शांततेचा २०१८ चा नोबेल पुरस्कार

लेखिका - धारा

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने Resolution 1820 स्वीकारून एक दशक या वर्षी पूर्ण होत आहे. याअंतर्गत सशस्त्र युद्धामध्ये केलेला लैंगिक अत्याचार हा आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला एक धोका आणि गुन्हा मानला जातो. २०१८चा शांततेचा नोबेल पुरस्कार हा युद्धजन्य परिस्थितीत अत्याचार झालेल्या महिलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या नादिया मुराद आणि डॉ. डेनिस मौकेज या दोघांना जाहीर झालाय. नादिया यांनी आयसीसच्या अतिरेक्यांनी केलेल्या लैंगिक अत्याचार पीडीत मुलींच्या पुनर्वसनाचं मोठं काम केलंय, तर डॉ. डेनिस मक्वेज हे काँगो या देशातले सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी बलात्कार पीडित महिलांच्या पुनर्वसनासाठी प्रचंड कार्य उभं केलं आहे.

nobel_2018_peace.jpg

(चित्र सौजन्य : https://www.express.co.uk)

आयसीसने याझदी ह्या इराकमधल्या अल्पसंख्याक समुदायातल्या तीन हजार मुलींचं अपहरण करून त्यांचा 'सेक्स स्लेव्ह' म्हणून वापर केला. त्यात नादिया मुरादही होती. आयसीसच्या ताब्यातून सुटल्यानंतर तिने अशा पीडित मुलींच्या हक्कासाठी चळवळ उभारली आणि जगाचं लक्ष वेधून घेतलं. डॉ. डेनिस यांनी काँगोतल्या यादवीत होरपळलेल्या 85 हजार महिलांवर उपचार केलेत. त्यांनी बुकाव्हू इथं हॉस्पिटल उभारून यादवी युध्दात लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांवर उपचार केला आणि त्यांना आधार दिला. संयुक्त राष्ट्रानेही त्यांच्या या कामाची दखल घेतली होती.

नादिया मुराद
याझिदी हा इराक मधला धार्मिक अल्पसंख्याक समुदाय. याझिदींच्या चालिरिती आणि अनेक परंपरा या वेगळ्या असल्यानं त्यांना मुस्लिम समुदाय आपलं मानत नाही. त्यामुळं इराकमध्ये याझिदींना कायम दुय्यम वागणूक मिळत गेली, त्यांच्यावर अत्याचार झाले. याझिदी वंशाचे आता केवळ काही हजार लोक राहिले असून आपली परंपरा आणि संस्कृती वाचवण्यासाठी ते प्राणपणाने लढत आहेत. आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करणाऱ्या या याझिदी समुदायात १९९३मध्ये नादिया मुरादचा जन्म झाला. घरात सगळ्यात छोटी. तिला सहा भाऊ. स्वभावाने चुणचुणीत आणि बंडखोर. ऑगस्ट २०१४ मध्ये उत्तर इराकमधल्या कोचो ह्या नादियाच्या गावावर आयसीसनं नियंत्रण मिळवलं. दहशतवाद्यांनी गावातली सगळे पुरुष आणि वृद्ध महिलांना वेगळं करून गोळ्या घातल्या. यात नादियाची आई आणि सहा भावांचाही जीव गेला. उरलेल्या तरूण मुलींमध्ये नादियाही होती. त्या सर्वांचा आयसीसने लैंगिक शोषणासाठी वापर केला. आयसीसचे दहशतवादी त्या तरूणींवर बलात्कार करत होते. त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले गेले. अनेकदा तर दिवसातून अनेक वेळा सामुहिक बलात्कार केला जायचा. आयसीस या मुलींचा फक्त वापरच करत नव्हते तर त्यांना लैंगिक गुलाम म्हणून विकलंही जात होतं. पैसा कमविण्याचं ते त्यांचं माध्यमही होतं. नंतर नादियाला मोसुलच्या एका जिहादी कट्टरतावाद्याला विकण्यात आलं. त्याच दरम्यान नादियानं मोठ्या हुशारीनं या नरकयातनातून आपली आणि इतर काही तरूणींची सुटका करून घेतली.

या सुटकेनंतर तिने देश सोडून जर्मनीत आश्रय घेतला. आपण भोगलेल्या नरकयातना जगासमोर मांडण्यासाठी तिने THE LAST GIRL My Story of Captivity, and My Fight Against the Islamic State हे पुस्तक लिहिलं. या पुस्तकानं जगभर खळबळ उडाली. इस्लामचं नाव घेत दहशत माजवणाऱ्या आयसीसचा क्रूर विद्रुप चेहेरा जगासमोर आला. या संघटनेचा धर्माशी काहीही संबंध नसून त्यांचे लोक हे लुटारू आणि सैतान आहेत, हे तिने जगाला दाखवून दिलं. नादियाच्या मदतीसाठी अनेक लोक पुढं आली आहेत. नादियाने पुढाकार घेतल्यानेच संयुक्त राष्ट्राने आयसीसने याझिदींवर केलेल्या अत्याचाराची चौकशी करण्यासाठी समिती नेमली. हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॉर्ज क्लुनी याची पत्नी अमल क्लुनी ही या अत्याचाराविरूद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेली असून याझिदींना न्याय मिळावा, यासाठी ती नादियाला मदत करतेय.

नादियाने दाखवलेल्या धाडसाचं सर्व जगानं कौतुक केलं. जगभर याझिदींच्या प्रश्नांची चर्चा होऊ लागली. आयसीस महिलांवर कसे अत्याचार करतं, याचे पुरावे जगासमोर आले. संयुक्त राष्ट्राने तिला आपले अनुभव मांडण्याची संधी दिली आणि तिची सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती केली. त्यामुळे तिला मिळालेला शांततेचा नोबेल पुरस्कार हा तिच्या धाडसाचा आणि संघर्षाचा सन्मान आहे. सन्मान मिळाला याचा आनंद असला तरी याझिदी आणि महिलांवर होणारे अत्याचार केव्हा थांबतील? असा सवाल तिने सर्व जगाला केलाय.

तिच्या संघर्षाची कहाणी इथे वाचता येईल : https://www.bbc.com/marathi/international-45760736

डॉ. डेनिस मक्विज

९ भावंडांपैकी तिसर्‍या असणारे डॉ. मक्वेज जन्मवेळी संसर्गामुळे मरता मरता वाचले. त्यापासून प्रेरणा घेऊन रोग्यांना बरे करण्यासाठी ते बालरोगतज्ञ बनले. पण काँगोतल्या महिलांना बाळंतपणादरम्यान होणार्‍या गुंतागुंतीच्या त्रासांना बघून त्यांनी स्रीरोग आणि प्रसूतीशास्त्राची पदवी मिळवली. जेव्हा पहिले कॉन्गो युद्ध सुरु झाले तेव्हा ते बुकाव्हूमध्ये परतले आणि १९९९साली त्यांनी पान्झी हॉस्पिटलची स्थापना केली. आजवर, या हॉस्पिटलने प्रसूतीवेळी होणार्‍या जटिल परिस्थितीत अडकलेल्या ८५००० हून जास्त रूग्णांवर उपचार केले आहेत. त्यातील ६०% गुंतागुंती या युद्धादरम्यान केलेल्या लैंगिक हिंसेचे दुष्परिणाम आहेत. या हॉस्पिटलमध्ये येणार्‍या स्त्रिया सहसा अत्यंत दुरावस्थेत (बर्‍याचदा नग्नावस्थेतही) असतात. जेव्हा त्यांनी १९९०च्या अखेरच्या युद्धांमध्ये विविध गटातील संघर्षात जननांग नुकसानी(genital damaging) चा वापर हत्यार म्हणून केला जात असल्याचे पाहिले, तेव्हा त्यांनी लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या स्त्रियांच्या मदतीसाठी आपले आयुष्य वाहून घेतले. बरीच वर्षे चाललेल्या काँगोतल्या या यादवी युद्धात प्रचंड मनुष्यहानी झाली आहे. याच दरम्यान या महिलांवर अत्याचार झाले होते.

सप्टेंबर २०१२ साली मक्वेज यांनी संयुक्त राष्ट्संघासमोर जाहीर भाषण दिले. त्यात त्यांनी 'सामूहिक बलात्कार करणार्‍यांना शिक्षा झालीच पाहिजे', याची मागणी केली. काँगो आणि इतर देशातीलही विविध सरकारे स्त्रियांवरच्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात, स्त्रियांना युद्धकैदी/गुलाम म्हणून वापरलं जाणं, थांबवायला कमी पडत आहेत, असं मत मांडलं. २५ ऑक्टोंबर २०१२ रोजी, मक्वेज यांच्यावर जीवघेणा सशस्त्र हल्ला झाला पण त्यांच्या सुरक्षारक्षकाने हस्तक्षेप केल्यामुळे ते सुरक्षित राहिले.

देश-विदेशात युद्ध आणि सशस्त्र संघर्षात डेनिस मक्विज हे सर्वांत महत्वाचे आणि एकत्रीकरणाचे प्रतिक आहेत. प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे, हे त्यांचे तत्व आहे. खरं तर अशा प्रकारच्या गुन्ह्याविरूद्ध सर्व स्त्री-पुरूष, सैनिक, नागरिक, देश-विदेशातले अधिकारी सगळ्यांनी एकत्र लढले पाहिजे. तेव्हा, एकट्याने केलेले डॉ. मक्विज यांचे अविरत, समर्पित, निस्वार्थी काम अतुलनीय आहे.

अजून माहितीसाठी :

  1. Nadia Murad यांची मुलाखत
  2. Denis Mukwege यांची मुलाखत
  3. Denis Mukwege यांचे वीकीपीडिया पेज
  4. Nadia Murad यांचे वीकीपीडिया पेज
  5. शांततेच्या नोबेल पुरस्काराची अधिकृत वेबसाईट

संदर्भ :

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle