कुठून लकेर येते, माझे जीवन गाणे होते!
लाटेचे पैंजण किणकिणती, झुळकेशी खिदळत मोहक गाती,
अल्हाद सूरांना दटावत एक, पान तिथे संन्यासी होते-
माझे जीवन गाणे होते!
मध्येच दिसते, लपून बसते, लाजून आढेवेढे घेते,
मनमोराला उगा खूळावत, अवखळ धून सवार होते-
माझे जीवन गाणे होते!
मी पहिली मी पहिली म्हणते, अल्लड श्रुती नादावत जाते,
भावसख्याचे गूज लेऊनी, खळखळते! रुणझूणते!
माझे जीवन गाणे होते!
- चिन्नु