मुक्तछंद

सूर्यबलक

डबडबलेल्या अंधारावर
पांढरेधोप जाळीदार आकाश
त्यात ओघळणारा सूर्य
थोडे गुलबट ढगांचे तुकडे
आणि किरमिजी पक्ष्यांची पखरण
हलकेच वाहणारा खारा वारा
त्यावर स्वार गच्च हिरवी पाने
तांबड्या मातीचा धुरळा
आजचा कुरकुरीत आसमंत!

(सौजन्य: आजचे चविष्ट ऑम्लेट :P )

Keywords: 

कविता: 

चांदणी चौक

लाल चौकोनी दिव्यांची अखंड मोहनमाळ
चहूबाजूंनी कर्कश्श उतू जाणारा पाऊस
काचांवर, पत्र्यांवर, सिमेंटच्या मातीवर

भर पावसाळ्यात पानोपानी वठलेले एक झाड
कुजणाऱ्या गवताचा गोडूस, रानटी गंध
चांदणं हरवून बसलेला एक स्तब्ध चौक

विझलेली नजर आणि शिवशिवणारे हात,
चौकोनाच्या आत, चौकोनाच्या वर
रग लागलेल्या गर्दीचे उभे दमट पाय

समोर काचेच्या तड्यांत फुटलेला एक सूर्य
अचानक उतारातून टोळीने घसटणाऱ्या
गुबगुबीत मेंढ्या, प्रत्येकीवर एक लाल ठिपका

Keywords: 

कविता: 

सांगाती

मी एकटी नाही
तो आहे सोबतीला.
कधीकधी वाटतं तो निघून गेला, कायमचा.
पण तो उडत येतो पुन्हा
एखाद्या काळोख्या पहाटे किंवा टळटळीत दुपारी
किंवा श्वास कोंडून टाकणाऱ्या संध्याकाळच्या सावल्यांत.
सगळ्यांना नकोसा एक पक्षी
माझं दुःख, वेदनेचा पक्षी.
त्याच्या बंद गळ्यातून कधीच निघत नाही सूर
फक्त झुलत रहातो माझ्या धमनीच्या हिंदोळ्यावर.

- माझा आवडता कवी-लेखक चार्ल्स बुकोवस्कीच्या companion कवितेवर आधारित.

Keywords: 

कविता: 

आपापलं ऊन

कॉफीची फिकी वर्तुळे उमटलेला उन्हाळा
आळशी दुपारी छेडलेल्या गिटारच्या तारा
आणि टेबलावर बर्फ चमकणारा ग्लास

निळ्या खिडकीतून येणारा चोरटा सूर्य
शुभ्र नक्षीदार पडद्यातून फाकत उजळ रेषा
पसरत राहतो खोलीभर मिटवत पापण्या

दरवळतात आपले आवडते सगळे गंध
समुद्र, कॉफी आणि आंब्याचा मोहोर
प्रत्येक श्वासाने वाहणाऱ्या माझ्या धमन्या

आणि एक दिवास्वप्न
शांत, मग्न तळ्याकाठी
थांबून वाट बघणारे..

मग जमण्यासारखी एकच गोष्ट जमते
डोळे उघडे ठेवून बघत रहाते रहदारी
तुझ्या चमकत्या डोळ्यांत बघितल्यासारखी..

Keywords: 

कविता: 

Subscribe to मुक्तछंद
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle