मी लहान होते, म्हणजे अगदी बालवाडीत तेव्हा हवाहवाई हे गाणे सगळीकडे सारखे वाजायचे. श्रीदेवीचा नाच आणि गाण्याचे वेडेवाकडे शब्द, धमाल यायची पहायला. तेव्हाच कुणीतरी सांगितलेले की हवाई नावाची खरंच एक जागा आहे. ते मनात झालेले हवाईचे बि़जारोपण. नंतर शाळेत कधीतरी दुसर्या महायुद्दातील पर्ल हार्बर अॅटॅकविषयी वाचताना हवाई परत कानावर आले.काय असावे हे हवाई असा विचार तेव्हाही आला मनात. नंतर मग ऑफिसला जायला लागले तेव्हा एका रिट्रीटच्या निमित्ताने गोव्याला गेले होते तेव्हा ऑफिस सेलेब्रेशनची पुर्ण थीम हवाईयन होती. गोव्याचे मॅरिअट तसेही सुंदर आहे. म्हणजे तेव्हातरी होते. आणि आमच्या थीमच्या नुसार त्यांनी आमचे वेलकम, रुम सजावट, कॉन्फरन्स रुम अॅरेंजमेंट, फुड, एंटरटेनमेंट सगळी हवाईअन केली होती. भरपुर चाफ्याची फुले, ऑर्किड्स, हवाईअन कपडे घातलेले अटेंडंट्स, माई टाई ड्रिंक्स, पायनापल डीझर्ट्स, पपाया, असा सगळा एक्झॉटिक मामला होता. तेव्हा मनात आले खरंच हवाईला हे सगळे असे असेल? या प्रश्नाचे उत्तर मिळायला १२ वर्षे जावी लागली.
लग्न झाले तेव्हा अमेरिकेत आले आणि कंटाळुन वर्षाच्या आतच भारतात निघुनही गेले.तेव्हा फक्त ३/४ प्रसिद्द शहरे फिरलो होतो. हवाई तर दुरच. मग अमेरिकेत परत आले ती डायरेक्ट मुलाच्या जन्मानंतर. दोन राज्ये फिरुन एकाठिकाणी स्थिरावलो. ईथे थंडीचा नुसता वैताग यायचा मला. अजुनही येतो. नोव्हेंबर ते मार्च तर अगदी भारतात पळुन जावेसे वाटते आणि मुलगा शाळेत जात नव्हता तोपर्यंत मी दरवर्षी भारतात जायचेही. एक दोन थंडीत कॅलिफोर्निया, फ्लोरिडा अशी वॉर्म ठीकाणे फिरुन आलोही. तेव्हाच काही कपल्स हवाईला जाउन आल्याचे कळले. त्यांच्या माहितीनुसार हनिमुनर्ससाठी बेस्ट आहे,फॅमिलीजसाठी छान आहे, रिझनेबल आहे, महागडे आहे, वर्थ आहे, वर्थ नाही असे परस्परविरोधी डिटेल्स कळत होते. यांतले सगळे बरोबर्/चुक असे म्हणता येणार नाही. प्रत्येकाचा अनुभव, द्रुष्टी, अपेक्षा वेगवेगळ्या असतात. पण ते अतिशय सुंदर आहे याबाबत सगळ्यांचेच एकमत होते.