वेडींग ड्रेस - 10

घरी पोहोचल्यानंतर व्हिक्टोरिया विल्यम्स ला स्टडी हॉल , रूम, घरात सगळीकडे शोधू लागली. शेवटी तिने घरातल्या नोकर माणसांना विचारल्यावर तो कुठल्याशा दौऱ्यावर गेलाय आणि रात्रीच परतेल असं तिला कळालं. या वेळेत तिला शांत बसवले नाही. ती पुन्हा हेन्री च्या घराकडे गेली. जवळ तेरेसा चे पत्र होतेच. शेजारी रसेल्स च्या घराचे दार ठोठावले. आतून एक वेगळाच माणूस बाहेर आला.
" मला डेव्हिड रसेल यांना भेटायचं आहे"
तो माणूस प्रश्नार्थक नजरेने व्हिक्टोरिया कडे पहात राहीला.
" तुम्ही कोण?"
"मी मिस व्हिक्टोरिया विल्यम्स. प्लिज माझं खूप अर्जंट काम आहे. ते आहेत का घरात? "
"तुम्हाला काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. माझं नाव आर्थर रसेल आहे, डेव्हिड नावाचं कोणीही आमच्या घरात राहत नाही"
आधीच एकामागून एक धक्के बसल्यामुळे व्हिक्टोरियाचे डोके भणाणले होते. आता तिचे पेशन्स संपले. ती त्या माणसाला जवळजवळ ढकलत आत शिरली.
"हेय, काय करताय तुम्ही"
आत जाऊन तिने सगळ्या खोल्या तपासल्या, पण तिला भेटलेला डेव्हिड कुठेच नव्हता.
"झालं समाधान. मी सांगतोय ते ऐका आता. इथे कोणीही डेव्हिड राहत नाही, इन फॅक्ट माझ्या नातेवाईकांत कोणीही डेव्हिड नाही. समजलं?"
"मिस्टर आर्थर. हे पत्र इथे राहणाऱ्या डेव्हिड रसेल्स कडून मला मिळालं. इथे, इथे बसून आम्ही बोललो, आणि तुम्ही म्हणताहात तो माणूसच अस्तित्वात नाही? हे कसं होऊ शकतं. मला वेड लागलंय असं तुम्हाला वाटतंय का?"
" हे बघा मिस विल्यम्स, मला तशी शंका येण्याआधी तुम्ही इथून निघून जा नाहीतर मला पोलिसांना बोलवावं लागेल"
"पण मिस्टर रसेल्स.."
"प्लिज, तुम्ही आता निघा, मी शेवटचं सांगतोय"
व्हिक्टोरिया नाईलाजाने तणतणत तेथून बाहेर पडली.
हे पत्र, डेव्हिड रसेल हा सगळाही बनाव होता? आत्तापर्यंत डेझी च्या कुठल्याच वाक्यावर मला विश्वास बसला नव्हता.माझ्या मनातली भीती खोटी ठरवण्यासाठी मी इथे पडताळणी करायला आले होते. पण अखेर तीच खरी ठरली. हे काय घडतंय माझ्याबरोबर? डॅड, का केलं तुम्ही हे? हेन्री च्या जाण्याने जेवढं दुःख मला झालं त्यापेक्षा कैक पटींनी आज मला त्रास होतोय. काय खरं काय खोटं, कोणावर विश्वास ठेवायचा हेच कळत नाहीये. अँजेला? डेझी? डेव्हिड? आर्थर? डॅडी? मी स्वतःवर तरी विश्वास ठेवावा का? की मलाच सगळे भास मलाच होताहेत.
व्हिक्टोरिया तशाच नादात घरी आली तेव्हा संध्याकाळ उलटून गेली होती. ती घरी आली तेव्हा विल्यम्स समोरच उभा असलेला दिसला.
" विकी बेटा, मी तुझीच वाट पाहत होतो, कुठे गेली होतीस?" विल्यम्स नेहमीसारखा उत्साहात बोलला.
व्हिक्टोरिया चा भावनांचा कडेलोट झाला.
" बास, बास करा ही नाटकं, किळस येतेय मला तुमची " व्हिक्टोरिया चा आवेश पाहून विल्यम्स च्या चेहऱ्याचा रंग उडाला. तो व्हिक्टोरियाच्या जवळ येउ लागला.
"विकी, काय झालं ? काय बोलतेयस?"
"बास म्हणलं ना.. व्हिक्टोरिया एवढ्या जोरात ओरडली की घरातली सगळी नोकरमाणसं बाहेर येऊन काय झालंय ते पाहू लागली.
" तुमच्या तोंडातून नाव ही नकोय मला माझं." व्हिक्टोरिया चा चेहरा लालेलाल झाला. केसांपासून ते नखांपर्यंत सर्वांग थरथरू लागले.
डोळ्यांतुन अश्रू ओघळू लागले.
"मान्य आहे मला मी खूप हट्टीपणा, बालिशपणा केला आमचे लग्न ठरावे म्हणून. पण मी तो माझ्या डॅड कडं केला. मला माहीत होतं तेव्हाच तुम्ही ते मान्य कराल. पण मी मोठी झालेय डॅड, मी काय निर्णय घेतेय ते मला माहीत होतं. हेन्री ला माहीत होतं. माझी तयारी होती कष्ट सोसायची. हेन्रीने ही वेळोवेळी मला तशी जाणीव करून दिली होती. तुम्हाला अजिबात मान्य नव्हतं तर तुम्ही मला शिक्षा द्यायची होती, हाकलून द्यायचं होतं घरातून. तुम्ही त्या साध्या, सभ्य मुलाला टॉर्चर केलं, तेवढं कमी होतं की काय तुम्ही त्याला जीवानिशी मारूनच टाकलं? त्याची ती गरीब आई? तिलाही तिची काही चूक नसताना त्याची हकनाक किंमत चुकवावी लागली. आणि मी, मी ही तेवढीच गुन्हेगार होते या सगळ्यात, मला मात्र मागे या नरकात जिवंत ठेवलंत? काय मिळवलंत डॅड तुम्ही हे करून?
व्हिक्टोरिया धाय मोकलून रडू लागली. विल्यम्स ला आता दिखावा करून उपयोग नाही हे कळून चुकले.
" मी मोडून गेले होते डॅड, हेन्री चा तो तसा विद्रुप चेहरा पाहून. कित्येकदा जगण्यात अर्थ नाही असं वाटून मनात नाही नाही ते विचार आले. आपणही द्यावं स्वतःला त्या प्रवाहात झोकून असं वाटलं. पण त्या त्या वेळी मला तुम्ही दिसायचात डॅड. मी गेल्यावर तुम्ही एकटे पडाल, मला एवढा जीव लावणारे, माझ्या हट्टासाठी मनाविरुद्ध तडजोड करणाऱ्या माझ्या डॅड चं कोणीच राहणार नाही असा विचार करून मी मनावर संयम ठेवला. पण तुम्ही राक्षस होतात, राक्षस, देवपणाच्या बुरख्याखाली !माझ्यापुढे सत्य कधीच येणार नाही असं कसकाय वाटलं तुम्हाला? इतकी मूर्ख वाटते मी तुम्हाला?"
"विकी मला .."
"इनफ डॅड. मला माझे नावही तुमच्या तोंडात नकोय. " व्हिक्टोरिया आता दमली होती. तिच्या आवाजाची तीव्रता कमी झाली. स्वतःचे भिजलेले गाल तिने पुसून काढले.
"आजपासून आपला संबंध संपला. माझे डॅड माझ्यासाठी कायमचे मेले. मी निर्णय घेतलाय.आज हे घर मी कायमचं सोडून जातेय. आणि हो तुमच्यात जरा तरी माणुसकी शिल्लक असेल ना, तर मला शोधायचा, मला पुन्हा आणायचा , प्रेमाने, बळजबरीने, कुठलेही घाणेरडे राजकारण करून मला इकडे येण्यास भाग पाडण्याचा तुम्ही प्रयत्न करणार नाहीत. तुमच्याकडे पैसे आहे, माणसं आहेत, प्रतिष्ठा आहे आणि अशा गोष्टी करणं तुम्हाला सहज शक्य आहे हे मला आता चांगलंच माहिती झालंय. पण इथून पुढे माझं जे काही होईल, त्याला मी जबाबदार. तसही मी जे काही भोगलय त्यापेक्षा वाईट या जगात आता अजून काहीही नसेलंच. यापुढे माझ्या कुठल्याही बाबतीत तुम्ही हस्तक्षेप करायचा नाही. आणि जर मला तशी कुणकुणही लागली तर मी त्याच क्षणी स्वतःला संपवून टाकेन. मला आता जगायचं आहे. मला तुम्हाला जगू द्यायचं असेल तर तुम्ही एवढं कराल."
व्हिक्टोरिया जिन्याकडे वळता वळता पुन्हा थांबली.
" एक गोष्ट मी माझ्याकडूनही स्पष्ट करते. तुमच्याबद्दल माझ्या मनात आता कसल्याही भावना उरणार नाहीयेत. त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की मी तुम्हाला अटक करवेन, शिक्षा मिळवून देईन, तुमच्यावर सूड उगवेन तर तसं काहीही होणार नाहीये हे ध्यानात असू द्या. कुठल्याच प्रकारे आता मला तुम्ही माझ्या आयुष्यात नको आहात. "
व्हिक्टोरिया मागे वळून विल्यम्स च्या डोळ्यात पहात म्हणाली.
" ज्या माणसाची पत्नी, मुलगी मेली आहे, मुलगा असून नसल्यासारखा आहे , जो माणूस या वयात चारही बाजुंनी या भल्या मोठ्या जगात एकटा पडलाय त्याला मी अजून काय शिक्षा देणार? तो स्वतःच शिक्षा भोगतोय"
विल्यम्स स्वतःचं डोकं धरत सोफ्यावर बसला.
व्हिक्टोरिया जिन्यावरून चढत तिच्या रुम मध्ये गेली दहा मिनीटात ती हातात एक गाठोडं घेऊन आली. दारातून बाहेर जाताना तिने मागे वळूनही पाहीले नाही. त्या गाठोड्यात तिने जपून ठेवलेली पत्र आणि तिच्या वेडिंग ड्रेस ची पेटी याशिवाय काही नव्हते.

...
पावसाची सततची रिपरिप चालुच होती. व्हिक्टोरिया अखंड चालत राहीली. चीड, करुणा, दुःख, गिल्ट सगळ्या भावनांनी तिच्या डोक्यात थैमान घातलं होतं. एका हाताने गालावर ओघळणारे अश्रू पुसत, हुंदके देत ती कितीतरी वेळ चालतच होती. पायपीट करत ती गावापासून खूप दूरवर आली होती. रात्रीची वेळ होती. गाव केव्हाच संपून गेल्याने दिवे, मशाली , स्ट्रीट लाईट्स , उजेडाच्या लहानसहान खुणा सगळे मागे पडले होते. पुढे मोकळा रस्ता संपून दाट झाडी सुरू झाली होती. गर्द हिरवा , काळा रंग एकमेकांत मिसळून अंधार आणखी दाटत गेला तशी तिला चिंता वाटू लागली. रातकीडयांनी सूर धरला होता. अधून मधून वाळलेल्या पाचोळ्यावर कोणाचे तरी पाय पडून तो कुस्करला जाण्याचे आवाज येत होते. चिखल, दगड धोंडे, झाडांच्या आडव्यातिडव्या फांद्या सगळ्यांना कापत ती चालत होती. दिवसभरात एकानंतर एक घडलेल्या घटनांनी तिच्या मनाला, मेंदूला प्रचंड श्रम पडले होते. ती अतोनात दमली होती. पोटात भुकेची जाणीव होऊ लागलीहोती, पाय दुखू लागले होते. झाडीतून मार्ग काढताना सतत सतर्क राहून चालावे असल्याने तिच्या मेंदूवर अतिरिक्त ताण पडत होता. या सगळ्या ताणाने शेवटी टोक गाठले आणि ती ग्लानी येऊन खाली वाळलेल्या पण पावसाने ओलसर झालेल्या पाचोळ्याच्या खचात कोसळली.

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle