शतायुषी भव !

शाळेच्या ग्रुपवर माझ्याच माहेरच्या कॉलनीत रहाणार्‍या मित्राने जेव्हा सांगितले की तू या वर्षी ५० वर्षांचा झालास, त्यानिमित्त मोठ्ठं सेलिब्रेशन असणार आहे, तेव्हा काय वाटलं कसं सांगू तुला? ५० नसले तरी २२-२३ वर्षे नक्कीच तुझ्या सान्निध्यात होते मी. तू यायचास तेव्हाचे १०-१२ दिवस म्हणजे मंतरलेले दिवस असत. अजुनही त्याचं गारुड आहे मनावर. लोक उन्हा-पावसाची तमा न बाळगता पायी चालत पंढरीला जातात, शिर्डी गाठतात. काय मिळतं त्यांना असा त्रास सोसून? माझ्या लेखी या प्रश्नांचं जे उत्तर तेच तुझ्यासमवेतचे दर वर्षीचे १०-१२ दिवस जगतानाचे उत्तर....निव्वळ आनंद. असा निखळ, निर्भेळ आनंद खरंच त्याव्यतिरिक्त कधी गवसतच नसे.

हा आनंद हेच एकमेव कारण असावं तू असा मनाच्या कोनाड्यात घट्ट रुतून राहिलायस त्याचे. आज लग्न होऊन्, १६ वर्षे होऊन गेलीत तरी तुझ्या माहेरी असतो का गं? कुठे? किती दिवस? या प्रश्नाचं उत्तर म्हणूनच तुलाच आठवून दिलं जातं की "हो असतो ना, मोहन नगरमध्ये १० दिवस". खरंच तू सार्वजनिक होतास, आहेस तरी प्रयेकाचा होतास, माझाही. म्हणूनच तर चुलत काकांकडे पहिल्या दिवशी घरच्या गणपतीच्या दर्शनाला जायचो, त्याला दुर्वा वाहिल्याशिवाय जेवायचं नाही हा बाबांचा नेम पाळायचो तरी तो कायम प्रधानांचा अन तू माझा, माहेरचा असंच वाटत राहिलंय. शेवटी तू एकच रे, चराचरात सामावलेला, कळतंय मलाही, पण तरी तुझं हे माझ्या मनातलं सगुण साकार रुप त्याचं स्थान वेगळंच, इतरांपेक्षा काकणभर वरतीच.

मला आठवतंय तू येण्याच्या साधारण महिना- दोन महिने आधी जिथे तू घडत असायचास त्या कारखान्यात शाळेत जाता-येता वाट वाकडी करुन जात असू आम्ही आणि तुला घडत असताना पाहत असू. "काका, मोहन नगरचा कुठला?" हा प्रश्न एकदाच विचारायचा आणि मग ती जागा अचूक हेरुन, भले ती इतर सर्व मूर्तींच्या गराड्यात कोपर्‍यात का असेना, तिच्यावरच सारे लक्ष केंद्रीत असे आमचे. गेले कित्येक वर्ष तीच सिंहासनाधिष्ठीत मूर्ती, लोडाला रेलून किंचित तिरकस बसलेला, एकच पितांबर, उपरणे, सारं तसंच असूनही आमच्यासाठी सर्वांत सुंदर, मोहक होतास तू... कारण तू आमचा होतास. ‘आमचा लाडका बाप्पा’.... हो याच नावाने आम्ही हाक मारत आलोय तुला. तेव्हा राजा, महाराजा उदयास आलेच नव्हते रे. तू एकच होतास, पुजेसाठी वेगळी छोटी प्रतिकॄती आणून ती समोर मांडणे हे असं काही नव्हतं. आम्ही कोणीही, कधीही तुझ्याजवळ येऊ शकत होतो. स्वहस्ते तुला हार घालत होतो, कसलंच अवडंबर नव्हतं ना सोवळ्या-ओवळ्याचं ना सुरक्षेचं. म्हणूनच तू आमचा जवळचा होतास. तुला आवडतं म्हणून खास लाल जास्वंदीचं रोप आजीनं लावलं होतं मागच्या अंगणात आणि त्या फुलांचा आजीने स्वतःच्या हाताने गुंफलेला लालचुटुक हार तू मोठ्या दिमाखात तिच्या एकेका नातवंडाकडून गळ्यात घालून मिरवायचास रोज.

आमच्या लहानपणीच्या शिक्षणपद्धतीचंही या आनंदसोहळ्यात एक महत्वाचं योगदान असायचं बरं का. ते म्हणजे तू यायचास तेव्हा कध्धीच परीक्षा नसायच्या. पहिली चाचणी होऊन गेलेली असायची आणि सहामाही नवरात्रीच्या सुमारास. त्यामुळे तू ,आमची ही बुद्धीची देवता अंमळ श्रमपरिहार करुन घ्यायलाच येत होती, रिफ्रेश होऊन पुन्हा जोमाने अभ्यास करायला. प्रोजेक्टस, असाइन्मेंटस असले शब्द आम्ही तेव्हा डिक्शनरीतसुद्धा वाचले नव्हते. त्यामुळे तुझं येणं म्हणजे निखळ मनोरंजन हेच समीकरण डोक्यात फिट्ट बसलं होतं बघ.

तू यायच्या कैक दिवस आधीच तुझ्या येण्याचा 'माहोल' जमायला सुरुवात होत असे. तिथे कारखान्यात तू दिवसागणिक साकारत असायचास तर इथे आमची लगबग मखर काय नि कसे बनवायचे, सांस्कॄतिक कार्यक्रम काय ठेवायचे? यासाठी. मखराच्या कामात मी तर फक्त लुडबुडच केली आहे कायम, तितकंच जमायचं मला. मात्र मनोरंजनाच्या कार्यक्रमात कायम सक्रीय सहभाग. लहान असताना स्पर्धक म्हणून आणि वयोमर्यादा ओलांडल्यावर संयोजक म्हणून. नाटकं बसवणे, नाच, वेशभुषा स्पर्धा, चित्रकला, बुद्धिमत्ता स्पर्धा,महिलांसाठी एक खास दिवस राखून त्यांचे खेळ ...दहा दिवसांचं एकदम जंगी आयोजन. शाळेला सुट्टी नव्हतीच. पण शाळेत फक्त शरीराने जायचो तेव्हा. मन इथेच तुझ्या मंडपात घुटमळत असे. आज घरी गेल्यावर काय काम करायचे हाच विचार डोक्यात.

कितीही दिवस आधीपासून सुरुवात करा, कामं रेंगाळलेली असायचीच आणि मग तुझ्या आगमनाआधीची रात्र जागवून सारं तडीस न्यायचं. मामाचं घर तळमजल्यावर, बर्‍याचदा तिथेच मखर बनत असे आणि आदल्या रात्री मंडपात जोडणी करायची. उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आलेलं असायचं त्या रात्री. भराभरा मंडप डेकॉरेशन उरकून आगमन मिरवणुकीची वेळ दर्शवणारा फळा लिहून दर्शनी भागात ठेवला की हुश्श करुन मध्यरात्रीनंतर मंडळी पांगत.

दुसर्‍या दिवशी सकाळपासून पुन्हा धांदल सुरु. ज्यांच्या घरी गणपती आहे त्यांचीही आणि ज्यांच्या घरी नाही त्यांना कुठे तरी जायचे असायचेच. मात्र त्या सगळ्या गडबडीतही ११३ सभासदांच्या कॉलनीत, जवळजवळ प्रत्येक घरातून किमान एक माणूस तरी तुला आणायला यायचाच, कारण तू आमचा होतास ना.वाजत गाजत, तुझ्या नामाच्या गजरात गुलाल उधळत तू यायचास आणि प्रथेप्रमाणे नवविवाहीत जोडपे तुझी प्राणप्रतिष्ठापना करायचे.तोवर आम्ही घरच्या गणपतीला जाऊन येतो, इतक्या वाजता मंडपात भेटू असे वायदे करुन तिथून पळत असू. मग तुझ्या साक्षीने या आनंदसोहळ्याची खरी सुरुवात होई. दररोज नैवेद्य कोणाचा याची यादी बनलेली असे, इच्छुक मंडळींची नावे चिठ्ठ्या टाकून काढली जात. त्या घरुन तुला दुपारचा नैवेद्य आणि संध्याकाळी आरती नंतर प्रसाद येणार. त्या घरातला सदस्य तुझी आरती करणार.... हे सगळं अस्संच सालाबादप्रमाणे, कोणतीही कमिटी असली तरी.

संध्याकाळी सात पासून लहान मुलांच्या स्पर्धा, खेळ सुरु होत. साडे आठ ते नऊ आरती. नऊ ते साडेनऊ-दहा घरी जाऊन जेवून यायचं की दहाला मुख्य कार्यक्रम सुरु होत असे. दररोज काही वेगळे आकर्षण.मराठी भावगीत गायन, कॉलनीतल्या मुलांचे नाच, नाटक, मोठ्यांचे नाटक, कधी ऑर्केस्ट्रा, कधी कथाकथन. त्यानिमित्त्ताने प्रत्येक घरातील तीनही पिढ्या एकत्र येत. आजी आजोबा- मुला,नातवंडांना रंगमंचावर कौतुकाने पाहत असत, खुशीत येऊन बक्षीसे देत असत. एकमेकांची ख्याली खुशाली विचारली जाई. माहेरवाशिणी तुझ्या निमित्ताने घरी रहायला येत असत. घरच्या बरोबरच शेजारच्या काकी मावशी कडूनही कोडकौतुक करुन घेत असत. हसण्या-खिदळण्याला, चिडवाचिडवीला ऊत येई. हे सगळं तुझ्या साक्षीने, तुझ्याच मंडपात. कार्यक्रम चालू असतानाच अध्ये मध्ये नजर वळत असे तुझ्याकडे, तू पण असायचास आमच्यासोबत एंजॉय करत.
मंत्रमुग्ध झाल्यागत हे दहा तर कधी बाराही दिवस कसे चुटकीसरशी संपून जात ते जाणवायचंही नाही रे. अनंतचतुर्दशीच्या आदल्या रात्री मोठ्ठं जाग्रण, राहिलेले सर्व कार्यक्रम त्या रात्री पार पडत आणि मग सर्व स्पर्धांचा बक्षीस समारंभ. कधी कधी तर तुझ्या मिरवणुकीचा ट्रक एकीकडे सजतोय तर दुसरीकडे बक्षीस समारंभ असंही झालंय. पण त्यावेळी मात्र बक्षीस घेतानाच्या आनंदापेक्षा तुझ्या विरहाच्या भावनेने मन उदास झालेलं असायचं. तू घरी येतोस तो लाडका भाचा म्हणून मामाकडून कोडकौतुक करुन घ्यायला तो कौतुक सोहळा संपूच नये असं वाटत असायचं. त्या शेवटच्या - महाआरतीच्या वेळी तर मंडपात पाऊल ठेवायला जागा नसे. आजारी, वयोवॄद्ध असे जे १० दिवस येऊ शकले नाहीत ते सारे त्या शेवटच्या आरतीसाठी तरी खाली उतरत, नव्हे त्यांना उतरवलं जाई. तुला एकदातरी....आणि कदाचित शेवटचं पहावं म्हणून....पुढच्या वर्षी लवकर तू येशील रे पण आम्ही असू का या साशंकतेनं आलेले असे ते थकलेले जीव.

त्या शेवटच्या आरतीनंतर निरोपाची प्रार्थना म्हणताना तर गळ्यांत आवंढा दाटून यायचा आणि आरतीनंतरचं ते, त्या वर्षीचं शेवटचं दर्शन, तो चरणस्पर्श आणि त्या वेळची तुझ्याशी झालेली नजरभेट तर विसरणंच शक्य नाहीये. खरंतर तुझ्या अख्ख्या गोंडस रुपावर कडी म्हणजे तुझे डोळे......त्या डोळ्यांत पहाणं म्हणजे अक्षरशः 'दुनिया भूल जाते है' ची अनुभुती. त्या डोळ्यांत काय रे अशी जादू आहे तुझ्या की प्रत्येकाला त्यांची मोहिनी पडतेच पडते...मी तरी कशी अपवाद असणार मग? तुला आठवतंय? ८४ साली तू आलास तेव्हा? किती चिडले होते मी त्या वर्षी? आठवतं ना? मला माहीत आहे तू कध्धीच काहीच विसरत नाहीस. असं म्हणतात की जे खरे भक्त असतात, ते कधी देवाला कोणत्याही प्रसंगी 'का?' असा जाब विचारत नसतात. जे जे वाट्याला येतं ते ते सगळं तुझं ‘दान’ म्हणून आनंदाने स्वीकारतात. पण मला कुठली रे तितकी अक्कल असायला त्या लहान वयात? भक्ती म्हणजे काय हे देखील कळत नव्हतं, अजुनही नाहीच कळलंय म्हणा. बाप्पाला लहान मुले खूप आवडतात आणि त्यांनी केलेली प्रार्थना तो लग्गेच ऐकतो हे घरातल्या तमाम मोठ्यांचे शब्द तू फोल ठरवले होतेस याचा राग येऊन त्या वर्षी मी अगदी दृढनिश्चय केला होता तुझं दर्शन 'न' घेण्याचा. मनात कैक 'का?' साठवून. नेहमीसारखं मित्र-मैत्रिणींनी बोलावलं की काहीतरी कारण काढून तुझ्या मंडपात जायचं टाळत होते. तु आलास,तुझी प्राणप्रतिष्ठा झाली.असंच केव्हातरी कुणीतरी बोलावलं म्हणून का काय ते आठवत नाही पण नाखुशीनेच तुझ्या मंडपात गेले आणि तुला न बघताच वळत होते आणि..... आणि काय झालं मला ते काही कळलंच नाही बघ. माझ्या मनाविरुद्ध, नकळत मी परत फिरले आणि तुझ्यासमोर आले, स्वतःच चालत जणू काही तूच बोलावलंस हाक मारुन. तुझ्या समोर येत असतांना डोक्यांत घोळू लागली अगणित 'का?' ची गुंफण आणि तुझ्याशी नजरभेट झाली. काय जादू केलीस रे तू? सगळ्या सॄष्टीला तुझ्या तालावर नाचवणारा तू, तुझ्या परशुच्या एका प्रहाराने असूरांना गारद करणारा तू... तुझ्यासमोर उभी असलेली मी...., माझा राग, माझे प्रश्न काय चीज होते रे तुझ्यासमोर? तुझ्या त्या भावसांद्र नजरेतून होणारी ती मायेची पखरण....आईशप्पथ.... या जन्मात विसरणां शक्य नाहीये मला त्या दिवशीचं ते तुझं रुप....कोणते प्रश्न मनात होते? कसला राग होता? कोण होते मी?.. मला काय झालं? होत होतं ? मला सांगताच येणार नाही........

यानंतर काही वर्षांनी टी व्ही वर विष्णुपुराण नामक चोप्रांची हिंदी सिरियल लागायची. त्यातला ध्रुवबाळाचा भाग चालू होता. ध्रुवबाळाची खडतर तपश्चर्या पाहून विष्णूला त्याच्या समोर प्रगट व्हावंच लागलं. तो स्वतःच्या मूळ चतुर्भुज रुपात ध्रुवबाळासमोर येतो आणि त्याला विचारतो की “तुला काय हवंय ज्यामुळे खेळणं-बागडणं विसरून तू असा खडतर तपश्चर्येला बसलायस?” ध्रुव बाळाने विष्णूला उत्तरादाखल प्रतिप्रश्न केला की "मला माझ्या वडीलांच्या मांडीवरुन का उठवलं गेलं?" उत्तरादाखल विष्णू त्याच्या पुढ्यात खाली बसतो आणि ध्रुवबाळाला अलगद स्वतःच्या मांडीवर घेतो......... बस्स यानंतर ध्रुवबाळाला खचितच दुसरं कोणतंही अढळपद मागायची गरज पडली नसेल. हा भाग पाहिला आणि त्या वेळची तुझी ती नजर आठवली ...किती साधर्म्य होतं म्हणून सांगू तुला या दोन प्रसंगांत ....

त्यानंतर तू केवळ दिलंस...भरभरुन देत आलास...अजूनही देतोच आहेस रे. आता नं तुला काहीतरी द्यावंसं वाटतंय. हसतोस काय? मी तुला काय देणार म्हणून ?ते ही खरंच रे. पन्नास वर्षांचा झालास म्हणून तुला शुभेच्छा देतानाच असं वाटतंय की तुला म्हणावं "शतायुषी भव !" ही इच्छा समज, प्रार्थना किंवा आशिर्वाद काहीही. शेवटी तुला दिले तरी झोळी माझीच भरणार आहे, ठाऊक आहे मला. अजुन कमीत कमी पन्नास वर्षे तरी येत रहा.तुझ्या आगमनाने माझ्यासारख्या कैक जीवांचं भावविश्व असंच निखळ आनंदाने बहरत राहू दे. इतकं की त्या सर्वांच्या मनाच्या गाभार्‍यात तू असाच अढळस्थानी विराजमान होशील "आमचा लाडका बाप्पा" या नात्याने आणि त्यासाठीच बाप्पा, शतायुषी भव !.

समाप्त

Keywords: 

लेख: 

ImageUpload: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle