"फायनली पाऊस थांबलेला दिसतोय." ती पडदा सरकवत म्हणाली. साडेपाचच्या अलार्मने जागी होऊन ती खिडकीत उभी होती. बाहेर अजूनही अंधार, थोडंसं धुकं आणि साठलेलं पाणी टपटपणारं रेन ट्री अंधुक दिसत होतं. काल त्याने बाबांना कॉल केल्यानंतरचे तास कसे गेले हे तिला पैज लावूनही सांगता आलं नसतं. अखंड बडबड, त्यांचं एकमेकांत गुंतून जाणं आणि रात्री कधीतरी एक दोन वाजता भुकेची जाणीव होऊन फ्रिजवर टाकलेली रेड. नक्की काय खाल्लं तेही तिला आठवत नव्हतं पण बहुतेक फ्रीजमध्ये चीज क्यूब्स, काकडी, टोमॅटो, उरलेला ब्लॅक फॉरेस्टचा तुकडा, फ्रीझरमध्ये अडीनडीला ठेवलेलं चॉकलेट चिप आईस्क्रीम एवढंच असावं. तिला वाटलं होतं त्यांच्या एकत्र येण्याने त्यांच्या आत असलेली तगमग शांत होईल पण कसलं काय, आता ती तगमग, हुरहूर, एकमेकांना स्पर्श करायची गरज कितीतरी पटींनी वाढली होती.
अलार्म आणि तिच्या बोलण्याने जाग येऊन असीम आळस देत उठला. ती त्याचा जेमतेम मांडीपर्यंत पोहचणारा टीशर्ट घालून काचेतून बाहेर बघत उभी होती. खालपासून वरपर्यंत तिच्याकडे बघत त्याने एक बारीकशी शिट्टी वाजवली तेव्हा तंद्रीतून बाहेर येत तिने नाटकीपणे त्याच्याकडे पहात पापण्या फडफडवल्या. तो बॉक्सर्सवरच उठून तिच्याशेजारी येऊन उभा राहिला. खांद्यावर त्याचा जड, उबदार हात टाकून तिला जवळ घेत बाहेरची शांतता बघत तो काही मिनिटं तसाच थांबला. एव्हाना तिने त्याच्या छातीवर डोकं टेकवून डोळे मिटून घेतले होते.
"हम्म, मॅनेज होईल बहुतेक." बाहेर लांबवर पसरणारा उगवतीचा अंधुक लालसर उजेड बघून तो अचानक म्हणाला.
"मॅनेज होईल म्हणजे?" ती मान वर करून त्याच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाली.
"म्हणजे मला निघावं लागेल बेल्स." तो हळूच तिच्या गालावर ओठ टेकवत म्हणाला.
"प्लीज असीम! आजच्या दिवस थांब ना. उद्या जा." आतापर्यंत कधीही न जाणवलेला एकटेपणा आणि हुरहुरीचं मळभ तिच्याकडे वेगाने येऊन पोचलं होतं.
"शक्य नाहीये बेला, कॉन्ट्रॅक्ट साइन झालंय. लगेच निघालो तर रात्रीपर्यंत पोहोचेन. ट्रॅफिकचाही काही भरवसा नाही आणि उद्या दुपारी शो आहे." तो तिला समजावत होता. ती दुःखी चेहरा करून त्याच्या जॉ लाईनवरून बोट फिरवत होती.
"बस. ये इकडे." म्हणून त्याने तिला बेडवर शेजारी बसवत तिचे हात हातात घेतले. "बेला, प्लीज समजून घे मला. सध्या माझं आयुष्य हेच आहे. आज इथे, उद्या दुसऱ्या ठिकाणी. कधीकधी मलाच माहीत नसतं दुसऱ्या दिवशी मी कुठे असेन. फिरणं हा माझ्या आयुष्याचा भाग आहे बेला, मी तो तोडून नाही टाकू शकत. हा माझ्या करियरचा भाग आहे. आणि आत्ता जिथे इतक्या मेहनतीने पोचलोय त्या पॉइंटवर मी अनप्रोफेशनल नाही वागू शकत. मी उभं केलेलं सगळं कोलॅप्स होईल." तो सरळ तिच्या डोळ्यात बघून बोलत होता. पण बेला तिच्या विचारात मग्न होती. त्याचे शब्द आठवून तिच्या छातीत बारीक कळ येत होती. 'आज इथे, उद्या दुसऱ्या ठिकाणी' म्हणजे ती विचार करत असलेली नवी सुरुवात, दोघांचं एकत्र भविष्य वगैरे सगळं खोटं होतं? त्याच्यासाठी कालचा दिवस, कालची रात्र म्हणजे फक्त दोन ठिकाणांमधला एक फिलर होता??
"इज इट अ वन नाईट स्टँड, असीम?" ती मनातलं वाक्य ओठावर घेऊनच आली.
"व्हॉट?? नो!!" तो धक्का बसून तिच्याकडे बघत म्हणाला. "तुला असं वाटलं बेला? असं अजिबात नाहीये. मला आत्ता जावं लागेल पण मला जसा वेळ मिळेल तसा मी लगेच तुझ्याकडे परत येईन. मी कसलंच प्रॉमिस नाही करू शकत... मला माहिती आहे, हे इतकं सोपं नाही." त्याने पुढे होत तिचा चेहरा दोन्ही हातात घेतला.
तिच्या मनात खोलवर दडलेल्या गोष्टी शोधत तो पुढे बोलत होता. "हे परफेक्ट सोल्युशन नाहीये पण आज मी एवढंच सांगू शकतो. तुला चालणार आहे का हे? नसेल तर तसं सांग मला."
हे पुरेसं नाहीये. ती आतल्याआत रडत होती. मला त्याच्या करियरमधला एखादा रिकामा दिवस बनून नाही रहायचं. तिला तो अख्खा हवा होता. रोज... तिच्याबरोबर... पण तो तसा असेल, तर तो असीम नसेल. आणि तिला असीम हवा होता.
"तू नक्की परत येशील?" तिने त्याच्या डोळ्यात बघत गंभीरपणे विचारले.
"जेव्हा जमेल तेव्हा. इतकंच सांगू शकतो." तो मान हलवत म्हणाला.
"आणि मी सगळं सोडून तुझ्याबरोबर आले तर? कूकिंग तर मी कुठेही करू शकते" ती आशेने त्याच्याकडे बघत म्हणाली.
त्याने नकारार्थी मान हलवली. "अजिबात नाही बेला. विचारही करू नको. तुझं रेस्ट्रॉंट तुझ्या आयुष्यभराचं स्वप्न आहे. तू त्यासाठी किती मेहनत घेतलीस ते मला माहिती आहे. माझ्यासाठी ते नाही कुस्करू देणार मी तुला." तिच्या डोक्यावर थोपटत तो ठामपणे म्हणाला.
तिची आयुष्य जगण्याची पद्धत वेगळी होती. तिला सगळ्या गोष्टी शिस्तीत, व्यवस्थित आखलेल्या लागायच्या. प्रत्येक गोष्टीचा एक चौकोन होता. प्रत्येक गोष्टीची एक आउटलाईन होती. ज्यामुळे तिला ती या पटावर नक्की कुठे उभी आहे हे नेहमी माहीत असेल. तिचं स्थान माहीत असेल. त्याला वेळ मिळेल तेव्हा तो येणार. येणार की नाही तेही नक्की नाही. आपल्या बिझी आयुष्यातून तिच्यापुरते दोन तीन तास चोरणार आणि सारखे गुडबाईज. परत कधी? माहीत नाही. नवरे एकटे परदेशात राहणाऱ्या किंवा बॉर्डरवर असणाऱ्या सैनिकांच्या बायका कसं तोंड देतात आयुष्याला? पण ती देऊ शकते का? तिला जोरजोरात ओरडावसं वाटत होतं. प्लीज असीम... सोडून दे हा शो बिझनेस. लॉयर हो पुन्हा. इथे फर्म सुरू कर. माझ्या जवळ रहा. प्लीजss माझ्या जवळ रहा.
पण तिला अचानक त्यांचं बोलणं आठवलं, ते कुठल्या गोष्टीमुळे कनेक्ट झाले ते आठवलं. त्याने मळलेली वाट सोडून आपल्याला जे खरंच हवंय त्या दिशेला जाण्याची त्याची जिद्द, सगळ्या जगाच्या विरोधात जायची तयारी, कम्फर्टपेक्षा आपल्या पॅशनला निवडणे हेच तर तिला आवडलं होतं. ते आव्हानं स्वीकारून प्रयत्न करण्याबद्दल बोलले होते. काय होतं तिचं वाक्य? हां, 'जोपर्यंत ते डोंगर चढायला घेत नाहीत तोपर्यंत कसं कळणार? आयदर तुम्ही तोंडावर पडाल किंवा शिखरापर्यंत पोहोचाल पण आधी एक पाऊल बाहेर तर टाका!' हेच म्हणाली होती ना ती... मग स्वतःशीच खोटं कसं काय बोलू शकते ती? आता का फक्त स्वतःच्या कंफर्टचा विचार करतेय? ट्रॅव्हलिंग हा त्याच्या करियरचा अविभाज्य भाग आहे. तिला तो हवा असेल तर हे accept करावेच लागेल.
"बेला??" त्याच्या आवाजाने एकदम भानावर येत तिने त्याच्या वाट बघणाऱ्या, आर्जवी डोळ्यात खोलवर बघितले.
आणि एकदम तिच्या मनावरचं सगळ्या शंका कुशंका, प्रश्नांचं सावट उन्हातल्या धुक्यासारखं वितळून गेलं. तिचा निर्णय तिला लख्ख समोर दिसत होता. तिला असीम हवा होता. तिच्यासाठी त्याच्याबरोबर घालवलेले काही तास दुसऱ्या कुणा माणसाबरोबर घालवलेल्या आयुष्यभरापेक्षाही खूप मोलाचे होते.
"मी तयार आहे. तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे." त्याचे हात घट्ट धरत ती म्हणाली. इतका वेळ गंभीर असलेला त्याचा चेहरा एकदम उजळला आणि त्याने तिला घट्ट मिठी मारली.
"ऑ, स्टॉप इटss माझी हाडं मोडतील असीम" ती ओरडत म्हणाली.
"ठिके" म्हणून खांदे उडवत त्याने लगेच तिला सोडून दिलं.
"हां? मी सोड असं कधी म्हटलं?" ती फुरंगटून म्हणाली.
आता त्याच्या डोळ्यात एक खट्याळ चमक परत आली होती. "आणि माझा टीशर्ट पण मला परत पाहिजे" म्हणत त्याने एकेक पाऊल तिच्या दिशेने टाकेपर्यंत ती नाही, नाही, नाही ओरडत लिविंग रूम मध्ये पळून गेली होती.
तासाभराने आवरून ओल्या सुनसान पार्किंगमधून कार बाहेर काढताना त्याने वर बघितले तेव्हा ती त्याच नेव्ही ब्लू टीशर्टमध्ये बाल्कनीत उभी राहून त्याच्या दिशेने फ्लाईंग किसेस फुंकरत होती. खिडकीतून हात काढून त्याने तो किस पकडून खिशात ठेवला आणि तिच्या कोवळ्या प्रकाशात चमकणाऱ्या हसऱ्या डोळ्यांकडे पहात गाडी सुरू केली.
क्रमशः