सूट - भाग 2.5

'काय झालं तिलु? केवढ्या मोठ्याने ओरडलीस. स्वप्न पडलं का काही? थांब, थोडं पाणी पिऊन घे'.
विनूनं तिला उठवून बसवलं. पाणी पिऊन तिलुला जरा हुशारी वाटली. ती सावरून बसली.
'काही व्यवस्थित आठवत नाही. स्वप्नच असावं'
'कसलं स्वप्न? अतिविचार करतेस ना. असं होणार ना मग. काय पाहीलं सांग'. विनूनं लॅपटॉप बंद केला आणि बॅगेत ठेवून दिला.
'तू होतास स्वप्नात'
'काय? तू मला पाहून किंचाळलीस???'
'नै कै', तिलु हसत म्हणाली.
'तुझ्या चेहर्यावर खूप तेज होतं. मी तो प्रकाश कुठून येतोय हे जाणून घेण्यासाठी भरभर पुढे येत होते'
'आणि तू कशाला तरी ठेचकाळुन धडपडलीस?'
'अय्या! तुला कसं माहित? '
'मी होतो ना तुझ्या स्वप्नात'. विनू खो खो हसायला लागला.
'कर थट्टा आणखी. खरंच सांग ना कसं कळलं तुला?'
'ए वेडी आहेस का? तुक्का मारला मी'.
'हॅ'. तिनं मान झटकली. 'काय झाली वाटतं सुटका पहिल्या बायको पासून'. ती लॅपटॉप बॅग वरून हात ओवाळले.
'नाही ग. काम आहे अजून. उद्या करतो'
'का? उद्या का? कर आताच'
'ए चिडू', विनूनं तिचं नाक चिमटीत पकडून हलवलं. 'काम संपत आलेलं पण मी LDS बद्दल वाचत बसलो होतो'. तिचा चेहरा प्रश्नार्थक झाला. 'Latter Day saints church किंवा मर्मन्स चर्च, जिथे मी काम करतो. खूप जुनं आणि प्रख्यात चर्च आहे हे. याचं बांधकाम किती तरी वर्षे चाललं. तरी main stream पासून या चर्च ला वेगळी मान्यता आहे'.
तिलुच्या चेहर्यावर कौतुक मिश्रित आश्चर्य प्रकटलं.
'कॅथॉलिक असो की प्रोटेस्टंट सर्व या चर्चला फार मानतात'.
'एक मिनिट. काय फरक आहे त्यांच्यात? '
काही मदर मेरीला मानतात तर काही येशू ख्रिस्त देव मानतात. पण या चर्चला सर्वच मानतात.'
ती श्रद्धेने ऐकायला लागली.
'त्याचं हे temple खूप सुंदर आहे. ते फक्त स्वच्छ ठेवत नाही तर इतर नियमही पाळतात. Temple च्या सान्निध्यात कुणी जोरात बोलत किंवा हसत नाही. सर्वांना कोट आणि टाय compulsory आहे. पत्ता पण तू पाहिलंस ना, temple पासून अमुक direction ला अमुक नंबरच्या street वर, असाच असतो. Temple ला मध्यवर्ती धरून रस्त्यांना नंबर दिले आहेत. याउलट आपण आपल्या धर्मस्थळांना कुठं जपतो?'
विनूनं आपली व्यथा बोलून दाखवली.
'तू खूप भारावून गेला आहेस'
'हो तर! नियम पाळण्यात माझ्याकडून ही कसूर व्हायला नको असं वाटतं. म्हणूनही मला उशीर करायला आवडत नाही.'
'असं आहे होय. किती हुशार आहेस रे तू. किती माहिती आहे तुला!'
'नाही. मी कसला हुशार. मला तर काहीच माहिती नाही.'
'कशाची माहिती नाही? '
'तुझी माहिती गं' विनू तिला खेटून बसला.
'मी काय ऐतिहासिक स्थळ आहे माझी माहिती कशाला'
'ऐतिहासिक नाही पण 'स्थळ' तर आहेस, तेही प्रेक्षणीय'. बोलता बोलता त्याने तिची हनुवटी उचलली. तिलुने डोळे मिटून घेतले होते.

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle