ला बेला विता - ७

"ओह, तुझं घर इथून जवळ आहे हे विसरलेच होते मी. गुलमोहर पार्कमध्ये ना? तुझे बाबा राहतात अजून तिथे?" ती किल्ल्याच्या भिंतीचा आडोसा बघून टेकून उभी रहात म्हणाली.

"हम्म, मी गेल्या बारा वर्षात त्यांना भेटलो नाहीये." तो तिच्याशेजारी भिंतीला टेकून हाताची घडी घालून समोर बघत म्हणाला. तिने घाबरून त्याचा मूड बदलला तर नाही म्हणून त्याच्याकडे पाहिलं, पण तो शांत होता. "त्यांना माहीतही नसेल आत्ता मी आठवडाभर इथे आहे ते."

"पण एखादा शो बघायला तरी आले असतील नक्की! मी 'ला बेला' उघडलं तेव्हा माझी अख्खी फॅमिली आली होती सेलिब्रेट करायला.." ती म्हणाली.

"हूं! त्यांना माझ्या शोसाठी वेळ नाही. ते बिझी असतील तिसऱ्या मिसेस दिवाणबरोबर." तो कडवट हसत म्हणाला.

ओह! पुढे रिअ‍ॅक्ट करायचं टाळत ती म्हणाली.

"अ‍ॅट लीस्ट आत्ताच्या मिसेस दिवाण त्यांच्या वयाच्या तरी आहेत, आधीची तर त्यांच्या निम्म्या वयाची होती" तो पुन्हा वाईट चेहरा करत म्हणाला. आता पुन्हा त्याचा चिडलेला चेहरा आणि थंड डोळे तिला बघवत नव्हते.

त्याला नक्कीच मागच्या घटना आठवत असणार, पण स्वतःच्या वडिलांशी असा कसा काय वागू शकतो हा. स्वतःच्या वागण्याबद्दल तर याला काडीचा पश्चात्ताप दिसत नाहीये. आतापर्यंत जरा बरा वाटायला लागला होता पण तो फक्त देखावाच होता तर! इथून आता निघालेलंच बरं. ती विचारात पडली.

"असीम, जाऊदे सोड तो विषय. एक वाजत आलाय. आता पाऊसपण कमी झालाय, आपण खाली जायचं का? उतरायला तासभर तरी लागेल आणि मला आता खूप भूक लागलीय." ती जरा दमल्याचं नाटक करत म्हणाली.

"हम्म उतरुया.." तो भानावर येत म्हणाला.

पायथ्याशी पोहोचेपर्यंत दोघे शांत शांत होते. तिने इकडचे तिकडचे विषय काढायचा प्रयत्न केला पण त्याची उत्तरं एक दोन शब्दांच्या वर नव्हती.

"काय करायचं? पालवीमध्ये जायचं का, जवळपण आहे आणि त्यांची पावभाजी खूप मस्त असायची. आठवतंय ना?" ती कारमध्ये बसताच म्हणाली.

"हो, पण मी फार कधी गेलो नाही तिथे. एकतर ते घराच्या खूपच जवळ होतं. मी मित्रांबरोबर मोस्टली घरापासून लांब कुठेतरी जाणं प्रिफर करत असे. पण जाऊ आता तिथे, नो प्रॉब्लेम" आता तो बराच शांत झालेला दिसत होता.

ते दोघे रिकाम्या गार्डन एरियात जाऊन छत्रीखाली बसले. जेवताना ती फक्त त्याचंच निरीक्षण करत होती. आल्यापासून त्याने फक्त ऑर्डर सांगण्यापुरतं तोंड उघडलं होतं.

"मग इथल्या फूडबद्दल काय ओपिनियन? आय मीन प्रोफेशनली?" त्याने अचानक विचारलं. तिने दोन सेकंद दचकून त्याच्याकडे पाहिलं. आता बहुतेक तो मघाच्या डिप्रेसिंग मूडमधून बाहेर आला होता.

"चांगलं आहे, त्यांनी कॉलेज क्राऊडवर फोकस ठेवलाय अजूनही. ज्यूस आणि सॅलड बार नवीन झालेला दिसतोय, सो नवीन हेल्थ कॉन्शस लोकपण कव्हर्ड आहेत. इथलं बेसिक फूड आमच्या इतकंच चांगलं आहे. फक्त इंडियन आणि इटालियन एवढाच फरक." ती मिल्कशेकचा घोट घेत म्हणाली.

"हम्म, मला 'ला बेला'चा मेनू सरप्राईज होता. मला वाटलं होतं काहीतरी खूप एक्झॉटिक आणि मिक्स्ड अप डिशेस असतील. पण प्रॉपर इटालियन होमली फूडसाठी आपल्या शहरात एवढी गर्दी हे माझ्यासाठी नवीन होतं."

"सिम्पल आणि सस्टेनिंग या दोनच गोष्टी माझा क्लू होत्या. मला काहीतरी शोबाजी न करता इटलीच्या घरोघरी जे बेसिक जेवण बनतं त्या रिअल डिशेस इथे लोकांना खिलवायच्या होत्या. अँड इट वर्क्ड!" आता तिच्या बोलण्यात अभिमान आणि आत्मविश्वास दोन्ही झळकत होते.

"तू आता कूकिंग नाही करत ना?"

"नाही, आता नाही. सुरुवातीला कूकिंग, सर्व्हिंग, क्लिनिंग सगळं मीच पहायचे मग नुपूरा जॉईन झाली. काहीकाही दिवस इतके क्रेझी असायचे.. वेड्यासारखं काम केलं आम्ही. हळूहळू स्टाफ वाढला. ऑलीला हेड शेफ हायर केलं, तेव्हाही मी त्याला सहा महिने ट्रेनिंग दिलं. आता मी फक्त सगळं मॅनेज करते. मोठं व्हायचं तर काहीतरी हातातून सोडावं लागतं." ती जराशी हसत म्हणाली.

"पण तू ते सगळं मिस करतेस राईट?"

"हम्म मस्त दिवस होते ते. पॅशनेटली एका गोष्टीसाठी झोकून देणं, ते वेड हे मिस करते आता." डोळे मिचकवून ती हळुवार हसली. त्याने किती सहजपणे तिचं मन ओळखलं होतं. "वडिलांना जॉईन न करता मला माझं रेस्ट्रॉंट उभं करायचं होतं. ते एकच स्वप्न होतं माझं. दादाने त्यांचा बिझनेस जॉईन केला आणि ते आता त्याच्याकडेच मुंबईतच असतात. मी इथे एकटीने झपाटल्यासारखी मेहनत केली, पण आता मस्तपैकी सगळं सेटल झालंय. कितीतरी लोक आयुष्यभर चक्राला बांधल्यासारखे त्यांचं तेच तेच आयुष्य जगत रहातात, त्यांना कळतही नसतं त्यांना काय हवंय. कायम सेफ आणि सिक्युअर राहतात, रिस्क किंवा भीतीचा लवलेशही नको असतो त्यांना. पण जोपर्यंत ते डोंगर चढायला घेत नाहीत तोपर्यंत कसं कळणार? आयदर तुम्ही तोंडावर पडाल किंवा शिखरापर्यंत पोहोचाल पण आधी एक पाऊल बाहेर तर टाका! हेच फॉलो केलं आणि इथपर्यंत आले.." ती त्याच्या डोळ्यात पहात मनापासून बोलत होती. त्याच्या डोळ्यात दिसणारी समज आणि जाणीव पाहून तिला जरा आश्चर्य वाटलं आणि तेव्हाच क्लिक झालं..

"तू पण हेच तर केलंय.. इतकं शिकल्यावर मध्येच.."

"एका दगडावरून दुसरीकडे उडी मारली! राईट" तो तिच्याकडे हसून बघत म्हणाला. "कॉलेजमधल्या सगळ्यांना अजूनही वाटतं की मी इतकं हाय फ्लाईंग करियर सोडून कसं देऊ शकतो."

"हम्म, इथेही सगळ्यांना वाटलं होतं की एवढा ब्रिलीयंट स्टुडंट अकॅडेमीकली काहीतरी खूप मोठं नाव कमवेल. मग तू कॉमेडीकडे कसा काय स्विच झालास?" तिच्या मनात बराच वेळ असलेला प्रश्न तिने विचारला.

"थोडक्यात एक रागीट, हट्टी, बोरिंग माणूस स्वतःला फनी कसा समजायला लागला, असंच ना?" त्याने गंभीरपणे विचारले. ती खांदे उडवत हसली. "बघ मी जे आधी कमीडियन्सबद्दल माझं मत सांगितलं होतं ते अगदीच वन सायडेड होतं. तुझा शो पाहिल्यावर मला रिअलाईज झालं की मी किती चुकीची होते. यू वर ऍबसल्युटली ब्रिलीयंट! मला खूप आवडला शो!" तिच्या डोळ्यातलं हसू आता त्याच्या डोळ्यांपर्यंत पोहोचलं होतं. मान झुकवत त्याने त्या ग्लॅमरस आवाजात "थँक यू" म्हटलं.

"खरं सांगायचं तर लहानपणापासून मी चुकूनही अ‍ॅक्टींग करणार नाही असं ठरवून टाकलं होतं. शो बिझनेसवाल्या लोकांचा तिटकारा होता मला." त्याच्या आवाजाला आता सुरीसारखी धार आली होती.

ती शांत राहून त्याचं सगळं बोलणं कानात साठवत होती.

"का ते तुला कळलं असेल. सो माझी दिल्लीला ऍडमिशन झाली. तिथलं गणित सोपं होतं, अभ्यास करायचा, मोठा लॉयर व्हायचं, भरपूर पैसा कमवायचा की लाईफ सेट. लॉ स्कूलमध्ये मूट कोर्ट्स वगैरे मध्ये भाग घेतला की थोडी डायलॉगबाजी, अ‍ॅक्टींग करावीच लागते त्यामुळे पब्लिक स्पीकिंगची सवय होती. तेव्हाची माझी गर्लफ्रेंड नेहा, इंटर कॉलेजीएट प्लेज, कॉम्पिटिशन्स मध्ये असायची."

नॉट दॅट इट मॅटर्स पण तिच्या छातीत बारीकशी कळ आली.

"ने.. तिच्याबरोबर सारख्या रिहर्सल्स अटेंड करून करून.. "

परत दुसरी कळ. तिने स्वतःच्याच मनगटाला चिमटा काढला.

"माझाही अख्खा प्ले आपोआप पाठ होता आणि ऐन वेळी त्यातला एक ऍक्टर बाईकवरून पडला आणि पाय मोडून बसला. मग काय युअर्स फेथफुली आहेतच! तेव्हा त्यात ऐनवेळी काम केलं आणि मग ती पॅशनच बनली. मग ते करता करता जाणवायला लागलं की कॉमेडी मला जास्त चांगली जमतेय मग त्याच्यावर फोकस केला. पण तेव्हा ती फक्त हॉबी होती. नंतर लॉ पूर्ण झालं. माझं करियर नीट सुरू झालं होतं, हातात पैसा येत होता. दिल्लीतली कनेक्शन्स चांगली जुळली होती आणि कॉलेजमध्ये GS ची निवडणूक जिंकल्यामुळे पॉलिटिक्स मध्येही एन्ट्री मिळत होती. पण मजा नव्हती, काहीतरी मिसिंग होतं." आता सांगताना त्याचे डोळे चमकत होते.

तेव्हाच एकदा एक अनाथाश्रम पाडून तिथल्या मुलांना वेगवेगळ्या दुसऱ्या ठिकाणी देऊन टाकणार होते. त्याच्याविरुद्ध आमच्या पक्षाने मोर्चा काढला होता. नंतर तिथेच अंगणात स्टेजवर लोक उपोषण करत होते आणि ती मुलं समोर बसली होती. पण ओव्हर ऑल त्या सगळ्या गोष्टीतून स्वतःचा फायदा बघणारे लोक पाहून मला वीट आला होता. त्या मुलं बिचारी रडवेली झाली होती. तेव्हाच मी माईक घेतला आणि त्यांना एंटरटेन करायला लागलो. जशी ती खदखदून हसायला लागली तेव्हा जोश येऊन मी बाकी लोकांवर, त्यांच्या भ्रष्टाचारावर खूप बोललो. त्याची पेपर, टीव्हीवर खूप चर्चा झाली आणि शेवटी तो अनाथाश्रम वाचला. तेव्हापासून ठरवलं की डायरेक्ट सामान्य लोकांपर्यंत गोष्टी पोचवायला हव्यात आणि कॉमेडीच्या माध्यमातून पोचल्या तर त्या जास्त लोकांपर्यंत पोहोचतात. हे सुचल्यावर असिमेट्रिकची कॉन्सेप्ट आणि पाहिलं स्क्रिप्ट लिहून काढलं. नव्या घटना घडतील तसं स्क्रिप्ट बदलत असतं. प्रत्येक शो वेगळा असतो."

"अमेझिंग!" आ केलेल्या तोंडाने ती एवढंच बोलू शकली. त्याची कामाबद्दलची पॅशन पाहून तिला आपल्यासारखंच कुणीतरी भेटल्याचा आनंद झाला होता. ती त्याला जसा समजत होती तसा तो अजिबातच नव्हता. "तू लोकांना हसवतो तर आहेसच पण त्याचवेळी त्यांना विचार करायला भाग पाडतोस."

"एक्झॅक्टली! दॅट्स द पॉइंट!" तो खूष होत म्हणाला.

तेवढ्यात आतून काचेचं मेन डोअर ढकलून कोणीतरी बाहेर आलं. तिकडे लक्ष जाऊन त्याने ओठ मुडपून मान वळवली. त्याच्या डोळ्यात पुन्हा तोच राग दिसत होता. त्याचा मूड पुन्हा पहिल्यासारखा कडूकडू होत चाललेला तिला जाणवला. इतकं अचानक बदलायला काय झालं म्हणून तिने वळून मागे पाहिलं तर स्वतः विक्रम दिवाण त्यांच्या दिशेने चालत येत होते.

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle