हे गार्डन कसे अस्तित्वात आले यामागे एक प्रेरणादायी कथा आहे. डॅन नावाच्या एका माणसाने १९७७ मध्ये 'हिलो' येथील समुद्राजवळच्या दरीत काही एकर जमीन विकत घेतली. अगदी घनदाट असे जंगलच म्हणा ना. येथे काहीतरी हॉटेल व्यवसाय करावा असे त्याच्या मनी होते. पण त्याच वेळी तेथील दुर्मीळ आणि सुंदर वनस्पती, झाडे, धबधबे पाहुन त्याला असेही वाटले की हे सर्व नीट जतन व्हावयास हवे. विचाराअंती त्याने निर्णय घेतला की येथे एक बोटॅनिकल गार्डन करावे. पण कसे? त्याच्याकडे ना काही माळीकामाचे ट्रेनिंग होते ना वनस्पतींचा अभ्यास ना काही. मुळचे सॅन फ्रॅन्सिस्को येथील घर आणि ट्रक्सचा व्यवसाय विकुन तो कुटुंबासमवेत हवाईतच स्थायिक झाला आणि पुढील ८ वर्षे दररोज तो घरुन जेवण बरोबर घेऊन निघायचा आणि वॅलीत येऊन काम करायचा. रात्री चिखलाने माखलेले अंग आणि कपडे घेऊन घरी परतायचा. आता त्याला त्याच्या ध्येयाने झपाटले होते. नंतर त्याने ३/४ मदतनीस घेतले. एकत्र मिळुन त्या दरीत पायवाटा बनवल्या. झाडांचे कमीत कमी नुकसान होईल अशा पदधतीने कठडे, पायरया बनवल्या. काही नवीन झाडेझुडपेही लावली. अथक परिश्रमांनंतर १९८४ मध्ये हे गार्डन लोकांसाठी खुले केले. सध्या ही एक नॉनप्रॉफिट संस्था आहे. गार्डनमध्ये फिरण्यासाठी फी आकारली जाते. व्हीलचेअर अॅक्सेसही आहे आणि चालायची इच्छा नसणार्यांना कार्टमध्ये बसुनही फिरता येते. त्याचे वेगळे शुल्क आकारले जाते.
या गार्डनला पोचेपर्यंतचा रस्ता खुप सुंदर आहे. रस्त्याच्या एका बाजुला उंच टेकड्या, त्यावरुन वाहत येणारे उंच धबधबे आणि दुसरया बाजुला उसळता समुद्र. हिरव्याकंच झाडांची आजुबाजुला दाटी. निसर्गाने येथे भरभरुन दान दिले आहे. वाटेत काही ऊसाचे मळेदेखील होते. गाडीतुन नुसते बाहेर पहात रहावे, फोटोही काढण्यासाठीही नजर हटवु नये असे वाटत होते. एका ठिकाणी गाडी थांबवुन ऊस, शहाळे, पपई, केळे, अननस खाल्ले. त्या विक्रेत्याने (जो नेटिव हवाईयन होता) मध्येच त्याच्या ५/६ वर्षांच्या मुलीला चापट मारली. कारण काय तर ती सारखा त्याचा फोन मागत होती. आम्ही चाटच पडलो. येथे असे कुणी आपल्या मुलांना रस्त्यात मारताना दिसत नाहीत. घरी भले धुऊन काढत असतील पण रस्त्यात मी तरी कुणाला मुलांना फटकवताना पाहिलेले नाही. काय प्रतिक्रिया द्यावी कळेना. न राहवुन मी त्या विक्रेत्याला म्हंटले, असु दे हो, माझा मुलगाही फोनसाठी हट्ट करतो. त्यावर त्याने मला बरेच ऐकवले. " सगळा अमेरिकन कल्चरचा प्रभाव आहे या मुलांवर. आम्हाला ते बिलकुल पसंत नाही. मुलं हट्टी होत चाललेयत. हे असे अधुन मधुन फटके द्यावेच लागतात त्यांना" वगैरे वगैरे. नवरा मध्ये पडला, अहो, भारतात पण मुले अशीच वागतात. कुठेही गेले तरी मुले अशीच. तरी त्या विक्रेत्याला पटेना. तेवढ्यात त्या मुलीची आई आली आणि त्या रडणारया मुलीला घेऊन गेली. आम्ही जरा त्याला समजावले, मुले आपल्या हातात सारखा फोन बघतात मग ते मागणारच वगैरे. पण तो आता चक्क आमच्याकडे दुर्लक्ष करु लागला. मग आम्ही निघालो. त्या मुलीचा विचार बराच वेळ मनात येत राहिला.
गार्डनमध्ये पोचलो आणि तिकीटे घेतली. प्रवेशद्वारापाशी डॅनची दगडात कोरलेली प्रतिकृती आहे. डॅन वयाच्या ८५ व्या वर्षी २००७ साली निवर्तले. त्यांचे स्मरण करुन त्यांना मनात थँक्यु म्हणत आत शिरलो. येथे सर्व प्रकारची फुलझाडे, घनदाट वृक्ष होतेच पण मला सर्वात जास्त आवडले ते तेथील ऑर्किड्स कलेक्शन. इतक्या वेगवेगळ्या रंगाची, आकारांची ऑर्किड्स मी नैसर्गिक वातावरणात प्रथमच पाहिली. दुकानात असतात पण एवढी फ्रेश नसतात. १०० एक फोटो नुसते गार्डनचेच आहेत. काही येथे देते.
ही पहा पायवाट. अगदी झाडा-पारंब्यांना हात लावत चालता येते.
गार्डनमधील एक धबधबा:
'Palm Jungle' येथे बसले की अंगावर झाडांवरुन दव पडते. खुप खुप फ्रेश वाटते.
ऑर्किड्सः
सगळेच सौंदर्य काही माझ्या कॅमेरात मावले नाही पण फार सुंदर 'लिली लेक', 'वडाचे बन' आणि 'केळीची बाग' ही पाहिली. इथेतिथे पडलेली आणि पायदळी येणारी फुले उचलुन जमतील तेवढी केसांत माळली. तेव्हापासुन मुलगा जरा अंतर ठेवुन पुढेपुढे चालु लागला. नवर्याचे सगळे लक्ष एका दुसर्या कपलकडे लागलेले होते. का तर म्हणे ते संशयास्पद वाटतायत. नंतर ते मला गुपचुप पाने तोडताना दिसले. काहीतरी प्रोजेक्ट असेल कॉलेजात असे सांगुन मी नवर्याला नाकासमोर चालण्यास बजावले. काय तरी कंपनी माझी! मला त्या माबोवरच्या जागुची प्रचंड आठवण आली. मनात म्हंटले ,अशा निसर्गसौंदर्याने बहरलेल्या ठिकाणी ती असती माझ्याबरोबर तर काय बहार आली असती हे असे ठोकळे घेऊन गार्डनमध्ये फिरण्यापेक्षा. प्रत्येक झाडा, फुलांखाली नावे लिहीली होती पण ही मंडळी वाचतील तर शपथ. चला चला, एकदाचे काय ते पहा आणि जेवायचे बघा असा सगळा दृष्टिकोन.
तेथेच एका ठिकाणी 'KU' ह्या हवाईअन देवाची उंच प्रतिकृती होती. जवळपास ३० फुट असावी. हवाईत चार प्रमुख देवदेवता आहेत: 'LONO' , 'KANALOA', 'KANE' and 'KU'. हे देव पृथ्वी आणि स्वर्गाचे रक्षक आहेत असे मानतात. हा पहा ''KU':
गार्डन जेथे संपते तेथे ते समुद्राला जाऊन मिळते.
एके ठिकाणी समुद्र हा असा अंगावर उसळत होता. अंगावर शहारे येत होते:
अगदी रोमँटिक स्पॉट होता. आमचं लहान पात्र आम्ही पेकिंग केले तरी लाजतं त्यामुळे आम्ही फक्त 'दोन ओंडक्यांची सागरात होते भेट' अशी गाणी गायली. त्याला मराठी गाणी कळत नाहीत अजुन. बराच वेळ समुद्र पहात बसुन राहिलो. तेथे दिवसभर पहुडावे किंवा निवांत पुस्तक वाचत बसुन रहावे अशा अनेक जागा होत्या. आम्हाला मात्र 'Kaumana Caves' ही पहायचे असल्याने आम्ही तेथुन निघालो.
'कॉमाना केव्ज' ही एक प्रचंड मोठी 'लावा ट्युब' आहे जी १८८१ च्या ज्वालामुखीच्या वेळी निर्माण झाली. आम्ही पुर्ण गुहा फिरलो नाही कारण मुलगा दमला होता आणि काळोखात जायला त्याला आवडत नाही. तरी मी आत शिरल्यावर पाठीपाठी आलाच.
तेथे आजुबाजुला पडलेले काही दगड वेचले. ज्वालामुखीमु़ळे छान जाळीदार नक्षी असलेले, तांबड्या रंगाचे फोटो असलेले, ज्वालामुखीचे घाव सोसलेल असे ते दगड आता आमच्या शोकेसमध्ये विराजमान आहेत. भरपुर फोटो काढले आणि तेथुन निघालो. ज्वालामुखीमुळे हा भुभाग काही वेगळाच घडलाय. आयलंडच्या काही भागांत विपुल फळे, फुले आणि काही भाग नुसताच बंजर. पण त्या बंजर, खडकाळ जमिनीलाही सौंदर्य आहे. आणि एका दिवसातच अतिशय गरम हवा ते पाऊस, बोचरी थंडी, घाम, हुडहुडी भरणारी थंडी या सगळ्याचा अनुभव एकाच बेटावर घेता येतो.
त्या संध्याकाळी हॉटेलात लवकर पोचलो म्हणुन फ्रेश होऊन शॉपिंगसाठी बाहेर पडलो. तेथे शॉपिंगसाठी अशी शटल होती.
हॉटेलच्या जवळ दोन 'स्ट्रीप मॉल्स होते'. तेथे अनेक दुकाने, रेस्टॉ होती. एक छोटे मुवी थिएअटरही होते. आम्ही काही छोटी मोठी खरेदी केली. शॉपिंग टीप म्हणजे अशी देईन की, हवाईत 'ABC Stores' या दुकानाच्या शाखा सगळीकडे आहेत. तेथे अगदी ५ डॉलरपासुन गिफ्ट्स मिळतात. मुलांच्या शाळेत, शेजारीपाजारी, ऑफिसात सुवेनिअर म्हणुन वाटायला उत्तम. मी तेथेच एक 'कोकोनट ब्रा' आणि' गवताचा स्कर्ट घेतला. एखाद दिवस बीचवर घालुन फिरेन म्हणुन. खुप वर्षांची फँटसी होती माझी कोकोनट ब्रा घालण्याची. त्याचे किस्से नंतर. खरेदीनंतर जपानी रेस्टॉमध्ये जेवायला गेलो. चविष्ट फिश डिशेस होत्या. 'साकी' प्यायलो. जरा जास्तच अल्कोहोल होते त्यात. मला थोडं टुन्ना टुन्ना झाल्यासारखे वाटले म्हणुन बाहेर स्टारबक्समध्ये कॉफीही प्यायलो. खादाडी करुन समुद्रावर फिरायला गेलो.
मानसीने पहिल्या भागावर प्रतिक्रिया देताना विचारले होते जपान्यांबद्दल. हवाईत बरेच जपानी स्थायिक झाले आहेत. नाजुक चणीचे आणि ओठांच्या इवलुश्या हालचाली करुन बोलणारे जपानी. बाकी स्थायिक अमेरिकन्स आणि काही नेटिव हवाईअन. मुळचे हवाईअन लोकं हे चांगले मजबुत अंगापिंडाचे असतात. अगदी शाळेत जाणारी लहान मुलेही गुटगुटीत, बाळसेदार. हा फोटो पहा. हा आमचा 'ग्लास बॉटम टुअर' चा गाईड. हा नेटिव. फार गमत्या होता हा:
ग्लास बॉटम टुअर म्हणजे बोटीचा तळ काचेचा असतो, अशा बोटीतुन खोल समुद्रात जायचे आणि बोटीच्या काचेच्या तळातुन पाण्याखालचे दृश्य पहायचे. ज्यांना स्नोर्कलिंग, डायविंग शक्य नाही त्यांच्यासाठी मस्त पर्याय आहे हा. हे काही पाण्याखालचे फोटो. आम्ही अनेक प्रकारचे मासे, वनस्पती, खडक पाहिले. माझ्या सारख्या पोहता न येणारयांना हा समुद्रस्रुष्टी पाहण्याचा सुरक्षित मार्ग आहे.
येथेच थांबते आज. काही फोटो टाकते कमेंट्समध्ये.
हवाई - भाग ५ - 'ब्लॅक सँड बीच' आणि 'Waipi'o Valley': https://www.maitrin.com/node/3331