एका हाॅटेलच्या वरच्या मजल्यावरील एका रूममध्ये उभी होती ती. एकटीच. वार्याची झुळूक आली की नाही असं वाटलं म्हणून खिडकीत उभी राहिली. रस्ता संथ वाहत होता. 'ऑफिसला जाणार्यांची वर्दळ', ती पुटपुटली.
कालच तिनं आणि विनूनं Utah मध्ये पाउल ठेवले होते. Flight ला यायला उशीर झाला होता. त्यात rental car घेऊन map धरून hotel मध्ये reservation असूनही check-in करायला वेळ लागला. 'पहिलाच दिवशी ऑफिसमध्ये उशीरा जातोय मी', विनू करवादला, 'त्यात तू एकदम हळूबाई'. 'अरे! माझ्यावर काय चिडतोस, तूही पाहिलं ना, सगळे पत्ते सारखेच.' तिलु रदबदली करायला गेली. इथले सर्व रस्ते चर्चचा reference धरून होते. ती rental car वाली बाई पण धन्य होती. You'll figure it out once you go to the temple म्हणे. 'अगं ए, आपलं temple नाही काही. इकडे त्यांच्या चर्चला temple म्हणतात. नाहीतर लावशील भुणभुण जाऊ या जाऊ या करत. तो मॅप धर व्यवस्थित आणि direction बघून सांग.' एवढे सांगून सुद्धा तिलु खिळल्यासारखी त्याला बघत होती. 'अशी काय बघतेस माझ्याकडे? कधी पत्ता शोधला नाहीस काय? मुंबईत राहीलीस ना तू?' 'हो. पण ते दादाकडे.' तिलूचं उत्तर ओठातच राहीलं. मॅप पूर्ण उघडायच्या प्रयत्नात तिचा हात कारच्या खिडकीला लागला जोरात. तिनं अभावितपणे हाताकडे पाहीलं. मेंदी जरा पुसटली होती. लग्न होऊन काहीच दिवस झाले होते. 'काय झालं? लागले का?', विनूनं हात धरून विचारताच तिच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं.
खटखट दार वाजलं. 'Housekeeping!' कुणी तरी ओरडलं आणि धाडकन दरवाजा उघडला गेला. तिलु सकपकून खिडकीपासून दूर झाली.
******
'Hi, housekeeping. Do you want to vacuum bed today?'
'अं? No no. Sorry yes yes' तिलु गोंधळली.
दोन्ही housekeeping करायला आलेल्या मुली भराभर आवरत होत्या. बाथरूम मधली साबण, शॅम्पू तत्सम बदलून एक बाहेर आली. 'Anything you need?' वापरलेली टाॅवेल्सचे भेंडोळं करून त्या मुलीनं विचारलंस. तिलुनं मान हलवली नाही अशी. पण ते न कळाल्याने दुसरी तिच्या समोर उभी ठाकली. हातातले धूत टाॅवेल्स व शॅम्पूच्या बाटल्या तिच्या डोळ्यासमोर नाचवत परत विचारती झाली. तिलुनं अंमळ जोरात जवळ जवळ ओरडून नाही सांगितले. ती मुलगी तिलुकडे रोखून बघत होती. तिलुने हळूच बांगड्या असलेले हात लपवायला कुर्तीमागं घेतले.
'काय हे? हातभरून बांगड्या. इकडे कुणी असं घालत नाही. काढून ठेव ते सगळं'
'अरे पण मला आवडतात म्हणून आईने खास सुल्तान बाजार मधून मागवल्या. मी तर घालणारे. माझ्या सगळ्या कुर्त्यांवर मॅचिंग आहेत!'
'अगं तुला काम कसं करायला जमणार एवढ्या ढीगभर बांगड्या घालून?'
तिला विनूबरोबर झालेला प्रेमळ संवाद आठवला. तसंच विनूचं आठ्या भरलेलं कपाळ आठवून तिला खुदकन हसायला आलं.
तश्या आठ्या आल्या की विनूच्या कपाळावर मधोमध गंध रेखल्यासारखी आठी पडायची. त्याच्या विशाल भालप्रदेशाकडे बघत रहावसं वाटायचं तिला. 'काय बघताय एवढे निरखून मॅडम?', असं म्हणून विनूनं दोन पावलं पुढे टाकताच तिने काही नाही म्हणून किचनकडे धूम ठोकली होती.
'Enjoy your day' म्हणत त्या मुलीनं दरवाजा जवळ ओढला. तिलुने दरवाज्याची कडी लावली. घाईघाईने साखळी लावली. इतका वेळ रोखून धरलेला सुस्कारा सोडला.