kavita

यंदा भिजायचं नाही

आभाळ भरुन येईल
पण आता थांबायचं नाही,
मेघही बरसतील
पण यंदा भिजायचं नाही;

भेटतील वेडे पक्षी
गातील गाणी पावसाची,
आता मात्र
त्या गाण्यांनी हरखायचं नाही

बरसेल मग पाऊस माझ्या खिडकीशी,
थांबेन क्षणभर तेव्हा;
ऐकेन त्याची चाहूल,
आणि वाट पाहीन उघडीपीची..

आताशा दिसतो मला तो
पावसानंतरचा आसमंत,
नितळ निळा अन् शांत;
आणि खुणावती मला
डोंगर आणि त्यांची गर्द हिरवाई,
राखून ठेवायचे हे दिवसं
पाहण्या पाऊस लेऊन नटलेली हिरवी नवलाई

म्हणून आभाळ भरून येईलही
पण यंदा भिजायचं नाही,
मेघही बरसतील
पण आता थांबायचं नाही

विभावरी थिटे

Keywords: 

कविता: 

लकेर

कुठून लकेर येते, माझे जीवन गाणे होते!

लाटेचे पैंजण किणकिणती, झुळकेशी खिदळत मोहक गाती,
अल्हाद सूरांना दटावत एक, पान तिथे संन्यासी होते-
माझे जीवन गाणे होते!

मध्येच दिसते, लपून बसते, लाजून आढेवेढे घेते,
मनमोराला उगा खूळावत, अवखळ धून सवार होते-
माझे जीवन गाणे होते!

मी पहिली मी पहिली म्हणते, अल्लड श्रुती नादावत जाते,
भावसख्याचे गूज लेऊनी, खळखळते! रुणझूणते!
माझे जीवन गाणे होते!

- चिन्नु

Keywords: 

कविता: 

मोर हवा तर

मोर हवा तर..............

मोर हवा तर, स्वतःच मोर झालं पाहिजे ना!

सत्य, शिव, सुंदराला

करताना आवाहन

स्वतःच कणखर व्हावे;

असत्याला, असत्य म्हणण्याइतके

अ-शिवाला संपवुन टाकणे पेलण्याइतके;

असुंदराची भलावण पाहताना

त्यांचा सल बाळगण्याइतके;

आपल्यातल्या शिवाला
होवुदे प्रकट

मर्ढेकरांच्या मुरारीकडे

मागण्या अनंत,

पण खरचं,

भंगु दे काठिण्य माझे

आम्ल मनीचे जावु दे

विवेकाच्या जिवंत झर्‍यात

मालिन्य सारे वाहुन जा वु दे

Keywords: 

Subscribe to kavita
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle