ही गोष्ट आहे माझ्या आयुष्यातील सर्वात लांबलेल्या अपयश साखळीची. त्या साखळीने मला तेव्हा आणि त्यापुढील काही वर्षं चांगलंच जखडून ठेवले होते. पण आता चारेक वर्षं होऊन गेल्यावर मी एकंदर त्या सर्व प्रकरणाला हसू शकते. नव्हे, येतेच हसू! काय एकेक आठवणी!! :uhoh:
तर मी सांगत आहे कथा माझ्या ड्रायव्हिंग लायसन्सची. थोडी बॅक्ग्राउंड सांगायची मी इंजिनिअरिंगला असताना पुण्यातील हॉटेल शीतल( :love:) शेजारील राज ड्रायव्हिंग स्कुलमधून व्यवस्थित लेसन्स घेतले व आळंदीला गाडी चालवत गेलो मी व इतर दोन शिकाउ ड्रायव्हर आणि बरोबर आमचा इन्स्ट्रक्टर. अर्थात मी आळंदीपर्यंत गाडी नेऊ शकतेय म्हणल्यावर कॉन्फिडन्स वाढला होता. तिथे गेल्यावर हार्डली पहिल्या गिअर मधून दुसर्या गिअरमध्ये टाकेस्तोवर मला पास केले गेले होते. लायसन्स आले हातात.
पण ते आले म्हणजे सगळं झालं असं कुठे असते? गाडी चांगली चालवता येतही होती, लायसन्सही होते पण प्रॅक्टीस अजिबात नव्हती. एक दोन वर्षं गेली आणि गाडी चालवायचा कॉन्फिडन्स गेला. मी बरी आणि माझी स्कुटी बरी.
मग बाबांनी परत उचल खाल्ली. पुण्यात देशपांडे काका म्हणून आहेत.(काय पण वाक्य आहे!! पण खरंच पुण्यातील कार शिकवणारे देशपांडे काका ही व इतकीच ओळख बास आहे त्यांच्याकरता!!) ते आमच्या बिल्डींगमध्ये बर्याच जणांच्या ओळखीचे होते. एक दोन जणांना त्यांनी कार शिकवली होती. मग बाबांनी त्यांच्या हातात मला सोपवले. खूप शिस्तीचे काका. लाँग स्टोरी शॉर्ट, काकांनी गाडी सुपर्बच शिकवली मला! वेल, येतच होती. पण मंडईत ने, रविवार पेठेत ने, पावसात घाटात ने- हे जे काही त्यांनी केले ते मी एकटीने केले नसते. सो मला सवय झाली सगळीकडे चालवायची. पण परत मागील पानावरून पुढे. जरी खूप प्रॅक्टीस झाली तरी कार चालवणे होणार कशाला तर एरंडवण्यातून आईला नळस्टॉपला घेऊन जाणे इतपतच. मग खर्या अर्थाने कार चालवायची वेळच न आल्याने शिकलेले परत मनाच्या कुपीत वगैरे जाऊन बसले. मग लग्न झाले. युएसला जाणार वगैरे दिसले. म्हटले आता तरी कार चालवली जाईल.
युएसला आले २९ डिसेंबर २००७ला. एक दिड दिवस झोपूनच काढला. ३१ डिसेंबरला बाहेर पहिल्यांदा फिरायला गेलो. रस्त्यावरच्या गाड्यांची संख्या व एकंदरीत रंगरूप पाहून हबकलेच होते. काय वाट्टेल ते नियम? आणि लोकं पाळतात? :thinking: म्हणजे बघा, सिग्नलला गाडी थांबल्यावर आपल्या गाडीत व समोरच्या गाडीत आख्खी एक गाडी बसेल इतके अंतर?? आणि तरीसुद्धा मागून हॉर्न्स नाहीत?? :thinking:
एनीवे. तशी मी पर्सनल आयुष्यात शिस्तीचा अजिबात अभाव असलेली मुलगी असले तरी मला सार्वजनिक शिस्त खूप आवडते. एस्पेशली रस्त्यावर अनप्रेडिक्टेबल गोष्टी होऊ नयेत असं वाटतं तरी. (उदा: लाल दिवा असूनही मागून पीएमटी रोरावत येणे वगैरे.. हो हो! हे झाले आहे माझ्याबरोबर! कर्वे रोडचा फ्लायओव्हर पास करून पुढे एआरएआय टेकडीला रस्ता वळतो त्या चौकात!) त्यामुळे असे वाटले की जमेल हे आपल्याला. सोपे वाटतेय. मग युएसमध्ये आल्याच्या पहिल्याच आठवड्यात ड्रायव्हिंगची रिटन टेस्ट घ्यायचे ठरले. त्यासाठी नवर्याने अभ्यासाला नियमांचे पुस्तक आणून दिले. नियमांचे पुस्तक?? :confused: :surprise: तीन दिवस बसून ते सगळे पुस्तक वाचायचा प्रयत्न केला व वाढदिवशी आम्ही निघालो डीएमव्हीला. (डिपार्टमेंट ऑफ मोटर व्हेईकल्स) तेव्हा तर मला समोरचा अमेरिकन काय बोलतोय कळायचे देखील नाही. नाही म्हणजे नाहीच. कितीही कानात तेल, पाणी, WD40 घातले तरी समोरच्याने उच्चारलेले शब्द कानात शिरून मेंदूपर्यंत पोचायचे नाहीत. तरीदेखील रिटन परीक्षेचा पेपर मिळवला, एका आयताकृती खोक्यात जाऊन तो पेपर सोडवला.. आणि चक्क पास झाले की!! :surprise: नवरा कुडन्ट बी हॅपीअर.. (वेल लिटल डिड हि नो.. एनीवे..)
तर, आता आपल्याला लर्नर्स लायसन्स मिळाले आहे व आता कार चालवायची आहे ह्या विचाराने एक्सायटेड वाटले. पण मग पुस्तकातले सगळे नियम अचानक डोक्यात फेर धरून नाचले.. अरे बापरे. हे सगळं कसं लक्षात ठेवायचे कार चालवताना? बरं बघू. पुढचे पुढे. सध्या कारमध्ये बसा. अह..ओह.. उलट्या बाजूने बसायचे. म्हणजे आता गिअर बॉक्स उजव्या हाताला! मी डावखुरी असल्याने असेल कदाचित, पण माझा उजवा हात एक्स्ट्रिमली अशक्त आहे असे आपले मला वाटते. मला बर्याच गोष्टी उदा: चमच्याने खाणे, मीठ टाकताना चिमुट करणे, भाजीचा डाव हलवणे असं बरंच काही अजिबात जमत नाही उजव्या हाताने. सर्प्राईझिंगली अधूनमधून मला त्याच हाताने उत्कृष्ट बॅडमिंटन खेळता येते. हे काय गौडबंगाल आहे माहित नाही. पण मुद्दा असा की मला काही ते गिअर धड टाकता येईनात. म्हटलं येईल सवयीने. आता आमच्या कारबद्दल बोलूया. आयमिन तेव्हाची कार. ती होती ९८ची टोयोटा करोला. स्टिक शिफ्ट. म्हणजे इंडीयातल्यासारखी मॅन्युअल गिअर टाकायची. खूप जुनी. नवर्याने युनिव्हर्सिटीत असताना इबेवर ऑक्शनवर(!!) घेतलेली! त्याची अतोनात लाडकी, माझ्यासाठी हं ओके. ऑटोमॅटीक असती तर बरं झालं असतं वगैरे. म्हटलं तेही बघू. होईल सवय.
मग सुरू झाली प्रॅक्टीस. सर्वात प्रथम सांगते. नवर्याबरोबर कार शिकायची चूक कधीच करू नका! आमची सगळी भांडणं फक्त कारमध्येच व्हायची! त्यांना कारणं काय हा फोल प्रश्न आहे. नवर्याकडून कार शिकताय? लेसनबरोबर संयमित चर्चा फ्री!! तर.. आम्ही निघालो कम्युनिटीतून. आणि मी उलट्या लेनमधून गाडी चालवू लागले! :hypno: नशीबाने आमच्या गावात सुमसाम(की सुनसान?) शांतता असायची. आम्ही सोडुन कोणीही नव्हते रस्त्यावर. नवरा निवांत बसला होता. मलाच एक दोन क्षणांनंतर जाणवलं की आपण उलटे चाललो आहोत!! मग काय केले हे आता आठवत पण नाही. बहुधा गडबडीने कोणत्यातरी कॉम्प्लेक्समध्ये घुसून घाम पुसला असेल. नवरा परत एकदा निवांत बसुन माझी गडबड पाहात होता. (कळलं संयमित चर्चा का होतात?!) तिथेच जरा लक्ष दिले असते मी (कानात WD40 वगैरे घालून) तर माशी शिंकतानाचा आवाज स्पष्ट ऐकू आला असता!! ही होती नांदी!
आता तयार व्हा हं! आत्तापर्यंतची होती प्रस्तावना. आत्ताशी कुठे नाटकाचा पडदा उघडत आहे..
-क्रमशः