लाल चौकोनी दिव्यांची अखंड मोहनमाळ
चहूबाजूंनी कर्कश्श उतू जाणारा पाऊस
काचांवर, पत्र्यांवर, सिमेंटच्या मातीवर
भर पावसाळ्यात पानोपानी वठलेले एक झाड
कुजणाऱ्या गवताचा गोडूस, रानटी गंध
चांदणं हरवून बसलेला एक स्तब्ध चौक
विझलेली नजर आणि शिवशिवणारे हात,
चौकोनाच्या आत, चौकोनाच्या वर
रग लागलेल्या गर्दीचे उभे दमट पाय
समोर काचेच्या तड्यांत फुटलेला एक सूर्य
अचानक उतारातून टोळीने घसटणाऱ्या
गुबगुबीत मेंढ्या, प्रत्येकीवर एक लाल ठिपका
रस्ताभर डबडबलेले कुणा डोळ्यातले पाणी
अंगभर फुललेला थंड, टिपूर काटा
कानात मायकल ओरडतो, beat it!