ही आहे घर-घर की कहानी. आमच्या, तुमच्या कोणाच्या ही घराघरात घडणारे हे किस्से. केवळ पात्रांची नावं, तपशिल बदलले जातात पण किस्से थोड्या-फार फरकाने कुठेही घडणारे!
------------------------------------------------------------------------------------------------
ऑफिसमधून येऊन नुकतीच घरात शिरले तर बाजूच्या खोलीतून किंकाळी आली - I am dead, I am dead!! -
मोठेशेटांचा आवाज! नसलेलं मातृहृदय घेऊन मी हबकून त्या खोलीत गेले. तर चिरंजीव कॉम्प्युटर समोर डोकं धरून बसलेल्या अवस्थेत आढळले. जवळ जाऊन जरा अंदाज घेतला, तर सगळं ठीक वाटत होतं, म्हणजे जी आरोळी ठोकण्यात आलेली, तसं तर काही दिसलं नाही!! मी अशी डोकावून बघत असताना, अचानक चिरंजीव जोरात उठले आणि रोहन, यू किल्ड मी..व्हाय डिड यू डू दॅट - असं ओरडून वरच्या मजल्याकडे पळाले. वरती एक अशक्य, वर्णन न करता येण्याजोगं रणकंदन माजलं. (अमेरिकेतली घरं लाकडाची असली तरी खूप मजबूत असतात हे मी ठामपणे सांगू शकते!) या गोष्टीला मी सरावले असल्याने, सावकाशपणे कॉफी बनवून, पिऊन मी वर पोहोचले. लठ्ठालठ्ठी अजूनही जारी होतीच. काय झालं, कोण का मेलं - याची मी चौकशी चालू केली असता हाती बातमी आली की - खेळत असलेल्या व्हिडीओ गेम्स मध्ये थोरल्यांना धाकट्यांनी मारलेलं आहे. "हे कसले रे व्हायोलंट गेम्स खेळता तुम्ही!! मी सतराशे-एकसष्टाव्यांदा परत डायलॉग मारला. “तो बॅड गाय होता, मी पोलिस. म्हणून मी मारलं त्याला”, धाकटे शेट उत्तरले. “असले गेम्स खेळू नये. छान काहीतरी चेस नाहीतर काय तो मोनॉपोली वगैरे खेळा बरं..”, मी एक केविलवाणं वाक्य टाकलं. यापुढचे सर्व डायलॉग्ज सर्वांनाच पाठ असल्याने, आम्ही तिघांनी ते सर्व एका-सूरात म्हणून तिन्ही जीव परत आपापल्या कामांकडे वळले, दोन जीव गेमचा पुढला राऊंड खेळायला तर माझा जीव सोशल मेडिया सोशलायझेशन करायला, तब्बल एक तास सोमि पासून दूर राहिल्याने जीवाची खळबळ झालीच होती!
सोशल मिडीया वर नेमकी पहिलीच पोस्ट - व्हायोलंट गेम्स खेळल्याने बालमनावर होणारे दुष्परिणाम वगैरे! वाचता-वाचताच ठरवलं की ते काही नाही, या कार्ट्यांवर संस्कार केले पाहिजेत नीट...नुस्ते घाणेरडे गेम्स नाहीतर हाणामार्या करत फिरत असतात. आज त्यांचा बाप आला की त्याला ह्यांचा संस्कारवर्ग घ्यायला लावते. अशीही दिवाळी आहे - चांगला आहे मुहुर्त!
थोड्या वेळात नवरा आला. आल्या आल्या डबे खरवडून जमेल ते जंक गोळा करून तो टीव्ही समोर चिकटला. आजच्या दिसाचा रोजगार आणून कर्तव्य पार पाडल्याचं समाधान आणि जंक खाऊन मिळणारं समाधान - सारं कसं चेहर्यावर दाटून आलेलं. त्यातून समोर तो ६५" समाधान देणारा स्क्रीन! ब्रम्हानंदी टाळी लागल्यासारखा तो बसलेला!
मोका साधायचा तर धोका पत्करावा लागेल असा विचार करून मी देखील नवर्याशेजारी बूड चिकटवलं. आता ह्या कृतीत कोणताही रोमांस सामावलेला नसतो, तर ही कसलीतरी नांदी असते, इतपत तर नवर्यालाही कळू लागलंय एव्हाना. त्यामुळे त्याने "आता काय?" असा प्रश्न फेकून, एकीकडे तोंडात शेवेचा तोबरा भरून चॅनेल सर्फ करण्याचे काम पुढे चालू ठेवले.
"ह्या मुलांवर आज संस्कार करूया", मी!
"काय? म्हणजे काय करूया?" चेहर्यावर भाव असे की, आधी आपण संस्कार म्हणजे काय ते शिकूया, मग मुलांना शिकवूया! आता ते खरं असलं तरी ती वेळ पार निघून गेली आहे.
"अरे, जरा दिवाळी आहे, ते नुसते चकल्या-शेव-लाडू हादण्यापेक्षा जरा त्यांना दिवाळीचं महत्व, आपले सण-समारंभ वगैरे माहिती देऊया!" मला स्वतःला, दिवाळी म्हणजे खाणे-पिणे आणि हल्ली फोटो काढून इथे-तिथे सारत रहाणे - याखेरीज का साजरी करतात अजिबातच आठवत नव्हते, त्यामुळे नवर्याकडे ते डिपार्टमेंट देण्याचा हा कट मी रचलेला.
"बरं, जरा वेळानी करुया काय ते संस्कार!" त्याने सध्यापुरती स्वतःची सुटका करून घेतल्याचं लक्षात आलं होतं माझ्या. पण असो!
रात्री जेवणाच्या टेबलाभोवती नवर्याने संस्कार वर्ग आखला.
"तर मुलांनो पुढल्या आठवड्यात आहे दिवाळी! "
"ओह येस, द प्रिन्सिपल अनाऊंस्ड टुडे दॅट इट इज अ फेस्टीव्हल ऑफ व्हिक्टरी ऑफ गुड ओव्हर इव्हिल!" धाकटयाने माहिती पुरवली. त्या प्रिन्सिपल बाईंना मी मनोमन तडक धन्यवाद दिले.
"देन अ बंच ऑफ अस डिमांडेड दॅट वी शुड हॅव हॉलिडेज फॉर दिवाळी. मेनी किड्स सपोर्टेट द आयडिया. बंच ऑफ अस वॉक्ड आऊट ऑफ द क्लास टू प्रोटेस्ट!" मोठ्या चिरंजीवांनी अभिमानाने बातमी दिली. यांच्या या गांधीवादी की मार्टिन ल्युथर किंग वादी धोरणाचा सत्कार व्हावा अशी यांची अपेक्षा असावी!
अवाक, हताश अशा अनेक भावनांनी मी त्याच्याकडे बघत असताना पुढली बातमी कानी आली. अर्थातच शाळेकडून डिटेंशन मिळाले होते चिरंजीवांना! त्याचं जितं-जागतं प्रूफ म्हणून त्याने आमच्या हातात प्रिन्सिपलचं गुलाबी पत्रच ठेवलं. तसेही यांच्या पराक्रमाचे गोडवे गायला वेळी-अवेळी शाळेच्या प्रिन्सिपल मला फोन करत असतातच. आता तर शाळा ते घर हॉट लाईन टाकून घ्यायची वेळ आली आहे.
कार्ट्यांना खरंच काही संस्कार म्हणून नाहीत. दिवाळी म्हणून त्यांच्या मावस-चुलत भावंडांना २ आठवडे सुट्टी मिळते म्हणून यांना अमेरिकेत राहून सुट्ट्या हव्यात.. उद्या सर्वपित्री अमावस्येला सुट्टी हवी म्हणून प्रोटेस्ट करतील!!
"चल रे, कर यांच्यावर संस्कार लवकर!", मी परत एकदा नवर्याकडे फर्मान सोडलं.
"ऐका रे, एक होता रावण. त्याला दहा तोंडं होती. ", ही संस्कारांची सुरुवात!
"वॉव! एका वेळी केवढं बोलता आणि केवढं खाता येत असेल ना त्याला!",एकाचा प्रतिसाद!
नवर्याने त्या वाक्यावर माझ्याकडे पाहिलं. 'ते तर दहा तोंडं नसताना पण जमू शकतं' असा भाव त्याच्या चेहर्यावर लिहीलेला मला वाचता येत होता पण आत्ता त्या विषया कडे वळलो तर आधी तासभर भांडणं आणि त्याचा शेवट "चला आता मस्त आईस्क्रिम शेक वगैरे बनवून पिऊया", असा होईल याची मला खात्री होती. म्हणून मी तिथे दुर्लक्ष केलं.
"तर रामाने त्याच्याशी युद्ध करून त्याचा पराभव केला. That was the victory of good over evil!", नवर्याने पुढलं संस्कार-वाक्य टाकलं. हे असे लिमिटेड संस्कार! तीन वाक्यात संस्कार संपले!
"बाबा, डिड शिवाजी हेल्प राम?", धाकटे चिरंजीव वदले. याला भारत म्हटला की एकच शिवाजी माहिती आहे. आणि ते नाव कुठल्याही संदर्भात बाहेर फेकलं की आजू-बाजूची जनता खूश होते हे ही यानी चांगलं बघून ठेवलं असावं. त्यामुळे हे असं राम-रावण ते मोदी कोणत्याही विषयावर घरी-दारी चर्चा चालू असेल तर हा शिवाजी नाव टाकून मोकळा होतो. हमखास हश्या आणि टाळ्या!
"अरे बाबा, शिवाजी ४०० वर्षांपूर्वी होऊन गेला. रामायण हजारो वर्षांपूर्वी. काही संबंध आहे का? काहीही बोलतो!" मी खेकसले.
"अगं आई, आहे ना संबंध!!", माझ्याकडे टकामका पहात तो उद्गारला. "कनेक्ट द डॉटस, Can you not connect the simple dots?", हे वर!! झालं!! या आईला कुठलेही डॉटस कनेक्ट करता येत नाहीत, हे दोघांचं ठाम मत आहे. मला मूळात ते डॉटस दिसलेले नसतात, तर ते कनेक्ट कुठून करणार??
"आहे ना संबंध! शिवाजी किल्ड बॅड गाईज. राम/कृष्ण ऑल्सो किल्ड बॅड गाईज”, हिला काही आयुष्यात डॉटस कनेक्ट करता येणार नाहीत अश्या अर्थी डोकं हलवत धाकटे शेट उत्तरले. नाही त्या वेळी लॉजिक कुठून येतं याच्यात देव जाणे!
"See! we do the same thing in our video games! आम्ही पण बॅड गाईजना मारतो. That is also a victory of good over evil! आता आम्हाला सांगू नकोस व्हिडीओ गेम्स कसे violent असतात ते!! ",मोठ्या चिरंजीवांनी कात्रीतच पकडलं आम्हाला!
यावर काय बोलावं न सुचून नवर्याने घाईघाईने घोषणा केली, "चला, चला पुरे झालं आता!"
आजचा “लिमिटेड-संस्कार” वर्ग संपला!