मी अमेरिकेत रहायला आले तेव्हा पानगळीचा ऋतू होता. भगवी, पिवळी, लाल, हिरवी पानं; सोनेरी, केशरी, पिवळट, धुळकट रंगाचे पायाशी पडलेले पानांचे गालिचे आणि रस्त्या रस्त्याच्या कडेला उभे असलेले उंच झाडांचे, मनाला आणि डोळ्याला दिपवून टाकणारे जिवंत कॅनवास; पानगळ होत असली तर हवेत नव निर्मितीची चाहूल होती असं मला वाटलं होतं. नवीन देशात ह्यापेक्षा दुसरं अनोखं स्वागत अजून काय असू शकतं? असं सगळं poetic वगैरे मला पहिले सात दिवस वाटलं असेल, मग साडे चार ला होणारा अंधार खटकायला लागला, थंडी बोचायला लागली. पुण्यातून आणलेले लोकरी स्वेटरच गार पडायला लागले; अती शहाणपणा करून थर्मल शर्ट वगैरे मी आणले नव्हते, अमेरिकेत आल्या आल्या मला खरेदीला जायचे नव्हतं. बाहेर पानं,पाचोळा उडवणारं वारं कपड्यांमध्ये शिरून माझ्याभवती फेर धरायला लागलं. तेव्हा माझी बहिण Upstate Newyork, Albany मध्ये राहत होती. तिला दोन फुट बर्फात दोन मुलांना साधं libraryत घेऊन जायचे असेल तर चारशे साठ गोष्टींमध्ये त्यांना गुंडाळून घराबाहेर पडण्याची सवय होती. Sunny California बद्दलची माझी तक्रार ऐकून ती आधी मनसोक्त हसली मग तिने LLBean companyचे Thermal shirts आणि Layering shirts पाठवले.( त्यातला एक आजूनही माझ्या वापरात आहेJ) पण त्याने माझा प्रशन सुटला नाही..
अमेरिकेत आल्यावर “Wear layers” किंवा “Dress in layers” असं सर्रास ऐकायला मिळतं. पण पुण्यात असताना जीन्स आणि कुर्ता हा युनिफॉर्म असणाऱ्या आणि थोडसं fashion challenged असणाऱ्या मला, layering ही संकल्पना समजायला खूप दिवस, खूप महिने, खूप वर्ष गेली. खरंतर Layering ची theory खूपच साधी, सोपी, सरळ आहे. त्यात rocket science निश्चितच नाहीये.पण नाही जमत बुआ एकेकाला साध्या गोष्टी...एकेकाला नाही, बहुदा खूप जणांना जमत नसावं म्हणूनच तर wikipediaवर ह्या विषयावर एक अख्खं पेज आहे, youtube वर व्हिडीओ आहेत. Wikipedia वरचे नियम खाली थोडक्यात:
Usually at least three layers are identified as follows:
Inner layer provides comfort by keeping the skin dry. Also called base layer or first layer.
Mid layer provides warmth. Also called insulating layer.
Shell layer protects from wind and/or water. Also called outer layer which works as protection over the other two layers.
तीनही layers योग्य रंगसंगतीत बसणारे, हवे असतील तेव्हा Laundry hamper मध्ये नसून, स्वच्छ धुवून, घडी केलेले असणं, गळ्याला आणि कानाला थंडी वाजू नये म्हणून योग्य रंग संगतीत स्कार्फ आणि ear muff ची जोडी हाताशी असणे, अशी अनेक Aesthetic कारणं माझ्या आड येत. मग ९९ टक्के वेळा मी सगळे Aesthetic नियम धाब्यावर बसवून, वाटेल ते, सापडेल ते घालायचे. २-३ वर्ष तरी मी आसपासच्या student housing मधल्या लोकांची भरपूर करमणूक केली असणार.
अगदी निव्वळ योगायोगाने हे सगळे layers एकाचवेळी उपलब्ध झाल्यास, ते घालून मी बाहेर पडले की निकीत,“काय आज Antartica का?” एवढंच विचारायचा. मग माझा पारा चढायचा. देश बदलल्यामुळे त्याच्या कपड्यात, कपाटात कोंबलेल्या ऐवाजांमध्ये फारसा काहीच फरक पडला नव्हता. Jeans, ड्रेस shirts, tshirts, २ blazers एक formal एक casual, स्वेटर्स, mufflers आणि fleece jackets, ३ कुर्ते आणि fabindia ची दोन जाकीटं. माझ्या कपाटात एक गोंधळ माजलेला होता; माझी भारतातली identity दरवळत असणारा cotton, खण, ब्लॉकप्रिंट, तल्लम सिल्क चा पसरलेला खजिना आणि मला न उलगडलेली, स्वीकारायला थोडी अवघड जाणारी polyester, synthetics, linen आणि cotton blend चा अनोळखी स्पर्श असणारी, नवीन देशातली सगळी नवीन वस्त्र. ह्या गोंधळातून योग्य वस्त्र निवडून, एक सुसंगती साधणं अवघड जात होतं मला...ती सगळी layers उतरल्यावर आत मी कोण असणार होते हे एक कोडं होतं माझ्यासमोर.म्हणूनच कदाचित layering समजायला उमजायला मला अवघड गेलं...
थोडीशी सुसंगती साधता येते आहे असं वाटायला लागतंय तेवढ्यात एक अनपेक्षित आक्रीत घडलं. इरा पोटात असताना अचानक मला वाजणारी थंडी, कपड्यात फेर धरणारं वारं नाहीसं झालं. जाकीट न घालता, दिसेल त्या उबदार वस्त्रात स्वतःला न गुंडाळता मी बाहेर हिंडत फिरत होते. आई म्हणाली, “ इथलं पाणी मुरलं आता अमृता, सरावलीस तू.” मला वाटलं की इराची उर्जा माझ्या अंतरंगात उब पसरवत होती.
इराचा जन्म भर थंडीतला आहे. तिला घरी आणलं आणि लक्षात आलं आता एकीच्या नाही दोघींच्या layers ची डोक्याला कटकट असणार. पण इराच्या गावी असले थंडी बिंडी शब्दच नव्हते. डोक्यावरच्या टोप्या काढून टाकणे, पायतले मोजे घासून घासून काढून टाकणे, लाथा मारून पांघरूण ढकलून देणे हे तिने सहाव्या महिन्यापासून सुरु केलं. तिच्या मा, म्हणजे निकीतच्या आईने, अपार मायेने विणलेले स्वेटर ती फक्त फोटोपुरते घालते. मी Hot house flower असले तरी तिच्यात ह्याच मातीतलं पाणी मुरलंय.
मागच्या वर्षी Lake Tahoe च्या बर्फाळलेल्या पाण्यात, जोरजोरात खिदळत इरा तासभर खेळत होती; निकीत तिच्या शेजारी कुडकुडत, बत्तीशी घासत उभा होता. तेव्हा मला विचारावसं वाटत होतं, “काय आज Antartica का?” पण मी काहीच बोलले नाही. पोटातली उर्जा बर्फाच्या पाण्यात खेळत होती आणि मी असेल नसेल त्या उबदार वस्त्रांमध्ये स्वतःला गुंडाळून किनाऱ्यावर बसले होते.