मोनार्क - ४

मोनार्क - १
मोनार्क - २
मोनार्क - ३

butterfly line divider R_0.png

केनेथ अर्थात केन ब्रगर, मेक्सिकोत वास्तव्यास असणारा अमेरिकन निसर्ग अभ्यासक. विस्कॉन्सिनमधे जन्मलेल्या केनला तिथला कडक हिवाळा रुचत नसे. त्यामुळे हिवाळ्याचे दिवस मेक्सिकोत व्यतित करण्यासाठी आपला पाळीव कुत्रा कोलासोबत छोट्याश्या Winnebago(१) मधे त्याने फिरतं घर थाटलं होतं.

कॅटेलिना आग्वादो - धीट, स्वतंत्र बाण्याची विशीतली मेक्सिकन तरूणी. लहान वयातच तिने मेक्सिको, ग्वाटेमाला, एल साल्वादोर तसंच बरचसा अमेरिका व कॅनडाचा भूभाग एकटीने पायथा घातला होता. सुट्टी घालवण्यासाठी अकापुल्कोच्या नयनरम्य किनार्‍यावर मित्रमैत्रीणींसोबत आलेली कॅटेलिनाला पहाताचक्षणी केन तिच्या प्रेमात पडला होता.खरंतर कॅटेलिनाच्या एका मित्रानेच ही भेट घडवून आणली होती. कॅटलीनाचं मोहक रुप आणि धाडसी स्वभाव केनला तिच्या प्रेमात पडायला पुरेसा ठरला. त्यातच फुलपाखरांविषयी वाटणार्‍या जिव्हाळ्यामुळे त्यांचं नातं अधिकच दृढ झालं.

डॉ. फ्रेड यांनी मेक्सिकन वृत्तपत्रात दिलेली जाहिरात जेव्हा कॅथीला दाखवली तेव्हा थोड्याश्या नाखुशीनेच ती उत्तरली, "Good Luck with Compesinos (२) and the Mexican Goverment." पण केनने नेटाने आपलं म्हणणं लावून धरल्यावर मात्र कॅथीकडे हो म्हणण्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग उरला नाही. कॅथीचा होकार या कामासाठी मोठा फायद्याचा होता. मेक्सिकन असल्याने तिची स्पॅनिश मातृभाषेची उत्तम जाण, चुणचुणीत, उत्साही व्यक्तिमत्त्व तसचं स्थानिक गावकर्‍यांशी असलेल्या ओळखी या सगळ्याचा आपसूकच मोनार्क संशोधनाकरीता उपयोग होणार होता.

डॉ. फ्रेड यांची पत्राद्वारे परवानगी मिळताच केन आणि कॅथीची भटकंती सुरु झाली. आठवडभर नोकरी करुन सुट्टीच्या दिवशी आसपासची गावं पाळीव कुत्रा कोला याच्यासोबत पालथी घालणं हा दिनक्रम झाला. अनेकदा दूरच्या अशा खेड्यात जाण्यासाठी कॅथीच्या मदतीने एखादा गावकरी वाटाड्या म्हणून बरोबर घेत असत. डॉ. फ्रेड यांनी संदर्भासाठी मोनार्क फुलपाखरांची छायाचित्र त्यांना देऊ केली होती. ही छायाचित्र दाखवून कॅथी गावकार्‍यांना अशाप्रकरच्या फुलपाखरांच्या शोधात आम्ही आहोत, हे काम आम्ही एका अभ्यासासाठी करतोय हे पटवण्याचा प्रयत्न करी. बरेचदा गावकरी नकरात्मक उत्तरं देत, कधी कधी चुकीची माहीती मिळे. अनेकदा त्यांना गावकर्‍यांच्या रोषाला ही सामोरे जावे लागे. कित्येकदा आपल्या गावात लपवलेलं गुप्तधन चोरायला ही मंडळी आलीत की काय असा संशय घेउन गावकर्‍यांनी कॅथी व केनला जीवे मारण्याची धमकीसुद्धा मिळत असे. या मनसोक्त भटकंतीत अनेकदा मुसळधार पावसाचा अडसर येत असे तर कधी कधी त्यांची Winnebago प्रवासात बिघडल्याने अवघड चढणीवर सामानसुमानासहीत चढावे लागे.

सुरवातीला डॉ. फ्रेड यांच्यासाठी स्वयंसेवक म्हणून काम करीत असल्याने बराचासा खर्च कॅथी आणि केनला आपल्या खिशातून करावा लागे. परंतु काही काळ डॉ. फ्रेड यांच्यासोबत काम केल्यावर त्यांच्या कामाविषयी खात्री पटल्यावर डॉ. फ्रेड यांनी केनची नियुक्ती आपला सहाय्यक म्ह्णून केली. त्यानंतर बराचसा खर्च फ्रेड यांच्या संस्थेतर्फे केला जाई. दिवस जात होते, प्रयत्न चालू होते परंतु हाताला काहीच लागलं नव्हतं. थोडं निराशेतच असलेलं कॅथी व केन हे दांपत्य थोड्याच दिवसात येऊ घातलेल्या मेक्सिकन सण 'एल दिया दे लोस मुएर्तोस"च्या तयारीला लागले. आस्तेकांच्या काळापासून चालत आलेला हा मृतात्म्यांसाठी सण. घरोघरी जय्यत तयारी चालू होती. सुट्टीच्या या दिवशी कॅथी व केनही आपल्या नेहमीच्या कामगिरीवर निघाले होते. सिएरा माद्रेच्या डोंगराळ भागात एका स्मशानाजवळ जेव्हा दोघे पोचले तेव्हा स्मशानात आपल्या पितरांसाठी रंगीबेरंगी फुलं आणि विविध प्रकारची फळं अर्पण करण्यासाठी एकच गर्दी जमली होती. कॅथी व केन या लोकांकडून काही माहीती मिळेल या आशेवर त्या दिशेने निघाले. थोडा वेळ स्मशानाजवळ शांततेत गेल्यावर कॅथीच लक्ष एका थडग्यावरील फुलांवर भिरभिरणार्‍या सुंदर फुलपाखरावर गेलं. नाजूक नारींगी पंखांवर काळेभोर ठिपके असलेलं ते फुलपाखरू मोनार्क तर नव्हे? डॉ. फ्रेड यांनी दिलेल्या छायाचित्रात दिसणारं फुलपाखरु असंच तर होतं. धडधडत्या ह्र्द्याने कॅथीने आसपासच्या थडग्यावर उडणार्‍या फुलपाखरांकडे पाहिलं. हो ते मोनार्कच होते! तिने केनला त्या फुलपाखरांकडे खूण करताच त्याचाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. आसपास अजून बारकाईने निरिक्षण केलं असता सिएरा माद्रेच्या डोंगराळ रांगांकडे मोनार्क्सचा थवा उडतांना त्यांना आढळला. गेले दोन वर्ष जंगजंग पछाडूनही ज्या गोष्टीचा तीळमात्र सुगावा लागला नव्हता त्याच मोनार्क्सची गाठ अशी अचानक पडावी हा योगयोगच होता. केनने तात्काळ दूरध्वनी करुन डॉ. फ्रेड यांना संपर्क केला. अत्यानंदाने पलिकडून डॉ. फ्रेड यांचा आवाज आला, "We feel that you have zeroed in on the right area." मोनार्क्स स्थलांतर संशोधनाच्या कामात एक महत्त्वाचा दुवा हाती लागला होता.

अनेक दिवस वाट पाहिल्यानंतर मिळालेल्या या पहिल्या यशाने कॅथी आणि केन यांचा उत्साह द्विगुणित झाला. सिएरा माद्रेच्या घनदाट अरण्यात कुठेतरी मोनार्क फुलपाखरांचं हिवाळी वास्तव्य असलं पाहिजे या आधारावर पुढचा प्रवास चालू झाला. त्यातच एके दिवशी केन, कॅथीला भेट्ण्यासाठी याच भागातून प्रवास करीत होता. त्या अंधार्‍या रात्री पाऊस धोधो कोसळत होता. अतिशय अरुंद व नागमोडी वाटेवरुन प्रवास करीत असतांना अचानक एके ठिकाणी तो आश्चर्यचकीत होउन थबकला. जोरदार पावसाने सुकलेली पानं गळून पडावीत त्याप्रमाणे कित्येक मृत, जीर्ण-शीर्ण मोनार्क फुलपाखरांचा वर्षाव होउन गाडीच्या काचेवर ती चिकटली होती. त्या काळ्याकुट्ट रात्री ही मोनार्क्स नक्की कुठून आलीत याचा मात्र पत्ता लागत नव्हता. केनने लागलीच पत्राद्वारे डॉ. फ्रेड यांना या घटनेचा सविस्तर तपशील कळवला. यावर उत्तर आलं. "You must be getting really close. These butterfly remains suggested that birds had been feeding on large flocks of Monarchs."


या घटनेमुळे कॅथी आणि केनचं मनोधैर्य तर उंचावलंच होतं त्याबरोबर आता काहीही करुन या प्रकरणाचा छडा नक्कीच लावण्याचा ध्यासच घेतला. २ जानेवारी १९७५ चा तो दिवस कॅथी आणि केनसाठी नेहमीप्रमाणेच उजाडला. पण आज उगवलेला सूर्य मात्र त्यांच्या आयुष्याला नविनच वळण देणार होता. रोजच्याप्रमाणे दोघेही पहाटे पहाटे आपला पाळीव कुत्रा कोला आणि स्थानिक वाटाड्याला घेउन भटकंतीसाठी निघाले.सिएरा माद्रेची जरा अवघड अशी चढण चढल्यावर काही मोनार्क्सचे थवे भिरभिरतांना त्यांना आढळले. तिथेच आसपास लाकूड गोळा करणार्‍या एका गावकर्‍याजवळ चौकशी केली असता त्याने अजून थोडं वर सेतो पेलोन(Cerro Pelón)च्या आसपास या फुलपाखरांचे थवेच्या थवे असल्याची माहीती दिली.

घनदाट देवदार वृक्षांमुळे पहाटेच्या अंधुक प्रकाशातही काळाकुट्ट भासणारी, अरूंद, वळणावळवणाची अशी सेरो पेलोनला जाणारी चढणीची, पालापाचोळ्यांनी भरलेली वाट हळूहळू सूर्य माथ्यावर येऊ लागला तशी बरीच सुसह्य झाली. वळणावळणाची चढण ज्या ठिकाणी संपली त्याठिकाणी पोचताच कॅथी आणि केनला सुर्यप्रकाशात एकाएकी चमकणार्‍या नारींगी-तपकीरी रंगाने एका जागी खिळवून टाकलं. समोर दिसणारा नजारा अचंबित करणारा होता. कधीही न कल्पलेला निर्सगाचा अजब चमत्कार. लाखो नारिंगी-तपकीरी मोनार्क फुलपाखरं झाड्यांच्या फांद्यांना चिकटलेली, जणू झाडांना पानांऐवजी मोनार्कच बहरली असावीत. अगदी जंगलभरुन. जमिनीवर पहावं तर एखादा सुंदर, नक्षीदार गालिचा पसरावा तसा सकाळच्या थंड हवेत पंख बंद केलेली नारींगी-काळ्या रंगाची मोनार्क्स पसरली होती. नजर जावी तिथे दूरदूर पर्यंत पसरलेली मोनार्क्स.

"I see them! I see them!" कॅटेलिना अत्यानंदाने चित्कारली.

m1.jpg
m2.jpg
m3.jpg
m5.jpg
m4.jpg

"We have located the colony!" त्याच दिवशी संध्याकाळी तातडीने केनने डॉ. फ्रेड यांना दूरध्वनी केला. त्याच्या आवाजात उत्साह, आनंद ओसंडून वाहत होता. "We have found them-millions of Monarchs-in evergreen besides mountain clearing."

गेली कित्येक वर्ष डॉ. फ्रेड आणि नोरा यांनी ज्या शक्यतेची फक्त आणि फक्त कल्पना केली होती ती स्वप्नवत कल्पना आज सत्यात उतरली होती. सरतेशेवटी मोनार्क फुलपाखरांचं मध्य मेक्सिकोतलं हिवाळी वास्तव्याचं ठिकाणं सापडलं होतं.

पण तरीही कॅनडा आणि उत्तर अमेरिकेमधून हिवाळ्यात अचानक गायब होणारी मोनार्क्स नक्की हीच असावीत का? एवढ्या लांबचा प्रवास पूर्ण करुन हा छोटासा नाजूक जीव सेरो पेलोनच्या घनदाट जंगलात कसा बरं पोचत असेल?

अनेक प्रश्न अजून अनुत्तरीतच होते.

(क्रमशः)



टीपा :
(१) Winnebago
(२) Compesinos - स्पॅनिश शब्द, अर्थ - गावकरी


संदर्भ :

(१) Monarch Butterflies - Mysterious Travelers By Bianca Lavies
(२) The Incredible Journey of the Butterflies (DVD -2009)
(३) The Monarch Butterfly - International Traveler By Fred Urquhart

butterfly line divider R.png

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle