घरी पोहोचल्यानंतर व्हिक्टोरिया विल्यम्स ला स्टडी हॉल , रूम, घरात सगळीकडे शोधू लागली. शेवटी तिने घरातल्या नोकर माणसांना विचारल्यावर तो कुठल्याशा दौऱ्यावर गेलाय आणि रात्रीच परतेल असं तिला कळालं. या वेळेत तिला शांत बसवले नाही. ती पुन्हा हेन्री च्या घराकडे गेली. जवळ तेरेसा चे पत्र होतेच. शेजारी रसेल्स च्या घराचे दार ठोठावले. आतून एक वेगळाच माणूस बाहेर आला.
" मला डेव्हिड रसेल यांना भेटायचं आहे"
तो माणूस प्रश्नार्थक नजरेने व्हिक्टोरिया कडे पहात राहीला.
" तुम्ही कोण?"
"मी मिस व्हिक्टोरिया विल्यम्स. प्लिज माझं खूप अर्जंट काम आहे. ते आहेत का घरात? "
व्हिक्टोरिया ने तेरेसा चे पत्र वाचले. तिच्याकडे एक लहानशी लाकडी पेटी होती. त्यात तिने आजवर तिला जपून ठेवावीशी वाटतात अशी पत्रं ठेवलेली होती. तेरेसाचे पत्र ठेऊन देण्यासाठी ती पेटी तिने बाहेर काढली . पेटी उघडताच सगळ्यात वर ठेवलेले हेन्री ने मरण्याच्या आधी तिला लिहिलेल्या पत्राचे पाकीट ठेवलेले होते. हेन्री ची शेवटची आठवण! तिने ते सहज उलटून पालटून पाहीले. उघडून पत्र बाहेर काढले, पुन्हा वाचले. पाकिटात खाली असलेली जांभळी फुलं तशीच होती, फक्त सुकून करडी पडलेली, हात लावला की चुरा होणारी. तिने पत्राचा कागद पुन्हा नीट घडी घालून पाकिटात ठेवला.
जमिनीवर आपले पाय मरगळल्या सारखे पडताहेत, कोणीतरी आपल्याला धरून चालवत नेत आहे असं काहीसं ग्लानीत असलेल्या व्हिक्टोरियाला जाणवत होतं. कोणीतरी आपल्याला गाडीत बसवत आहे असं वाटत असताना ती घाबरून थोडीशी भानावर आली. तिच्या अंगावर घातलेल्या कोटाने तिला थोडीशी उब वाटत होती. तो माणूस तिचे डॅड आहेत हे पाहून तिला धीर आला.
"डॅड, तुम्ही कधी आलात? त्या नदीत कोणीतरी वाहून.. त्याचा चेहरा"
" विकी शांत हो बाळा, सावकाश बोलू आपण सगळं" विल्यम्स ने तिच्या खांद्यावर हात टाकून तिला जवळ घेतले.