ही आहे घर-घर की कहानी. आमच्या, तुमच्या कोणाच्या ही घराघरात घडणारे हे किस्से. केवळ पात्रांची नावं, तपशिल बदलले जातात पण किस्से थोड्या-फार फरकाने कुठेही घडणारे!
--------------------------------------------------------------------------------------------------
आमचे धाकटे चिरंजीव यांना एके दिवशी एकदम साक्षात्कार झाला की आपण आपले संपूर्ण आयुष्य एकाच घरात कंठतोय. "all my life, I have been living only in one house. I don't even know how does it feel like living in any other house!" असे उसासे टाकत तो वरचेवर फिरू लागला. त्यावेळी त्याचे वय होते - ७ वर्षे. दोन्ही आजोबांनी, ज्यांनी ४०-५० वर्षं एका घरात काढली, त्यांनी, नातवाचे हे वक्तव्य ऐकलं असतं तर त्यांना झीट आली असती. पण मी मूळातच अतिशय कनवाळू आई असल्याने त्याचं हे म्हणणं लगेचच मनावर घेतलं. आणि घराचा शोध जारी केला. तसं तर घरं बघण रहाणे हा माझा अनादि-अनंत छंद आहे. त्यामुळे पहिलं घर घेतल्यापासून तिसर्या महिन्यापासून मी कुठेही ओपन हाऊस दिसलं की मी बघून यायचे. आता तर काय स्वतःकरीता घर घ्यायचं... कसून तयारीला लागले. पण जवळपास तीन एक वर्षं हा शोध जारीच राहिला...घर नक्की हवंय का, हवं तर कुठे घ्यायचं इथपासून.. घरात आपल्याला काय सुविधा हव्यात हे ठरवण्यातच हा काळ निघून गेला...
आमच्या पिताश्रींना आम्ही नविन घर घ्यायचा विचार करतोय हे काही पचनी पडेना..."नविन घर बघताय?? का, काय वाईट आहे सध्याच्या घरात?" "बाबा, हे घर लहान पडतं आम्हाला", हे माझं विधान ऐकून त्यांना दातखीळ बसली... त्यांच्या मते भलं-थोरलं घर लहान कसं पडतं..असा प्रश्न त्यांना भेडसावत होता (ती ४० वर्षाची परंपरा भानगड तर होतीच!)..आणि तो प्रश्न वारंवार मला विचारून त्यांनी मला भेटसावून सोडलं..."अमेरिकन ड्रीम, अमेरिकन ड्रीम म्हणतात ते हेच!", असं सांगून मी त्यांची बोलती बंद केली.
आखूडशिंगी, बहुगुणी घर शोधणं म्हणजे फारच कठीण काम...त्यातून दोन्ही युवराजांची घराबद्दल स्वत:ची ठाम मतं होती. पहिलं घर घेताना त्यांचं मत विचारात घेतलं नव्हतं असाही एक निषेध नोंदवण्यात आला...आता हे आम्ही कसं साध्य करणार होतो देव जाणे...पहिलं घर घेताना मोठ्या युवराजांचं वय होतं १ वर्ष तर दुसऱ्यांचं वय होतं - (negative) १.५ वर्ष!
पण असं काही विचारण्यात अर्थ नसतो त्यामुळे नविन घरात काय हवंय ते सांगा असं म्हणून गपगुमान सर्वांच्या अटी नोंदवून घेतल्या!
आता ४ जणांच्या सर्व अटींत बसणारं आणि खिशाला परवडणारं घर (ही अट अर्थातच दोघा युवराजांच्या खिजगणतीतही नव्हती!) शोधायचं म्हणजे फारण कठीण काम!
बरीच शोधाशोध..ऊहापोह..भवती-नभवती होऊन अखेर एक नविन घरं बांधणी चाललेली कम्युनिटी आवडली...बांधकामाला सुरूवात व्हायची होती पण घरांचे प्लँन्स पटले..एक plan चौघांना आवडला...चौघांच्या, सर्व नाही पण बऱ्याचश्या अटी पूर्ण होतील असं वाटून घर finalize करायचं ठरलं..आणि बुकिंग अमाऊंट भरून टाकली पण...
आणि पुढले सहा महिने नविन घर सोडून मंडळींना दुसरा विषयच नाही उरला. सतत नविन घराविषयी स्वप्नरंजन करणे आणि वेळी अवेळी बांधकामाच्या साईटवर जाऊन बांधकाम प्रगती न्याहाळणे, घरात कोणत्या खोलीत काय ठेवायचे, नाहीतर नविन घरात फर्निचर काय घ्यायचं हे शोधणे एवढाच उद्योग चालू होता... खरं तर बिल्डरने बांधकाम चालू असताना साईटवर जायचे नाही असं फर्मान काढलेलं...पण त्याला कोण बधतंय...संध्याकाळी कामगार घरी केले की आम्ही पोहोचून पार आतून चकरा मारून कितपत काम पुढे गेलंय याची पहाणी करत फिरायचो. कधी कधी तर दुपारीही पोहोचून मग बिल्डरचा डोळा चुकवून साईटवर फिरणे चालायचे.
आता नविन घर पार जमिनीच्या तुकड्यापासून घेतलं म्हटल्यावर कोणालाही वाटेल घरामध्ये आपल्याला हवे ते बदल करून घेता येतील. प्रत्यक्षात म्हणे हे डिझायनर होम आहे! म्हणजे घर घेणार्यांना काहीच अक्कल नसेल असं गृहितक घरून, डीझायनर नावाच्या प्राण्याने आपल्याला जे काही बहाल केलंय ते आपण उपकृत भावनेने घ्यावं असा बिल्डरचा नियम होता...घरात काडीचाही बदल करण्याची पॉवर पैसे मोजून घर घेत असलेल्या आम्हाला नाही याचा आम्हाला शोध लागला...त्यामुळे आमच्यासारख्या अजागळ मंडळींना पांढरी कॅबिनेटस नको, आम्ही २ वर्षात ती काळीकुच्च करून दाखवू - ह्या आमच्या सांगण्याचा काहीही उपयोग झाला नाही. डिझायनर म्हणालाय पांढरी कॅबिनेटस म्हणजे चकचकीत पांढरी शुभ्रच कॅबिनेटस मिळणार! नंतर पुढे मी माझ्या शेजारणीकडे बघितली तर सुंदर ग्रे कलर...हा अस्सा रंग मला हवा आमच्या कॅबिनेटसना, असं मी म्हणाल्यावर ती म्हणे, मला पांढराशुभ्र रंग हवा होता...झालं! केली असती जर अदला बदल तर दोन जीवांना खुश नसतं केलं...नाही म्हणायला लहान मुलांना कसं उगी उगी म्हणून आपण थोडं त्याच्या कलाने घेतो, तसं त्यांच्या डिझायनर स्टुडिओ मध्ये जाऊन उगीच ४ फुटकळ गोष्टींची निवड आम्हाला करायला दिली...आम्ही आपले तेवढ्यावर आनंद मानून घेतला...
बघता बघता ६ महिने निघून गेले. घरात पदार्पण करण्याचा दिवस आला...दुपारी चाव्या मिळणार होत्या तर सकाळपासून चौघांना कधी एकदा दुपार होते आहे आणि कधी एकदा चाव्या घ्यायला जातोय असे झालेलं....ज्युनिअरांचे तर प्लॅन्स होते की स्लिपींग बॅग्ज घेऊन जायच्या आणि चाव्या मिळाल्या की त्या रात्री नविन घरात कँपिंग! त्यानुसार ते चौघांना ४ स्लिपिंग बॅग्ज घेऊन तयार राहिले. कम्युनिटीत बाकी बर्याच जणांना सुद्धा त्याच आठवडा-पंधरा दिवसात पझेश्न्स मिळत होती आणि प्रत्येकाने किल्ली कधीही मिळाली तरी चांगला दिवस, मुहूर्त बघणे वगैरे करूनच गृहप्रवेश केले. दुसरं घर नसल्यासारखं त्याच रात्री नविन घरात मुक्काम ठोकणारे आम्हीच!
दुपारी चाव्या मिळाल्या आणि आम्ही घरात शिरलो. चाव्या द्यायला आणि घराला आतून वॉक थ्रू करायला बिल्डरचे सेल्स representatives बरोबर होते...ते आपले घर, अप्लायन्सेस दाखवतायत.. कसल्या कसल्या वॉरंटीज एक्स्प्लेन करतायत... आम्ही आपले हो-हो करत त्यांना पिटाळण्याच्या मागे...निघा एकदाचे...आणि आम्हाला नविन घर एंजॉय करू देत असं झालेलं...
ते टळल्यावर घरात मनसोक्त उधळलो...वर-खाली ७० वेळा जाऊन-जाऊन कानाकोपरा बघून आलो...कुठे काय ठेवायया, कसं डेकोरेट करायचं याचे (परत एकदा) खल झाले...रात्री बाहेर जाऊन जेऊन आलो आणि पथार्या ऊर्फ स्लिपिंग बॅग्ज पसरल्या. सकाळी उठलो! सामान म्हणून स्लिपिंग बॅग्ज सोडून मी फक्त माझी कॉफी घेऊन आलेले...नविन घराच्या चाव्या मिळणार या आनंदात घरातले लहानच काय मोठेही विचार करण्याच्या पलिकडे गेलेले...आता बाकी सोडा पण बाथरून टिशू तरी आणावे ना... ते देखील नाही म्हटल्यावर सकाळी उठून जुन्या घरी पळ काढण्यावाचून पर्याय नव्हता! दोन दिवसांनी सगळं सामान नविन घरात हलवलं आणि आम्ही नविन घरवासी झालो एकदाचे...
आता नविन घर मित्रांना दाखवायला म्हणून दोघं युवराज मित्रांना स्लिपओव्हरची आमंत्रणं देऊन घेऊन यायला लागले. म्हणजे इथे नाही धड बॉक्सेस उघडलेले, एक गोष्ट सापडायची शाश्वती नव्हती आणि घरात अजून मित्र रहायला बोलावून तो एक कल्ला...बरं समस्त मित्रवर्गाचं मत पडलं की वरून ओपन स्पेस असल्याने हे घर नर्फ गन्स वॉर झोन म्हणून अगदी योग्य आहे. वरून शत्रूवर बुलेटस झाडणं अगदी योग्य पडतं...त्यामुळे घरात वर-खाली नुसता नर्फ गन्सचं रणकंदन माजलं...पाय ठेवावा तिथे नर्फ गन्सच्या बुलेटस! एवढंच नाही तर आधीच्या घरापेक्षा हे घर मोठं असल्याने घरात पळापळी, लपाछपी, बाप-लेकांच्या क्रिकेट मॅचेस, कागदाची विमानं उडवणे हे देखील जोरात रंगू लागलं. त्या बुलेटस, कागदी विमानं कुठे तरी पार वर असलेल्या, हात पोहोचणार नाही अश्या खिडकीच्या फ्रेममध्ये जाऊन अढळपद मिळवून नांदू लागली. एक दिवस घरी आले तर धाकट्या शेटांनी मोज्यात टेनिस बॉल घालून तो मोजा दोरीने वरच्या मजल्यावरच्या रेलिंगला बांधून खाली लिव्हिंग रूम मध्ये सोडून, टेनिसच्या नावाखाली बॉल बडवणे हा एक नवा खेळ चालू केला होता. येता जाता आपल्याला कधी कुठून कुठला बॉल लागेल, विमान येऊन आदळेल याचा नेम उरला नाही. कौतुकाने घेतलेला ओपन फ्लोअरप्लॅन आमच्यावर असा आदळू लागला.
नविन घरात आल्यावर धाकट्या शेटांची शाळा अर्ध्या वर्षात बदलावी लागली. नविन शाळा नविन शिक्षक - हा कसा काय रुळतो याची मला धाकधूक! सुपुत्र शांत! हो, शिक्षण, शाळा या गोष्टी एवढ्या विचार करण्याजोग्या नाहीतच, हे त्याचं मत.. आधीची शाळा काय, नी ही काय! मेलं... इकडून-तिकडून अभ्यासच करायला लावणार ना, मग काय फरक पडतोय! हे त्याचं तत्वज्ञान! नविन शाळा चालू झाली. पहिल्या दिवशी शाळेतून घरी आल्यावर मी विचारले, "कशी वाटली शाळा, टीचर कशी आहे?" तर म्हणे "टीचर बरी वाटत्ये...but its too early to make any opinion! Teachers are always good to you on your first day. You need to give it some time to see how she really is! पाच दिवस लागतील मला ठरवायला." पाच दिवस आम्ही आपले चिंतेत... नविन टीचरला अप्रूव्हल मिळतंय की नाही! रोज आल्यावर हेच संवाद! आणि चिरंजीवांचं तेच पालुपद - "prima facie she looks alright but you can't hurry into forming your opinions in such things". शेवटी एकदाचे ५ दिवस पार पडले...टीचरला अप्रूव्हल मिळालं आणि आमचा जीव भांड्यात पडला.
बघता बघता नविन घरात येऊन वर्ष होत आलं. गेला वर्षभर घर सेट अप करणे यात बराच वेळ आणि जीव ओतला..वेगवेगळे प्रोजेक्टस - कुठे कपाटं करून घे, कुठे खिळे ठोका-फ्रेम्स लावा हे अजूनही चालूच असतं. त्यातून आमची जाज्वल्य परंपरा बघता - कुठलाही साधासा वाटणारा प्रोजेक्ट आम्ही हाती घेतला की तो अक्राळ-विक्राळ रूप धारण करतो.
कुठे काही काम काढलं की होमे डेपो च्या १०० चकरा, गोष्टी आणा, त्या परत करा, खिळा मारायला स्टड शोधताना स्ट्ड फाईंडर ने जिथे स्ट्ड दाखवला की तिथे भुसभुशीत भिंत निघणार आणि इथे स्टड नाही, असं स्ट्ड फाईंडरने छातीठोक पणे सांगितलं तिथे ठोकायला सुरूवार करावी तर तिथे बरोबर स्ट्ड! आमच्याच नशिबी हे असले स्टड फाईंडर्स येतात का, न कळे! एकेक प्रोजेक्ट पार पाडत आता घर बर्यापैकी लागलं असं ठरवून मी परत ओपन हाऊसेस बघायला लागले.
घराचे सुरुवातीचे एकमेकांना घर स्वच्छ ठेवण्याची, वस्तू जागच्या जागी ठेवायची वचनं हवेत विरून गेलीत...घर परत "आमचं घर" झालं आहे. जुना गोंधळ नव्या घरात यथास्थित चालू आहे!