सोमवारची उदास सकाळ सोबतीला तुफान पाऊस घेऊन आली होती. खिडकीबाहेर नुसता करड्या धुक्यासारखा पाऊस दुमदुमत होता. बेला तिच्या केबिनमध्ये बसून समोर स्क्रीनवर टॅलीमधल्या आठवड्याच्या एंट्रीज चेक करत होती. टेबलभर सगळीकडे बिल्स, रिसीट्स आणि हिशोबांचे कागद पसरलेले होते. पण तिचं डोकं अजिबात चालत नव्हतं. काही टोटल अजिबात जुळत नव्हत्या. तिने चष्मा काढून टेबलावर ठेवला आणि खिडकीच्या पावसाने धुरकट झालेल्या काचेतून बाहेर पहात हातातली पेन्सिल चावायला लागली.
"बेला, माझ्याकडे एक भन्नाट आयडिया आहे" धाडकन उत्साहाने आत येत नुपुरा म्हणाली.
"बोला" बेला वर बघून म्हणाली. तिला आत्ता नवीन काहीही प्लॅन करायचा अजिबात मूड नव्हता. शुक्रवारी दुपारी असीम निघून गेल्यावर ती उन्हातून त्या वितळणाऱ्या डांबरी रस्त्यावर तशीच वाट फुटेल तशी चालत राहिली होती. तिला परत फिरून मिस्टर दिवाणांना फेस करायची अजिबात ताकद उरली नव्हती. त्याने ज्या थंडपणे ते विधान केले होते त्यावरून त्याला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप तर नव्हताच पण तो त्याच्या वडिलांच्या प्रेमालाही पात्र नव्हता. ती नंतर कशीबशी घरी पोहोचली खरी पण मनात घोळणाऱ्या विचारांमुळे तिचं धड कशातच लक्ष लागत नव्हतं. पुढचे विकेंडचे दोन्ही दिवस इतक्या गर्दीचे होते की तिला स्वतः विचार करायला वेळच नव्हता. त्यातल्या त्यात एवढ्याच गोष्टीचं सुख होतं की दौरा आटपून रविवारीच तो तिच्या शहराबाहेर निघून गेला होता. आजपासून तो कुठे अचानक भेटण्याचीही भीती नव्हती.
"बेलाss तू ऐकते आहेस का, मी इतका वेळ काय सांगतेय ते?" नुपुरा तिच्या तोंडासमोर हात हलवत जोरात म्हणाली.
"हुं! सॉरी बोल, बोल.. कशाबद्दल बोलत होतीस?"
"असीम! असीम दिवाण?" नुपुरा तिच्याकडे पहात म्हणाली.
बेलाच्या भुवया आक्रसल्या. तिला आता त्याचं नावही ऐकावसं वाटत नव्हतं. "त्याचं काय?"
"आपण मध्ये बोललो होतो ना पब्लिसिटी बजेट वाढवण्याबद्दल. तू मला नवीन आयडिया सुचवायला सांगितल्या होत्या. मी त्याच्यावर काम सुरू केलंय. तुला ती नताशा माहितीये ना? व्हाईट एलिटच्या मार्केटिंग टीममध्ये आहे ती. तर ती सांगत होती की असीमचे इथले सगळेच्या सगळे शो हाऊसफुल झाले होते आणि भरपूर एन्क्वायरीज पण आल्या त्याला बुक करायला. आणि मुख्य म्हणजे तो थिएटरबरोबरच मोकळ्या वेळात लहान गिग्स पण करतो, रेस्ट्रॉंट किंवा ओपन कॅफेमध्ये. गेट इट?" तिने भुवया उंचावत विचारले.
"ओह! ओके" बेला एवढंच म्हणू शकली.
"तसंही सध्या मार्केट जरा स्लो आहे, आपली रोज पाच सहा तरी टेबल्स एम्प्टी जातायत. वी नीड सम काइंड ऑफ बूस्ट. आणि गर्दी खेचायला हा बेस्ट मार्ग वाटतो मला." नुपूराचा उत्साह आता उतू चालला होता.
"मला नाही वाटत हे वर्कआऊट होईल" ती नाराजीने म्हणाली पण मनात ही खरी ग्रेट आयडिया आहे हे तिला मान्य होतं. पण असीमचा पुन्हा नुपुरा आणि तिच्या आयुष्यात काही संबंध येऊ नये असंही वाटत होतं.
"बघूया पुढे. अभिषेक कसा आहे?" बेलाने विषय बदलत म्हटले.
"अगं काय! मी इतका वेळ घालवून, विचार करून तुला काहीतरी आयडिया देतेय आणि तू विषय का बदलतेस? असीमला सुद्धा आवडली होती ही कल्पना. आणि अभी मस्त आहे, अजूनही भरपूर ओव्हरटाईम करतो आहे." ती रागात म्हणाली.
"काय? असीमशी कधी बोलणं झालं?"
"आम्ही लंचला नाही का गेलो होतो, नवाबमध्ये? आठवलं?" नुपुराने डोळे मोठे करत पुढे विचारलं. "मी ऐकलं तुझं त्याच्याशी भांडण झालं, त्यामुळे तर नाही ना हे सगळं?"
"असं काही नाही, मी कशाला काळजी करू. माझा काय संबंध. भांडण झालं असं कोण म्हणालं तुला?" ती काहीच न घडल्यासारखं म्हणाली.
"असीम म्हणाला." नुपूराने सहज उत्तर दिले.
"काय? कधी?" आता ती पूर्ण शॉक झाली होती.
"शनिवारी मला सुट्टी होती आणि अभि ऑफिसमध्ये होता. मी खूप कंटाळले होते आणि तेव्हाच असीमचा कॉल आला. मग त्याचा फेवर रिटर्न करायला मी त्याला घरी जेवायला बोलावलं. सो लंच करता करता बऱ्याच गप्पा झाल्या. तेव्हा त्याने सांगितलं तुमच्यात काहीतरी वाद झाले म्हणून."
"म्हणजे तू त्याला परत भेटलीस. मी तुला सांगितलं होतं ना त्याच्यापासून लांब रहा म्हणून. मला त्याच्यावर अजिबात विश्वास नाहीये. त्याच्याबद्दल जे काही ऐकलं ते.."
"बेल्स, मला माझं जजमेंट आहे. त्याला लोक काय म्हणतात तेही ऐकलंय. पण तो तसा अजिबात नाहीये. मी जितका वेळ त्याला भेटले, मला तो खूप केअरिंग आणि समजूतदार वाटला. रविवारी इथून निघतानासुद्धा त्याने मला कॉल केला बाय म्हणायला." नुपूरा तिला मध्येच थांबवत गंभीर होत म्हणाली.
बेलाचा तिच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. नुपूरा जर इतकी त्याच्या प्रभावाखाली असेल तर तिच्या लग्नाचं काय, अभिचा काही विचार करते की नाही ही. बेलाला काही समजेनासं झालं होतं. फक्त असीमसारख्या निर्लज्ज, नालायक माणसापासून आपल्या मैत्रिणीला लांब ठेवायला हवं ह्या एकाच गोष्टीवर तिने मेंटल टिकमार्क केला होता.
"पण बेला, तू त्याच्या इतकी अगेन्स्ट का आहेस? इतक्या वर्षांपूर्वीचा राग तू अजूनही मनात धरून ठेवला आहेस असं मला वाटतंय." म्हणून नुपुरा तिथून बाहेर निघून गेली. आणि बेला पुन्हा बारावीच्या वर्षात पोहोचली. सेंडऑफ पार्टीच्या आधीचा अख्खा महिना तिने वेगवेगळ्या प्रकारे असीमशी बोलायच्या प्रयत्नात घालवला होता. हर तऱ्हेने तिने फ्लर्ट करून पाहिलं पण तो अजिबात तिला दाद देत नव्हता. हा तिला तिच्या तेव्हाच्या क्वीन बी स्टेटसचा मोठाच अपमान वाटत होता. शेवटी ती धीर करून संध्याकाळी त्याला बास्केटबॉल कोर्टवर एकटाच प्रॅक्टिस करताना बघून थांबून राहिली. नंतर तिने तिचे सगळे प्रयत्न करूनही तो हो म्हणाला नाही.
शेवटी जेव्हा तिने त्याला मिठी मारली, तेव्हा त्याने तिच्या टॉपची कॉलर धरून रागाचे फुत्कार सोडत तिच्या डोळ्यात पहात विचारलं, "अजून किती लेव्हल्स खाली उतरणार आहेस तू बेला? तुला वाटतं तू इथली क्वीन आहेस? सगळी मुलं तुला भाव देतात? हाहा! तीच मुलं तुझ्यामागे तुला काय म्हणतात ते जाऊन ऐक एकदा!" आणि त्याने ती सगळी नावं एकेक करून तिला सांगितली. ती आता तोंडावर हात घेऊन रडत होती.
"आपल्या शरीराचा वापर करून पुढे जाणाऱ्या सेल्फ सेन्टर्ड मुलींना काय म्हणतात माहिती आहे ना? हुं! मी तरी कुणाशी बोलतोय! तुझ्यासारख्या सगळ्या बायका अश्याच असतात. चीप!! जा पळ, घरी जा लवकर."
ती शरम आणि रागाने पाणीपाणी होत डोळे पुसत तिथून पळून तर गेली, पण कोणीतरी हे सगळं घडताना बघितलं होतं आणि त्यावरून पुढे अख्खं वर्ष संपेपर्यंत तिचं कॉलेजमध्ये हसं झालं होतं. त्यातच तिच्या जखमेवर मीठ चोळत तो सेंडऑफ पार्टीला गेला होता. तेही फर्स्ट बेंचवर बसणाऱ्या नम्रताला घेऊन, जिच्याकडे कधी कुठल्या मुलांनी ढुंकूनही पाहिलं नव्हतं, तिला! तो अपमान बरीच वर्षे तिच्या जिव्हारी लागला होता.
या सगळ्या तिने मागे टाकलेल्या आठवणी परत येणं म्हणजे शांत तळ्याचा तळ हलवून गढूळ चिखलाच्या पाण्यात डुबकी मारून वर आल्यासारखं तिला वाटलं.
"बेला, हे घे" नुपुरा दारातून कॉफीचा मोठा मग घेऊन आत येत म्हणाली. "डबल एस्प्रेसो विदाऊट शुगर. तुला हवी तशी. दिस विल क्लिअर योर हेड!"
"थँक्स नुपूर! यू आर माय सेव्हीअर!" दोन्ही हातांनी मग उचलत ती मनापासून म्हणाली.
"मी जुन्या गोष्टी नाही उकरत, पण तो खरंच चांगला नाहीये. आणि मला खरंच वाटतं की तू लांब रहावं" बेला पुन्हा ठासून म्हणाली.
"त्याचा इतका तिरस्कार तुला शुक्रवारी तर वाटत नव्हता. मग आताच काय झालं?" नुपुराने चौकशी केली.
"आम्ही पालवीमध्ये जेवत असताना त्याचे वडील भेटले. तो त्यांना हर्ट करून काही न बोलता निघून गेला. मी बाहेर जाऊन सांगायला गेले तर तिथेही भांडून निघून गेला. त्याने त्याच्या वडिलांशी असं वागणं तेही आता या वयात मला अजिबात पटलं नाही."
"हम्म फेअर इनफ! त्याचे वडीलही काही संत माणूस नाहीत. आता ते झाले असतील वाल्याचे वाल्मिकी पण म्हणून तो जुन्या गोष्टी अश्या एका क्षणात विसरून जाईल असं नाही ना! त्यांचं हे आत्ताचं लग्न..
"हम्म तिसरं लग्न. माहिती आहे. पण ह्या मिसेस दिवाण खरंच चांगल्या आहेत" बेला तिचं वाक्य मध्येच तोडत म्हणाली.
"हो, असीमलाही चांगल्या वाटल्या त्या. म्हणाला तो. पण त्याला तिथे फारच अनकम्फर्टेबल वाटलं म्हणून तो बाहेर निघून गेला. हेही म्हणाला तो. असो! जरा शांत बस आणि कॉफी एन्जॉय कर" म्हणून दार लावून नुपूरा बाहेर गेली.
"हम्म. का परत आलास तू असीम दिवाण??" स्क्रीनकडे नजर वळवत ती मोठ्याने म्हणाली. टेबलावर काढून ठेवलेले एअरपॉड्स तिने पुन्हा कानात घातले आणि ऐकत असलेली गजल कन्टीन्यू केली.
हुई है शाम तो आँखों में बस गया फिर तू
कहाँ गया है मेरे शहर के मुसाफ़िर तू
बहुत उदास है इक शख़्स तेरे जाने से
जो हो सके तो चला आ उसी की ख़ातिर तू...
क्रमश: