संधीप्रकाशातल्या डेझी

२०१६ मध्ये शास्ता डेझीच्या बिया आणून, त्याची २०-२१ रोपटी केली. त्यातली निम्मी माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी Fremont ला लावली, तिथे भरपूर ऊन असल्यामुळे तिच्याकडे छान फुलतील अशी अपेक्षा होती, पण ३-४ महिन्यातच ती रोपं जळून गेली. आमच्या अंगणात मोठ्या झाडांची सावली पडते, पण मला ह्या डेझीजची खूप हौस म्हणून आमच्या अंगणात, सगळ्यात जास्त उन मिळणारा कोपरा शोधला आणि तिथे ६ रोपटी लावली. मग बागेतल्या इतर छोट्या छोट्या पूर्ण सूर्यप्रकाश मिळणाऱ्या कवडश्यात इतर रोपं डकवली. त्याला काहीही symmetry नव्हती. डेझी बर्कली मध्ये फक्त उन्हाळ्यातच उमलते, फार क्वचित कधी fall मध्ये. वर्षभर फुलबागेतली जागा अडवून ठेवत असली तरीही मे पासून सपटेंबर पर्यंत बागेचा एक कोपरा ह्या हसऱ्या चेहऱ्याच्या फुलांनी ओसंडून वाहतो. संध्याकाळी झाडांना पाणी घालताना रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांशी गप्पा होतात. Daisies shower smiles, a happiness so pure and carefree that every gardener should plant them to experience it....
२०१७ च्या उन्हाळ्यात हा आनंद पुरेपूर अनुभवला आणि हौस पुरी करून घेतली. २०१७ च्या ऑक्टोबर मध्ये ही १२ रोपटी, त्यांचा बहर पूर्ण ओसरल्यावर पूर्ण छाटून टाकली. यंदाचा स्प्रींग म्हणजे मार्च महिना उजाडेपर्यंत,ज्या कोपऱ्यात सहा रोपं लावली होती, ती सगळी 'एकट्याला दुकटंं' म्हणत डझनभर झाली होती. रोपटी सपासप उंच होत, तीन -साडेतीन फुट झाली. छोटा कोपरा पुरेना तेव्हा रोपं सूर्याच्या दिशेने धाव घेत तिरकी वाढायला लागली. वेडीवाकडी वाढ, त्यात त्यांना टेकू देण्याचे एक न अनेक कारभार. रोपटी वेगळी करायला जावं तर कळ्या धरायला लागलेल्या. एखाद्या हिरव्या बोटाच्या किंवा मुरलेल्या माणसाने हलक्या हाताने कदाचित ही रोपटी वेगळी केलीही असती, पण मी करू शकले नाही. रोपटी वेगळी करण्याच्या भानगडीत चांगली आडदांड वाढणारी रोपं आणि त्यांच्या कळ्या मरून गेल्या तर ?.. मला विचारच सहन झाला नाही. त्या छोट्या जागेत डेझीज वेड्या वाकड्या पसरत होत्या,फोफावत होत्या, मी त्यांना खत पाणी घालत राहिले. फुलं फुलायला लागल्यावर, मुलीच्या शाळेत, मित्र मैत्रिणींच्या घरी, घरातल्या फ्लॉवरपाॅटस मध्ये डेझी सजायला लागल्या पण ह्या वर्षी "Happiness was not carefree" for मी... फुलांच्या ओझ्याने वाकलेल्या रोपट्यांना आधार कसा देत रहायचा आणि " too much of a good thing.." असे विचार येऊन गेले.
आज संध्याकाळी झाडांना पाणी घालायला उशीर झाला, सूर्यास्त होऊन गेला होता, पण दिवस खूपच उष्म असल्यामुळे मी आठच्या सुमारास पुढच्या अंगणात पाणी घालत होते. दारातून बाहेर पडले तर एक आजी आजोबा एकमेकांचा हात धरून चालले होते. डेझीज कडे बघून आजी थांबली, पण आजोबा त्यांची काठी टेकवत चालतच होते. दंडाला हिसका बसल्यामुळे ते थांबले बहुतेक.मग त्यांची नजर आज्जींच्या चेहऱ्यावर आणि मग डोळे किलकिले करत माझ्या शेकड्याने फुललेल्या देझीज वर गेली. त्यांचे एकमेकांच्या हातातले हात घट्ट झाले. आजींच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर एक पुसटसं हसू उमटलं. आज्जी परत चालायला लागल्या, आजोबांच्या शेजारी आल्यावर त्यांनी आजीच्या खांद्यावर हात टाकला...त्यांच्या जगात ते मग्न होते. मीच त्यांच्याकडे अशी का बघत राहिले माहित नाही. मी घराच्या पायऱ्या उतरून पाण्याच्या नळाशी जाताना एकदम मनात विचार आला, आणि मी त्यांना जोरात " Wait!" असं म्हणाले. आजोबा चालतच राहिले, मी पळत जाऊन २-३ डेझी तोडण्याचा प्रयत्न केला. पण डेझी दिसायला सुंदर तितकीच तिची फांदी चिवट. तुटता तुटेना. आजोबांची काठी एका जागी थांबल्यामुळे जमिनीवर टकटक करायला लागलेली. शेवटी दोन डेरेदार फुलं हातात आली. पळत जाऊन त्या आजीच्या हातात ती फुलं दिली. तिने मायेने गालावरून हात फिरवला नाही की स्वतःच्या बागेत उगवलेल्या डेझीच्या गप्पा मारायला सुरुवात केली नाही. पण तिच्या चेहऱ्यावर एक तृप्तता झळकली, किंवा संधीप्रकाशात मला तशी ती भासली. " Thank you dear." म्हणून ते दोघं त्यांच्या वाटेला निघून गेले आणि मी माझ्या डेझीकडे वळले. सुर्याबरोबर उमलणारी ही फुलं, संधीप्रकाशातसुद्धा मला लक्ख टवटवीत दिसली... इतर झाडांना मी अंधारात पाणी घातलं, पण ह्या उन्हाळ्यात परत एकदा "Daisies shower smiles, a happiness so pure and carefree that every gardener should plant them to experience it." ही अनुभूती मिळाली.

https://amrutahardikar.blogspot.com/2018/07/blog-post.html

लेख: 

ImageUpload: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle