आभाळ भरुन येईल
पण आता थांबायचं नाही,
मेघही बरसतील
पण यंदा भिजायचं नाही;
भेटतील वेडे पक्षी
गातील गाणी पावसाची,
आता मात्र
त्या गाण्यांनी हरखायचं नाही
बरसेल मग पाऊस माझ्या खिडकीशी,
थांबेन क्षणभर तेव्हा;
ऐकेन त्याची चाहूल,
आणि वाट पाहीन उघडीपीची..
आताशा दिसतो मला तो
पावसानंतरचा आसमंत,
नितळ निळा अन् शांत;
आणि खुणावती मला
डोंगर आणि त्यांची गर्द हिरवाई,
राखून ठेवायचे हे दिवसं
पाहण्या पाऊस लेऊन नटलेली हिरवी नवलाई
म्हणून आभाळ भरून येईलही
पण यंदा भिजायचं नाही,
मेघही बरसतील
पण आता थांबायचं नाही
विभावरी थिटे
--------------------------------------------------------------
(२०१2 मायबोली दिवाळी अंकात पुर्वप्रकाशित)