वरकरणी पाहीलं तर हा एक अतिमानवीय थरारपट आहे. सिनेमातल्या नायकाकडे म्हणजेच कियानु रिव्हस् ने पात्र साकारले आहे त्या जॉन कॉन्स्टंटीन कडे काही दैवी शक्ती आहेत, ज्याद्वारे त्याला सामान्य मानवाच्या डोळ्यांना दिसणार नाही अशा गोष्टी दिसतात. ही गोष्ट वेगळी की त्याला तो वरदान न समजता शाप समजतो! सिनेमाची सुरवात पाहून इतर एक्सरसिस्ट प्रमाणे हाही एक रुटीन एक्सरसिस्ट आहे अशी आपली समजूत होते. पण हा तसा नाही. फक्त आपल्याला दैवी शक्ती आहे म्हणून तो पिशाच्चाने झपाटलेल्या लोकांची सुटका करतोय असं नाही. ह्या गोष्टी तो स्वार्थासाठी करतोय. का? तर त्याला माहीत आहे मेल्यानंतर त्याचा आत्मा थेट नरकात जाणार आहे. लहानपणी आपल्याला भयावह, अनाकलनीय गोष्टी दिसतात असं सांगितल्यानंतर साहजिकच त्याच्या पालकांनी त्याला मनोरुग्ण ठरवून शॉक ट्रीटमेंट्स देण्यास सुरुवात केलेली असते. या सगळ्या त्रासाला कंटाळून तो आत्महत्या करतो. कॅथलिक धर्माच्या नियमाप्रमाणे आत्महत्या हे मोठे पाप आहे आणि ते केल्यास मेल्यानंतर माणसाचा आत्मा नरकात जातो. तिथे त्याला वारंवार छळलं जातं, अगदी अमर्याद काळापर्यंत! पण जॉन ची वेळ आलेली नसते. आत्महत्या केल्यामुळे दोन मिनिटांसाठी तो मरतो आणि पुन्हा जिवंत होतो. आत्महत्येमुळं त्या दोन मिनिटांसाठी तो नरकात जातो.नरकातले ती दोन मिनिटं म्हणजे आपल्या अख्ख्या आयुष्यभराचा कालावधी! तिथे काळ जणू थांबलेला असतो. पण इथून पुढे तो कुठल्याही कारणाने मेला तर त्याचं नरकात जाणं ही मात्र काळ्या दगडावरची रेघ. याच दैवाला बदलण्यासाठी तो लोकांना अशा दुष्टात्म्यांपासून वाचवत राहतो. अशा केसेस जास्तीत जास्त तो शोधतो आणि सोडवत असतो. आतापर्यंत कित्येक पिशाच्च त्याने नरकात पोहोचवले असतात. जेणेकरून त्याच्या खात्यावर पुण्य जमा होईल आणि तो स्वतःसाठी स्वर्गात जागा कमावू शकेल, अशी त्याची समजूत असते. पण हे आत्महत्येचं पाप धुवून टाकणं आणि नरकात जाण्याची शिक्षा चुकवणं तितकं सोपं नाही. मुळात ती प्रोसेस च अशी नाही. त्यात एके दिवशी त्याला खोकल्याची उबळ येते आणि थुंकीतून त्याला रक्त पडलेले दिसते. तपासणी अंती त्याला कळतं की त्याला शेवटच्या स्टेज चा फुफ्फुसाचा कॅन्सर आहे. हे त्याचं दैव नाही तर 15 वर्षांचा असल्यापासून दिवसाला 30 सिगरेट्स ओढण्याचा परिणाम आहे. त्याच्या हाती आता जास्तीत जास्त केवळ वर्षभराचा अवधी आहे. या सगळ्यात त्याच्याकडे इसाबेल म्हणजे रेचल विस् ची केस येते. इसाबेल ला अशाच अनाकलीय गोष्टी दिसतात. तिच्या विचित्र वागण्यामुळे तिला मनोरुग्ण म्हणून दवाखान्यात ठेवलेले असते. इसाबेल तिथे आत्महत्या करते. तिच्या डिटेक्टिव्ह असलेल्या जुळ्या बहीणीला (ही पण रेचल च) म्हणजेच अँजेलाला मात्र आत्महत्येसाठी इसाबेलला कोण्या दुष्ट शक्तींनी प्रवृत्त केलंय असा दाट संशय आहे. कारण इसाबेलही धार्मिक कॅथॉलिक असते आणि आत्महत्येचं पाप ती कधीही करणार नाही, अशी अँजेला ला खात्री आहे. पण ते सिद्ध करण्यासाठी पुरावा तिच्याकडे नाही. अँजेला ला जॉनच्या कामाच्या पार्श्वभूमीची माहिती मिळते आणि ती जॉनकडे मदत मागण्यासाठी जाते. इसाबेलच्या मृत्यूचे गूढ उकलत जाताना जॉनला यावेळी येणारे संकट हे नेहमीपेक्षा खूप मोठे असल्याची जाणीव होते. सिनेमात पुढे काय होते हे लिहिणे मुद्दामच मी टाळतेय, कारण ते बघणं अधिक मनोरंजक ठरेल.
जॉनला मिळालेली दैवी शक्ती, त्यामुळे त्याच्या बालपणावर झालेला परिणाम, नरकात 2 मिनिटे घालवल्यामुळे मेल्यानंतर वाट्याला येणार असलेल्या भोगांची पूर्ण कल्पना यामुळे त्याचा स्वभाव मितभाषी, तिरसट, सनकी, उद्धट, उपरोधिक बनला आहे. कॅन्सरचे निदान झाल्यापासून तो काहीसा निराश ही झालेला आहे. तरीही तरी त्याची विनोदबुद्धी मात्र शाबूत असते. कियानु ने अभिनयातून जॉन च्या अशा स्वभाववैशिष्ट्यांना चपखलरित्या दाखवले आहे. कियानु च्या मुलाखती पाहिल्या तर प्रत्यक्षातही हा माणूस गूढ, मितभाषी, काहीसा लाजाळू वाटतो. त्यामुळे ही भूमिका करताना त्याला अजिबातच कष्ट पडले नसावेत. उंच, शिडशिडीत बांध्याचा, तोंडात सतत सिगारेट ठेवणारा, धातूच्या लायटर ला हाताने झटका देऊन उघड बंद करणारा जॉन सम्पूर्ण सिनेमाभर इन केलेला पांढरा शर्ट, काळा टाय, त्यावर मध्यम लांब काळा कोट, काळी पॅन्ट या वेषात वावरतो, अगदी रोजचे सवयीचे शुल्लक काम करावे तसा कोणत्या न कोणत्या पिशाच्चाला नरकात धाडत राहतो आणि प्रचंड हँडसम दिसतो.
अँजेला चे पात्र साकारणारी रेचल डिटेक्टिव्ह असली तरी तिच्या पेशाचे सिनेमात फारसे महत्व नाही. बहिणीच्या मृत्यूचे गूढ उकलने या विषयाभोवतीच तिचे पात्र फिरते. अभिनय मात्र रेचलचाही सुंदर झाला आहे. ती दिसतेही गोड. अँजेलाच्या व्यक्तिमत्वातही एक गूढ आहे ज्याने सिनेमाला महत्वाचे वळण मिळते. इसाबेलच्या मृत्यूमुळे एकमेकांच्या आयुष्यात आलेल्या जॉन आणि अँजेला मध्ये जवळीक निर्माण होताना अप्रत्यक्षपणे पण सुंदररित्या दाखवले आहे. उद्धट, तिरसट जॉन तिच्यासोबत असताना काहीसा सौम्य वाटतो. त्यांच्यातल्या नात्याची सुरुवात आहे, त्यामुळे सिनेमाच्या एखाद दुसऱ्या प्रसंगात त्यांच्यात अधुरा रोमान्स ही दाखवला आहे. रोमान्स चा हा प्रकार मला अतिशय आवडतो. नायक नायिकेचे एकमेकांपासून अगदी थोड्याशा अंतरावर येऊन भावनांच्या थ्रशोल्ड ला पोहचुन तरीही एकमेकांना किंचितही स्पर्श न करता स्वतःला थोपवून पुढची जी काही थेट कृती असेल ती अनफिनिश्ड सोडणे या रोमँटिक क्षणात जितकी प्रचंड पॅशन असते ती मला थेट किसिंग किंवा त्याही पुढच्या पायरी वर जाऊन केलेल्या सेक्स सिन मध्ये जाणवत नाही. त्यांच्या मागे हटण्यामुळे आणि तो रोमान्स अपूर्ण ठेवल्यामुळे बघणाऱ्याला "छे काहीतरी घडायला हवे होते" अशी हुरहूर लागून राहते. पुढे जाऊन नेमक्या कसे आणि कोणत्या प्रसंगातून ते जवळ येतील याबद्दल उत्सुकता लागून राहते. त्यात कियानु- रेचल सारखे प्रचंड देखणे आणि सहज अभिनय करणारे नायक, नायिका असतील तर प्रसंग अजूनच काळजात कट्यार! कुठल्याही सिनेमा, मालिकेत नायक -नायिकेच्या नात्यातले असे सुरवातीचे क्षण मला जास्त गोड वाटतात. एकदा का त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं माझा त्यातला इंटरेस्ट संपतो.
सिनेमात अजूनही काही विशेष देणगी लाभलेले व्यक्तिमत्व आहेत. कथेत सांगितल्याप्रमाणे नरक, स्वर्ग आणि सामान्य मानवांची पृथ्वी हे सगळे एकाच ठिकाणी आहेत. पण तरीही तिथे राहणाऱ्या कोणालाही सहजपणे एकमेकांच्या भागात प्रवेश मिळू शकत नाही किंवा ते दिसतही नाहीत. त्यामुळे पृथ्वीवर समतोल बनवून ठेवण्यासाठी पिशाच्च आणि देव यांचे अर्धे मानव असलेले काही प्रतिनिधी पृथ्वीवर राहतात. पैकी गेब्रियल ही देवदूत आणि बॅलह्याझार हा पिशाच्च दूत आहे. मिडनाईट नामक एक दैवी पुरुष आहे जो की कोणाच्याही बाजूने नाही, पण त्याच्याकडे एक खुर्ची आहे जो तो योग्य वेळी विशिष्ट कामासाठी वापरू शकतो. दैवी शक्ती च्या आधारे वेगवेगळ्या ठिकाणी घडणाऱ्या झपाटलेल्या माणसांच्या केसेसची बसल्या जागी माहीती मिळवून देणारा, बीमन नामक अतिमानवी गोष्टींचे प्रचंड ज्ञान असणारा, जॉन ला दुष्ट शक्तींचा सामना करण्यासाठी उपयुक्त अशा शस्त्रांचा पुरवठा करणारा, तसेच जॉन चा ड्रायव्हर आणि विद्यार्थी असणारा चॅझ हे तिघे सोडून इतर कोणीही मित्र जॉन ला नाहीत.
सिनेमातले कॉन्स्टंटिन पात्र आणि कथा कॉमिक वरून घेतलेले आहे. कथेला योग्य वेग आहे. प्रत्येक पात्र या कथेमध्ये घट्ट गुंफलेले आहे. पुढे काय होईल याची उत्सुकता प्रसंगानुरूप वाढत जाते. 2005 सालच्या मानाने vfx व्यवस्थित वाटतात. धगधगणाऱ्या नरकतील दृश्य, वेगवेगळ्या रूपातले पिशाच्च यांचे अनिमेशन चांगले झाले आहे.सिनेमात जास्तीत जास्त प्रसंगात काहीसा पिवळट, अंधारलेल्या, गूढ जाणीव निर्माण करणाऱ्या प्रकाशयोजनेचा वापर केलेला आहे. जॉन आपल्या विनोदबुद्धीने अधूनमधून हे गंभीर वातावरण हलकं करतो राहतो. संवाद ही सिनेमातली अजून एक मला अतिशय आवडलेली बाब, विशेषतः जॉन ला लाभलेले!
कॉन्स्टंटीन ची कथा कितीही अतिमानवी आणि तशाच अतिमानवी पात्रांनी युक्त असूनही ती दैवी शक्ती लाभलेल्या एक सामान्य माणसाच्या जगण्याचा आणि सुटकेचा संघर्ष आहे. अतिमानवी कथानक, दैवी देणगी असलेली पात्रं, एक्सरसिजम हे घटक असूनही असे विषय असलेल्या इतर सिनेमांपेक्षा हा सिनेमा खूप वेगळा आहे. हा सिनेमा अमेझॉन प्राईम वर उपलब्ध आहे. ज्यांना हे विषय आवडतात, त्यांनी या सिनेमाला एकदा एक संधी देऊन नक्की पहाच!!
Keywords:
ImageUpload:

