गेले दोन आठवडे पाऊस उसंतच घेत नव्हता. धरण भरून, सगळे दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले होते, तरीही वादळी पावसाची संततधार सुरूच होती. हायवेला दरड कोसळून वाहनांची रांगच रांग लागली होती. बेलाच्या आई-बाबांनीही पावसामुळे त्यांचं येणं कॅन्सल करून टाकलं. बेला सकाळपासून टीव्हीच्या लोकल चॅनलवर मेन रोडवर पाणी भरल्याच्या बातम्या बघत होती. 'ला बेला'च्या आजूबाजूला पाणी भरलं होतंच. तिने लगेच सगळ्या स्टाफला फोन करून सुट्टी दिली.
सगळ्या खिडक्या बंद करूनसुद्धा घरात खूप थंडी वाजत होती. भिंती आणि फरश्या दोन्ही थंडगार पडलं होतं. सकाळी तिला नेहमीप्रमाणे लवकर जाग आली. स्टाफला सुट्टीचं सांगून झाल्यावर उठून तिने आंघोळ केली, केस डोक्यावर उंच गुंडाळून मेसी बनसारखं काहीतरी केलं आणि ग्रे स्वेटपँटसवर एक लूज, पातळसा काळा कार्डिगन घालून दुलईत घुसून पोटावर लॅपटॉप ठेऊन एक टाईमपास रोमँटिक सिरीयल बिंज करू लागली.
एक दोन तासांनी तिला कॉफीची आठवण आली म्हणून उठून पायात सपाता सरकवून ती किचनकडे निघाली तोच पावसाच्या कॉन्स्टंट आवाजातून वेगळा डोअर बेलचा टिंग टॉंग आवाज आला. आत्ता अश्या पावसातून कोण येऊ शकतं? ती जागीच थबकली. अचानक तिच्या मनात 'कौन' मधली घाबरलेली उर्मिला येऊन गेली. "हा हा हा" करून स्वतःलाच इव्हील लाफ देत ती दार उघडायला गेली.
तिने डोळा बारीक करून दरवाज्याच्या आय होलमधून बघितलं पण पावसाने ती काचही धुरकटली होती. बाहेर जाड काळं रेनी जॅकेट घातलेला कोणीतरी उंच माणूस उभा आहे एवढंच दिसत होतं. तिने दार उघडून समोर पाहताक्षणी ते घारे डोळेच आधी तिच्या डोळ्यात घुसले. "ओह नोss" म्हणत पटकन तिने दार बंद करायला ढकलले. तेवढ्यात त्याने दारावर हात ठेवत ते रोखून धरले.
"प्लीज बेल्स! त्याचा आवाज जरा हळू आणि घोगरा येत होता. "आपल्याला काही गोष्टी बोलून क्लिअर करायला हव्यात."
"नो, वी डोन्ट!" ती दारावरचा हात न काढता तसंच पुढे ढकलायचा प्रयत्न करत म्हणाली. "काय बोलायचं ते आधीच बोलून झालंय आपलं. आणि मी --"
"मला माफी मागायचीय." तिचं बोलणं तोडत तिच्या डोळ्यात पहात तो म्हणाला.
हे इतकं अनएक्सपेक्टेड होतं ती आ करून त्याच्याकडे पहातच राहिली आणि हळूहळू तिच्या डोळ्यात एक मिश्किल चमक दिसायला लागली होती. द ग्रेट मिस्टर असीम दिवाण माफी मागणार! ती ते हसू ओठांपर्यंत येऊ न देण्याचा जाम प्रयत्न करत होती.
"आय ओ यू ऍन अपॉलॉजी." तो हळुवारपणे म्हणाला.
"टू डॅम राईट!" ती तिरकस हसत म्हणाली. "फक्त मलाच नाही तर तुझे बाबा, मिसेस दिवाण, नुपूरा... सगळ्यांनाच!"
"नुपूरा? ती कुठून आली यात." त्याला कोड्यात पडलेलं पाहून ती जरा ढेपाळली. त्याचे डोळे तिला यावेळी खूप मऊ, समजूतदार वाटत होते.
"एनीवे, तू सगळ्यात आधी माफी तुझ्या वडिलांची मागितली पाहिजे. आधीच बारा तेरा वर्ष लेट आहेस तू." ती मुद्द्यावर येत म्हणाली.
"त्याबद्दलच मला आधी तुझ्याशी बोलायचं आहे." तो पुन्हा आर्जवी नजरेने पहात म्हणाला.
ती आपल्या म्हणण्यावर ठाम होती पण एकीकडे तिची नजर लॉबीच्या काचेतून बाहेर वेड्यासारखा कोसळणारा पाऊस, पार्किंगमध्ये टायरपर्यंत पाणी आलेल्या गाड्या आणि समोर त्याचे ते ग्लोरिअस स्टायलिश केस भिजून कपाळावर चप्प चिकटलेला, नाका गालावरून पाण्याचे ओघळ त्याच्या जॅकेटमध्ये गायब होत असलेला ओलेता असीम यांच्यावरही होती. वेडा आहे का हा, इतक्या पावसात ड्राइव्ह करून काय करतोय...
"मला काय जस्टीफाय करणार--" बोलता बोलता तिची नजर पुन्हा चेहऱ्यावर गेली आणि ती नसती गेली तर बरं झालं असतं असं तिला वाटलं. त्याच्या डोळ्यांभोवतीच्या बारीक रेषा आणि किंचित सूज बघून तो बरेच दिवस धड झोपला नसावा असं वाटत होतं. दोन तीन दिवस शेव्ह न केलेली खुरटी दाढी दिसत होती आणि त्याच्या चेहऱ्यावर जे मवाळ, शांत भाव दिसत होते ते तिच्यासाठी टोटली नवे होते. तिचा त्याच्यावरचा अविश्वास नाहीसा होऊन त्याची जरा कणव वाटायला लागली होती या गोष्टीनेच ती हलली होती. अजून दया वाटायच्या आत घाईने ती बोलायला लागली. " अजून आपल्यात काही बोलण्यासारखं आहे असं मला वाटत नाही. सो जिथून आलास तिथे परत निघून जा. Exactly कुठून आलास तू?" तिने अचानक उत्सुकतेने विचारलं.
"पणजी" सांगताना त्याच्या चेहऱ्यावर लहान मुलांसारखं हसू होतं.
"काय?? वेडा आहेस का तू? एवढ्या पावसातून एवढे तास ड्राइव्ह करत आलास?? ट्रॅफिकमुळे चौदा पंधरा तास तरी लागले असतील." ती कपाळावर हात ठेवत म्हणाली. "पण का??"
"तुला बघायला." त्याचा मधाळ आवाज आता हळुवार आणि ठाम होता. त्यात कुठेही खोटा, समोरच्याला जिंकून घेण्याचा अभिनिवेष नव्हता. फक्त आणि फक्त प्रामाणिकपणा होता. तिला किल्ल्यावर तिने एकदाच कुठल्याही पूर्वग्रहाशिवाय त्याला न्याहाळून मनातल्या मनात तो तिला आत्तापर्यंत भेटलेला सगळ्यात देखणा माणूस आहे हे मान्य केलं होतं ते आठवलं. इव्हन आत्ताही केसांतून पाणी टपकताना, चेहरा खूप वेळ भिजून आक्रसलेला असतानाही त्याच्यात एक रफ, मॅग्नेटिक अपील होतं जे थेट तिच्या आतपर्यंत जाऊन बाणासारखं रुतून बसलं होतं.
"प्लीज बेला..."
या प्लीजला नाही म्हणण्याची ताकद तिने कितीही प्रयत्न केला तरी तिच्यात येऊ शकत नव्हती. दोन पावलं मागे होत तिने दार पूर्ण उघडलं.
"ये आत." ती पुटपुटली. मी हार मानली नाहीये, अश्या पावसात मी कुठल्याही प्राण्याला घरात घेतलं असतं. हा तर माणूस आहे. ती स्वतःलाच पटवत होती. तो आत येताना त्याचा जरासुद्धा स्पर्श होऊ नये म्हणून पटकन ती बाजूला सरकली. दार लावताना तो तिच्या शेजारीच थांबून तिच्याकडे पहात होता. त्याचं गप्प रहाणं तिची अस्वस्थता अजून वाढवत होतं. माणुसकीच्या नात्याने त्याला घरात घेणं एक गोष्ट झाली पण त्याच्याबरोबर एका घरात रहाणं ही वेगळी गोष्ट होती. नेमके तिच्या समोरच्या फ्लॅटमधले लोकही कुठेतरी सुट्टीवर गेले होते. पाऊस आणि पुरामुळे सगळे लोक आपापल्या घरात दडून बसले होते आणि असीम दिवाणवर तिचा अजिबात विश्वास नव्हता.
"तुझे ओले शूज आणि जॅकेट काढून ठेव तिकडे" खोटं अवसान आणत बाल्कनीतल्या कपड्यांच्या स्टँडकडे बोट दाखवत ती म्हणाली. तिला त्याची सरबराई अजिबात करायची नव्हती.
"नक्की?" त्याने हळूच विचारलं. त्याच्या आवाजाने ती भानावर आली. अजूनही त्याला ती कशी रिऍक्ट करेल कळत नव्हतं. तो जपून बोलत होता. केवढा बदललाय हा! आधीचा असीम असता तर इथला मालक असल्यासारखा बिनधास्त आत घुसून जॅकेट काढून सोफ्यावर पसरला असता.
"नक्की. एक कप गरम कॉफीतरी देऊच शकते मी तुला. गारठला असशील तू." ती म्हणाली.
"गारठला इज ऍन अंडरस्टेटमेंट!" बल्ब पेटून विझल्यासारखं एक मिश्किल हसू त्याच्या डोळ्यात चमकून गेलं. "मला टॉवेल मिळेल का? तुझं कार्पेट खराब नाही करायचं मला." जॅकेट काढताना इकडे तिकडे उडालेलं पाणी पाहून तो म्हणाला.
ते जाड जॅकेट काढल्यावर आता त्याची तिला इतकी भीती वाटत नव्हती. तरीही त्या अरुंद पॅसेजमध्ये नेव्ही ब्लू फुल स्लीव्जचा निटेड टी शर्ट आणि लाईट फेडेड जीन्समधल्या त्याने बरीचशी जागा व्यापली होती. पण ती त्या उंच, मजबूत शरीराची जाणीव लपवू शकत नव्हती. एखाद्या बंद जागेत ट्रॅप झाल्यासारखं वाटून तिच्या हृदयाचे ठोके वाढले. तिच्या बदललेल्या श्वासांची लय आणि गालावर वाढलेला रंग नक्कीच त्याच्या लक्षात आला असणार.
"काही नाही होणार कार्पेटला. सिंथेटिक आहे ते. मी टॉवेल आणते" तिचा आवाज जरासा थरथरला आणि ती अजून काही दिसू न देता पटकन आत निघून गेली.
एक मोठा टॉवेल त्याच्या हातात देऊन ती परत कॉफी करायला आत गेली. दूध तापून ती कॉफी घेऊन बाहेर येईपर्यंत तो कोरडा होऊन हाताची घडी घालून, भिंतीला टेकून खिडकीबाहेर अजूनही रपारप कोसळणारा पाऊस बघत उभा होता. अजूनही त्याचे केस थोडे ओलसर दिसत होते आणि फॅनच्या वाऱ्यामुळे थोडेसे गोल गोल वळून तो किंचित टीनेजर असताना दिसायचा तसा भास होत होता.
ती वाफाळते मग्ज हातात घेऊन किचनच्या दारात त्याचं निरीक्षण करत उभी होती.
क्रमशः