शिर्षक गंमत म्हणुन तसे लिहिलेय हा, नाहीतर येतील 'तुपारे' फॅन्स धावत. आम्ही ९० मिनिटे का होईना सरंजामेंसारखे फिरलो
आतापर्यंत बरेचसे बिग आयलंड फिरुन झाले होते. वॉल्कॅनोज पार्क, फॉल्स, बोटॅनिकल गार्डन, वापिओ वॅली, ५/६ ठिकाणचे बीचेस, ग्लास बॉटम टुअर, पॅरासेलिंग. पण मन भरले नव्हते. माझे सारखे मागणे चालु होते नवर्याकडे की मला अजुन काहीतरी अद्भुत पहायचेय. अशा ठिकाणी जायचंय जिथे दुर दुर पर्यंत एकही माणुस, गाडी, वस्ती काही नको. फक्त आणि फक्त निसर्ग. नवरा आता हिला काय दाखवावे अशा विचारात गुगलला शरण गेला पण काही सापडेना त्याला. मग लॉबीत जाऊन जरा चौकशी केली असता कॉन्सिर्जकडुन 'Waterfalls of Kohala' चे माहितीपुस्तक मिळाले. ९० मिनिटांची एक हेलिकॉप्टर टुर होती. त्यात लिहिले होते की आयलंडच्या 'कोहाला' साइडच्या कोस्टवरुन हेलिकॉप्टर जाईल आणि कधीही पाहिले नसेल असे विलक्षण धबधब्यांचे दर्शन होईल. निळाशार समुद्र आणि उजवीकडे काळोखी दरया, सुमारे २७०० फुट उंचीवरुन कोसळणारे धबधबे आणि २५०,००० एकरांचा हिरवाकंच पट्टा असे सगळे दिसेल. एका धबधब्याच्या पायथ्याशी लँडिंग होईल आणि तेथे अर्धा तास खेळता येईल. माहितीपुस्तकात काही फोटोही होते. तिघांचा मिळुन १३०० डॉलर खर्च होणार होता. खरंच वर्थ असेल का असा जरा विचार केला. पण नवर्याने हट्ट पुरवणे मनावरच घेतलेले त्यामुळे लगोलग दुपारी १२ च्या टुरचे बुकिंग केले.
आता आमची तयारी सुरु झाली. पुर्वी एकदा आम्ही ३० मिनिटांची राइड केली होती स्मोकी माउंटनला. माझ्या पोटात गोळा येतो हेलिकॉप्टरच्या टर्ब्युलंसमुळे. त्यामुळे मी फक्त फलाहार केला. धबधब्यात उतरण्यासाठी काही कपडे पॅक केले आणि निघालो. आमच्या हॉटेलपासुन जवळच त्यांचे हेलिपोर्ट होते. तेथे गेल्यावर सेफ्टी विडिओ पाहिला, पायलटला भेटलो आणि काही बेसिक गोष्टींची माहिती करुन घेतली. हेलिकॉप्टरच्या आत संभाषण करण्यासाठी कुठले हेडफोन्स, मायक्रोफोन्स वापरायचे, पायलटला अचानक काही झाले तर कुठले बटण दाबायचे वगैरे.
हेलिकॉप्टर उडाले आणि आलाच माझ्या पोटात गोळा. मी पायलटच्या बाजुला बसलेले आणि नवरा व मुलगा पाठी. माझे आणि पायलटचे एकत्रित वजन आणि मुलाचे व नवर्याचे एकत्रित वजन असा हिशोब करुन पायलटनेच हा निर्णय घेतलेला त्यामुळे आम्ही तो मान्य केलेला. माझे वेडेवाकडे हावभाव पाहुन पायलट म्हणाला, हे काहीच नाही. आपण जसेजसे वॅलीच्या जवळ जाऊ ना तसा तसा टर्ब्युलंस अजुनच वाढणार. नवरा पाठुन, "अरे तिला असे काही सांगु नकोस रे, ती उलटी करेल. अगं तु बाहेर बघत बस पाहु". पायलटने मला त्याच्या खिशातुन मिंट्स काढुन दिले आणि म्हणाला हे घे, ह्याने सिकनेस जाईल. मी त्याला थँक्यु म्हणाले. पाठी नवरा अस्वस्थ झाला आणि त्याच्या माईकमधुन खेकसला, "त्याला त्याच्या कामावर नीट कॉन्संट्रेट करु दे, बाहेर बघ किती मस्त दिसतंय". हा शुद्द जळकेपणा! पण खरेच बाहेरचा नजारा खुप सुंदर होता. मी कॅमेरा ऑन केला आणि बाहेर पाहु लागले. हवाईला इंद्रधनुंचे राज्य असेही म्हणतात. कारण येथे आकाशात रोजच इंद्रधनष्य दिसते. हे मी टिपलेले इंद्रधनुष्य. काचेतुन घेतल्यामुळे फोटो फार स्पष्ट नाहीत.
