कॅनडातल्या एका छोट्या गावात रेल्वेलाईन शेजारच्या घरात खिडकीत बसून, रुळावरुन थडथडत धावणार्या मालगाड्यांची वाट बघत बसणं हा पाच वर्षाच्या छोट्या फ्रेडीचा आवडता छंद. मालगाड्यांची वर्दळ जेव्हा कमी होत असे तेव्हा रेल्वेलाईन पलिकडे पसरलेलं मोठ्ठ्च्या मोठ्ठं माळरान न्याहाळत बसणं हे फ्रेडीचं अजून एक काम. हिरव्यागार गवतात उगवलेली पिवळी-पांढरी रानटी फुलं,त्यावर घोंघावणार्या मधमाशा, रंगीबेरंगी फुलपाखरं, मधनूच भिरभिरणारे चतुर, फ्रेडी आपल्या पिटुकल्या डोळयांनी तासनतास निरखत बसे. एके दिवशी मांजरीच्या पिल्लासारख्या मऊमऊ अंगाच्या मधमाशीला पाहून अगदी न रहावल्याने फ्रेडी धावतच तिला पकडायला गेला. मधमाशीच्या अगदी जवळ जाताच मधमाशीने फ्रेडीच्या हाताला जोरदार डंख मारला. हाताला जोराचा झटका बसलेला फ्रेडी कळवळतच आईकडे धावला. आईने लागलीच जखमेवर मलमपट्टी करुन छोट्या फ्रेडीला समजावलं, "निसर्गाने संरक्षणासाठी मधमाशांना जन्मतःच तजवीज केलेली असते. नुसत्या हाताने मधमशी पकडायला गेलं तर त्या स्वरक्षणासाठी डंख मारतात. यापुढे कुठल्याही किट्काला नुसत्या हाताने स्पर्श करायला जाऊ नकोस." रोज खिडकीतून दिसणार्या पिटुकल्या मधमाशा इतक्या जोराने हल्ला करुन स्वतःच रक्षण करतात या गोष्टीचं फ्रेडीला राहून राहून कुतुहल वाटत होतं. वयाच्या पाचव्या वर्षी किट्क जगताशी जवळून झालेली ही छोटी ओळख फ्रेडीच्या आयुष्याला पुढे एक अनपेक्षित कलाटणी देणार होती.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle