तेरा मुझसे है पेहले का नाता कोई - भाग २

निशा वेळेत एअरपोर्टला पोहोचली. सिक्युरिटी वगैरे उरकून गेटला येऊन बसली. अजून boarding ला वेळ होता त्यामुळे तिने तिचं नेहमीचं काम करायचं ठरवलं. आजूबाजूचे लोक बघत बसणे. तिला काही मन वगैरे वाचता यायचं नाही पण माणसे बघणे हा तिचा आणखी एक विरंगुळा होता. ट्रेन स्टेशन, airport अशा ठिकाणी तर पर्वणीच! कारण १०० प्रकारची १०० माणसे. कोणी गडबडीत, कोणी मुलांना आवरून दमलेलं तर कोणी पहिल्या प्रवासाला निघाल्यामुळे खुश!

निशाला तिची पहिली सोलो ट्रिप आठवली. ट्रेनने एकटी राजस्थानला गेली होती. ती ट्रिप तिच्यासाठी पहिली असल्यामुळे खूप अविस्मरणीय ठरली होती. सगळी बुकिंग्स online करून तिथे गेली होती निशा. तिकडेच तिला एक मैत्रीण भेटली होती. राधा तीचं नाव. तीही हिच्यासारखीच भटकी. राधा आणि निशाच मस्त गुळपीठ जमलं होतं त्या ट्रीपमध्ये. राधा तिच्या ग्रुपबरोबर आली होती फिरायला आणि निशा एकटी. राधाने तिला ग्रुपबरोबर फिरायला चल म्हणून आग्रह केला कि ही पठ्ठी मात्र नाही म्हणायची. म्हणायची ग्रुपमध्येच फिरायचं होत तर आई बाबाना घेऊन आले असते गं. मला एकटीने बघायचंय हे सगळं. अनुभवायचंय. कॅमेरा घेऊन पाय दुखेपर्यंत भटकायची निशा. त्या दिवशी पहाटे, किल्ल्यावरून सूर्योदय बघायला २ तास आधीच जाऊन तिथल्या बुरुजावर थांबली होती ती. सूर्योदय झाला आणि निशा मंत्रमुग्ध होऊन पाहतच राहिली. तो क्षण तिचा होता...फक्त तिचा....ते लालबुंद सूर्यबिंब आकाशातल्या तुरळक ढगांना छेदत वर आलं आणि ती भान हरपून पाहत राहिली. आजूबाजुला कसलाही आवाज नव्हता. आणि चक्क फोटोज काढायचे विसरली निशा. सूर्य बराच वर आल्यावर मग तिच्या ते लक्षात आलं आणि स्वतःशीच खूप हसली ती...
Boarding ची announcement झाली आणि निशा भानावर अली. अरे बापरे, कधीपासून जुन्या आठवणीत हरवलोय आपण असं म्हणत उठली. Boarding झालं. निशाच्या शेजारच्या सीटवर कोणी अजून आलं नव्हतं. ही सीट रिकामी असेल तर किती बरं होईल ना, असा विचार तिच्या मनात तरळून गेला. अल्मोस्ट सगळे प्रवासी आले होते, आता असंही कोणी येणार नाही इथे म्हणून निशा खुश झाली. त्याच खुशीत खिडकीतून बाहेर बघत होती इतक्यात तिला जाणवलं, कोणीतरी शेजारी उभे आहे. तिने मन वळवून पाहिलं तर तो आपलं सामान वर ठेवत होता. ओह, म्हणजे आलंय कोणीतरी, निशा मनात म्हणाली. बॅग ठेवून तो खाली बसला.
“हाय” म्हणत त्याने हात पुढे केला.
तिने त्याच्याकडे पाहिलं, casual t-shirt , गळ्यात मोठे हेडफोन्स आणि चेहऱ्यावर आपण हिला कधीपासून ओळखतो असं हसू. हसला तशी त्याच्या गालावर लक्षात येण्याजोगी खळी पडली.
“हाय” तो जितक्या उत्साहाने म्हणाला तितकं नाही पण हलकसं हसून तिने प्रत्युत्तर दिलं.
“आर यू इंडियन?” त्याचा पुढचा प्रश्न.
“येस” निशाचं उत्तर.
“Which part?”
“Umm.. महाराष्ट्र” किती बोलतोय हा माणूस ओळख नसताना?! निशा मनातच!
“अरे वा! मराठी आहात होय? मस्तच! आता प्रवास छान होईल.. पुण्याच्या का तुम्ही?”
“नाही. जन्मगाव वेगळं आहे पण पुण्यातच राहतेय बरीच वर्ष” निशाने शक्य तेव्हढं जेव्हढ्यास तेव्हढं उत्तर द्यायचा प्रयत्न केला. पण तो गप्प बसायलाच तयार नव्हता. त्याने जणू तिला बोलतं करण्याचा चंगच बांधला होता.
“Let me guess... तुम्ही साताऱ्याकडच्या आहात का? बाय द वे मी सिद्धार्थ. मी मूळचा पुण्याचा.”
“निशा.” निशाने त्याच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं टाळलं. ह्याला काय करायचंय माझं मूळगाव?
आणि त्याचा अंदाज बरोबर होता. ती मूळची साताऱ्याची.
पुढचा प्रवास हा माणूस काही शांतपणे होऊन देईल कि नाही याची निशाला शंका यायला लागली.
तिने समोरच मासिक घेतलं आणि उगाच डोळ्यापुढे धरलं जेणेकरून त्याच्याशी अजून बोलायला लागायला नको.
“इथे UK ला ट्रीपसाठी आला होता का?”
“नाही. I work here” आवाज कठोर करायचा असला कि इंग्लिश बरी वाटायची निशाला.
“That’s ग्रेट. मीही इथेच काम करतो. हमाली”
तो असं म्हणाला आणि निशा उडालीच. काय बोलतोय हा माणूस? हमाली?
“I’m sorry!?” काहीसं चिडूनच तिने बघितलं त्याच्याकडे.
“I mean I work in software industry. जे आजकाल हमालीच झालेलं आहे” त्यानं सांगितलं.
“ते कामावर पण अवलंबून आहे ना” निशाला त्याने तिच्या field ला तसं म्हणलेलं अजिबात आवडलं नव्हतं. पण पुढे फ्लाईट Germany ला पोहोचेपर्यंत हे सगळं सहन करणं भाग होतं.
“कामावर अवलंबून असेलही. किंवा मला ते जास्त आवडत नाही म्हणूनही तसं वाटत असेल. पण असं दिसतंय कि तुला मात्र तुझं काम खूप आवडतं, राईट? सेम इंडस्ट्री?” त्याने हसत विचारलं.
“हो. मला आवडते software इंडस्ट्री.” निशाने सांगितलं. हा चक्क अगंतुगं करतोय आपल्याला!
“सॉरी हा.. तुला तू म्हणतोय. पण तू काही जास्त मोठी वाटत नाहीयेस माझ्यापेक्षा आणि मला उगाच formalities आवडत नाहीत सो... तुही मला अरेतुरेच म्हण”
अरे काय टाईमपास आहे? मागेच लागलाय हा!? म्हणून निशाने त्याला सरळ मला झोप येतेय सांगून कानात headphones अडकवले आणि डोळे मिटून घेतले. Flight takeoff झाली आणि निशाने मनात हुश्श केलं. आता झोपायचं नसलं तरी डोळे मिटून बसावं लागणार कारण उठले तर हा माणूस पकवणार. जाऊदे. त्यापेक्षा डोळे मिटूनच बसूया.

थोड्या वेळासाठी निशाला झोप लागली. जाग आली तेंव्हा जेवण द्यायचं चाललं होत. निशाने वेज मील preorder केलं होतं, ते आलं, पण निशा झोपलेली असल्यामुळे सिद्धार्थने ते ठेवून घेतलं होतं. निशाला उठवायला हवं होतं नाहीतर आधीच फ्लाईटमधलं जेवण! त्यात ते थंड झालं असत तर अजूनच बेचव लागलं असतं. त्याने हातातल्या magazine ने तिच्या खांद्यावर हलकेच टकटक केलं,
“हॅलो... जेवण आलंय.. उठून जेवून घे”
अरेच्चा! खरंच झोप लागली कि आपल्याला. निशाला स्वतःचंच आश्चर्य वाटलं. ती प्रवासात कधीही झोपायची नाही. आज कशी काय झोप लागली कोण जाणे.
“निशा.. खाऊन घे” सिद्धार्थ पुन्हा म्हणाला तसे मात्र तिने टक्क डोळे उघडले.
जेवण झालं. आता तर झोपेचाही बहाणा करणं अशक्य होत निशासाठी. आलीय भोगासी असावे सादर! मनात म्हणून निशा परत magazine घेऊन बसली. ट्रॅव्हल magazine होत ते. निशाच जुनं प्रेम! बॅकपॅक पाठीवर टाकून भटकंती करून जमाना झाला होता. तिची नजर त्या मस्त ट्रॅव्हल फोटोज वरून हटेना. आपल्या निर्णयांनी आपण आपलंच नुकसान करून घेतलं का असं एक क्षण वाटलं तिला. पण एकच क्षण. ते magazine ठेवायला तिने हात पुढे केला.
“काय गं? प्रवास आवडत नाही का तुला? कि काही जुनं आठवतंय?”
सिद्धार्थने तिचा चेहरा वाचला होता.
प्लीजच! हा माणूस जरा जास्तच बरोबर guesses नाही करत आहे का आपल्याबद्दल?
“नाही तसं काही नाही” तिने काहीतरी बोलायचं म्हणून म्हटलं.
“ओह.. तसं काही नाही म्हणतेस? पण तुझ्याकडे बघून तसं वाटत नाही”
“तुला काय माहित मला काय वाटतंय आणि काय नाही? तू मला भेटून पुरते २ तासही झाले नाहीयेत” निशा कावली शेवटी.
आणि तो पुन्हा हसला, त्याच्या गालावरच्या खळीसहीत.
“तुझा चेहराच सांगतोय कि मी आल्यापासून तुझ्याबद्दल केलेले सगळे guesses बरोबर आहेत आणि हे तुला झेपत नाहीये त्यामुळे तू रागावलीयेस” त्याच उत्तर बिनतोड होतं.
निशाने त्यावर काही न बोलता मान फिरवली आणि खिडकीतून बाहेर पाहायला लागली. त्यानंतर Germany ला flight उतरेपर्यंत तिने पुन्हा त्याच्याकडे एकदाही वळून पाहिलं नाही. Flight land झाली आणि निशाने मनात हुश्श केलं. पुढच्या flight च gate अजून announce झालं नव्हतं. तोपर्यंत कॉफी घेऊया असा विचार करून निशा कॉफीशॉप कडे निघाली. आपल्याच विचारात चालत होती ती. का बरं त्याचा इतका राग आला असेल आपल्याला? तो ना आपल्या ओळखीचा, मग इतकी चिडचिड का झाली आपली?
आणि
धाड!!!!
निशा कोणालातरी धडकली होती.
I’m so सॉरी... सॉरी.... निशाणे माफी मागतच वर पाहिलं.
तो सिद्धार्थ होता. त्याच्या हातातली कॉफी निशामुळे त्याच्या शर्टवर उपडी झाली होती.
निशाने पुन्हा सॉरी म्हटलं आणि तिथून निघणार तोच सिद्धार्थ म्हणाला,
“Hey wait! I’m sorry. मी मगाशी जरा जास्तच बोललो ना...म्हणजे आपली काही ओळख नाही. तुला माझं बोलणं ऑफेन्सिव्ह वाटलं असेल तर I’m really sorry ... I didn’t mean that”
“इट्स ओके” निशा म्हणाली “मी पण जरा ओव्हर रिऍक्ट झाले maybe”
“कॉफी?” सिद्धार्थने विचारलं.
“ओके” निशा म्हणाली. आणि ते परत कॉफीशॉप कडे निघाले.
“एक मिनिट. आलोच” म्हणून सिद्धार्थ गेला.
निशाने कॉफी ची ऑर्डर दिली. तेव्हढ्यात सिद्धार्थ परत आला. आता फॉर्मल व्हाईट शर्ट, त्याच्या बाह्या कोपरापर्यंत फोल्ड केलेल्या आणि चेहऱ्यावर तेच ओळखीचं हसू.
“I’m sorry निशा”
“अरे हो! कितीवेळा सॉरी म्हणशील?” इतक्या वेळात निशा पहिल्यांदा हसली. तोही हसला.
“तू हसलीस कि छान दिसतेस, फक्त जरा कमी हसतेस, मनमोकळं हसत जा गं”
निशाच्या चेहऱ्यावरचं हसू पुन्हा मावळलं.
“ए बाई, आता पुन्हा चिडू नको. मी असाच आहे गं. मनात जे येईल ते बोलून टाकतो. फिल्टर म्हणून काही नाहीच, पुन्हा सॉरी! तुला राग आला असेल तर”
“आता राग येऊन तरी काय फायदा आहे? तू चुका करतच राहणार ना? जाऊदे”
थोड्या वेळाने पुन्हा गेट announce झालंय का बघायला ते गेले तर त्यांची flight चक्क ५ तास delayed दाखवत होते. काहीतरी तांत्रिक बिघाड झाला होता.
काय? हे भगवान!
निशाने आईला फोन करून कळवलं. सिद्धार्थ होताच सोबत.
“ए निशा, ऐक ना. आज आपण या flight मुळे भेटलोय. न जाणो पुन्हा कधी आयुष्यात भेट होईल कि नाही. माझ्याकडे एक भन्नाट आयडिया आहे. मी माझी लाईफस्टोरी तुला सांगेन, तू तुझी मला सांग. असंही आता भरपूर वेळ आहे आपल्याकडे.”
“काय?” हा जरा वेडा आहे का? लाईफस्टोरी सांग म्हणे. निशाच्या चेहऱ्यावरची नाराजी सिद्धार्थने वाचली असावी.
“ओक...ओके.. तू नको सांगू हवी तर...माझी तरी ऐकून घेशील?”
“आता काय! सांग! दुसरा option आहे का माझ्याकडे? एअरपोर्टवर बोर होण्यापेक्षा तुझी गोष्ट ऐकलेली बरी” निशाच्या चेहऱ्यावर खट्याळ हसू उमटलं.
आणि तेच सिद्धार्थच्या चेहऱ्यावरच्या खळीत परावर्तित झालं.

क्रमश:

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle