सकाळचा पाचचा गजर वाजला आणि निशा उठली.
कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती
करमूले तू गोविंदं
प्रभाते करदर्शनम।
आपल्या तळहातांकडे बघून तिने मनात आईने शिकवलेला श्लोक म्हटला. तिचे बाबा गेल्यापासून आईला खूप जपायची ती. तशी तिची आई खंबीर होती पण ४ वर्षांपूर्वी बाबा गेले आणि आई अगदीच हरवली. तिला परत हसतखेळतं बनवण्यासाठी निशा २ वर्ष अमाप झटली. बाबांची जागाच घेतली जणू तिने आईसाठी. निशा तिच्या आई वडिलांचं एकुलतं एक अपत्य. लहानपणापासूनच लाडात वाढलेली निशा बाबांची खूप लाडकी. निशा इंजिनीअर होऊन नोकरीला लागली तेंव्हा तिच्या बाबांना तिला कुठे ठेऊ आणि कुठे नको असं झालं होतं. तिचे बाबा, आई आणि ती एक मध्यमवर्गीय कुटुंब. अगदी श्रीमंत नव्हते ते, पण तिच्या आई बाबानी आपल्या नोकऱ्या सांभाळून तिची सगळी हौस पुरवली होती. जेंव्हा बाबा गेले तेंव्हा त्यांच्या डोक्यावर घराचं कर्ज होतं. निशाने आपला जॉब खूप seriously घेतला, खूप मेहनत केली. मागच्याच वर्षी कंपनीच्या ॲन्युअल इव्हेंट मध्ये तिला ‘एम्प्लॉयी ऑफ द इयर’ चा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर लगेचच तिला ही UK ची assignment मिळाली होती. निशाने आधी बॉसला नाही म्हणूनच सांगितलं होतं पण परत आईला सांगितल्यावर तिच्या आईनेच सांगितलं जा म्हणून. कारण तिच्या आईला माहित होतं, आपल्या काळजीने पोर इतकी चांगली संधी सोडेल आणि मनात कितीही जाऊ वाटत असलं तरी चेहऱ्यावर दाखवणार नाही. बरेच दिवस विचार करून निशा या assignment साठी हो म्हणाली होती.
जिममधून जाऊन येऊन निशाने पटकन स्वत:चं आवरलं. तिची आवडती स्ट्रॉंग कॉफी तयार करून घेतली. स्ट्रॉंग, नो शुगर आणि अगदी २ चमचे दूध अशी कॉफी घ्यायची सवय तिला इकडे UK ला आल्यावरच लागली होती. त्या कॉफी शिवाय तिची सकाळच सुरु व्हायची नाही. नेहमीच्या सवयीने तिने कॉफी संपवून आजच कॅलेंडर mobile वर चेक केलं. आज एकामागून एक मिटींग्स होत्या. त्यात काय काय डिस्कस करायचंय, कोणाकडून कुठले अपडेट्स घ्यायचेत याचा विचार करतच निशा बाहेर पडली. ऑफिसला गेल्यावर निशा कामात बुडून गेली. दुपारी लंच ब्रेकमध्ये तिने नेहमीसारखा घरी फोन केला. आई आज खुश दिसत होती.
“काय गं आज आवाज एकदम मस्त येतोय तुझा? काय म्हणतेस” निशाने विचारलं.
“निशु, अगं काल गोखलेकाका आले होते” आईने सांगायला सुरुवात केली.
“अरे वा! गोखलेकाका बऱ्याच दिवसांनी?! काय म्हणतायत? कसे आहेत ते?” निशाचा लगेच प्रश्न.
“अगं मीच बोलावलं होतं त्यांना. म्हणजे तसं मागच्या वेळी फोनवर बोलणं झालच होतं, पण म्हटलं प्रत्यक्ष भेटूनच बोलावं”
“आई, पॉईंट काय आहे?” निशाला आईची सवय माहित होती. जर एखादी गोष्ट तिला निशाला पटवून द्यायची असेल तर ती असं फिरवून बोलायची.
“अगं हो गं! सांगते! हां तर काय म्हणत होते मी? हं, गेल्या वेळेस त्यांच्याशी फोनवर बोलले होते तेंव्हा त्यांनी तुझ्यासाठी एक स्थळ सुचवलं होतं. मुलगा खूप चांगला आहे म्हणत होते. तुझ्यासारखाच इंजिनिअर आहे. मोठ्या कंपनीत नोकरीला आहे UK मधेच. मी म्हटलं छान.. आमची निशूही तिथेच आहे सध्या.”
आई भरभर सांगत होती.
“आई, मी तुला सांगितलंय ना हा विषय आत्ता नको म्हणून. आणि अगं युके मोठा देश आहे गं, उद्या उठून भेटणार नाही आम्ही, आमची निशू पण तिकडेच आहे म्हणे” निशाने आईला तो विषय संपवायला सांगितलं आणि फोन ठेवला. तिला आधी घरावरचं कर्ज उतरवायचं होत. आईला कसलीही काळजी नसेल तेंव्हाच लग्न करायचं असं ठरवलं होत तिने. आणि असंही ती आईची सगळी जबाबदारी लग्नानंतरही घेणार होती, ते मान्य करणारा कोणी मुलगा भेटेल असं निशाला वाटत नव्हतं, त्यामुळे लग्न हा विषय तिने स्वतःपुरता तरी मोडीत काढला होता. आता आईला कसं समजवायचं हा प्रश्न होताच, पण त्याचं उत्तर आज ना उद्या मिळेल हे तिला माहित होतं.
आत्ताची निशा आणि बाबा असतानाची निशा यात जमीन अस्मानाचा फरक होता. तेंव्हाची निशा हसरी, खेळकर होती. जणू उत्साहाचा झराच! अभ्यासात तर पुढे होतीच पण निरनिराळे छंदही जोपासायची ती. वाचन, ट्रेकिंग, पाॅटरी, चित्रकला हे तर होतेच पण जेंव्हा मनात येईल तेंव्हा पाठीवर बॅकपॅक टाकून भटकायला जायची ती. तिच्या सोलो ट्रिप्स बद्दल बोलताना बाबा थकायचे नाहीत. घरात त्या फोटोजचे
अल्बम्स पडले होते. पण आत्ताची निशा फक्त आणि फक्त काम आणि जबाबदाऱ्यांना महत्व देणारी होती. त्या हसऱ्या स्वच्छंदी निशाला तिने मनाच्या सात दरवाजांच्या आत बंदिस्त करून टाकलं होतं, परत कोणालाही न दिसण्यासाठी. फक्त काम एके काम आणि आई आणि घराची जबाबदारी एव्हढच आयुष्य बनवलं होतं तिने.
निशाने विषय संपवला असला तरी आई कुठली गप्प बसायला? शेजारच्या आर्याच्या मदतीने आईने निशाला त्या मुलाचा बायोडेटा आणि फोटो मेल केला. मेलचा पॉपअप बघून निशाने तो न बघताच पर्सनल फोल्डर मध्ये मूव्ह केला आणि परत कामात गढून गेली.
संध्याकाळी परत तिला आईचा फोन आला.
“बघितलास का गं मेल?”
“नाही गं आई... वेळच नाही मिळाला”
“निशू... का असं करतेस गं बाळा? एका पानाचा बायोडेटा बघायला आणि एक फोटो बघायला तुला असा कितीसा वेळ लागणार आहे? आत्तापर्यंत तू नाही म्हणायचीस म्हणून गप्प बसले, पण हा मुलगा खूप चांगला आहे गं. त्याचे छंद पण तुझ्यासारखेच आहेत बघ. फिरायला, नवीन जागा बघायला आवडत त्याला. आणि गोखलेकाकांनी त्यांच्या घरीही तुझा फोटो दाखवला, त्यांना पसंत आहेस तू”
आता मात्र आश्चर्यचकित व्हायची पाळी निशाची होती. हिने मला न विचारता परस्पर माझा फोटो दिला आणि ती माणसे मला प्रत्यक्षात न भेटता पसंत आहे मुलगी म्हणतायत? काय चाललंय हे? वैतागलीच निशा.
“आई प्लीज! मी म्हटलं ना आत्ता नाही” निशा तिच्या मताबद्दल आग्रही होती.
“अगं, ऐकून तरी घे त्याचं नाव...”
“आई मी खूप दमलेय गं. आपण नंतर बोलूया का” असा म्हणून निशाने फोन ठेवलाही.
आता मात्र निशाने लॅपटॉप घेतला हातात. काय चाललंय हे? हा कोण कुठला मुलगा UK मध्ये राहतोय, जॉब करतो आणि एखाद्या मुलीला न भेटता फक्त फोटो बघून तिला होकार देतो? राग आला होता तिला. त्या विचारातच तिने पर्सनल फोल्डर मध्ये सकाळी मूव्ह केलेला तो मेल डिलीटच करून टाकला.
त्यानंतर या गोष्टीवर काही चर्चा झाली नाही. दोन महिने असेच गेले. निशा आपल्या कामात व्यस्त. आईनेही पुन्हा तो विषय काढला नाही याचं निशाला खरतर मनातून बरंच वाटलं. उगाच पुन्हा ते समजावणं नको आणि काही नको म्हणून तीही गप्प बसली. दिवाळीच्या सुट्टीत प्लॅन केल्याप्रमाणे निशा भारतात आईकडे जाणार होती. निशाने आवराआवर केली. दुसरी दिवशी ऑफिसनंतर रात्रीच्या फ्लाईटने निशा निघणार होती. फ्लाईटचं ट्रान्झिट Germany मध्ये होतं. सकाळचा गजर लावून आता घरी दिवाळीत काय काय करायचं याचा विचार करत निशा झोपली.
- क्रमश: