अधुरी एक कहाणी

कोणत्याही घरातले दागिने हे नुसतेच दागिने नसून त्याभोवती घरातल्यांच्या भावना ही गुंफलेल्या असतात. काही दागिने कुटुंबाचे पिढीजात म्हणून लाडके, काही आंनदाच्या क्षणांचे सोबती म्हणून आवडते. काहींच्या नुसत्या आठवणी ही मन अस्वस्थ करणाऱ्या. तर अशाच एका दागिन्याची ही मनाला भिडणारी गोष्ट.

आमच्या आईचे वडील ती लहान असतानाच गेले. पण तिच्या सधन काकांच्या खंबीर आधारामुळे पोरकेपणाची झळ तिला कधी लागली नाही. तिचे बालपण अगदी लाडाकोडात आणि श्रीमंतीत गेले. काकांनी शिक्षणाचे महत्व जाणून होते आणि म्हणूनच घरातल्या इतर स्त्रियांचा विरोध पत्करून ही साधारण ऐंशी पंच्यायशी वर्षांपूर्वी त्यांनी आईला मॅट्रिक पर्यंत शिकवले. लहान वयात तिचे लग्न लावले नाही. सहाजिकच तिच्या साठी मुलगा शोधताना उच्चशिक्षित हवा ही एकच अट होती. माझे वडील ह्या अटीत बसत होते.त्यामुळे जावई त्याना लगेच पसंत पडले आणि अशा तऱ्हेने त्यांचे लग्न होऊन संसार सुरू झाला.

वडील जरी शिकलेले असले तरी त्यांचे ही पितृछत्र तरुण वयातच हरपल्याने आणि तेच सर्वात मोठे असल्याने सगळ्या सख्ख्या सावत्र भावंडांची जबाबदारी त्यांच्यावरच होती. लहान वयात वैधव्य प्राप्त झालेल्या आपल्या सावत्र आईला शिकवून स्वतःच्या पायावर उभं करण्याचा ही त्यांचा मानस होता. हे सगळं एकट्याच्या पगारात करणं त्यांना शक्यच नव्हतं. आमची आई अनायसे शिकलेली होतीच म्हणून तिने संसाराला हातभार लावण्यासाठी शिक्षिकेची नोकरी धरली.

नव्या नोकरीत, नव्या घरात, नवीन माणसात आई रुळत होती. न कुरकुरता, न थकता,आंनदाने आणि हसतमुखाने घरासाठी अफाट कष्ट करत होती. सासरच्या माणसात ती दुधातल्या साखरेसारखी विरघळून गेली होती. त्यामुळे सगळ्या दीर नणंदांची ती लाडकी वहिनी बनली होती. ती त्यांची मैत्रीण,आई सगळंच होत. तिच्या सावत्र सासुबाईंशी ही तिचे सम्बन्ध फारच सलोख्याचे होते. आज इतक्या वर्षांनी ही सगळे नातेवाईक कधी एकत्र भेटलो की तिच्या आठवणी निघतात ह्यातच सगळं आलं. पै न पै वाचवून, भावंडांना शिकवून त्याना चांगलं life देण्याच्या वडिलांच्या व्रताला आईची खंबीर साथ होती. आज मी मोठी झाल्यावर जेव्हा विचार करते तेव्हा एखाद्या तरुण गृहिणी साठी हे किती कठीण आहे ह्याची जास्तच जाणीव होते.

तिच्या सगळ्या दीर,नणंदा ही गुणी, समजूतदार आणि हुशार ही होत्या. त्याना परिस्थितीची जाणीव होती. आपापल्या परीने प्रत्येक जण कुटुंबाला वर आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होता. जसे सगळे दिवस सुखाचे नसतात तसे सगळेच दिवस कठीण ही नसतात. हा कठीण काळ ही सर्व जण एक जुटीने राहिल्याने बघता बघता मागे पडला. सगळे जण शिकले, स्वतःच्या पायावर उभे राहिले. योग्य वयात लग्न कार्य होऊन आपापल्या संसारात रममाण झाले. आई वडिलांनी ह्याच दिवसाचं स्वप्न पाहिलं होतं. आईच्या लाडक्या धाकट्या सावत्र ( म्हणायचं फक्त सावत्र , तो त्या दोघांना ही स्वतःच्या मुलापेक्षा ही जास्त प्रिय होता.) दीराच्या लग्नात इतके दिवस आई वापरत असलेले तिच्या सावत्र सासूबाईंचे तोडे ह्या त्यांच्या नव्या सख्ख्या सुनेला अगदी सामंजस्याने दिले गेले. कारण ते आपले नाहीयेत हे आईला लग्नानंतर लगेचच तिला माहीत झालं होतं. असो.

आमच्या आईचा स्वतःचा संसार ही आता वाढत होता. आम्हा भावंडांच शिक्षण, इतर गरजा ह्यात दुसरं काही करायलाच मिळत नव्हतं तिला. घरात शिक्षणाला सर्वात जास्त प्राधान्य असल्याने “हौस” हा शब्दच जणू तिच्या शब्दकोशात नव्हता. तिने कधी ही कशाची ही डिमांड केल्याचं, अमुक एक गोष्ट मला हवीय अस म्हटल्याच मला आठवत नाहीये. स्वतः नोकरी करत असूनही तिने स्वतःला एखादी चांगली झुळझुळीत साडी ही कधी घेतली नाही. मग दागिने करणं तर फारच दूरची गोष्ट. सर्व फॅमिलीची बेटरमेन्ट हाच त्या दोघांचा ही दागिना होता. तरी ही कधी कधी तोडयांचा विषय घरात निघत असे. वडील नेहमी आश्वासन देत असत तोडे करण्याचं पण प्रपंचाच्या व्यापात ते प्रत्यक्षात येत नसे.

कालचक्र फिरत होत. आम्ही भावंडं ही आता हळूहळू मार्गी लागत होतो. वडिलांची कौटुंबिक जबाबदारी थोडी कमी झाली होती. किंचित का होईना पण आर्थिक स्थैर्य प्राप्त झालं होतं. एका मे महिन्यात बहीण माहेरी आलेली असताना वडिलांनी आईची मापाची बांगडी आणि पैसे तिच्या हातात देऊन दिवाळीत येशील तेव्हा आईसाठी तोडे करून आणायला सांगितलं. आम्हाला सगळयांनाच खूप आनन्द झाला. त्यावेळचा आईचा उजळलेला चेहेरा आणि ज्या कृतकृत्य नजरेने तिने वडिलांकडे पाहिलं ते आज ही माझ्या डोळ्यासमोर आहे. आईला तोडे करण्याचं आमचं सगळ्यांचंच स्वप्न आता लवकरच सत्यात येणार होत. पण दैवाला हे मंजूर नव्हतं. त्या नंतर थोडेच दिवसात तब्बेत चांगली असणारी आई आजारी पडली, दुखणं वाढत जाऊन विकोपाला गेलं आणि त्याच वर्षीच्या भाऊबीजेच्या दिवशी ती हे जगच सोडून निघून गेली. शेवटपर्यंत तिच्या हातात तोडे चढले नाहीत ते नाहीतच.

आणि म्हणूनच तोडे हा दागिना आमच्या सगळयांचा एक अतिशय हळवा कोपरा आहे. आपण लहानपणी राहिलेल्या घराबद्दल भले ते भाड्याच ही असेल किंवा आपण वापरलेल्या वस्तूंबद्दल आपली जी भावना असते, जे ममत्व असते अगदी तीच भावना तोडयांबद्दल ही असल्याने आम्ही भावंड एकत्र जमलो की कधीतरी त्या तोडयांचा विषय निघतो. माझ्या मोठ्या बहिणी त्या बद्दल भरभरून सांगतात. कसे ते जड असूनही नाजूक होते, त्याच्या कळ्या कशा सुबक होत्या. त्याचा स्क्रू लावायला त्या आईला कशा मदत करत असत आणि लग्ना कार्यात हिरव्या बांगड्या,तोडे वैगेरे घातलेले तिचे हात किती सुंदर दिसत असत वैगेरे वैगेरे... मी मात्र तेव्हा लहान असल्याने ह्या अनुभवला मुकले असले तरी त्याना हातात घेण्याची, त्याना स्पर्श करण्याची माझी जबरदस्त आंतरिक इच्छा होती. काकुकडे जाऊन ते एकदा तरी हातात घ्यावेत अस मला फार वाटे पण पझेशन मध्ये मला interest आहे असा कदाचित काकूचा गैरसमज होईल म्हणून मी ते जाणीवपूर्वक टाळत होते. एकदा काकुकडे काहीतरी समारंभ होता म्हणून मी तिच्याकडे जरा लवकरच गेले होते. काकू तयार होत होती. थोड्याच वेळात ते तोडे घेऊन ती माझ्याकडे आली आणि त्याचे स्क्रू लावायला तिने मला सांगितले. त्या तोडयाना स्पर्श करताना मला काय वाटत होतं हे सांगणं शब्दातीत आहे. स्क्रू नीट दिसत नाहीये, नीट लागत नाहीये अशा अनेक सबबी सांगत मी बराच वेळ त्यांचं स्पर्शसुख अनुभवलं. त्यादिवशी काकुला मी अगणित वेळा मनातल्या मनात थँकू म्हटलं. अक्षरशः हवेत तरंगतच मी घरी आले. इतकं की त्या दिवशीचा माझा आनंदी, उत्फुल्ल चेहेरा माझ्या यजमानांनी ही नोटीस केला होता. तोडयांच स्पर्शसुख एकदा तरी अनुभवण्याची माझी आंतरिक इच्छा अशा तऱ्हेने अचानक, ध्यानी मनी नसताना पूर्ण झाली होती. असो.

आईच्या हातात कधी ही घातल्या न गेलेल्या तोडयांची ही अधुरी राहिलेली कहाणी ती कपाटात जपून ठेवलेली आईची मापाची बांगडी आज ही निःशब्द पणे आम्हाला सांगत आहे....

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle