विक्रम दिवाण! उंच, भारदस्त व्यक्तिमत्व. समोरच्या माणसाचा वेध घेणारे हिरवट घारे डोळे, अगदी असीमसारखेच! पण असीमसारखी चमक आता त्या डोळ्यांत उरली नव्हती. झुकलेले खांदे, दमलेला सुरकुतलेला पण अजूनही जुन्या दिवसांची आठवण करून देणारा देखणा चेहरा आणि विरळ झालेले केस अश्या रूपात त्यांना पाहून तिला वाईट वाटलं. कितीतरी वर्षांनी बघत होती ती त्यांना. चेहराही आता बराच मवाळ झाल्यासारखा दिसत होता, नाहीतर लहानपणी त्यांच्या रागाच्या किश्श्यानी पेपरचे गॉसिप कॉलम्स भरलेले असत.
क्षणभर त्यांचे आणि असीमचे डोळे एकमेकांना भिडले आणि त्यांच्या डोळ्यात एकाचवेळी ओळख, प्रेम, राग, गिल्ट सगळे भाव एकामागे एक चमकून गेले. "असीम!" हाक मारताना त्यांचा आवाज जरा कातर झाला होता. तिच्या समोर असीम उठून उभा राहिला. "बाबा" त्याच्या एकाच शब्दात बेफिकिरी, राग, वेदना आणि वरवर दाखवायची नम्रता सगळं भरलेलं होतं. त्याच्या चेहऱ्यावर हास्याचा लवलेशही नव्हता. त्यांनी पुढे केलेला हात त्याने मुद्दाम इग्नोर केला. तेवढ्यात त्याचं लक्ष त्यांच्यामागे गेलं, "मिसेस दिवाण!" तो मान हलवून म्हणाला. तेव्हा बेलानेही वाकून पाहिलं. त्यांच्यामागे गोऱ्या, प्रेमळ चेहऱ्याच्या, बुटक्याश्या, बऱ्याचश्या पांढऱ्या केसांची एक लहानशी पोनीटेल आणि फुलाफुलांची पेस्टल शिफॉन साडी नेसलेल्या मिसेस दिवाण उभ्या होत्या. असीमने म्हटल्याप्रमाणे त्या वयाने त्याच्या वडीलांएवढ्याच वाटत होत्या.
"फॉरमॅलिटी नको असीम, हवं तर तू मला स्मिताकाकू म्हणू शकतोस." त्याच्या थंड प्रतिसादाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं होतं. "भेटून बरं वाटलं असीम, तू लग्नाला येऊ शकला नव्हतास." शांतपणे त्या पुढे म्हणाल्या.
बेलाने असीमकडे पाहिलं. मिसेस दिवाणानी शांतपणे मांडलेला मुद्दा त्यांच्यापर्यंत पोचला होता. "हो, मी खूप बिझी होतो तेव्हा. माझे एकामागे एक शो बुक झाले होते." एक क्षण त्याला थोडं गिल्टी वाटल्यासारखंही वाटलं पण ते चेहऱ्यावर न दाखवता त्याने बेफिकीरीने उत्तर दिलं.
"ऑफ कोर्स!" जरा धार आलेल्या आवाजात त्या म्हणाल्या. "तुझं करिअर आता छान होताना दिसतंय. आम्ही काल तुझा शो पाहिला.."
तो एकदम उडालाच. डोळे विस्फारून त्याचे गाल जरासे लाल झाले होते आणि काय बोलावं त्याला सुचत नव्हतं. टेबलवर टेकलेला त्याचा हात जरा थरथरताना दिसला तेव्हा बेलाच पुढे झाली. "आपण सगळे आधी बसून बोलूया का? मिसेस दिवाण?" शेजारची खुर्ची त्यांच्यासाठी सरकवत तिने विचारलं. त्यांनी तिच्याकडे बघून हसून ओठांनीच थँक यू ची खूण केली. एव्हाना मिस्टर दिवाणही खुर्चीत बसले होते. असीम मात्र हट्टाने उभाच होता. "असीम?" तिने वर त्याच्याकडे बघत विचारले.
"आपल्याला निघायला हवं. मला लवकर जाऊन काही कामं आहेत" तो दोन्ही हात टेबलावर ठेऊन झुकून तिच्याकडे बघत म्हणाला.
"कुठे थिएटरवर? तू तर म्हणत होतास सहा पर्यंत काही काम नाही? आणि अजून माझा लंच पण संपायचा आहे" मिल्कशेककडे बोट दाखवत ती म्हणाली. तिला त्याची खिचाई करायला मजा येत होती. इट्स हाय टाइम, त्याने त्याच्या वडिलांना आता फेस करायलाच हवं होतं.
"मी स्वतःची ओळख करून देते, मी बेला इनामदार." ती हसून म्हणाली.
"अच्छा.. मी ऐकलंय तुझं नाव. इटालियन रेस्ट्रॉंटची मालकीण. बरोबर ना?" जरासं हसण्याचा प्रयत्न करत विक्रम दिवाण म्हणाले.
"बरोबर. तुम्ही आलाय कधी तिथे?"
"नाही, सध्या आमचं बाहेर जाणं अगदीच बंद आहे.. गेले काही महिने यांची तब्येत जरा नाजूक आहे.. आत्ताही.. " मिसेस दिवाण हळू बोलत होत्या.
तिच्या शेजारी धुमसत गप्प बसलेल्या माणसाच्या डोळ्यातल्या ठिणग्या आणि रागाच्या लाटा त्याच्याकडे न बघताही हवेत करंट असल्यासारख्या तिला जाणवत होत्या. तिकडे दुर्लक्ष करत तिने पुन्हा विचारलं. "ओह आणि तरीही तुम्ही असीमचा शो बघायला आलात.. आवडला तुम्हाला?"
"खूप आवडला." विक्रम दिवाण असीमकडे पहात म्हणाले. त्यांच्या डोळ्यात आता असीमसाठी फक्त प्रेम आणि समाधान दिसत होतं. "मला कधी जाणवलंच नाही..
ते बोलत असतानाच असीमने पाणी पितापिता त्याचा ग्लास टेबलावर आपटला.
"याची काही गरज नाही. तुमची ही केअरिंग वडिलांची acting बंद करा. इथे कोणीही तुमचं हे नाटक बघायला उत्सुक नाही."
असीम!
पण...
हे बरोबर नाही.
बेला, मिस्टर आणि मिसेस दिवाण तिघेही एकाच वेळी उद्गारले. खुर्ची जोरात मागे सरकवून असीम उभा राहिला. "इफ यू विल एक्स्क्यूज मी, मला निघायचं आहे. बेला, तुला पाच मिनिटं देतोय, मी गाडीत असेन. पाच मिनिटात मी निघेन, तुझ्याबरोबर किंवा तुझ्याशिवाय!" काहीच न घडल्यासारखा थंडपणे बोलून तो ताड ताड बाहेर निघून गेला.
दिवाणांचा चेहरा आता पांढरा फटक पडला होता.
"आय एम सॉरी.." बेला हळूच म्हणाली.
"तू अपसेट नको होऊ." मिस्टर दिवाण जरासं हसायचा प्रयत्न करत म्हणाले. "आमचं नातं पहिल्यापासून बरंच ताणलेलं आहे. माझ्यासारखाच हट्टी आहे तो. फक्त माझ्या चुका त्याने करू नयेत आता..." ते श्वास सोडत म्हणाले. "त्याच्या आईने वाढवलं त्याला त्यामुळे त्याची सगळी लॉयल्टी आईकडे आहे. मी माझ्या कामात बिझी होतो... आणि तेव्हा माझ्या हातून खूप चुका झाल्या. मी मान्य करतो. सगळ्यात मोठी चूक म्हणजे असीमकडे माझं दुर्लक्ष झालं... त्याची आई वारल्यानंतर तो वर्षभर माझ्याकडे होता. पण आमच्यात काही भांडण झाल्यामुळे तो निघून गेला दिल्लीला. त्याच्या शिक्षणाची तरतूद त्याच्या आईने आणि मी मिळून आधीच करून ठेवली होती. तेव्हापासून परत भेटलाच नाही मला" ते कपाळावरचा घाम पुसत म्हणाले.
"तुम्ही आता स्वतःला त्रास नका करून घेऊ.." मिसेस दिवाण त्यांच्या हातावर थोपटत म्हणाल्या. "बेला, असीमने खूप हर्ट केलंय यांना. गेली इतकी वर्ष ते एकट्याने सहन करत होते. त्यांना त्यांच्या चुका मान्य आहेत पण असीमनेही त्यांना आता माफ करायला हवं ना."
हम्म यांचं असीमवर किती प्रेम आहे, त्याला का जाणवत नाहीये हे... ती स्वतःशीच वैतागली होती.
"तो मित्र आहे का तुझा? तुला काय वाटतं त्याच्याबद्दल?" त्यांनी तिच्याकडे बघत विचारलं.
"नाही नाही, आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो पण आत्ताच रिसेंटली परत भेटलो."
"हम्म, पण तो तुझं ऐकतो असं वाटतंय मला. त्याला प्लीज सांग, मला त्याच्याशी बोलायचं आहे. माझी चूक सुधारायला मी काहीही करेन. भूतकाळ विसरून मला नवी सुरुवात करायची आहे. माझ्याकडे वेळ कमी आहे आता. प्लीज सांग त्याला बेला." ओढलेल्या चेहऱ्याने तिच्याकडे पहात ते म्हणाले.
"मी बोलेन त्याच्याशी. पण त्याचा काही उपयोग होईल असं काही मी प्रॉमिस नाही करू शकत."
"ठीक आहे पण बोल नक्की." ते पुन्हा म्हणाले. "आणि आमचे आशीर्वाद सांग त्याला."
"हो, तो वाट बघत असेल, येते मी." म्हणून ती उठून सॅक खांद्याला लावत घाईघाईत पार्किंगमध्ये गेली.
स्टेअरिंगवर घट्ट मुठी आवळून ताठ बसलेली त्याची आकृती लांबूनच तिला दिसत होती.
"असीम! असा निघून का आलास तिथून? तुझ्या बाबांना बोलायचं होतं तुझ्याशी." ती दार उघडून त्याला म्हणाली.
"आमच्यात बोलण्यासारखं काहीही उरलेलं नाहीये. आम्ही अनोळखी आहोत एकमेकांना. आणि मी कधीही त्यांच्याशी कुठलाही संबंध ठेवणार नाही." त्याच्या कपाळावरची शीर रागाने उडत होती.
"हे खोटं आहे. त्यांना तुझी काळजी आहे. ते दुःखी आहेत, त्यांना गरज आहे तुझी. एकटे पडलेत ते असीम..
"त्यांची बायको आहे त्यांना सोबत."
"हो त्या आहेत, प्रेमळ आहेत, त्यांची काळजीही घेतात. पण तू त्यांचा एकुलता एक मुलगा आहेस. त्यांच्या हाडामासाचा.."
"स्टॉप इट! काहीतरी चीप नॉवेलमधली वाक्य बोलू नको. मला माहिती होतं तू नक्कीच त्यांच्या कन्सर्न्ड, प्रेमळ बापाच्या नाटकाला फसशील. हूं! तशाही बायका लगेच फसतात त्यांना." तो खुनशी हसत म्हणाला. "काय म्हणाले ते?"
"त्यांचं म्हणणं होतं की तू तुझ्या आईशी लॉयल आहेस. त्यांनी त्यावेळी चुका केल्या आणि त्या त्यांना सुधारायच्या आहेत."
"का नसेन लॉयल मी? तिने खस्ता खाऊन वाढवलं मला. माझ्या शिक्षणासाठी पै पै वाचवून सेव्हिंग्ज केली. ती आजारी होती, कॅन्सर होता तिला. आमच्याकडे ट्रीटमेंटसाठी पुरेसे पैसे नव्हते तेव्हा हा माणूस पार्ट्यांमधून मिरवत होता. आई गेली त्या शेवटच्या आठवड्यात हे बघायला आले तिला. ती गेल्यावर मग लोकांना दाखवायला म्हणून मला घरी घेऊन गेले. ते वर्षभर मी काय करतो याच्याकडे कणभर लक्ष नव्हतं त्यांचं" तो दातओठ खात म्हणाला.
"ते म्हणाले तुमचं भांडण झालं, तू घरातून निघून गेलास.."
"हाह! निघून गेलो? हाकलून दिलं त्यांनी मला. का ते सांगितलं नसेल ना? कारण त्यांच्या बायकोबरोबर मी त्यांना बेडमध्ये सापडलो होतो." तो जोरात श्वास घेत रागाने लाल झालेल्या चेहऱ्याने ओरडून म्हणाला.
ती दोन क्षण पूर्ण ब्लॅंक झाली. त्याच्याबद्दल तिच्या मनात तयार होत असलेल्या प्रतिमेचा पूर्ण चक्काचूर झाला. रागाने डोळ्यातून पाणी येऊन सगळं अंधुक दिसायला लागलं होतं.
"डिस्गस्टिंग माणूस आहेस तू! कुठला मुलगा त्याच्या वडिलांना हे दुःख देईल? माणूस म्हणायच्याही लायकीचा नाहीस तू. निघून जाss निघून जा इथून. परत कधीही तोंड दाखवू नको मलाss" ती किंचाळत म्हणाली आणि तिने खाडकन कारचं दार ढकलून दिलं. एक क्षण त्याने दार पुन्हा उघडायला हात पुढे केला पण लगेच बाजूला होत गाडी सुरू केली. प्रचंड वेगात गाडी रिव्हर्स घेत, वळून तो गेटच्या बाहेर निघून गेला.