ही आहे घर-घर की कहानी. आमच्या, तुमच्या कोणाच्या ही घराघरात घडणारे हे किस्से. केवळ पात्रांची नावं, तपशिल बदलले जातात पण किस्से थोड्या-फार फरकाने कुठेही घडणारे!
--------------------------------------------------------------------------------------------------
"Yes! running a company feels good!" छोटूशेट कॉम्प्युटर रूममध्ये मोठ्या शेटांना कामाला लावून स्वतः लिव्हिंग रूममध्ये सोफ्यावर टिव्ही समोर तंगड्या पसरता पसरता उद्गारले.
"आता कसली नविन कंपनी स्थापन केलीस बाबा?", मी विचारणा केली.
"सध्या मी फक्त कंपनी काढली आहे, कंपनीने काय करायचे आहे, ह्याचाच रिसर्च करायला मी अरिनला हायर केलंय. I am the CEO. My job is to pay him. His job is to work his butt off and research what the company can create." , रोहनशेट उत्तरले.
ही दोघांनी मिळून काढलेली सतराशे साठावी तरी कंपनी असेल. दर आठवड्याला एक नविन कंपनी स्थापन होत असते. दोघांपैकी एकाच्या डोक्यात काहीतरी पाद्रट ते भन्नाट या स्पेट्रम मधली एक आयडीआ आली की तिच्यावर विचार करण्याऐवजी नविन कंपनी बनवण्याचे विचार चालू होतात. मग कंपनीच्या पॉलिसीज, नविन employees ना घेतल्यावर त्यांच्याबरोबर करायचे contracts आणि NDA चे ड्राफ्टस बनू लागतात. जोरदार interviews, पगाराची बोलणी इ. इ. चालू होतं. कंपनीचं नक्की प्रोडक्ट काय आहे, ते बनवण्याचे काय प्लॅन्स आहेत ह्या सर्व गोष्टी प्रचंड गोपनीयनेच्या कारणास्तव उघड केल्या जात नाहीत!
मध्यंतरी रोहन शेटांनी डिक्लेअर केले की त्याच्याकडे एक भन्नाट आयडिया आहे. "आई, Do you have any kaav-kaav right now?", त्याचा प्रश्न एका संध्याकाळी येऊन आदळला. असं त्याने विचारलं की कुठल्यातरी नविन उद्योगाची ही नांदी आहे, हे समजून जावं. त्यांच्या अविरत बडबडीला कंटाळून मी अधून-मधून त्यांना आत्ता माझ्या डोक्याशी काव-काव करू नका असं सांगत असते. त्यामुळे हल्ली आधी मला "कितपत काव-काव आहे" याची चाचपणी करून मग पुढले मोठमोठाले प्लॅन्स सांगण्यात येतात.
तर यावेळी रोहन शेटांची नविन योजना होती की, लोकं चालतात त्यातून निर्माण होणार्या vibrations मधून energy निर्मांण करणे ह्याकरीता तो एक कंपनी स्थ्यापन करतो आहे. कंपनीचा भर हा पर्यावरण जतन करून एनर्जी निर्माण करण्याकडे असेल हे देखील नमूद झाले. त्याकरीता नेहेमीप्रमाणेच इंटरव्ह्यू वगैरे प्रोसिजर चालू झाली. बरं ही इंटरव्ह्यू प्रोसेस का घडते याची मला काही कल्पना नाही. कारण रोहन शेटांनी स्थ्यापन केलेल्या कंपनीत अरिन हा एकच इंटर्व्ह्यू कँडिडेट तर अरिन शेटांनी स्थापन केलेल्या कंपनीत रोहन हा एकच इंटर्व्ह्यू कँडिडेट असतो. पण यावेळी मी ही या अश्या एवढ्या environmental friendly कंपनीचा आपणही भाग असावं म्हणून इंटर्व्ह्यू करीता मी पण अॅप्लिकेशन दिलं. रितसर interview करीता आमंत्रण आलं.
कंपनीचे CEO साहेब, रोहनशेट interview घ्यायला बसले. नेहेमीच्या यशस्वी कँडिडेटचा interview आधीच झाला होता. आपल्याला जबरदस्त चुरस आहे याची मला जाणीव होतीच.
पहिला प्रश्न आला: "किती पगाराची अपेक्षा आहे?"
मी विचारले,"आधी काम तर काय आहे ते सांगा" तर ते गुप्ततेच्या नावाखाली सांगता येणार नाही असं सुनावण्यात आलं.
अर्रेच्या! म्हणजे interview मध्ये candidates ना त्यांना काय काम करायचं आहे, हे देखील सांगणार नाहीत?
यावर मी आक्षेप घेतला तर जुजबी माहिती देण्यात आली. वर आमच्याकडे दुसरा candidate आहे, जास्त बोललात तर हा जॉब तुम्हाला मिळणार नाही, हे सांगण्यात आलं. परत एकदा पगाराची अपेक्षा विचारण्यात आली. आता नक्की काम काय आहे, न कळता देखील पगार किती सांगावा असा विचार करेस्तोवर कानी आलं की दुसर्या कँडिडेटला महिना $५ पगार ऑफर झालाय.
"तुमची seniority पाहून महिना $६ देऊ", अशी generous offer देण्यात आली. आनंद/ आश्चर्य/ अवाक अश्या अनेक भावनांनी मी बघत असताना पुढे हळूच विचारणा झाली,"कंपनीकडे सध्या पैसे नाहीत तरी तुम्ही कंपनीला पैसे पुरवणार का? त्यातूनच तुमच्या पगाराची सोय होईल."
आता नेहेमीच ज्या अश्या अनंत कंपन्या बनत असतात, त्यांचे venture capitalist होण्याचा मान आम्हाला मिळतच असतो. पण यावेळी आपणच कँडिडेट असल्याने आपल्याला VC बनावे लागणार नाही अशी मला आशा होती. तर तसं काही दिसेना. बरं हे देखील मान्य केलं...तर पुढे आणखी चार प्रश्न विचारून निर्णय देण्यात आला की त्या पोझिशन करीता माझी निवड झालेली नाही!!! "The other candidate is much better", पण तुम्ही पैसे घालायला तयार आहात तर त्यांच्या पगाराचे पैसे तेवढे पुरवा. असं सांगून आमची बोळवण झाली!!
पण यावेळी ही कंपनी बरीच वाढली बरं का! नाही म्हणजे कामाच्या बाबतीत नाही तर CEO साहेबांनी job description न देता आणखीन ४ कर्मचारी नियुक्त करून दाखवले. अरिन शेटांना CTO पद बहाल झालं. शाळेतल्या मित्रांपैकी एकाला CFO, एकाला Scientist अशी भारदस्त बिरुदं बहाल करण्यात आली. त्यांना पगारांची आश्वासनं देण्यात आली. (हो! आयता, कँडिडेट म्हणून रिजेक्टेड, असा VC होताच!) एकाला चक्क security in-charge बनवण्यात आलं. त्याचं नक्की काय काम विचारलं तर म्हणे कंपनी आणि तिचे प्रोजेक्टस गुप्त ठेवणे याची सर्वस्वी जबाबदारी या security-in-charge ची होती!!
कंपनीच्या हया भारदस्त बोर्डाच्या मिटींग्ज झडू लागल्या. रोज शाळेत, शाळेतून आल्यावर एखाद्या गुपित जागी भेटून ह्या मिटींग्ज घडत होत्या. मिटींग्ज मध्ये काय झालं हे VC ना देखील कळू द्यायचं नाही, असा ठराव म्हणे पहिल्याच मिटींग मध्ये झाला. आणि security-in-charge नी तशी तंबीच मला दिली.
सुमारे ८-१० मिटींग्जनंतर समस्त बोर्ड VC कडे पगार मागायला हजर झालं. आणि VC ने मला तुम्ही नक्की काय करताय हे माहित नसल्याने मी पैसे देऊ शकत नाही म्हणून हात वर केल्यावर पुढील दोन दिवसांत कंपनी बरखास्त झाल्याची बातमी हाती आली!
अर्थातच मंडळी अश्या छोट्या मोठ्या पराभवांनी डगमगून जात नाहीत. पुढल्याच आठवड्यात अरिन शेटांनी "ऑटोमेशन-नेशन" नावाची कंपनी काढली. आता ही कंपनी काय करणार तर ऑटोमेशन करून देणार हे उत्तर मिळाले. "ते आलं रे लक्षात"...यावेळी कंपनीचं नाव बरंच descriptive ठेवलेलं. "पण कसलं ऑटोमेशन?" याचं उत्तर अर्थातच मिळालं नाही.
पण एकदा मध्यरात्री तहान लागली म्हणून झोपेतून उठून मी पाणी घ्यायला मी स्वयंपाकघरात गेले तर बाजूच्या कॉम्प्युटर रूम मधून भलभलते खाट-खूटीचे आवाज येत होते. हे कोण कुठे हातोडे मारतंय आत्ताच्या प्रहराला? घरात चोर शिरलेत आणि त्यांना आपल्या घराखाली पुरलेल्या सोन्याच्या हंड्यांचा सुगावा लागलाय म्हणून त्यांनी हे जमिन खोदकाम चालू केलंय अशी काहीशी शंका माझ्या मनात डोकावली. हळूच अंदाज घ्यावा म्हणून मी कॉम्प्युटर रूममध्ये डोकावले. तर स्क्रीनवर एक कुर्हाड आपली स्वतःहूनच झाडं तोडत बसलेली. त्याचाच तो एवढा खाट-खूट आवाज होता.
सकाळी अरिनला विचारले तेव्हा समजले की हेच ती "ऑटोमेशन-नेशन" कंपनी करत आहे. गेम खेळायचे ऑटोमेशन करून देणार म्हणे. म्हणजे तुम्ही रात्रभर "ऑटो" मोड वर गेम खेळायला लावयाचा - सकाळी बघाल तर तुमच्या अकाऊंटला हजारोंनी पॉईंटस जमा झालेले... ह्याकरीता टेस्टिंग म्हणून रात्रभर "माईनक्राफ्ट" ला कामाला लावलं होतं.
"का रे, ती गेल्या आठवड्यात एवढी environment friendly कंपनी काढलेलीत, आणि आता ही झाडं कसली तोडताय रात्रभर?" असं विचारल्यावर "दुप्पट झाडं लावायचं पण ऑटोमेशन करणार आहोत", असं सडेतोड उत्तर हाती आलं.
आता हे असे गेम्स खेळायला "ऑटो" मोड कोण लावेल हा प्रश्न विचारण्यात अर्थ नव्हता. यांच्यासारख्याच यडचप मंडळींची जगात कमी नसणार आहे, असं स्वतःला सांगून मी गप्प बसले. "ऑटोमेशन-नेशन" नी घरात "ऑटोमॅटीक" पैसे आणले तर माझी हरकत नाहीच आहे तशीही!
या अश्या नवनविन कंपन्या स्थापायच्या म्हणजे अगदीच काही काम करावे लागत नाही असं नाही हं. धाकटे शेट नाही म्हणायला सतत कसले तरी प्रोटो-टाईप्स बनवण्याच्या मागे असतात. रॉन व्हिझली चे मोठे जुळे भाऊ "फ्रेड आणि जॉर्ज व्हिझली" यांच्या prank shop वरून प्रेरित होऊन रोहन शेटांनी मध्यंतरी "रोहन's prank shop" ची स्थापना केली. आणि निरनिराळे prototype pranks आमच्यावर टेस्ट होऊ लागले. त्याची खोली विविध कार्डबोर्डस, कागद, झिरमिळ्या, रंग, कात्री, दगड-धोंडे-काटक्या आणि अगणित अगम्य गोष्टींनी भरून गेली. बरं खोलीत शिरायची सोय नव्हती. कारण शिरताना कुठून वर लपवलेला बॉल डोक्यावर येऊन आदळेल, नाहीतर आपल्या लक्षात येणार नाही अश्या लावलेल्या दोर्याला आपण अडखळून पडू नाहीतर पायाखाली काहीतरी येऊन डसेल असल्या प्रँक्सची भीती होती. अरिन शेटांनी याचे अनेक अनुभव घेऊन आम्हाला शहाणे करून सोडल्याने ती विषाची परिक्षा घ्यायला आम्ही गेलोच नाही.
पण पुढे घरात आणलेला ब्रेडचा लोफ, चीज स्लाईसेस गायब होऊ लागले तेव्हा शंका येऊन मी परत अरिनलाच रोच्या खोलीत धाडले. तर क्लोसेटच्या कोपर्यात त्यांचा साठा केलेला आढळला. माझ्या डोक्याचा स्फोट होऊ लागल्याने "मोल्डी सँडविचेस" बनवून prank shop मध्ये ठेवण्याच्या त्यांचा उपक्रमाला सुरुंग लागला.
तर पुढल्या काही दिवसांत कंपनीने नविन प्रोडक्टची घोषणा केली "fake smelly sandwiches". अर्थातच हे नाव आतल्या गोटातलं होतं. जगापुढे हे सँडविच "World's best sandwiches" म्हणूनच येणार होतं. स्पंजचे ब्रेड, आतमध्ये फार्ट स्मेल असलेलं व्हूपी कुशन - चीज स्लाईस म्हणून! असा सगळा प्लॅन होता. पण पुढे कंपनीतल्या अंतर्गत कुरबुरींमुळे हे प्रोडक्ट देखील मार्केट मध्ये येता-येता राहिलं.
बाकी काही असो, अश्या असंख्य कंपन्या स्थापन होऊन, विरून गेल्या तरी विरस न होऊ देता पुढल्या multi-million डॉलर्स कंपनीची जुळवा-जुळव करण्याची दोघांची चिकाटी वाखाणण्याजोगी आहे खरी!
=================================================================================================
CEO अरिन, candidate रोहन यांचा इंटरव्ह्यू घेत असतानाचा एक व्हिडीओ - दोनेक वर्षांपूर्वी घेतलेला. यात कँडिडेट प्रामाणिकपणे त्यांना आधीच्या दोन कंपनींमधून फायर करण्यात आल्याचे इंटरव्ह्यू मध्ये कबूल करत आहेत. (न करून सांगतात कोणाला, आधीच्या दोन्ही कंपन्यांचे CEO च तर समोर बसलेत ना इंटरव्ह्यू घ्यायला!) आणि तरीही CEO साहेबही न डगमगता त्यांनाच (की स्वतःलाच!) दिलासा देतायत की "you will learn from your mistakes"!