वरकरणी पाहीलं तर हा एक अतिमानवीय थरारपट आहे. सिनेमातल्या नायकाकडे म्हणजेच कियानु रिव्हस् ने पात्र साकारले आहे त्या जॉन कॉन्स्टंटीन कडे काही दैवी शक्ती आहेत, ज्याद्वारे त्याला सामान्य मानवाच्या डोळ्यांना दिसणार नाही अशा गोष्टी दिसतात. ही गोष्ट वेगळी की त्याला तो वरदान न समजता शाप समजतो! सिनेमाची सुरवात पाहून इतर एक्सरसिस्ट प्रमाणे हाही एक रुटीन एक्सरसिस्ट आहे अशी आपली समजूत होते. पण हा तसा नाही. फक्त आपल्याला दैवी शक्ती आहे म्हणून तो पिशाच्चाने झपाटलेल्या लोकांची सुटका करतोय असं नाही. ह्या गोष्टी तो स्वार्थासाठी करतोय. का? तर त्याला माहीत आहे मेल्यानंतर त्याचा आत्मा थेट नरकात जाणार आहे.