Westman Islands बद्दल मी एका ब्लॉगवर वाचलं होतं. तुमच्याकडे वेळ असेल तर अवश्य जा असं त्यात लिहीलं होतं. पण तिथे काय आहे याबद्दल त्यात विशेष माहिती नव्हती, पफीन (Puffin) हा एक खास समुद्री पक्षी आईसलँड मधल्या बऱ्याच भागात आढळतो, हे पफिन्स Westman Islands वर बघता येतील अशी किरकोळ माहिती होती. वेळ मिळाला तर बघू असं डोक्यात होतं त्यामुळे खूप काही माहिती काढली नव्हती. आज कुठे जायचं याचा विचार करताना हे ठिकाण डोक्यात आलं, हवामान पण चांगलं होतं, पण तिथे जाणारी फेरी आधीच बुक करावी लागते असं मला वेबसाईट वरून वाटलं. तरीही जाऊन बघू म्हणून आम्ही निघालो. जांभळी ल्युपिनची फुलं, ठिकठिकाणचे लहान धबधबे असं गाडीतूनच बघत Landeyjahöfn म्हणजे जिथून फेरी निघते तिथे पोचलो.
बरीच गर्दी दिसली, गाडी पार्क करेपर्यंत मी आधी तिकीटं आणि फेरीच्या वेळा विचारून येते म्हणून गेले तर लगेच एक फेरी निघणार होती आणि तिकीटंही वेळेवर मिळत होती.
त्या बेटावर जाऊन नेमकं काय करायचं, किती वेळ घालवता येईल याबद्दल काहीच अंदाज नव्हता. त्यामुळे सोबत आणलेला खाऊ, थंडीचे कपडे असा सगळाच लवाजमा घेऊन निघालो. बोटीने जायचं हे आधी सांगून मग तिकीटं मिळाली नसती तर सृजन नाराज होईल, म्हणून आधी त्याला काहीच सांगितलं नाही. पण आता बोटीने जायचं हे समजल्यावर तो प्रचंड खूश झाला आणि अगदी निमूटपणे आमच्यासोबत निघाला. सुरूवातीला उत्साहाने बाहेरच्या डेकवर येऊन बसलो आणि मग थोड्याच वेळात झोंबणार्या वार्याने वाट लागली. आत बसायला अजिबातच जागा नव्हती.
मग थोडावेळ आत उभं राहून तर थोडावेळ बाहेर कोपर्यात थांबून समुद्र, आजूबाजूचे खडक, त्यातल्या कपारीतले आणि आकाशात विहरणारे अनेक पक्षी बघत, फोटो काढत वेळ छान जात होता.
आत एका केबिन मध्ये काही लोक दिसत होते, त्यात प्रेसचे लोकही दिसत होते, तिथे जागा रिकामी होती पण ते केबिन्स लॉक केले होते. आत कुणीतरी व्हीआयपी गेस्ट असावेत असा अंदाज आला. बेटावर उतरताना कळलं की तिथे जर्मनीचे प्रेसिडेंट Frank-Walter Steinmeier आहेत. आम्ही तिकीटं काढली तेव्हा तिथे पोलीसांच्या दहा-बारा गाड्या दिसल्या होत्या, त्यामागचा उलगडा आता झाला. आपण जर्मनीच्या प्रेसिडेंट सोबत एकाच बोटीने प्रवास केला याची गंमत वाटली. उतरल्यावर पुन्हा जर्मनीचे झेंडे दिसत होते, सगळे उतरल्यावर प्रेसिडेंट आणि त्यांचा ताफा बाहेर आले, त्यांच्यासाठी बस उभीच होती बाहेर. हे एवढं सगळं नाट्य बघत आमचं चांगलंच मनोरंजन झालं.
हा बंदरावर स्वागत करणारा पफीन -
मग पुन्हा काय करायचं म्हणून पाहिलं तर समोरच एक रेस्टॉरंट दिसत होतं. थंडी पण होती, मग आत जाऊन कॉफी घेऊ आणि पुढचा प्लॅन ठरवू म्हणत तिथे शिरलो. मेन्यू कार्ड मध्ये पुन्हा भारतीय पदार्थ होते बरेच, आम्ही खाऊन निघालो होतो, त्यामुळे फक्त केक आणि कॉफीच घेणार होतो, त्याचीच किंमत अल्मोस्ट जेवणाइतकी झाली. तेवढ्यात एक शेफचा अॅप्रन घातलेला भारतीय माणूस आमच्याकडे आला. हॅलो, नमस्ते म्हणत आणि हिंदीतून बोलायला लागला. कुठून आले, फिरायला आले का अशा गप्पा झाल्या. तो मूळचा दिल्लीचा, लाटव्हियाला होता आणि दोन महिन्यांपूर्वीच आईसलँडला आला असं सांगत होता. मग तो म्हणाला "तुम्हाला भारतीय खायचं असेल तर छान तिखट बनवून देतो. इथल्या लोकांसाठी, म्हणजे खरंतर स्थानिक नाही मुख्य पर्यटकच, सगळं कमी तिखट, कमी मसालेदार बनवावं लागतं. पण तुमच्यासाठी स्पेशल तिखट बनवेन." बहुधा बाहेरच्या वेट्रेसेस पैकी कुणीतरी त्याला जाऊन सांगितलं की बाहेर इंडियन गेस्ट आहेत, मग तो आला. आमच्या पोटात अजिबातच जागा नव्हती, आम्हाला काहीच नको हे सांगताना वाईट वाटलं, पण एका डिशची किंमत २५ युरोच्या आसपास असल्याने केवळ त्याच्यासाठी घेऊन बघू अशीही हिंमत नव्हती. पण तो बोलायला आला हे खूप छान वाटलं, त्यालाही सांगितलं. असे लोक प्रवासात वेगळे रंग भरतात, त्याचं अगत्य नेहमीसाठी लक्षात राहील. मग एकीकडे कॉफी पीत जरा शोधाशोध केली. समोरच एक पफिन वॉचिंग टुर्स चं ऑफिस दिसत होतं. तिथे चौकशी केली त्यांची बस फुल झाली होती. इतर काही बोट टूर्स होत्या, पण सृजन सोबत जरा कठीण होत्या. मग एक Beluga Whale Sanctuary दिसलं. शिवाय जवळच एक डोंगरावर जाणारा रस्ता दिसत होता, तिथेही काही लोक पायी जाताना दिसत होते. मग आधी या Whale Sanctuary मध्ये जाउ, म्हणजे सृजनला पण आवडेल आणि मग हवं तर त्या डोंगरावर जाऊ असा विचार करून बेलुगा मध्ये शिरलो.
हे खरंतर पफिन रेस्क्यू सेंटर आणि aquarium पण आहे, तिथल्या एका बाईच्या हातात नुकतंच जन्माला आलेलं एक पफिनचं पिल्लू होतं, इतकं लहान की ते तिने मुठीत झाकून ठेवलं होतं, झाकली मूठ पफीन पिल्लाची असं म्हणू शकू. :P
आम्ही तिथे होतो त्या पूर्ण वेळात तिने ती मफिन तसंच धरून ठेवलं होतं. मला स्वतःला प्राणी-पक्षी हे दुरून बघायलाच बरे वाटतात, पण इतक्या प्रेमाने त्यांना सांभाळणार्या लोकांबद्दल आदर वाटतो. फार काही मोठं नाही हे, शाळेच्या वयाची मुलं असतील तर त्यांना कदाचित कंटाळा पण येऊ शकेल कारण अगदी पंधरा-वीस मिनीटात पूर्ण बघून होऊ शकतं. त्यामानाने तिकीटाचे पैसे जास्त वाटू शकतात, पण यांच्या तिकीटाचे पैसे हे देखील या पफिन्स आणि इतर समुद्री प्राणी-पक्षी यांच्या काळजी आणि देखभालीकरता वापरले जातात हा एक आनंद आणि सृजनच्या वयाला अगदीच आवडेल असं होतं. आणि खरं तर आम्हाला पण खूप आवडलं. एक तर गर्दी अजिबातच नव्हती, त्यामुळे आम्ही प्रत्येक ठिकाणी बराच वेळ थांबून मग वेगवेगळ्या माशांचे रंग, हालचाली टिपत बसलो होतो.
सृजनसाठी हाही पहिलाच अनुभव होता. फिश, स्टारफिश, आणि हे पफिन (जे त्याच्या मते क्वॅक क्वॅक बदकच होते) ते सगळेच पुस्तकात/टीव्हीवर पाहिलेले किंवा खेळण्यातले, इथे प्रत्यक्ष तो पहिल्यांदाच बघत होता. त्यांची जागा उंचावर होती, आणि आम्ही उभं राहून सहज त्यांना पाण्यात खेळताना बघू शकत होतो. त्यांना त्यांच्या नॅचरल हॅबिटॅट मध्ये बघण्याइतकंच इथेही आवडलं. दर थोड्या वेळाने ही पफिन्स पाण्यात यायची, फडफड पाय हलवून पाण्यात डुंबायची आणि परत पाण्याबाहेर यायची. मग पंख फडफडवून स्वतःला सुकवून पुन्हा पाण्यात डुंबायला यायची. हा खेळ बघत आम्ही फारच रमलो.
काही व्हिडीओ पण इथे बघता येतील.
इथे आमच्यासोबत अजून २-४ लोक होते फक्त, त्यामुळे सगळा होल वावर इज अवर्स म्हणत छान बघता आलं. इथेच १९ जूनला २ मोठे बेलुगा व्हेल्स येणार होते, त्याची तयारी चालू होती, त्यांना इथे आणणे, त्यामागची कहाणी आणि इथलं त्यांचं adaptation याबद्दल माहिती लिहीलेली होती. हे दोन्ही व्हेल्स हे मग इथलं मुख्य आकर्षण असेल.
बराच वेळ घालवला तरी अजून ३ च वाजले होते. मग आता आजूबाजूला फिरू असा विचार करून निघालो. इथेही ठिकठिकाणी ल्युपिनची जांभळी फुलं होती. इतर फुलंही होती. हाही पूर्ण लाव्हाच होता. इथे ज्या पायवाटा केल्या आहेत, त्यावरूनच चाला हे लिहीलेले आहे. कारण हा खडक वेगळा आहे, त्यावर उगवणारं मॉस (एक प्रकारचं गवत) उगवायला वर्ष लागतात पण आपल्या पायांनी ते क्षणात उध्वस्त होतं, आणि पुन्हा अनेक वर्षं मग तिथे काही उगवत नाही. त्यामुळे इथेच नाही, संपूर्ण आईसलँड मध्ये या मॉस वर न चालण्याबाबत नियम आहेत आणि ते पाळायला हवेत. १९७३ मध्ये या बेटावर जवालामुखीचा उद्रेक झाला होता. सुदैवाने यात फक्त एक माणूस गेला, बाकी सगळे लोक सुखरूप राहिले. बहुतांशी लोक बेटावरून मुख्य आईसलँडकडे गेले, पण इथल्याच काही लोकांनी अनेक प्रयत्न करून, पाण्याचा मारा करून तो लाव्हा फार पुढे येण्याच्या आत आटोक्यात आणला आणि हे बेट पूर्ण उध्वस्त होण्यापासून वाचवलं. शिवाय लाव्हा थंड झाल्यावर सगळे स्थानिक परत या बेटावर राहायला आले. या लोकांची ज्वालामुखीसारख्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्याची जी सकारात्मकता आहे ती वाखाणण्यासारखी आहे.
डोंगरावरून ही एक जागा दिसली, ज्यात एक चर्च दिसत होतं आणि बसायला बाक पण होते, मग खाली उतरून मोर्चा तिकडे वळवला.
हे नॉर्वे कडून भेट मिळालेलं चर्च असं काहीसं याबद्दल लिहीलं होतं. या चर्च जवळ काही जण फॅमिली फोटोशूट करत होते. पण नंतर तेही गेले. एकीकडे समुद्र होता, बंदरावर बोटींची ये-जा चालू होती, पाण्यात बदकं खेळत होती, कितीतरी वेगळे पक्षी दिसत होते. पाणी किनार्यावर आदळून होणारा आवाज, या पक्षांचे मधूनच येणारे आवाज याशिवाय निव्वळ अतीव शांतता होती. कुणा चित्रकाराच्या हातून इथे नक्कीच काही चित्र रेखाटली गेली असती किंवा कुण कवी-कवयित्रीने कविता रचल्या असत्या. बाजूचं चर्च बंद होतं, पण तरीही मनात तिथल्या घटांचा आभासी आवाज घुमत होता. या अशा जागा, तिथला हा असा म्हटलं तर अगदी साधा, सहज पण अविस्मरणीय अनुभव आपल्याला मिळाला याबद्दल कृतज्ञता वाटत होती.
नंतर समोरच्या डोंगरावर काही मेंढ्या चढल्या होत्या, त्या तिथे कशा चढल्या माहीत नाही पण त्या इकडे तिकडे बागडत पळत होत्या आणि इतक्या उतारावरून त्या पडल्या तर काय अशी भीती पण वाटत होती.
आता थंडी वाढत होती, मग सरळ लवकरच फेरीसाठी येऊन थांबलो. एका ठिकाणी हे दिशादर्शक पफिन्स दिसले.
येताना पुन्हा तो भारतीय शेफ दिसला, तेव्हा तो इथे लोकच नाहीत, कुणी बोलायला नाही, शिवाय हे आईसलँड पासूनही तेवढं जवळ नाही, पाऊण तासांची फेरी, त्यामुळे खूप कंटाळा येतो असं तो म्हणत होता. भारतातून युरोपातल्या अगदी गजबजलेल्या शहरात जरी आलो, तरीही सुरूवातीला हे होतंच. त्यात आईसलँड सारखा अजूनच कमी लोकसंख्येचा देश, त्यातल्याही एका वेगळ्या बेटावर तो आल्यामुळे त्याच्या भावना नक्कीच समजू शकत होत्या. त्याला पुन्हा बाय करून निघालो.
परत जाताना काहीच गर्दी नव्हती. इथल्या स्थानिक बायका फेरीतही विणकाम करत होत्या. आईसलँडची लोकर पण प्रसिद्ध आहे, पर्यायाने विणकाम हा एक महत्वाचा उद्योग पण.
Westman Islands म्हणजे अजिबात माहिती न काढता जाऊन मिळालेला अतिशय सुखद धक्का होता. शिवाय नेहमीप्रमाणे टिपीकल स्थळांपेक्षा एक वेगळं ठिकाण बघायला मिळाल्याचा आनंद पण होता. फेरीतून उतरल्यावर तिथे आम्ही फक्त अर्धा किलोमीटर परिसरातच फिरलो, पण त्यातच खूप समाधान मिळालं होतं. दुसर्या दिवसाचा बेत ठरलेला होता, पुढच्या भागात Reynisfjara आणि skogafoss बद्दल.
तळटीपः
अनेक लोक इथे मुक्कामाला येतात, पफिन्स बघण्यासाठी इथल्या अंतर्गत भागात ट्रेल्स आहेत किंवा बोट टुर्स आहेत, ते करता येतात. यातल्या काही ठिकाणी लहान मुलांना नेता येत नाही, पण खास वेळ काढून या ठिकाणी जायला हवंच.
इथल्या १९७३ सालच्या ज्वालामुखी बद्दल नंतर पाहिलेल्या एका documentary ची लिंक लवकरच अपलोड करेन. त्यात अजून माहिती बघता येईल.