अचानक! मी कराडला गेले तेव्हा तर ठीक च होता. एकदम fit and fine. मग दोन दिवसांत असं काय बरं झालं असेल ? मला एकदम आमच्या आईचं ‘जाणं’ आठवलं.. तीही तर अशीच गेली होती आम्हांला सोडून ..अचानक… पण कायमची!
पण मला राहून राहून हेच वाटत होतं की मला कोणीच, काहीच का नाही सांगितलं! कराड म्हणजे काही खूप लांब नव्हतं पुण्यापासून- जेमतेम साडेतीन चार तासांचा रस्ता ! मी आले असते लगेच. निदान त्याला शेवटचं बघू तरी शकले असते.
या विचारांच्या नादातच घरी पोचले. दारापाशी उभी राहून बेल वाजवली. हो, आता माझी चाहूल लागून मी बेल वाजवण्या आधीच माझ्या येण्याची वर्दी देणारा माझा लौकिक नव्हता घरात. दिदी नी दार उघडलं. आम्ही दोघीही एकमेकींच्या गळ्यात पडून रडलो. माझ्या डोळ्यांत तिला बरेच प्रश्न दिसले असावे. मी न विचारताच ती म्हणाली,” त्याला अचानक दम लागला, श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. त्यावेळी नेमके बाबा आणि पराग (माझा भाऊ) दोघंही बाहेर गेले होते. मावशी आजींनी शेजारून कोणाला तरी बोलावून आणेपर्यंत लौकिक गेला अगं.”
बिचारा, जाताना आमच्यापैकी कोणीच नाही दिसलं त्याला. काय वाटलं असेल त्याला त्या शेवटच्या काही मिनिटांत? आमची वाट बघितली असेल का त्यानी शेवटच्या क्षणापर्यंत ? या आणि अशा विचारांनी डोक्याचा भुगा व्हायची वेळ आली. मी दिदीला विचारलं,” पण मग मला का नाही सांगितलं कोणी? मी आले असते लगेच. निदान शेवटचं एकदा बघितलं तरी असतं त्याला.”
या बद्दल विचार करताना कधी कधी मला वाटतं की हे मुके जीव किती सहजपणे आम्हां माणसांना आपलं मानतात! त्यांच्या मनात “आम्ही प्राणी- ही माणसं” असा भेदभाव कधीच येत नसावा.. त्यांच्या वागण्यातून तरी तसं कधीच जाणवत नाही. पण आम्हां माणसांच्या दुनियेत मात्र - माणसा करता वेगळे शिष्टाचार, कुळाचार आणि प्राण्यांकरता वेगळे ! कुठेतरी काहीतरी चुकतंय….
असो! मी तिला विचारलं,” आता कुठे आहे तो?” ती म्हणाली, “बागेतल्या बकुळीच्या झाडाखाली.” मी तशीच उठून बागेत गेले. बकुळीच्या झाडाखालची माती हातात घेऊन कपाळाला लावली. लौकिक ला खूप वेळ सॉरी म्हटलं. त्याला जेव्हा माझी खरी गरज होती तेव्हा मी त्याच्या जवळ नव्हते. मी त्याची अपराधी होते. In a way, i had betrayed his trust.
कोणीतरी सुचवलं, “ दुसरं कुत्रं पाळा, म्हणजे आत्ता जो मानसिक त्रास होतोय तो कमी होईल.”
पुन्हा तेच.. माणसांच्या आणि प्राण्यांच्या बाबतीतले वेगवेगळे नियम.. मला तर ही ‘replacement policy’ पटतच नाही.. अरे, तो एक जीता जागता प्राणी होता. आमच्या परिवाराचा एक सदस्य होता तो देखील! एखादं खेळणं किंवा वस्तू नव्हता.. एक हरवलं किंवा खराब झालं तर दुसरं आणायला … त्याच्या जागी दुसऱ्या कुठल्याही प्राण्यांची कल्पना ही नव्हतो करू शकत आम्ही कोणी.
आणि म्हणूनच की काय, पण आज इतक्या वर्षांनंतरही जर कधी बकुळीच्या फुलांचा तो मंद सुवास आला तर लगेच लौकिकचा तो हसरा चेहरा आणि त्याचं ते लडिवाळ भुंकणं आठवतं आणि ओठांवर एक हलकंसं हसू देऊन जातं!
हिंदी / मराठी
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle