नृत्य.. समाधी..

नाच करताना एक समाधी लागते.. ती खरं तर कोणालाच सांगता येत नाही.. पण सगळ्याचाच विसर पडतो..

अगदी तैया तै पासून नवीन शिकण्याचा, आत्मसाद करण्याचा आनंद वेगळा.. ते छान जमलं की तो आनंद वेगळा..

साहित्य करताना प्रत्येक स्टेप एक नवीन काहीतरी मिळवून देते.. आणि आज जे मिळतं त्याहुन अधिक उद्या मिळतं.. स्वत: स्वत:ला सापडत जातो.. नवनवीन शोध लागतात.. अनेक जाणिवा समृद्ध होतात..

माझी नाटकाची आवड बघता मला नृत आणि नृत्यापेक्षा नाट्य हा नृत्यप्रकार आवडेल असं वाटायचं .. तो आवडतोच.. पण नृत आणि नृत्यही तेवढेच आवडतात..

नृत करताना लावावी लागणारी एनर्जी, कोणतेही भाव त्यात नसतानाही बोलली जाणारी डोळ्यांची भाषा, आणि प्रत्येक ऍक्शनमधली ऍक्युरसी आणि सूत्रबद्धता.. त्याची मजा और.. ते करतच रहावं आणि मजा घेत रहावी.. दमून भागून जाईपर्यंत..

नृत्यामधला नृत आणि नाट्याचा संगम अजून वेगळा.. भाव तर ओतायचाच पण तरीही सगळं अगदी आखीव रेखीवच हवं.. लयबद्धता हवी.. त्यात बुडून जायला हवं.. तरच ते थोडंफार बाहेर येऊ शकेल.. जितकं करु तेवढं कमी.. जेवढी प्रॅक्टीस करु तेवढं नवं काही सुचत जाणार.. आणि प्रॅक्टीस कधी संपणारच नाही.. आणि कधी संपूही नाही.. :)

नाट्यामध्ये तर, लय आधी बेसिक धरुन ठेवायची.. तिला हलून न देता मग नाट्य सुरू करायचं.. ती हलतीये असं वाटलं तर नाट्याला हातच घालायचा नाही.. अभिनय तर महत्वाचाच .. पण नाटकातल्या अभिनयापेक्षा अगदी वेगळा.. नाचाच्या व्याकरणात राहूनच तो करायचा.. हे गणित जमायला हवं.. जितका विचार अधिक तितका नाच सुंदर.. जितकं बुडून जाणं अधिक तितके रंग भरणं अधिक.. जेवढं शेडिंग कराल.. कमीच वाटायला लागतं.. प्रत्येक कॅरॅक्टरचा विचार करून त्याच्या वेगळ्या अदा दाखवणं चॅलेंजिंग.. आणि वेशभूषेमध्ये काडीचाही बदल न करता क्षणात राम आणि क्षणात रावण दाखवता यायला हवेत.. त्या त्या ओळीला ते अंगात भिनायला हवेत.. आणि अख्खं नाट्य डोळ्यासमोर उभं रहायला हवं.. तीच तुमच्या नाचाची ताकद..

माझा नाच हा फक्त आणि फक्त माझ्यासाठीच असतो.. तो कोणाला दाखवावासा वाटत नाही.. शोज तर आजिबात नकोत.. परिक्षा नको.. कारण मग तुलना सुरु होते.. स्पर्धा येते.. माझ्या आनंदाचं मूल्यमापन सुरू होतं.. कोणीतरी माझ्यापेक्षा उत्तम नाचतं हे जितकं त्रासदायक त्याही पेक्षा मी कोणापेक्षा तरी बरी नाचते हे जास्त मारक..

त्यात शोध संपतो.. आनंद संपतो.. परफ़ॉर्मन्स सुरु होतो.. आणि समाधी भंग पावते..

सायली

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle