बाळाच्या जन्मानंतर अवघ्या काही तासातच बाळाचे काळेभोर आणि भरपूर जावळ हा एक कौतुकाचा विषय होतो. डॉक्टर, सुईण, आजी आजोबा, मावश्या, काका, आत्या असा समस्त परिवार "काय सुंदर जावळ आहेत" असं म्हणू लागतात आणि बाळाच्या आई बाबांनाही ते आनंद दायीच असतं. भारतात जाऊ तेव्हा बाळाचे जावळ काढावे लागतील याबद्दल अधून मधून बोलणं होत राहतं. बाळाचे केस धुणे हा कार्यक्रम बाळाला रडवून अधून मधून होत राहतो. पण केस धुणे प्रकार आई बाबांना त्यामानाने आपल्या आवाक्यातला वाटत असतो. आता या सगळ्या गोष्टीना ' छान आहेत' वरून 'केवढे वाढले' असं वळण लागतं.
मग बाळ भारतात जातं तेव्हा पुन्हा जावळ कौतुक सोहळा होतो, अर्थात आता जावळ काढायला हवं हेही चर्चेस येतं, कारण बाळाचे जावळ खरंच जोरदार वाढत असतात. मग जावळ काढायचा कार्यक्रम ठरतो आणि बाळाचा बाबा त्याच्या जावळाच्या दिवशी किती रडला होता याच्या आठवणी रंगतात. 'हा आता काय करतो काय माहीत' म्हणत तयारी चालू असते. बाळाला या कशाचीच कल्पना नसते, त्याचं आपलं डोक्याला तेल लावा, अंघोळ करा, दूध प्या, रात्री आईला जागवा आणि आपल्या बाल लीलांनी सगळ्यांना खुश ठेवा असं रुटीन चालू असतं. तसा बाळ भयंकर चुळबुळा आणि हायपर ऍक्टिव्ह कॅटेगरीत फिट्ट बसणारा असतो. पण सतत गोड हसणे, कुणाच्याही जवळ काही त्रास न देता राहणे, भुकेशिवाय कधीही न रडणे वगैरे गोष्टी इतक्या कौतुकास्पद असतात की आई वगळता बाकीच्यांना त्याचा हा अत्यंत चुळबूळा स्वभाव तेवढा परिचित नसतो. तिच्याही पुढे हा काय करेल हे टेन्शन असतंच. अखेर तो दिवस उजाडतो, बाळासाठी खास कपडे आणले जातात, घरात सगळा गोतावळा जमतो आणि मग बाबाच्या मांडीत बसून गंमत बघणाऱ्या बाळाला अचानक काहीतरी डोक्यावर फिरत आहे याची जाणीव होते, मशीन चा आवाज येऊ लागतो आणि अत्यंत केविलवाण्या चेहऱ्याने तो ढसा ढसा रडू लागतो. एरवी अत्यंत चपळ असणाऱ्या बाळाला अचानक झालेल्या हल्ल्याने फार काही हलायला पण सुचत नसतं, पण रडणं ही तसं आटोक्यात असतं. तरी तो न्हावी आपण वस्तर्यानेच करू असा आग्रह करत असतो, पण ते नको, तुम्ही झीरो नंबरच्या मशीनने कापा असं सांगितल्यावर ऐकतो. अर्ध्याच्या वर केसांचं ओझं डोक्यावरून उतरतं आणि आई बाबा आणि समस्त परिवार यांच्याही डोक्यावरचं ओझं कमी होत जातं. पण मग बाळाला एकदम आईची आठवण येते आणि ते आई कडे बघून रडू लागतं. अजून काहीच बोलता येत नसतं, पण आई त्याला जवळ घेते आणि बाळ जरा शांत होतं. ब्रेक के बाद म्हणत पुन्हा पुढचे उर्वरित केस कापण्यात येतात आणि पुन्हा बाळ रडू लागतं. पण आपले भारतातले न्हावी एक्स्पर्ट असतात, सगळं सुरळीत पार पडतं, बाळ त्याच्या गुणी स्वभावाला जागून थोड्याच वेळात मस्त खेळायला लागतं आणि सगळे सुटकेचे निश्वास टाकतात. पुढच्या २ तासात तर बाळ अगदीच काही घडलं नाही अशा अविर्भावात घरभर रांगत असतं. पुन्हा एकदा बाळाच्या बाबाचे जावळ काढणे किती कठीण होतं आणि त्यामानाने आजची परिस्थिती बरीच बरी होती म्हणत जेवणं होतात. बाळाचे थोडेसे जावळ आई बाबांनी आपल्या खास आठवणीत राहावे म्हणून वेगळे ठेवलेले असतात. केवढा वेगळा दिसतो आहे अशा सगळ्यांच्या टकलू बाळाबद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया आई बाबा एन्जॉय करत असतात.
महिनाभरात बाळाच्या डोक्यावर भरपूर केस दिसू लागतात. बाळ परत भारतातून जर्मनीत येतं आणि ४ महिन्यात आता केस कापायलाच हवेत हे दिसू लागतं. मग केस कुठे कापायचे यावर चर्चा होतात. बाळ रडणार हे गृहीत धरलेलं असतं, पण २-३ ठिकाणी चौकशी केल्यावर आम्ही २ वर्षानंतर च्या मुलांचे केस कापू असं सांगण्यात येतं. मग घराजवळच एका ठिकाणी जायचं ठरतं. बाळ आता टॉडलर झालेला असतो. सोबत आजी आजोबाही आलेले असतात. ठरलेल्या वेळी आई आणि आजी बाळासोबत हजर होतात. बाळाला तिथल्या काकांकडून चॉकलेट देण्यात येतं आणि हळूहळू केस कापायची सुरुवात होते. बाळ रडून दुकान डोक्यावर घेतं, प्रत्येक जण आपले केस कापायचे थांबवून बाळाकडेच बघत असतो. बाळ आईच्या कडेवरून आजीकडे आणि आजीकडून आईकडे असं करत राहतं. अर्धेअधिक केस बाळाच्या नाका तोंडात चेहऱ्यावर कपड्यांवर, आई-आजीच्या अंगावर आणि कपड्यांवर आणि उरलेले जमिनीवर पडतात. बाळाला अधून मधून बाहेर आणून काही बाही दाखवून भुलवायचे सगळे प्रयत्न व्यर्थ जातात. सलून प्रमुख बाई "तुम्ही त्याला इथे नेहमी घेऊन येत जा, त्याला हळूहळू माहित होईल आणि तो कदाचित शांत राहील, खरंच केव्हाही या" असा प्रेमळ आग्रह करते. अखेर घरी येऊन अंघोळ वगैरे आटोपून बाळ झोपतं, उठल्यावर नेहमीसारखी मस्ती करतं आणि दिवसागणिक परत केस वाढू लागतात. अरे किती वाढले याचे केस अशा प्रतिक्रियांना आई बाबा हसून हो म्हणतात, पण पुन्हा पुढच्या वेळी केस कसे कापायचे हेच डोक्यात चालू असतं. आता पुढच्या वेळी आई आणि बाबा दोघेच असतात. डोक्यात दडपण ठेवून आई बाबा आत जातात, आणि अत्यंत आश्चर्यकारक रीत्या अर्ध्याच्या वर केस कापताना बाळ हु की चू करत नाही. नंतर अगदी मामुली रडपड होते पण तसं अगदीच विजयी मुद्रेने आई बाबा बाहेर येतात, बाळाला गोड धोड खाऊ घालतात आणि चला, आता जरा मोठा झाला लेक म्हणजे हा त्रास कमी होईल असं वाटून आनंद व्यक्त करतात. सृजन यावेळी अजिबात रडला नाही ही बातमी समस्त कुटुंबात प्रसिद्ध होते आणि शहाणा आहेच बाळ म्हणत कौतुक वाढत जाते.
आता पुढच्या वेळी जायचं तेव्हा आई बाबा निवांत असतात. आता केस कापणारा ओळखीचा झालेला असतो. त्यात त्याची मुलगी सृजन पेक्षा केवळ १ दिवसाने मोठी आहे असा योगायोग बघता त्यालाही अजून सॉफ्ट कॉर्नर असतो. या हायफाय कटिंग सलून मध्ये आजवर आई बाबा कधी गेलेले नसतात, पण लेकाच्या निमित्ताने तिथलं आदरातिथ्य अनुभवतात. आत गेल्या गेल्या चहा कॉफी विचारली जाते. मग ते नको तर पाणी, काही खायला हवंय का या सगळ्याला आई बाबा हसून नकार देतात. आजूबाजूचे लोक निवांत खात पीत आपले केस कापणे एन्जॉय करत असतात. थोड्याच वेळात इथे काय घडू शकतं याची कुणालाच काडीमात्र कल्पना नसते. आता लेक अजून मोठा झालेला असल्याने त्याची आधी मानसिक तयारी करवून घेतली तर उत्तम असे आईला वाटत असते, म्हणून आई काही दिवस आधीपासून "सृजन आता आपल्याला तुझे केस कापायला जायचं आहे, ते काका कसे छान केस कापून देतील वगैरे सांगत असते. बाळ पण छान ऐकत असतं." आई बाबा ठरवलेल्या वेळी बाळाला घेऊन जातात आणि तिथले काका खेळण्याचा एक मोठ्ठा बॉक्स बाळापुढे आणून ठेवतात. पण आता बाळाला समजायला लागलं आहे याचाच एक अर्थ असाही होतो की, हे सगळं कोडकौतुक आई बाबा काहीतरी विशेष कारणासाठी करत आहेत हेही त्याच्या लक्षात येतं. त्यामुळे सुरुवातीला आढेवेढे घेऊन शेवटी वेळ येईल तेव्हा बघू, तोवर खेळूया म्हणून तो खेळणी काढून खेळू लागतो. एकीकडे आई "बघ, त्यांचे केस ते काका कसे कापतात, त्या मावशीच्या केसांना बघ काय लावलंय, कुणीच रडत नाही अशी बडबड करत असते. इथे समोरच्याला आपली भाषा येत नाही याचा पूर्ण फायदा घेतला जातो, नाहीतर माझ्याच मुला एवढी मुलगी असणाऱ्याला काका म्हणायची हिम्मत भारतात काही होणार नाही. शेवटी बाळाचा नंबर येतो आणि हीच ती वेळ, हाच तो क्षण म्हणत बाळ शक्य तेवढ्या जोरात रडून ओरडून आणि आई बाबांशी धक्काबुक्की करत या सगळ्याला विरोध करू लागतं. त्या काकांच्या मते तो आज थकलेला आहे म्हणून असं होतंय, तुम्ही त्याला खेळण्याचा मूड असताना घेऊन या, आम्ही बहुतेक अपॉइंटमेंट घेतो पण तुम्ही तेही करू नका" एवढी सूट मिळते. यात काही तथ्य नाही, पुढच्या वेळी हेच होणार तास आत्ताच होऊन जाऊ दे असं आई बाबांना वाटत असलं तरी ते नंतर येऊ यावर तयार होतात. मग एका शनिवारी चांगल्या मूड मध्ये असताना त्याला घेऊन जातात आणि मागच्या पेक्षा दुप्पट जोराने रडापड चालू होते. आईच्या कडेवरून बाबा आणि व्हाईस व्हर्सा असे खेळ चालू होतात, आई बाबा बाळाच्या केसांनी न्हाऊन निघतात पण बाळ कसंबसं थोडे केस कापू देईपर्यंत काका हात टेकतात, तरी "तुम्ही रोज त्याला जाता येता घेऊन या, नुसतं इथे बसू द्या, सवय होऊ द्या, त्याच्या खेळण्याच्या वेळात आणा, तो जास्त थकलेला नसेल अशी वेळ बघा" अशा अनेक गोष्टी सुचवत राहतात. आई बाबांना बाळाचं रडणं शांत करायचं असतं, हे काय कसं होणार पुढे याचे प्रश्नचिन्ह असतं, इथे भारतातले न्हावी असते तर अशी सुररकन केस कापपुन दिले असते हे त्यांना वाटत राहतं,. पण हे बाळांच्या बाबतीतले कल्चरल डिफरंस आड येणारच हे चित्र स्वच्छ दिसत असतं. फार काही बरे नाही पण उन्हाळ्यासाठी ठीक झालेत केस म्हणून आई बाबा समाधान मानतात. ते केसमय कपडे धुताना आईच्या नाकी नऊ येतात. प्रत्येक वेळी हे कपडे एखाद्या मशीन मध्ये टाकायचे आणि त्या मशीन ने केस वेगळे करून ते स्वच्छ धुवून द्यायचे असं काहीतरी मशीन असावं हे तिला हमखास वाटतं.
त्यानंतर रस्त्याने जाताना प्रत्येक वेळी बाळ स्वतःहून "काका, केश" असं म्हणून दुकानाकडे बोट दाखवतो, पण जाऊयात का असं विचारलं तर स्पष्टपणे "ना ना" म्हणून उत्तर मिळतं. पुढच्या वेळी आई बाबा पुन्हा लेकाला घेऊन सलून मध्ये जातात. पण जायच्या आधीच बाळ इथून चल म्हणून मागे लागतो आणि केस कापायचे का यावर नाSSही नं हे खास स्टाईल मध्ये सांगत राहतो. तिथे गेल्या क्षणी पुन्हा घरी चल चल चा भुंगा चालू होतो, गोड धोड खायला देणे, भूर जाऊ, टेडी देऊ यापैकी कुठल्याच मार्गाने बाळ बधत नाही. न्हावी काका खूप शांततेने हॅन्डल करत असतात, सगळ्या दुकानासमोर आई बाबा नेहमी इतकेच हतबल होऊन बघत असतात आणि अखेर केस कापणी अर्ध्यावरच थांबते. काका पैसेही घ्यायला तयार होत नाहीत, पण त्यांचं न ऐकता आई बाबा तिथे पैसे ठेवतात आणि हताश होऊन घरी येतात. विचारांती केस कापायचे ट्रिमर शोधून आई ऑनलाईन ऑर्डर देते आणि ते यंत्र घरी येतं. आता नवीन माणूस नाही, तर घरी कदाचित सोपं जाईल असं बाकीच्या आयांकडून ऐकलं असतं. तरी प्रत्येक मूल वेगळं असतं हा मंत्रही ती सतत लक्षात ठेवते आणि एक दिवस बाबा अचानक पणे "चला केस कापूया" म्हणत पटापट तयारी करतो आणि पुन्हा रडत रडत केस कापणी मोहीम पार पडते. दरवेळी केस धुवायचे म्हटल्यावर हे असेच गोंधळ असतात पण इथे काही लागू नये ही मोठी काळजी असते. आजी आजोबा सगळं बघत असतात, पण त्यांच्या दुधावरच्या सायीला ते जितपत रडताना बघू शकतात, तितपतच हे रडणं असतं. आई बाबांच्या मते बाहेरच्या पेक्षा इथे ठीक एवढंच समाधान असतं, गोंधळ तसा तेवढाच असतो. तरीही बाबा अर्थात "छान कापले केस" म्हणून पाठ थोपटून घेतो.
आता काहीच दिवसात दुसरा वाढदिवस येणार असतो, मग तेव्हा फोटोसाठी बरं दिसावं म्हणून सगळं तेवढ्यात आटोपण्यात येतं. पण त्यामुळे १५ च दिवसात कल्ले प्रचंड वाढलेले दिसू लागतात विस्कटलेले केस गोड चेहऱ्याला अजिबात सूट होत नाहीत असं बाळ सोडून सगळ्यांना वाटत असतं आणि पुढचा मुहूर्त काढण्यात येतो. आता मानसिक तयारीचा काही फायदा नाही म्हणत यावेळी पूर्ण अनभिज्ञ ठेवण्यात येतं. रविवार सकाळची वेळ ठरवण्यात येते. सगळं बाळाच्या सोयीने आखण्यात येतं. भरपूर खेळून दमल्यावर त्याला छान गूळ तूप पोळीचा लाडू आजीकडून भरवण्यात येतो. मग हळूच "अंघोळ करायची ना सृजन" म्हणता क्षणी सृजन "अंगोल, आंदोल" असं म्हणून स्वतःचा टॉवेल आणायला पळतो. मग कपडे काढून घेतो आणि बाथरूम मध्ये जातो. आता पुढे टबात बसायची घाई करत असतो पण आई त्याला कुठे ना कुठे रमवायचे प्रयत्न करते आणि हळूच बाबा हातात मशीन घेऊन येतो. मग आई हळूच "सृजन आपण पटकन केस कापूयात" असा बॉम्ब फोडते आणि एकीकडे मशीनचा आवाज चालू होतो. डोळ्यातून पाण्याच्या धारा काढत बाळ "बंद बंद" असं म्हणत असतो, पण आई बाबा याला सरावलेले असतात. हात पाय मान शक्य त्या प्रकारे हलवत ठेवणे आणि त्यातल्या त्यात त्याला घट्ट धरून ठेवणे अशी कसरत करत केस सगळीकडे साठत जातात, बाळ आईकडे बाबाच्या नावाने शंख करत असते पण आई सुद्धा (चक्क) बाबाच्या बाजूने असते. बरेच केस कापून होतात, अगं त्याला घट्ट धर वगैरे सूचना, अरे तो ऐकत नाही वगैरें उत्तरं चालू राहतात. तुझा मित्र गाबी अजिबात रडत नाही, रेबेका रडत नाही असं सांगितल्यावर, त्या रडण्यातून ब्रेक घेऊन हमसून हमसून मानी? असा प्रश्न येतो. ती पण रडत नाही असं सांगताना आईला हसू आवरत नसतं. जवळपास १०-१५ मिनिटांच्या या एपिसोड नंतर आता बास असं वाटतं आणि बाबाच्या तीक्ष्ण नजरेला एक बट दिसते. हत्ती गेला शेपूट राहिलं असं वाटून बाबा ही शेपूट कापायला जातो आणि एकदम वेगळाच प्रकार घडतो. एका बाजूने केस एकदम बारीक कापले जातात, रडणे वाढतच असते आणि पॅनिक होऊन बाबा अजून थोडे केस कापतो. आता सगळ्यांचा पेशन्स संपत आलेला असतो, दूर बसलेल्या आजीला नातवाचे रडणे अजिबात सहन न होऊन तीही डोकावते. आता ते अर्धवट कापलेले केस त्यातल्या त्यात नीट दिसावे म्हणून बाबा दुसऱ्या बाजूने मशीन फिरवायला जातो आणि बाळ झटकन मान फिरवतं, पुन्हा एकदा एकाच बाजूने केस कमी कमी होत जातात. आधीही हालचाल चालूच असते पण आईने शक्य तेवढे प्रयत्न करून ती आटोक्यात ठेवलेली असते. पण आता आई हतबल आणि बाबाकडे काय चाललंय अशा प्रश्नार्थक नजरेने बघू लागते. बाळाचे आबा बाळाला इतर गोष्टी दाखवून रामवायला बघतात, पण बाळ त्याच्या प्रिय बाबाकडे सतत रागीट कटाक्ष टाकत असतं. आता राहू द्या असं आजीचं म्हणणं चालू होतं. आबांना अजूनही बाहेर नेऊन उरलेले केस कापून आणणे हा जरा सोयीचा पर्याय वाटत असतो. मग आई आणि तिचे आई बाबा यांच्यात चर्चा रंगू लागतात. बाळाला आजीने चॉकलेट देऊन शांत केलेले असते, पण ते अगदीच तात्पुरतं असतं. एकूण अवतार भयानक दिसत असल्याने उरलेले केस कापावेच लागणार हे स्पष्ट दिसत असूनही ते करण्याची हिम्मत आता आई बाबांकडे नसते. मग आजी सारखी "अरे त्यात काय, परत वाढतील केस, आता बास" असे सांगत असते. "केस वाढतील हे सगळ्यांना माहीत आहे, पण असा अवतार कसा ठेवणार" या आईच्या प्रश्नावर "कोण बघतंय, तुम्ही नाही का फॅशन करत, आणि लोकांचा कशाला विचार करायचा वगैरे गोष्टी आम्हाला सांगताच की" अशी अगदी योग्य उत्तरं बाळाच्या आई बाबांना ऐकवण्यात येत असतात. "बरं लोकांचा विचार नाही, पण बरं नको का दिसायला?" यावर पुन्हा "केस वाढतील लग्गेच" असं उत्तर येतं. ती आपल्या ऑफिस मधली मार्टिना, तिचे ते चित्र विचित्र केस जे एका बाजूने लांब आणि एका बाजूने कापलेले, त्यात अर्धे रंगवलेले, त्यातल्या अर्ध्याचीच कधी बुच्ची असा अवतार असून तिला काही वाटत नाही, तर २ वर्षाच्या मुलाचं काय एवढं असे अनेक विचार चालू राहतात. मध्येच सगळं असह्य होऊन आई "सृजन, तू एवढा का रडतोस रे, काही दुखत नाही यात किंवा आता घरी बाबाच करतो, कशाची भीती वाटते तुला" म्हणून काकुळतीने "प्लीज रडू नकोस" चं आर्जव करू लागते. मला तुम्ही केस कापायला न्यायचा तेव्हा काय व्हायचं? यावर तू अजिबात रडत नव्हतीस असं उत्तर बाबांकडून ऐकून जरा भावही खाऊन घेते. शेवटी सर्वानुमते हे जे काही झालं आहे हे नीट करायलाच हवं हे ठरतं आणि सगळे परत एकदा केस कापायचा मोहिमेत गुंग होतात. त्यातल्या त्यात बरे केस ठेवून बंद या बाळाच्या हाकेला ऐकण्यात येतं. बाळाला लगेच त्याच्या टब मध्ये स्थानापन्न करण्यात येतं. तू तुझ्या मगरीचे, बदकाचे केस काप असं सांगितल्यावर वेड लागलं यांना अशा चेहऱ्याने बाळ आईकडे बघतं. बहुधा माझ्या खेळण्यांना मी तुमच्यासारखा त्रास देणार नाही असं मनात असेल. "कुणी त्रास दिला सृजनला, बाबानी का, मी त्याला हाट रे करतो " म्हणत पुन्हा त्याला बळंच बडवण्यात येतं. बाबा बिचारा बाळाचा इवलासा झालेला चेहरा बघून अजून बिचारा वाटतो. "जाऊ दे, आता कित्येक दिवस केस कापावे लागणार नाही" असं म्हणत आई त्याची समजूत घालते. परवा पासून नर्सरी परत चालू होणार, त्यासाठी मुंजच झाली की बाळाची म्हणत विनोद केले जातात. कल्ले कापण्याची फार गरज होती यावर सगळ्यांचं एकमत होतं आणि जे झालं ते चांगल्यासाठी झालं म्हणत सगळं गंगेला मिळवलं जातं. आता पुढचा मुहूर्त एवढ्यात नाही बघावा लागणार ही एक गोष्ट सगळ्यांना समाधान देत असते. तू एकदम यो यो दिसतो आहेस असं म्हटल्यावर हसून यो यो असे बोबडे बोल ऐकू येतात. आरशात बघून होतं, व्हिडीओ कॉल वर केस दाखवले जातात. हेच पुढच्या वर्षी झालं तर 'बाबा, तू काहीही करतोस' असं ऐकवण्यात येईल आणि त्यानंतर तर "मी म्हणेन तेव्हाच, मी म्हणेन तसे आणि मी म्हणेन त्याच सलून मध्ये" अशा अनेक अटी आता वयानुसार वाढत राहतील, त्यापेक्षा आता सध्या आपल्या हातात आहे तोवर घ्या मनासारखं करून असंही वाटत राहतं.
पाहिले २ दिवस प्रत्येक वेळी बाळाचा चेहरा आणि हेअर स्टाईल बघून हे मागचे सगळे एपिसोड आईच्या डोक्यात घोळत राहतात. सवयीने आता हेच छानच दिसतंय, असंच करत जाऊ प्रत्येक वेळी असंही वाटायला लागतं. ३ आठवड्यांच्या सुट्ट्या संपून नर्सरीत प्रवेश करता क्षणी बाळाला तिथल्या बायकांकडून "सृजन तू कुठल्या सलून मध्ये गेला होतास इतके छान केस कापायला" अशी प्रतिक्रिया मिळते. तो बाबा नामक न्हावी होता हे कळल्यावर मग पुन्हा सगळी चर्चा तिथेही रंगवली जाते. आई बाबांना ऑफिस मध्ये पुन्हा एकदा मार्टिना दिसते आणि तिचे केस बघता आपले खूप चांगले म्हणत ते स्वतःचेच समाधान करवून घेतात. केस परत कसे दिवसागणिक वाढत आहेत यावर रोज चर्चा घडत राहतात आणि आई बाबांना पुन्हा एक बट विचित्र बाहेर आली आहे असं वाटल्यामुळे ते पुढच्या मुहूर्ताची संधी शोधत राहतात. :ड