खालचा लँडस्केप तर अगदी खोटा वाटावा इतका रम्य होता. निळेहिरवे समुद्राचे पाणी, गडद हिरवी वॅली आणि त्यातुन खळाळत येणारे शुभ्र पाणी. पायलटने आता मंद संगीत लावले होते. त्या संगीताचे मला रोजा सिनेमाच्या संगीताशी साम्य वाटले. पोटातला गोळा गायब झालेला आणि मस्त तरंगल्यासारखे वाटत होते. मुलालाही ती प्लेलिस्ट आवडली. मस्त मुड आणि माहोलला आजेशी होती ती.
नंतर हेलिकॉप्टर जरासे खाली येऊन खोल दरीत शिरले. आणि आता तिन्ही बाजुंनी आम्ही धबधब्यांनी घेरावलो गेलो. न भुतो न भविष्यति असे दृष्य होते. वरचे आकाश दिसत नव्हते, खाली जमीन दिसत नव्हती. नुसते धुके, हिरवा काळोख आणि पाण्याचा आवाज. फोटो काढताच आले नाहीत कारण ते सगळं फोटोत पकडताच येणार नाही इतके अद्भुत होते. पाचेक मिनिटे तेथेच रेंगाळला पायलट. सगळे नि:शब्द! मग जरा बाहेर येऊन वेगळ्या अँगल्सनी घिरट्या घालुन, हेलिकॉप्टर उजवीकडे, डावीकडे करुन जंगलात फिरलो. असे दृष्य मी कुठल्या सिनेमातही पाहिलेले नाही. नाही म्हणायला बाहुबलीत काही विएफएक्स शॉट्स आहेत त्याच्याशी तुलना होऊ शकेल फारतर.
दरीतुन बाहेर आलो आणि पायलट म्हणाला आता आपण लँड करणार. आम्ही चक्रावलो. येथे हेलिपोर्टही दिसत नाहीए, अगदीच डोंगराळ भाग होता. येथे कुठे उतरणार? पण पायलट निवांत होता. त्याने समुद्राकडे हेलिकॉप्टर वळवले आणी एक यु टर्न घेउन दरीच्या पायथ्याशी गवतातच डिसेंड करायला सुरुवात केली. हेलिपोर्ट वगैरे काही नाही, एक जेमतेम अर्ध्या एकराचा सपाट जमिनीचा तुकडा होता तो. नवरा पाठुन, घे अद्भुत हवे होते ना घे, आपण जंगलात उतरतोय.
अगदी धब्धब्याच्या जवळुन नेत नेत धबधब्याच्या पायथ्याशीच उतरवले. मला विश्वासच बसेना. एवढा महाप्रचंड धबधबा, त्याचा कोसळण्याचा आवाज आणि आम्ही त्याच्या इतक्या जवळ! माहितीपुस्तकात वाचले होते की धब्धब्याजवळ लँडिंग आहे पण तेव्हा मनात म्हंटलेले असेल एखादा बारका धबधबा, पण नाही, हा म्हणजे अगदी उंच, महाकाय होता. तोंडाचा आ वासुन खाली उतरले आणि मान जमेल तेवढी वर करुन धबधब्याचा उगम पहात राहिले. कॅमेरात मावलाच नाही त्याचा सगळा आवाका.
आजुबाजुला जंगल होते. पायवाट वगैरे काही नाही. मुळात इथे ही हेलिकॉप्टर कंपनी सोडली तर कुणी येतच नाही त्यामुळे अगदी मोकळेपणा होता. बाहुबली सिनेमातल्यासारखेच जंगल, पाणी आणि एकुण वातावरण. अंगावर धबधब्याचे तुषार उडत होते. त्याचा आवाज इतका होता की जरा ओरडुन बोलावे लागत होते. कपडे काढुन ( म्हणजे वरचे लेयर्स काढुन, आत बीचवेअर होते) धबधब्याच्या आणखी जवळ गेलो आणि मला भितीच वाटु लागली. त्या बाहुबलीतलया शिवगामीसारखी मी वाहुन गेले तर! मुलालाही जरा लांबच ठेवले. धबधब्याच्या डायरेक्ट खाली नाही पण जवळपास पाण्यात मस्ती केली. चिंब भिजुन हुडहुडायला लागलो. तोवर पायलटने टेबल मांडून ठेवलेले. फेसाळती शॅम्पेन उघडली आणि चिज, चेरीज, पायनापल्स, क्रॅकर्स चा आस्वाद घेतला. मुलाला त्याने पेरुचे ज्युस दिले. जंगलात, धबधबा पहात कधी शँम्पेन पित बसु असे स्वप्नातही वाटले नव्हते, ती नशाच वेगळी! याचे वेगळे पैसे भरावे लागत नाहीत, हे सगळे एकच पॅकेज आहे. बाटली संपवुन आजुबाजुच्या जंगलात थोडे हिंडलो. खाली चिखल होता पण नवल म्हणजे तो पायाला चिकटत नव्हता. सगळी झाडे धबधब्यामुळे अगदी ओलीचिंब होती. धब्ध्ब्याचे पाणी वहात येऊन समुद्राला मिळते ती जागा पाहिली. तेथेही जरावेळ पाण्यात खेळलो. निघायची वेळ झाली तेव्हा वाटले येथे पुर्ण दिवस घालवायला मिळायला हवा. पण ठीक आहे, हेही नसे थोडके. माझे अद्भुत काहीतरी पाहण्याचे स्वप्न पुर्ण झाले. नवराही अगदी खुष, फ्रेश दिसत होता. अर्थात त्यात शॅम्पेनचा हातभार असावाच.
परतीसाठी टेकऑफ केले आणि आयलंडला बाहेरुन पहात पहात हॉटेलच्या दिशेला निघालो. मुलाने आता पायलटशी चांगली गट्टी केलेली त्यामुळे त्यांच्या अखंड गप्पा चालु होत्या. मी मात्र गप्प राहुन सगळं परत जगु पहात होते. 'भर लू अपनी आंखों में इन आंखो को मैं खोलु ना, घोंलू अपनी बातों मैं फिर इस दुनिया से बोलु ना' असे झाले होते माझे. पायलटला मात्र वेगळीच शंका आल्याने त्याने परत खिशातुन मला मिंट्स देऊ केले. बरा होता तसा. त्याचे घड्याळ फार आवडले मला. मी त्याला तशी कॉम्प्लिमेंटही दिली. नवरा जाणवेल इतका गप्प होता. आता फोटो दिसलाच आहे पायलटचा तर देतेच येथे:
अगदी तृप्त मनाने आम्ही परतलो. मुलाने त्यांच्या ऑफिसमधुन पेन घेऊन लगेच पायलटसाठी एक थँक्यु कार्ड बनवले आणि ग्रॅचुइटीबरोबर देऊ केले. आमच्या सगळ्या प्रवासाचे हेलिकॉप्टरमध्ये लावलेल्या कॅमेराने शुट झाले होते. हे त्यांनी आम्हाला आधी सांगितले नव्हते नाहीतर आम्ही जरा बरे वागलो असतो पण मग ते नैसर्गिक नसते, त्यामुळे असो. ती सिडी विकत घेतली आणि हॉटेलवर परत आलो. तेव्हा जेमतेम पाच वाजत होते. सुर्यास्ताला अजुन दीडेक तास होता. मग तेवढा वेळ हॉटेलच्या समुद्रावर जाऊन पहुडलो. मुलाने इटालियन खायची इच्छा व्यक्त केली त्यामुळे जरा लांब जेवायला गेलो.
रात्री मी माझी हवाईयन वस्त्राभुषणे, अलंकार बॅगेत नीट भरुन ठेवली. उद्या 'मॅजिक सँड बीच' वर जायचे होते आणि तेथेच मी कोकोनट ब्रा आणि गवताचा स्कर्ट नेसुन फिरणार होते. मुलगा मात्र ते नजरेस पडल्यावर लगेच विचारता झालेला, हे काय, तु एवढेच घालणार? इतर आयाबाया टु पिसमध्ये दिसलेल्या चालतात पण स्वतःची नाही मग त्याला समजावले की अरे बाबा, हवाईला येऊन हे करायची स्वप्ने फार वर्षे पाहतेय त्यावर असा बोळा फिरवु नकोस. तु 'मोआना' पाहिलायस ना? मग त्यात नाही का सगळे सदोदित असेच कपडे घालतात. मी थोडावेळाच घालणार आहे, कायमचे नाही. काय हा सासुरवास! झोपण्याआधी थोडा वेळ बोक्याला कॅमेर्यावर पाहिले. त्याने त्याचा ट्री टॉवर पाडून ठेवलेला आणि तो पडलाय म्हणुन गळा काढुन रडत बसलेला. सिटरला मेसेज केला की सकाळी लवकर जा आणि तो टॉवर उचल बाई. बोक्याची आम्ही कॅमेर्यातुन समजुत घालायचा प्रयत्न केला. तो घाबरुन लिविंग रुम मधुन त्याच्या लिटररुममध्ये चालता झाला. तेथे कॅमेरा नाही. तेवढा पोच आहे आम्हाला :ड आजचा संपुर्ण दिवस जादुई होता. ते सगळं आठवत झोपी गेलो.
आज एवढेच. इतक्या वेळा धबधबा हा शब्द लिहुन दमले मी.