मोनार्क - ३

मोनार्क - १
मोनार्क - २

butterfly line divider R_0.png

शिक्षण पूर्ण करताच डॉ. फ्रेड ऊर्कहट यांनी प्राणीशास्त्र हा विषय शिकवण्यास सुरवात केली. तरीही हिवाळ्यात अचानक गायब होणार्‍या मोनार्क फुलपाखरांचं कोडं मात्र त्यांना स्वस्थ बसू देईना. थोड्या निरिक्षणांती त्यांना दक्षिणेकडे जाणारी फुलपाखरं उन्हाळा सुरु झाला की परतांना दिसून आली.

त्यातच पुढे दुसरं महायुद्ध सुरू झाल्याने मोनार्कसंबंधी संशोधनाला अर्धविराम देउन डॉ. फ्रेड यांना रॉयल कॅनेडियन एअर फोर्सच्या हवामान विभागात ऑफिसर म्हणून रुजू व्हावं लागलं. दुसरं महयुद्ध संपल्यावर फ्रेड यांनी प्राध्यापकाची नोकरी पुन्हा सुरु केली. त्याच वेळी सहकारी नोरा पॅटरसन या तरुणीशी त्यांची ओळख झाली. किटकांविषयी विशेषतः फुलपाखरांविषयी असणारं कुतुहल व प्रेम या दोघांना एकत्र आणण्यात कारणीभूत ठरलं. नोराशी विवाह झाल्यावर मोनार्क स्थलांतराचा मागोवा काढणं दोघंचं स्वप्न बनलं.

मोनार्क जातीची फुलपाखरं स्थलांतर करत असतीलच तर त्यांच्या प्रवासाचा मार्ग, लागणारा वेळ, अंतर व दिशा जाणून घेणं अत्यावश्यक होतं. यासाठी या फुलपाखरांच्या मागावर रहाणं आवश्यक होतं, पण शक्य मात्र नव्हतं. यावर डॉ. फ्रेड यांनी या फुलपाखरांच्या पंखांवर काहीतरी खूण करण्याचं ठरवलं. अतिशय नाजूक, पातळ आणि चपळ अशा या फुलपाखरांच्या पंखांवर खूण करायची तरी कशी हा यक्षप्रश्न होताच. यावर उपाय म्हणून फुलपाखरांना एखाद्या लेबल अथवा चिकट कागदाने टॅग करायची युक्ती फ्रेड यांनी काढली. त्यानुसार रंगीबेरंगी कागदाला गोंद लावून फुलपाखराच्या पंखाला तो कागद चिकटवयचा प्रयत्न त्यांनी केला. पण जसं फुलपाखरु हवेत उडायला लागलं तसं हवेच्या जोरदार झोताने तो कागद उडून गेला. वेगवेगळ्या प्रकारचे स्टिकर्स, कागद, चिकटपट्ट्या वापरुन डॉ. फ्रेड यांनी मोनार्कना टॅग करायचा प्रयत्न केला पण हवेच्या प्रचंड झोतापुढे यातला कुठलाही प्रयत्न यशस्वी झाला नाही. पुढे नोरा आणि फ्रेड यांनी कॅलिफोर्नियामधील मॉनिटरी पेनिन्सुला या भागातल्या मोनार्क्सवर पोस्टाच्या स्टँपप्रमाणे प्रिंटेड लेबलचा वापर करायचं ठरवलं. परंतु एखाद्या मोठ्या उत्सवानंतर रंगीबेरंगी पताका रस्त्यावर विखुरल्या जाव्यात त्याप्रमाणे एका रात्री मुसळधार पावासात भिजललेया गवतात हे सर्व स्टँप गळून पडले. अजून एक अयशस्वी प्रयत्न नोरा आणि फ्रेड यांच्या पदरात पडला.

norafred.jpeg

(नोरा आणि फ्रेड ऊर्कहट)


अनेक अयशस्वी प्रयोगानंतर १९४० साली डॉ. फ्रेड यांच्या एका मित्राच्या सल्ल्यानुसार काचेच्या वस्तू विकणारे व्यापारी किंमती चिकटवायला जे लेबल वापरतात त्या लेबल्सचा उपयोग करायचं ठरवलं. या लेबल्सना चिकटण्यासाठी विशेष द्रव्य वापरलं जातं ज्यामुळे याप्रकारची लेबल सहजासहजी निसटू शकत नाहीत, सरतेशेवटी फ्रेड व नोरा यांना पट्कन चिकटण्याजोगी, हलक्या हाताने लावता येण्यासारखी, फुलपाखरांच्या नाजूक पंखांना इजा न करणारी व कुठल्याही प्रकारच्या हवामानाला तोंड देतील अशी ही लेबल्स मिळाली होती. मनाजोगी लेबल्स मिळाल्यावर फ्रेड व नोरा यांनी मोनार्क टॅग करायला सुरवात केली. प्रत्येक टॅगवर एक क्रमांक लिहिलेला असे तसेच 'Send to zoology University of Toronto Canada' असा मजकूर छापलेला असे. काम सुरु होताच हळूहळू नोरा व फ्रेडच्या लक्षात येऊ लागलं की स्थलांतराचा मार्ग शोधण्यासाठी लाखोंच्या संख्येने मोनार्क टॅग करणं आवश्यक होतं आणि हे काम फक्त दोन माणासांना पेलणं अशक्य होतं. यावर उपाय म्हणून डॉ. फ्रेड यांनी १९५२ साली 'Natural History Magazine' या मासिकात 'Marked Monarch' नावाचा लेख लिहून मोनार्क स्थलांतराविषयी सविस्तर माहीती लिहीली तसंच या प्रकल्पात मोनार्क्सना टॅग करण्याच्या कामासाठी स्वयंसेवकांना आवाहनदेखील केले. या आवाहनाला उत्तर म्हणून १२ जणांनी विनामोबदला मदत करण्याविषयी पत्राद्वारे कळविले. या सकारात्मक सुरवातीबरोबर नोरा व फ्रेड यांनी 'Insect Migration Association' या संस्थेची स्थापना केली.


advt.jpg

(अमेरिकन वृत्तपत्रातील स्वयंसेवकांना आवाहन करणारी जाहिरात)


बारा स्वयंसेवकांनी सुरु झालेल्या या संस्थेची सदस्यसंख्या बघता बघता १९७१ पर्यंत ६०० च्या वर पोहोचली. १९६५ साली फ्रेड आणि नोरा यांच्या 'Insect Migration Association' ला नॅशल जिओग्राफिक सोसायटी, नॅशनल रिसर्च काउंसिल ऑफ कॅनडा व अनेक स्वयंसेवकांकडून अनुदानाच्या रुपात भक्कम आधार लाभला.


अमेरीकाभर पसरलेल्या स्वयंसेवकांनी हजारोंच्या संख्येने फक्त मोनार्क्स टॅग करण्यात हातभार लावला असं नाही तर टॅग केलेले मोनार्क्स आपल्या आसपास आढळल्यावर लागलीच दूरध्वनी अथवा पत्राद्वारे ती माहीती डॉ. फ्रेड यांना कळवित असत. कॅलिफोर्नियातील अशाच एका गोल्फरला आपला पहिला स्ट्रोक मारण्यासाठी तयार असतांना गोल्फबॉलवर टॅग केलेलं सुंदर मोनार्क फुलपाखरू आढळलं. त्याने लागलीच पत्राद्वारे डॉ. फ्रेड यांना त्याची माहीती कळवली. अशा प्रकारची माहीती मिळताच नोरा व फ्रेड ती टिपून ठेवत असत, तसंच नकाशावर मार्ग आखून ठेवत. कॅनडातील ओंटारीओ, अमेरीकेच्या पूर्वेकडील मेन या भागात टॅग केली गेलेली फुलपाखरं दक्षिणेकडे कॅलिफोर्निया, टेक्सास, फ्लोरिडा या भागात आढळली. या संकलीत माहीतीच्या आधारावरून मोनार्क्सच्या स्थलांतराच्या मार्गाचं पुसटसं स्वरुप समोर येत होतं. त्यातून काही निरिक्षणं नोंदवली गेली.


tagmonarch.jpg
(टॅग केलेलं मोनार्क फुलपाखरु)


अनेक स्वयंसेवकांनी नोदवलेल्या निरीक्षणाच्या सखोल अभ्यासानंतर काही आश्चर्यजनक माहीती उघड झाली. आतापर्यंत नोंदवलेल्या निरिक्षणानुसार - बहुतांश नर मोनार्क उन्हाळ्यात परततांना मृत पावल्याचे आढळून आले. स्थलांतर करतांना मोनार्क रात्री प्रवास करीत नसल्याचं आढळलं तसंच एकच क्रमांक असलेलं टॅग मोनार्क फुलपाखरु एकाच दिवशी दोन वेळा दोन वेगवेगळ्या ठिकाणी पकडून सोडण्यात आलं. या फुलपाखराने एका दिवसात तब्बल ८० मैल प्रवास केला होता.

कॅनडातल्या ओंटारीओमधे उन्हाळ्यात आढळणारी बरीचशी फुलपाखरं नविन, तजेलदार पंखांची, टवटवीत असत परंतु त्यांच्या जोडीला थकलेली, निस्तेज मोनार्क्सही नजरेला पडत. या मोनार्क्सचं अभ्यासपूर्ण निरिक्षण केल्यानंतर असं आढळलं की एकाच वेळेला मोनार्क्सच्या निरनिराळ्या पिढ्या स्थलांतर करतात. तजेलदार पंखांची मोनार्क्स निश्चितच जवळच्या ठिकाणावरून आलेली असणार तर थोडी निस्तेज पंख असलेली मोनार्क फुलपाखरं बराच लांबचा पल्ला पार करुन येत असावीत. या निरीक्षणाच्या आधारावर असा निष्कर्ष काढण्यात आला की जी मोनार्क स्थलांतर करतात ती उन्हाळा संपता संपता अंड्यातून बाहेर आलेली असतात. अशा उशीरा जन्माला आलेल्या मादी फुलपाखरांचं अंडाशय अपुर्‍या प्रकाशाअभावी पूर्ण वाढ झालेलं नसतं. अशा माद्या जोवर हिवाळा काढू शकतील अशा प्रदेशापर्यंत पोहोचत नाहीत तोवर समागम करण्यास असमर्थ ठरत असाव्यात. अशा प्रदेशात मिळणार्‍या मुबलक सूर्यप्रकाशात या माद्यांचं अंडाशय परिपक्व होऊन त्या स्थलांतर करीत असतांनाच अंडी घालत असाव्यात. त्यातून जन्म घेणारी नविन मोनार्क्स ही कमी अंतराचा प्रवास करुन आल्याने तजेलदार दिसत असावीत.

उत्तर अमेरीकेच्या दक्षिण भागात सापडणार्‍या टॅग केलेल्या मोनार्क्सवरुन नवनविन निष्कर्ष निघत होते, अंदाज बांधले जात होते तरीही स्थलांतर करणारी मोनार्क फुलपाखरं हिवाळ्यात नक्की कुठे वास्तव्य करतात हे मात्र अजूनही गुपितच होतं. स्वयंसेवकांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर स्थलांतराचा मार्ग ढोबळमानाने उत्तरेच्या थंड प्रदेशांकडून दक्षिणेकडच्या उष्णप्रदेशांकडे जाणारा होता. त्यामुळे टेक्सास ते मेक्सिको यामधे कुठे ना कुठे हिवाळ्यात त्यांचं वास्तव्य असल्याचा कयास डॉ. फ्रेड यांनी बांधला. त्यानुसार फ्रेड आणि नोरा यांनी काही काळ आपलं बस्तान टेक्सासमधे हलवलं. टेक्सासच्या दक्षिणेकडील भागात काही काळ शोधाशोध करुन काहीही हाताला न लागल्याने निराश मनाने दोघेही कॅनडात परतले. मधली काही वर्ष हताशपणे काढल्यानंतर नोरा यांनी मेक्सिकोच्या वृत्तपत्रात मोनार्क स्थलांतर संशोधनाविषयी माहीती देणारी तसंच मोनार्क फुलपाखरं टॅग करण्यासाठी स्वयंसेवकांची आवश्यकता असल्याची जाहीरात दिली. फारशी अपेक्षा नसतांना अनपेक्षितरित्या २६ फेब्रुवारी १९७३ रोजी पत्राद्वारे या जाहिरातीला केनेथ सी. ब्रगर या तरूणाचा प्रतिसाद आला. मेक्सिको सिटीतून लिहिलेल्या या पत्रात केनेथ म्हणतो, "I read with interest your article on Monarch. It occurred to me that I might be of some help...."


मेक्सिकोस्थित अमेरिकन केन ब्रगर मोनार्क स्थलांतराच्या अभ्यासातील एक महत्त्वाचा दुवा ठरणार होता.

(क्रमशः)



संदर्भ :

(१) Monarch Butterflies - Mysterious Travelers By Bianca Lavies
(२) The Incredible Journey of the Butterflies (DVD -2009)
(३) The Monarch Butterfly - International Traveler By Fred Urquhart

butterfly line divider R_0.png

मोनार्क - ४

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle