ला बेला विता - १५

तिला पटापट सगळं आठवत गेलं. त्याने अवंतिका आणि त्या सगळ्या भूतकाळाबद्दल तर सांगितलं पण हल्ली त्याचं जे नुपूराबरोबर सुरू होतं त्याचं काय. ते तर त्याने तिला बरोब्बर गंडवून लपवून ठेवलं होतं. आंधळेपणाने ती नुपूराला कशी काय विसरली? 

त्याला नुपूराशी अफेअर करायचंय हे तिला माहीत आहे, हे त्याला तेव्हाच माहिती होतं. म्हणूनच त्याने मुद्दाम तिचा वापर करून नुपूराला रोखण्यापासून थांबवलं. आणि हा पूर्ण वेळ त्या दोघांचं अफेअर सुरू होतं! शिट!!

ती कशीबशी लडखडत्या पायांनी वॉशरुमपर्यंत पोहोचली. दार लावून टॉयलेट सीटवर ती डोकं हातात धरून बसली. आत्ता शो सुरू व्हायच्या आधी तो काय म्हणाला होता, तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. ते नक्की हेच असणार जे तो नुपूराने अभीला सांगायला फोर्स करतोय. तिला चक्कर आल्यासारखं वाटलं. आणि म्हणे तो नर्व्हस होता. असीम आणि नर्व्हस? तुला कळायला हवं होतं बेला. तिच्या डोळ्यातून आता हळूहळू पाणी ओघळायला लागलं होतं. तो मघा तिला हेच सांगणार होता पण वेळ नाही म्हणून तो थांबला आणि आता अभीला सांगून झाल्यावर तो तिला योग्य वेळी सांगणार होता. कुठली ती योग्य वेळ?

बाहेरून तिला लोकांच्या बोलण्याचे, प्लेट्स खणखणल्याचे अंधुक आवाज येत होते. तिला आत्ता बाहेर असायला हवं होतं, तिची होस्टेस ड्युटी तिची वाट बघत होती. ती बाहेर येऊन आरशात बघत टिश्यूने तिचा स्मज झालेला आय लायनर आणि डोळ्यातलं पाणी थांबवायला लागली. तेवढ्यात एक वेट्रेस येऊन तिला असीम ड्रेसिंग रूममध्ये बोलावतोय म्हणून निरोप देऊन गेली. तिने लिपस्टिक टचअप केली. काही झालं तरी ती या जागेची मालकीण होती आणि तिने तसं वागलंच पाहिजे म्हणत ती ताठ उभी राहिली.

पुन्हा शांतपणाचा मुखवटा लेवून तिने ड्रेसिंग रूमच्या दारावर टकटक केली. "कम इन" आतून असीम ओरडला. तिला येताना बघून तो झटकन उठून पुढे आला आणि दार ढकलून त्याने तिला मिठीत घेतलं. तो पुढे काही बोलणार इतक्यात तिने त्याला हाताने लांब केलं. "हे! तू कुठे लपून बसली होतीस? मी कधीपासून शोधतोय तुला" तो तिच्याकडे प्रेमाने बघत म्हणाला. एव्हाना त्याने फॉर्मल्स बदलून नेहमीची जीन्स आणि फुल स्लीव्हज असलेला मरुन निटेड टीशर्ट घातला होता. जसा नेव्ही ब्लू तिच्याकडे होता तसाच!

काय acting आहे! वा वा! ती मनात म्हणाली. परत डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून तिने डोळे घट्ट मिटून घेतले.

"सगळे गेस्टस निघालेत, तुला बाय म्हणायला  शोधत होते सगळे." तो काळजीने म्हणाला.

हाहा! हा तोच असीम आहे ज्याला ती हल्ली ओळखत होती. प्रेमळ, केअरिंग वगैरे वगैरे. आणि तिला आत्ताही तेच वाटत राहिलं असतं जर तिने मघाचा सीन पाहिला नसता. पण आता ती त्याच्या आत लपलेल्या प्राण्याला ओळखून होती. तोच प्राणी ज्याने तिच्या हृदयाचे बारीक बारीक तुकडे करून फेकून दिले होते.

तिने आपली चिंध्या झालेली मानसिक ताकद हळूहळू गोळा केली. तिचा सगळा अभिमान, इच्छा, आकांक्षा, प्रेम सगळंच चुराडा होऊन तिच्या पायाशी पडलं होतं. पण ती असीमला ते बघून होणारा आनंद अजिबात मिळू देणार नव्हती. तो हेच सांगायला आला होता ना? की ही रिलेशनशिप संपली. हुं! कसली रिलेशनशिप? काहीच तर नव्हतं त्यात. सुरवात ते शेवट सगळंच खोटं होतं. या सगळ्यातुन बाहेर निघायचा एकच मार्ग आहे. तो मला अजून फसवायच्या आत मीच सांगते त्याला.

"बेल्स?" पुन्हा त्याने काळजीने हाक मारली.

त्याच्या खोट्या काळजीने वैतागून तिने बोलायला सुरुवात केली.

"मी वॉशरूममध्ये होते. मला - मला विचार करायला वेळ हवा होता." ती म्हणाली.

"विचार करायला? कशाबद्दल?

"आपल्याबद्दल." तिचा आवाज थोडा हलला होता. आणि लगेच त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या.

"आपल्याबद्दल काय?" तो गंभीर होत म्हणाला.
त्याला खरंच धक्का बसल्यासारखा दिसत होता. कदाचित त्याला तिला कळलंय असा संशय आला असेल.

"इट्स नॉट वर्किंग असीम." एकदाचं संपवून टाकू या विचाराने तिचे शब्द जरा जास्तच जोरात आले होते. "हे असं वाट बघत मी जगू शकत नाही."

"बेला, मला माहितीये हे अवघड आहे... पण-"
हे अवघड होतंच पण ती ते सगळं त्याच्या प्रेमाखातर सहन करायला तयार होती. पण तो जो काही थोडासा वेळ तिच्यासाठी काढत होता त्यातच नुपूराही वाटेकरी होती हे जाणवून रागाने तिच्या कानातून वाफा यायला लागल्या होत्या.

"पण गोष्टी बदलतील..." तो पुढे बोलत होता.

"मला गोष्टी बदलायच्या नाहीत असीम, संपवायच्या आहेत. आपण खूप वेगळे आहोत. आयुष्यात कुठेच आपण सेम पेजवर नसणार आहोत. हे असं वर्क नाही होणार आणि ते वर्क करावसंही वाटत नाही मला. तू इथून आत्ताच्या आत्ता निघून जा आणि परत कधीही मला भेटू नकोस."

"बेल्स!"

"आणि हो मला पुन्हा चुकूनही बेल्स म्हणू नको, मी तुझ्यासाठी फक्त बेला इनामदार आहे."

इतकं म्हणूनसुद्धा त्याची निरागस, बिचारा, धक्का बसल्याची acting सुरूच होती.

"आणि मला वाटलं तू बदलली आहेस बेला. मूर्ख होतो मी. आयुष्यात तू कधीही बदलणार नाहीस!" रागाने लाल होऊन तिच्या डोळ्यात बघून तो म्हणाला आणि तसाच तरातरा दाराबाहेर पडून दार आपटून निघून गेला.

तो गेल्यागेल्या तिच्या पायातला सगळा जोर निघून गेला आणि ती धपकन खुर्चीत बसली. पाच मिनिटं आराम करून ती तिची ड्युटी संपवायला उठली. बाहेरून ती अगदी नेहमीसारखी प्रोफेशनल वागत असली तरी आतून ती तुटून फुटून गेली होती. कसातरी सगळ्या पाहुण्यांना हसून, गप्पा मारून निरोप देऊन झाल्यावर ती रिसेप्शनमधून आत आली. आता इतका वेळ तिने जमवलेला आत्मविश्वास संपून गेला आणि तिचा तो हसऱ्या, कॉन्फिडन्ट होस्टेसचा मुखवटा गळून पडला. एक हुंदका देत डोळ्यातलं पाणी पालथ्या हाताने पुसत ती कशीबशी आयलमधल्या एका खुर्चीत बसली.

"बेला, आम्हाला तुला काहीतरी सांगायचं आहे." नुपूरा आणि अभिषेक तिच्यासमोर उभे होते.

"हम्म, बोल. ऐकतेय. मी दमलेय खूप." वर न बघता ती म्हणाली.

"एक गुड न्यूज आहे बेला" अभिषेकचा आवाज उत्साहाने उतू जात होता.

तिने मान वर करून रडून बारीक झालेले डोळे ताणत त्या दोघांकडे फोकस करायचा प्रयत्न केला. चक्क अभिषेकने नुपूराच्या खांद्यावर हात टाकला होता आणि ते एकमेकांना चिकटून उभे होते.

"सो द गुड न्यूज इज, मी बाबा होणारे!" तो मोठं स्माईल देत म्हणाला आणि नुपूराने हसत मान डोलावली.

"बाबा!! पण नुपूरा --" तिला एकदम धक्काच बसला.

"आम्ही खरंच आशा सोडून दिली होती." अभिचं तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. "इतकी वर्ष प्रयत्न करूनही कन्सिव होत नव्हतं. मी स्वतःला जबाबदार मानून स्वतःला कामात बुडवून घेतलं होतं कारण रोज मला नुपूराला फेस करायला भीती वाटत असे. रोज तिचा निराश चेहरा मला बघवत नव्हता. माझ्या वागण्यामुळे तिला जास्त त्रास झाला." तो नुपूराकडे बघत तिचा हात घट्ट धरून म्हणाला.  "पण प्रत्येक गोष्टीला स्वतःची एक वेळ असते हेच खरं. वी आर सो हॅपी!" तो तिला पुढे सांगत होता.

"बेल्स? काय झालंय?" नुपूराचे तिच्या रडक्या डोळ्यांकडे लक्ष होते.

"नुपूर मला वाटलं तू... आणि असीम-"

"असीम? शिट! तुला वाटलं माझ्या आणि असीममध्ये काही चालू आहे?" नुपुरा दचकून अभिकडे बघून मान हलवत म्हणाली.

"अग येडपट मुली!" नुपुरा कपाळावर हात मारत म्हणाली.

"सांगते आमच्यात काय होतं ते. आपण जेव्हा व्हाईट एलिटमध्ये गेलो तेव्हा मी खूप डिप्रेस्ड होते. आपण कॉफी पिताना मी तुझ्याकडे सगळं बोलणार होते. पण त्याआधीच तिथे असीम भेटला. तुला कॉफी मिळायला वेळ लागत होता. तेवढ्या बोलण्यातून त्याने माझे प्रॉब्लेम्स ऐकून मला थेरपी घेण्यासाठी समजावलं आणि एका डॉक्टर मित्राचा नंबरही दिला. नंतर आम्ही दोनदा लंच एकत्र केला तेव्हाही त्याने खूप समजावलं आणि मला हसवून त्या वाईट मूडमधून बाहेर काढलं."

ओह! बेलाला आठवलं व्हाईट एलिटच्या कॅफेमध्ये तो कसा नुपुरचे हात हातात घेऊन बसला होता ते. तो तिला हे समजावून सांगत होता!

"मी स्वतः तर counselling घेतलंच पण नंतर अभिलाही घेऊन गेले. हळूहळू बोलून आम्हाला जाणवलं की फिजीकल प्रॉब्लेमपेक्षा आम्ही मेंटली एकमेकांपासून लांब गेलोय. कन्सिव न होण्यासाठी स्वतःला जबाबदार धरून आम्ही दोघेही एकमेकांपासून लांब रहात होतो. हे सगळं प्रयत्न करून बदललं आम्ही. असीमही जमेल तेव्हा फोन करून मला धीर देत होता. शेवटी मागच्या रविवारी मला शंका आली म्हणून मी क्लिनिकमध्ये जाऊन टेस्ट केली तेव्हा न्यूज कन्फर्म झाली. पण तरीही मला वाटत होतं की अजून काही दिवसांनी अभिला सांगावं. मला भीती वाटत होती हे टिकेल की नाही. आज दुपारीच मी असीमला ही बातमी दिली. ही वॉज सो हॅपी फॉर अस! त्यानेच फोर्स करून मला आजच अभिला सांगायला लावलं."

अभीनेही मान हलवत तिला दुजोरा दिला.

"आणि मला वाटलं--" तिच्या मेंदूवर साचलेलं धुकं आता बाजूला व्हायला लागलं होतं.

"आणि तुला वाटलं आमचं अफेअर सुरू आहे!  हाइट आहे ही!" नुपुरा डोळे फिरवत म्हणाली.
"अग डंबो, तो तुझ्यासाठी किती क्रेझी आहे ते  दिसत नाही का तुला? सारखं तुझ्याबद्दलच बोलत असतो तो. जर कोणी साफ हाडंबिडं मोडून प्रेमात पडला असेल तर तो असीम आहे. 'तुझ्या' प्रेमात! समजलं?" नुपुरा तिला मिठी मारून पाठीवर थोपटत म्हणाली.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle